जे. कृष्णमूर्ती  यांच्याकडे त्या पोलीस अधिकाऱ्यानं मागणं मागितलं की, ‘‘मला आत्मशांती हवीय.’ आपण सत्पुरुषाकडे अशाच भल्यामोठय़ा मागण्या करतो. कधी त्या नकळत असतात, उत्स्फूर्त असतात.. पण बरेचदा जाणीवपूर्वक मोठय़ा असतात. आपल्या मागणीतूनही आपलं (असलं-नसलेलं) मोठेपण इतरांवर बिंबवण्याचा एक प्रयत्न असतो. ‘मला आत्मसाक्षात्कार व्हावा’, ‘मला परमसुख लाभावं’, ‘मला मोक्ष लाभावा’, अशा प्रकारच्या या मागण्या असतात. इतरांना वाटावं, ‘आम्ही प्रापंचिक मागण्याच करतो, पण हे खरे महान साधक आहेत हो! यांना मोक्ष सोडून काहीही नकोय!’ त्या वेळी सत्पुरुष मात्र मनात हसत असतो, कारण हाच ‘मोक्षेच्छू’ जन्मभर प्रापंचिक मागण्याच करीत राहील, प्रापंचिक रडगाणंच गात राहील, हे त्याला माहीत असतं. जो मागण्या करीत जातो, असा शिष्य आणि जो शिष्याची प्रत्येक मागणी पूर्ण करीत जातो तो गुरू; हे दोघेही अपूर्णच असतात, असं महाराजांचं एक सूत्रवचन आहे! हा ‘मोक्षेच्छू’ साधकही भौतिक अनुकूलतेतच भगवंताची कृपा जोखत असतो. पेठेकाकांनी कुठेसं लिहिलंय की, मुलाला नोकरी मिळाली, मुलीचं लग्न ठरलं की, ‘महाराजांची कृपा आहे,’ असं वाटतं; पण समजा प्रवासात मोटार बंद पडली तर कुणी म्हणतं का, ‘की काय महाराजांची कृपा आहे पाहा, ऐन घाटात गाडी बंद पडल्ये!’ पण पुढे गेलेली वाहनं एखाद्या भीषण अपघातात सापडली की मात्र ‘कृपे’वर लगेच शिक्कामोर्तब होतं!

तेव्हा भौतिकातील अनुकूलता, प्रतिकूलता हाच कृपा वा अवकृपेचा मापदंड असताना मोक्ष, अनाहद नाद, तुर्यावस्था, ब्रह्मभाव अशा तोंडी मागण्या नुसत्या करून काय लाभ? त्या मागणीशी सुसंगत असं जीवन तर असलं पाहिजे? सत्पुरुष ही जाणीव करून देतात. प्रथम इच्छेला नाकारत नाहीत, तर ती व्यापक असावी, एवढंच सुचवतात. ती व्यापक इच्छा तोंडून उमटू लागली की मग संकुचित जगण्याकडे बोट दाखवतात! मोक्षाची इच्छा असेल, तर लहानसहान गोष्टींतलं अडकणं थांबलं पाहिजे. आत्मज्ञानाची इच्छा असेल, तर अज्ञानमोहातलं गुंतणं कमी झालं पाहिजे. ब्रह्मभावाची इच्छा असेल, तर देहभाव कमी व्हावा, अशी तळमळ जागली पाहिजे. एक निश्चित की, स्बळावर आणि स्वप्रयत्नानं हे साधणार नाहीच, पण म्हणूनच तर सत्पुरुष आपल्याला पेलवेल, असे बदल सुचवतात. प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक त्या बोधानुसार आपल्या वर्तनात सुधारणा करीत गेलो, तरी खरी प्रामाणिक वाटचाल सुरू होईल. अल्पसंकल्पात अडकलेल्या, अशाश्वतात गुरफटलेल्या, संकुचिताची चटक लागलेल्या जीवाला जर सत्यसंकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्न करायचे असतील, तर त्याला आधी जे जे अशाश्वत आहे त्याचा मनानं त्याग साधावा लागेल. जे जे भ्रम आणि मोह पोसणारं आणि त्यायोगे मानसिक क्लेशात भर घालणारं आहे त्याचा त्याग करावा लागेल. आपलं मन कुठे आणि कसं गुंततं याचा थोडा प्रांजळ शोध स्वत:शीच आणि स्वत:पुरता घ्यावा लागेल. संतसत्पुरुषांचा बोध खरं तर त्यासाठी दिशादर्शकच असतो. आता जे मन मोहाचा, भ्रमाचा, असत्याचा, अशाश्वताचा त्याग करण्याची शाब्दिक तयारी तरी दाखवत आहे त्या मनानं पहिली काळजी काय घ्यायला हवी? तर समर्थ सांगतात, ‘‘जनीं जल्प विकल्प तोही त्यजावा। रमाकांत येकांतकाळीं भजावा।।’’ ‘जनी’चे दोन्ही अर्थ इथे लागू आहेत. जनी म्हणजे संतजनांशी आणि जनी म्हणजे लोकांशी. तर लोकांशी व संतसत्पुरुषांशी निर्थक वाद वा विकल्पापायी होणारे वाद घालू नयेत. तसंच भगवंताशी असलेला भावसंवादही एकांतात करावा. भक्तीचं प्रदर्शन मांडू नये.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा