मनोबोधाच्या २८व्या श्लोकात नेमात राहाण्याचं महत्त्व समर्थानी प्रकट केलं, पण हा जो नित्यनेम आहे त्याचा थोडा विचार करू. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘नित्यनेम म्हणजे नित्याचा नेम!’’ किती सोपी आणि परिपूर्ण व्याख्या आहे ही.. मग जे नित्य आहे त्याच्या धारणेचा अभ्यास हाच नित्यनेम आहे.. आणि बरेचदा काय होतं की नित्यनेम करतानाच अनित्य असे अनुभव येऊ लागतात आणि तेच मोठी भुरळ पाडतात! तेव्हा नित्यनेम साधकानं किती जपून केला पाहिजे हे समर्थाकडूनच जाणून घेतलं पाहिजे. जुन्या दासबोधात रघुनाथ चरित्रात समर्थानी या नेमाबाबत फार मार्मिक विवेचन केलं आहे. ते थोडं पाहू. २८व्या श्लोकात समर्थानी काय सांगितलं? की जो नित्यनेमात आहे त्याला सद्गुरूंच्या पाठबळामुळे काळाचं भय नाही.. या रघुनाथ चरित्रात समर्थ सांगतात, ‘‘नाम जिव्हा जपे जयाची। तेथ प्राप्ती काय काळाची। आदि करूनि विरंची। विपरीत करू न शके।।३२।।’’ ज्याच्या मुखी सदोदित नाम आहे त्याला काळ काय बाधणार? काळाचं सोडाच, आदि करूनि विरंची.. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवादि देवसुद्धा त्याचं काही वाकडं करू शकणार नाहीत! पुराणात कथा आहेत ना? कुणी तपस्येला बसला की या देवांचा राजा जो इंद्र त्याला काय भीती वाटते! मग तो तपोभंग करायचे प्रयत्न करतो.. तसा माणूस साधनेला लागला की ‘इंद्र’ म्हणजे त्याची इंद्रियं किती खळबळ करतात! तरीही जो सतत नामाला चिकटून राहातो, साधनेला चिकटून राहातो, त्याला काळ आणि हे सारे देवदेखील  बाधू शकत नाहीत.. मग समर्थ सांगतात, ‘‘राम माझाचि नाहीं नेमिला। जे जे शरण गेले त्यांचाच जाला। परी रामासारिखा स्वामी फावला। तेचि धन्य संसारीं।।३५।।’’ अहो हा राम काही माझ्यापुरता नेमलेला नाही.. यातही नेम आहे बघा! तर रामाला केवळ मीच नेमानं प्राप्त करून घेतलं, असं नाही तर जो जो त्याला शरण गेला त्याचा त्याचा तो झाला! इथं समर्थानी आपला नेम अगदी स्पष्टपणे सांगितलाय, ‘शरणागती’! आणि शरणागती हे काही दुबळ्याचं काम नाही बघा.. अहो साधी कला, एखादी विद्या प्राप्त करून घ्यायची तर तिलाही शरणच जावं लागतं.. आपलं सर्वस्व विसरून तिचा ध्यास घ्यावा लागतो तेव्हा भौतिकातली साधी विद्याही अवगत होते.. इथं तर जो नित्य आहे त्याचीच नित्य प्राप्ती हवी आहे, मग सर्वस्व विसरून त्याचाच ध्यास नको? आणि असा ज्याला ध्यास लागला ना, त्यांच्या तो अधीन होतो! ‘‘जे जे शरण गेले त्यांचाच जाला।’’ त्या कृष्णाला गोपींनी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं ना? आणि महाराज काय म्हणाले? गोपींना कृष्णाला आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि त्यांचं भाग्य असं की तो भगवंतच निघाला! तेव्हा नुसत्या शरणागतीनं साधत नाही, नुसतं सर्वस्व अर्पण करून साधत नाही.. आपण ज्याला शरण जातो, ज्याला सर्वस्व अर्पण करतो तो खरा आहे का, याला महत्त्व आहे! म्हणून रामाला शरण गेलात आणि राम तुमचा झाला ना, अहो मोठं भाग्य आहे हो.. परी रामासारिखा स्वामी फावला। तेचि धन्य संसारीं।। राम म्हणजे दशरथाचा पुत्र राम, एवढाच अर्थ नाही.. जे कणाकणांत रममाण आहे ते व्यापक तत्त्व म्हणजे राम आहे.. तेव्हा कोत्या, संकुचित माणसाला शरण जाण्यानं काय लाभ? व्यापक, उदात्त, उन्नत असं जे आहे त्याला शरण जाण्यानं आपल्याही अंत:करणात व्यापकत्व प्रकट होतं.. आपणही धन्य होतो.. मग अशा परमतत्त्वाची भेट हवी ना? समर्थ विचारत आहेत.. ‘‘आतांही जयास वाटे भेटावें। रामें मज सांभाळीत जावें। ऐसें दृढ घेतलें जीवें। तरी ऐका मी सांगेन।।’’ अहो त्या परमतत्त्वाची आजही भेट होईल, ती हवी आहे ना? मग सांगतो ऐका..

-चैतन्य प्रेम

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…