मनोबोधाच्या ३६व्या श्लोकाच्या पहिल्या चरणात समर्थ सांगतात, ‘‘सदासर्वदा देव सन्नीध आहे,’’ हा जो देव आहे, जो सद्गुरू आहे तो सदासर्वदा जवळ आहे. तरीही त्याची जवळीक जाणवत नाही. याचं कारण गेल्या भागाच्या अखेरीस सूचित झालंच आहे. हे कारण म्हणजे जग मला अधिक जवळचं वाटतं, अधिक माझं वाटतं, अधिक सच्चं वाटतं. या जगात सद्गुरू असतात आणि सुरुवातीला ते या जगाचाच एक भाग वाटत असतात. इतर माणसांप्रमाणेच मी त्यांना एक माणूस म्हणूनच जोखतो, पाहातो, जाणण्याचा प्रयत्न करतो. अर्थात यात गैर काही नाहीच, पण जो खरा सद्गुरू आहे तो इतर माणसांपेक्षा अनंत पटीनं किती वेगळा आहे, निर्लिप्त आहे, स्वयंभू आहे, हे मला उमगतंच असं नाही. कारण मी स्वत: या जगाच्याच वृत्तीनुसार स्वार्थप्रेरित, स्वार्थलिप्त आणि परावलंबीच असतो. माझ्यातल्याच मनोवेगांना शरण जात, त्या मनोवेगांनुसार उत्पन्न होणाऱ्या इच्छांच्या पूर्तीसाठी मी जगासमोर लाचार असतो. त्यामुळे श्रीमंत-गरीब, वरिष्ठ-कनिष्ठ, ज्ञानी-अज्ञानी असा कोणताही भेद न मानता सर्वाशी सद्गुरू ज्या समत्वानं वागतात त्या वागण्याचा संस्कार माझ्यावर सुरुवातीला होतोच असं नव्हे. त्यांच्या सांगण्यानुसार मी वागत नाहीच, उलट त्यांनीच माझ्या सांगण्यानुसार वागावं, असा प्रयत्न करीत राहातो. त्यामुळे प्रत्यक्ष देहानं जवळ असूनही मनानं मी त्यांच्यापासून खूप दूर असतो. मग देहानं ते दूर असले तर त्यांचं सान्निध्य जाणवणं तर आणखीनच कठीण. श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले, ‘‘मी सर्वत्र आणि सर्वज्ञ आहे, असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुमच्या हातून पाप होणारच नाही!’’ म्हणजेच सद्गुरू सर्वज्ञ असल्याचं आपण तोंडानं एकवेळ म्हणत असलो तरी त्या भावनेनं वावरत मात्र नाही! आता इथं पाप म्हणजे अशी कृती जी भगवंताच्या  अर्थात शाश्वताच्या स्मरणापासून मला दूर करत असते. मात्र अध्यात्म मार्गावर वाटचाल करायची तर सद्गुरूंचं आंतरिक सान्निध्य सदोदित जाणवणं फार आवश्यक आहे. इथं सद्गुरूंचं सान्निध्य म्हणजे नेमकं काय, याचाही विचार करू. सद्गुरूंचं सान्निध्य म्हणजे केवळ त्यांच्या देहाचं सान्निध्य नव्हे, तर त्यांचा जो विचार आहे तो माझा होणं, त्यांचं ध्येय हे माझं ध्येय होणं, त्यांची अपेक्षा ही माझी अपेक्षा होणं, त्यांना ज्या गोष्टीचं प्रेम त्या गोष्टीचं प्रेम मलाही लागणं, हे खरं सदोदितचं आंतरिक सान्निध्य आहे.. हाच खरा आंतरिक संग आहे. त्यांचा विचार आणि माझा विचार, त्यांचं ध्येय आणि माझं ध्येय, त्यांची अपेक्षा आणि माझी अपेक्षा यात भेद असेल आणि त्यांना ज्या गोष्टीचं प्रेम आहे त्या गोष्टीचं प्रेम मला नसेल, तर हा संग टिकणार नाहीच. उलट आंतरिक दुरावाच उत्पन्न होईल. सद्गुरूंचा आंतरिक संग जितका वाढू लागेल तितकी वाटचाल खरी होत जाईल. आपण अशाश्वतात किती गुंतलो आहोत, याची जाणीव होत जाईल. अशाश्वताचा मनावरचा प्रभाव ओसरू लागेल. जगाचं खरं स्वरूप उमगू लागेल आणि मग जगाला जितकं महत्त्व आहे तेवढंच ते दिलं जाईल. जगामागे धावणं थांबेल. पण हे सान्निध्य असूनही ते जाणवत नसतं तेव्हाच आंतरिक धैर्याची परीक्षा होत असते. जगातल्या झंझावातानं आपलं मन डळमळीत होत असताना सद्गुरूंआधी या जगातल्याच आधारांचीच चाचपणी सुरू होते. ते आधार मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरू होते. सर्व आधार फोल ठरतात तेव्हाच सद्गुरूंकडे आधाराच्या अपेक्षेनं दृष्टी जाते! मग त्या निराधार क्षणी सद्गुरू खरंच पाठीशी आहेत का, असा प्रश्न मनात उमटू लागतो. त्यांनी पाठीशी असावं, यासाठी मन तळमळू लागतं. राजसभेकडे द्रौपदीनं अनेक आर्जवं केली तोवर कृष्ण थांबला होता. अखेर त्याचाच धावा सुरू झाला तेव्हा त्यानं धाव घेतलीच!

– चैतन्य प्रेम