सद्गुरू बोधानुरूप जो साधना आणि जीवन व्यवहार करीत आहे त्याच्या आंतरिक विकार स्थितीकडे श्रीसद्गुरूंचंच लक्ष असतं. साधनेच्या आड येणाऱ्या या षड्रीपुंना नियंत्रणात आणण्याची कला तेच शिकवतात. मनोबोधाच्या २९व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांचा हा मननार्थ आपण जाणला. या श्लोकाचे अखेरचे दोन चरणही फार अर्थगंभीर आहेत. या चरणांत समर्थ म्हणतात- पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।। या दोन चरणांतील ‘पुरी’ अर्थात अयोध्यापुरी, ‘सर्व’ आणि ‘विमान’ या तीन शब्दांना फार महत्त्व आहे. ‘अयोध्या’ हा शब्द एका व्यापक रूपकाचा बोध करतो, तर ‘विमान’ या शब्दालाही मोठं महत्त्व आहे. या एका चरणात राघवाच्या अर्थात श्रीसद्गुरूंच्या विशेष कार्याचंच सूचन आहे. प्रभु रामचंद्रानं अवतार समाप्तीच्या वेळी अयोध्यापुरीतील सर्वाना विमानातून साकेत या आपल्या परमधामी नेलं, ही पाश्र्वभूमी या चरणातून स्पष्ट होते. राम हा परमात्माच असला तरी, अवतीर्ण झाल्यावर अर्थात देहात प्रकट झाल्यावर ते सगुण रूप निसर्ग नियमानुसार मावळणं स्वाभाविकच होतं. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू देहात असले तरी त्या अवतार कार्याला त्यांनीच काळाची मर्यादा घालून घेतली आहे. त्यामुळे त्या दिव्य देहाचाही विलय आहेच. पण या अवतार समाप्तीनंतरही सद्गुरू भक्तांची कशी उपेक्षा करीत नाहीत, हे या श्लोकातून समर्थ सांगतात. २८व्या श्लोकात त्यांनी काय सांगितलं? की, सद्गुरू हा दीनानाथ आहे, त्यांना पाहून काळही घाबरतो, अर्थात काळाची त्यांच्यावर कोणतीही सत्ता चालत नाही. जो सदोदित नेमात आहे त्यालाच याची प्रचीती येते. आणि २९व्या श्लोकात त्यापुढचं पाऊल टाकत समर्थ म्हणतात, बाबा रे, काळाची सत्ता नसूनही हा सद्गुरू आपलाही देहातला अवतार संपवतो आणि काळाचा नियम अबाधित ठेवतो. त्याचवेळी तो आपल्या भक्तांचा सांभाळही करतोच! कसा? तर त्या राघवानं अवतार समाप्तीच्यावेळी अयोध्येतील सर्वाना विमानातून आपल्याबरोबर परमधामी नेलं होतं ना? आता अयोध्येतल्या ‘सर्व’ जीवमात्रांना राघवानं आपल्याबरोबर नेलं होतं, निवडक अधिकारी जनांना नव्हे, हे या चरणात स्पष्टपणे नमूद आहे. ‘सर्व’चा अर्थ जो जो अयोध्येत होता तो प्रत्येकजण! पशुपक्षीच नव्हेत, तर संतसज्जनांसह सामान्य जनही परमधामी गेले. अट एकच होती की त्यानं अयोध्येत असलं पाहिजे! आता या अयोध्येचं रहस्य काय आहे हो? ते जाणण्याआधी थोडं रामचरित्राचं रहस्य जाणून घेऊ. साधा प्रश्न आहे. रामाचा जन्म आधी झाला की रावणाचा? तर अर्थात रावणाचा! विद्वान, सर्वशक्तीमान आणि तपोबळ असूनही केवळ एका अहंकारामुळे रावण हा राक्षसवत् झाला. त्याच्या अधर्म, अनाचार आणि अत्याचारानं त्रलोक्याला ग्रासलं. देव बंदीवासात जखडले. ऋषी-मुनिंचा वध झाला. यज्ञ, व्रत, उपासना, पूजा-अर्चा अशा साधन परंपरेचा विध्वंस झाला. अगदी त्याचप्रमाणे अन्य प्राण्यांत नसलेल्या क्षमता आणि बुद्धी लाभूनही केवळ एका अहंकारानं माणूस दानववत् झाला आहे. प्राण्यांत माणसाइतक्या क्षमता नाहीत की माणसासारखी अतुलनीय बुद्धीही नाही, पण त्याच्यात अहंकारही नाही! त्यामुळे घोडा हा घोडय़ासारखा, गाढव हे गाढवासारखं, कुत्रा हा कुत्र्यासारखाच आहे. केवळ अहंकारानं ग्रासलेला माणूस हा दानवासारखाच झाला आहे! त्याच्यातली सात्त्विकता, तपस्या नष्ट झाली आहे. दशेंद्रियंरूपी रावणाची या देहावर अर्निबध सत्ता आहे. हे चित्र पालटायचं तर, दहा इंद्रियरूपी ‘दशरथ’ आणि कुशाग्र सद्बुद्धीरूपी ‘कौशल्ये’चं ऐक्य झालं पाहिजे.ते झाल्यावर या रावणाचा नि:पात करणारा ‘राम’ हृदयात जन्मतो. अर्थात परम चैतन्य शक्तीचा प्रवाह खुला होऊ लागतो. हे जिथं घडतं ते हृदय हीच ती ‘अयोध्या’ आहे!

 – चैतन्य प्रेम

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !