परमात्म्याची उपासना करीत असूनही किंवा सद्गुरूंच्या सहवासात असूनही जे त्यांच्या आधारावर भौतिक जीवनच सुखाचं करू पाहतात; किंबहुना भौतिकापुरताच ज्यांना त्यांचा आधार हवा असतो त्यांना समर्थ दुरात्मा, महानष्ट, चांडाळ म्हणून आता फटकारत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि गुरूच्या युतीला ‘चांडाळ योग’ म्हणतात. राहू हा अनैतिक कृत्याकडे वळवणारा ग्रह आहे, तर गुरू हा शक्तीप्रदायक ग्रह आहे. हे दोन्ही ग्रह एकत्र आले तर अनैतिक कृत्यासाठीची शक्ती वाढते, असं म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे उपासनेच्या शक्तीचा उपयोग ‘मी’पणा ओसरण्यासाठी झाला नाही तर, ती शक्ती ‘मी’पणा पोसण्यासाठी अर्निबधपणे वापरली जाते. अशा साधकाला समर्थ दुरात्मा म्हणत आहेत. म्हणजे खऱ्या आत्मिक प्रगतीपासून दूर करणाऱ्या गोष्टींत हा साधक गुंतून असतो. तो महानष्ट असतो म्हणजे जो महालाभ आहे, परमलाभ आहे त्यापासून तो स्वत:ला वंचित ठेवून आत्मनाश ओढवून घेत असतो. मनुष्य जन्माला येऊन निव्वळ खावं, प्यावं आणि चैन करावी असं ज्यांना वाटतं त्यांनी अवश्य तसं जगावं. त्या जगण्याचे ‘फायदे’ आणि तोटे दोन्ही स्वीकारावेत. निसर्गदत्त महाराज म्हणत ना? की, तुम्हाला पाप करायचं असेल तर अवश्य करा. पुण्याचे जसे परिणाम असतात तसेच पापाचेही परिणाम अटळपणे भोगावे लागतात. आपली अडचण ही की आपला पापांकडे म्हणजेच परम तत्त्वाला विसरून ‘मी’पणानं जीवन जगण्याकडे तर ओढा असतो; पण पापाचे परिणाम भोगायची आपली तयारी नसते. तरीही ठीक आहे. सर्वसामान्य माणूस त्याच्या त्याच्या आकलनानुसार जीवन जगत आहे. त्याचं जीवनध्येय भौतिक वाढवत राहणं, हेच आहे. पण जो अध्यात्माच्या मार्गावर आला आहे त्याचं काय? त्याचं ध्येय जर परमार्थ असेल आणि त्याचसाठी जो सद्गुरूच्या प्राप्तीसाठी धडपडत आहे किंवा जो सद्गुरू सहवासात आला आहे त्याचा जीवनव्यवहार हा त्या सामान्य माणसापेक्षा वेगळा असेलच ना? तो जर तसा नसेल आणि सामान्य माणसापेक्षाही तो कल्पनेत, भ्रमात, मायेत, मोहात, वासनेत म्हणजे हवं-नकोपणात अधिक गुंतत असेल, तर तो सद्गुरूंच्या प्राप्तीचं खरं महत्त्व जाणतच नाही, तो महानष्ट, दुरात्मा आणि पापीच आहे.

आता सद्गुरू बोध हाच ज्याचा जीवनाधार झाला आहे त्याची आंतरिक स्थिती कशी होते, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १२७व्या श्लोकात सांगत आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ आपण जाणून घेऊ  आणि मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।

कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला।

देहेभावना रामबोधें उडाली।

मनोवासना रामरूपीं बुडाली।। १२७।।

प्रचलित अर्थ : जो राम सुखानं सुखस्वरूप झाला, श्रीरामाचे गुणगान ऐकून जो तन्मय झाला, रामबोधानं ज्याची देहवासना बुद्धी नष्ट झाली व ज्याच्या वासना रामरूपी लीन झाल्या असा अंतर्बाह्य़ रामरूप झालेला भक्त जगात धन्य आहे.

मनुष्यजन्माचं खरं ध्येय काय आहे, हे या श्लोकात समर्थानी सांगितलं आहे आणि या ध्येयप्राप्तीच्या दिशेनं वाटचाल कशी करावी, हे ध्येय साध्य कसं करावं, हे सांगायला पुढील श्लोकापासून सुरुवात होणार आहे. समर्थ सांगत आहेत की, रामसुखानं जो तृप्त झाला तोच या जगात धन्य आहे, त्याच्या कथांमध्ये जो तल्लीन झाला तोच धन्य आहे, ज्याचा देहभाव रामभावानं उडून गेला तोच धन्य आहे आणि ज्याच्या मनाचं हवं-नकोपण रामरूपातच लय पावलं, तो धन्य आहे!

पण हे रामसुख म्हणजे काय, रामबोध म्हणजे काय, रामकथा म्हणजे काय आणि रामरूप म्हणजे काय? जोवर हे उकलत नाही तोवर खरा अर्थही उकलणार नाही.

 

 

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!