सद्गुरूंच्या दर्शन आणि स्पर्शानं आंतरिक जीवन धारणेत मोठाच पालट सुरू होतो आणि त्यांच्या संभाषणानं म्हणजेच बोधानं मनातल्या सर्व शंका मावळून समस्त संदेह नष्ट होतात. याला अट एकच की तो सद्गुरू खरा पाहिजे आणि ते दर्शन, स्पर्शन आणि संभाषणही वास्तविकच असलं पाहिजे. म्हणजे काय? खऱ्या सद्गुरूची लक्षणं आपण १३४व्या श्लोकाच्या विवरणात जाणून घेणार आहोतच. म्हणून खरं दर्शन, स्पर्शन आणि संभाषण म्हणजे काय, हे परत लक्षात घेऊ. सद्गुरू काळे आहेत की गोरे, शहरी आहेत की गावाकडचे.. आदी गोष्टी पाहणं हे त्यांचं खरं दर्शन नाही. त्यांच्या अंत:करणातली परमात्म्यासाठीची तळमळ पाहता येणं, त्यांच्या जीवनात उतरलेली एकरसता. एकमयता, परमात्म ऐक्य पाहता येणं हे सद्गुरूंचं खरं दर्शन आहे! अगदी त्याचप्रमाणे त्या परमात्म प्रेमाचा माझ्या जीवनाला स्पर्श होऊन जीवन धारणेत पालट होऊ लागणं, हे त्यांचं खरं स्पर्शन आहे. खरं संभाषण म्हणजे तेच ज्यामुळे जगणं संशयरहित होतं! संदेह हे देहाबरोबरच जन्माला आले असतात आणि देहबुद्धीद्वारेच पोसले जात असतात. आत्मज्ञानसंपन्न सद्गुरूच्या बोधाशिवाय देहबुद्धीची असमर्थता आणि फोलपणा उमगूच शकत नाही. जोवर देहबुद्धी कायम असते तोवर आत्मबुद्धी जागी होऊन त्यायोगे संशयरहित स्थिती लाभूच शकत नाही. आता ज्या सद्गुरूच्या बळावर या गोष्टी घडतात त्याची काही प्रमुख लक्षणं आता समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३४व्या श्लोकात सांगणार आहेत. तेव्हा प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

नसे गर्व आंगीं सदा वीतरागी।

क्षमाशांति भोगी दयादक्ष योगी।

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा।

इहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा॥१३४॥

प्रचलित अर्थ : गर्व नाही, सर्वकाळ तो वैराग्य संपन्न आहे, क्षमा व शांती नित्य त्याच्यापाशी आहेत. भूतदयेच्या कामी तो तत्पर आहे. रामचरणाचा अखंड योग त्याला साधला आहे. लोभ नाही, क्षोभ नाही आणि म्हणून ज्याच्या जीवनात दैन्यही नाही. या लक्षणांनी युक्त असा पुरुष योगीश्वर आहे, असे जाणा.

आता मननार्थाकडे वळू. जो खरा सद्गुरू आहे त्याची काही प्रमुख लक्षणं समर्थ सांगत आहेत. आज जे स्वत:ला सद्गुरू म्हणवून घेतात त्यातील किती जण या लक्षणांचा निकष लावला तर खरे उतरतात का, याची तपासणी ज्यानं-त्यानं करावी. पहिलं लक्षण म्हणजे त्यांच्या अंगी गर्वाचा लवलेशही नसतो. सर्वसामान्य माणसाच्या हातून एखादं कृत्य घडलं तरी त्याचा त्याला किती गर्व जडतो! ‘मी होतो म्हणून’, ‘मी केलं म्हणून’, अशा बढाया मारत तो यशाचं श्रेय आपल्याकडे घेऊ पाहतो. खरा सद्गुरू अनंत शिष्यांच्या जीवनात अनंत गोष्टी घडवतो. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे संकुचित ‘मी’पणाच्या डबक्यात रुतलेल्या जिवाला तो व्यापक जगायला शिकवतो! आणि एवढं करूनही तो याचं श्रेय कधीही स्वत:कडे घेत नाही, तर परमात्म्यालाच देतो! श्रीगोंदवलेकर महाराज ‘राम कर्ता’ म्हणत, समर्थ रामदास सर्व व्यवहाराला ‘भगवंताचं अधिष्ठान’ असलंच पाहिजे, असं म्हणत. खरा सद्गुरू सर्व कर्तृत्व असं भगवंताकडेच देतो! त्याच्या अंगी गर्व नसतोच, पण तो वीतरागीही असतो. वीतरागी म्हणजे जगासाठी अर्थात जगातल्या जिवांच्या हितासाठी अहोरात्र राबूनही जगाबद्दल जो पूर्ण उदासीन असतो तो! जगात आपलं नाव व्हावं, प्रसिद्धी व्हावी, अधिकाधिक शिष्य आपल्या पाठीशी असावेत, आपल्याला लोकाश्रय आणि राजाश्रयही लाभावा, अशा कल्पना त्याच्या मनात कदापि येत नाहीत. ज्यांच्या जगण्यात या कल्पनेनुसारची धडपड जाणवते ते भले कितीही प्रसिद्ध असोत, तरी खरे सद्गुरू नव्हेत! तेव्हा निगर्विता आणि भौतिकाबद्दलची उदासीनता, ही पहिली दोन लक्षणं झाली.