सद्गुरूंच्या संभाषणानं म्हणजेच बोधानं संदेह मोडतो, असं समर्थ सांगतात. आणि हा संदेहही कसा आहे? तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे तो मुळातच नष्ट आहे, म्हणजे न टिकणारा आहे. तरीही तो तकलादू संदेह आपल्या मार्गातला मोठा अडसर आहे. हा संदेह कशाबद्दलचा आहे? तर तो परमार्थाबद्दलचाच आहे! पारमार्थिक पुस्तकं अनेकजण वाचतात. गीतादि ग्रंथ असोत की नवनाथ पोथीपासून दासबोध, ज्ञानेश्वरीपर्यंतचे ग्रंथही अनेकांच्या पारायणात असतात. त्यामुळे अध्यात्माचे शाब्दिक ज्ञान या भूमीतील अनेकांना असतेच.

पण तरी ते ज्ञान प्रत्यक्ष जगण्यासाठीचं आहे, ते जगण्यात उतरलं पाहिजे, आपल्या जगण्यात त्याचा प्रत्यय आला पाहिजे, असं कितीजणांना वाटतं? तर बहुतांश जणांना ते ज्ञान प्रत्यक्षात उतरेल, असं वाटत नाही. ते प्रत्यक्षात उतरणं अशक्य आहे, हीच अनेकांची भावना असते. यामागचं कारण संदेह! त्यांच्या मनात संशय असतो की हे ज्ञान जगण्यात आलंच, तर आपल्याला नीट जगता तरी येईल का? भले आपण सर्वात्मक भावानं, सर्वामध्ये एकच परमात्मा भरून आहे, या भावानं इतरांशी वर्तन करू, पण इतर जण माझ्याशी तसंच वागतील का? एक माणूस स्वत:ला उंदीर मानून भयग्रस्त जिणं जगत होता. अखेर त्याच्यावर बरेच मानसोपचार झाले. त्या उपचारांना यश आलं. ‘तू उंदीर नाहीस, माणूस आहेस,’ हे तज्ज्ञांचं सांगणं अखेर त्याच्या गळी उतरलं. मानसोपचारतज्ज्ञानं त्याला सदिच्छांसह निरोप दिला. तो माणूस घरी जायला निघाला आणि काही क्षणांतच धावत परतला. मानसोपचारतज्ज्ञानं आश्चर्यानं विचारलं, ‘‘काय झालं?’’ तो माणूस घाबरून म्हणाला, ‘‘डॉक्टरसाहेब बाहेर रस्त्यावर मोठं मांजर बसलं आहे..’’ तज्ज्ञ म्हणाला, ‘‘अरे पण तू उंदीर नाहीस माणूस आहेस ना? मग घाबरतोस कशाला?’’ त्यावर घाबऱ्याघुबऱ्या स्वरात तो माणूस म्हणाला,‘‘अहो मी उंदीर नाही माणूस आहे, हे मला माहीत आहे, पण त्या मांजराला कुठे हे माहीत आहे?’’  तसं होतं आपलं. ज्ञानानुसार मी जगात वावरीनही, पण जग तसं माझ्याशी वागणार नाही, या भावनेचा पगडा अधिक असतो. कारण मुळात सर्वत्र भगवंत आहे, या भावनेनं जगात वावरायचं म्हणजे काय, हेच आपल्याला समजत नाही. हे जग द्वंद्वात्मक आहे. म्हणजे सुख आहे आणि दु:खही आहे, यश आहे आणि अपयशही आहे. अशा या द्वंद्वात्मक जगात निर्द्वद्व होऊन जगण्याची आपल्याला ओढ असते. आपल्या प्रयत्नांनीच सुख प्राप्त होईल, असंही वाटत असतं. हे सुख भगवंतापाशीच आहे, असं संत सांगतात, पण आपल्या मनात त्याबद्दल संदेह असतो.

जगाला आपण सुखाचा आधार मानतो. जग आपल्याला खरं वाटत असतं. भगवंत मात्र तेवढा खरा वाटत नसतो. ‘प्रयत्न आटोकाट करा, पण फळ भगवंतावर सोडून जे होईल त्यात संतोष माना,’ असंच संत सांगतात. पण त्याबद्दलही मनात संशय असतो. जेव्हा खरा सत्संग लाभतो, खऱ्या सद्गुरूचा सहवास लाभतो तेव्हा त्यांच्या बोधानंच अनेक संदेह मावळू लागतात. जग मिथ्या आहे, म्हणजे नेमकं काय, ते मिथ्या असेल, तर सर्वत्र भगवंत भरून आहे म्हणजे काय, त्या भगवंताच्या आधारावर जगायचं म्हणजे काय, आपल्या जन्माचा खरा हेतू काय, मनुष्य जन्माला येऊन खरं काय साधलं पाहिजे आणि ते साधता येईल का, याविषयीचे सर्व संदेहही सद्गुरू बोधानं हळूहळू मावळू लागतात. खऱ्या सद्गुरूशिवाय मात्र हे संदेह दूर होऊ  शकत नाहीत. कारण जोवर खऱ्या अर्थानं जो स्व-स्थ आहे त्याची गाठ पडत नाही तोवर या शंकांचं खरं निराकरण होत नाही आणि मनाला खरी स्वस्थता लाभत नाही. हा स्व-स्थ म्हणजेच सद्गुरू कसा आहे, त्याची लक्षणं १३४व्या श्लोकात समर्थ सांगत आहेत.