मौन हा विषयच असा आहे ज्यावर खूप काही बोलता येईल! याआधीही आपण मौनाचा मागोवा घेतला आहेच, पण आता परत ‘‘रघूनायकावीण बोलों नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो।।’’ या चरणांच्या अनुषंगानं थोडा वेगळ्या अंगानं विचार करू. या चरणाचा एक अर्थ गेल्यावेळी आपण पाहिला की,‘‘हे मना, सद्गुरूशिवाय अन्य काहीच बोलू नकोस आणि मनामध्ये सदोदित त्या सद्गुरूचाच निजध्यास राहू दे!’’ या चरणाचा आणखी एक अर्थ असा की, त्या सद्गुरूशिवाय अन्य काही बोलू नकोस आणि सद्गुरूशिवाय काही बोलायचं नाही, याचाच ध्यास अंत:करणात राहू दे! तर सद्गुरूशिवाय काही बोलूच नकोस, म्हणजे काय? व्यवहारात आपल्याला बरंच काही बोलावं लागतं. मग व्यवहाराचं बोलत असताना सद्गुरूंशिवाय काही बोलायचं नाही, म्हणजे नेमकं काय? इथं बोलण्याची आणखी सूक्ष्म पातळी अभिप्रेत आहे. व्यवहारात बोलावं लागतं ते व्यवहारापुरतं असतं. बाह्य़ जगात आपला वावर आणि आपलं बोलणं, हे खरं तर मर्यादितच असतं. पण त्या व्यवहाराबद्दल मनात जे चिंतन, मनन सदोदित सुरू राहातं ते आंतरिक बोलणंच असतं! एखाद्याशी आपलं वितुष्ट आलं आहे आणि त्याला भेटावंही लागणार आहे. तर आपण त्याच्याशी तेव्हा बोलू त्याला वेळेची मर्यादा असेल. पण त्याआधी त्याला काय काय बोलायला हवं, याचा मनात जो सदोदित विचार सुरू असतो ते आंतरिक बोलणं अमर्याद काळ सुरूच राहातं. तर व्यवहार हा व्यवहारापुरता करायचा, व्यवहाराला व्यवहारातल्या इतकंच महत्त्व द्यायचं पण तो चित्तात ठसू द्यायचा नाही, बुद्धी त्यानं माखू द्यायची नाही, मन त्यानं ग्रासू ्द्यायचं नाही, तसं होत असतं म्हणून आंतरिक पडसादही त्या व्यवहाराचेच उमटत राहातात. तर हे मौनातलं जे बोलणं आहे, आंतरिक.. आपलं आपल्याशी जे अखंड बोलणं आहे ते बाह्य़ जगानं व्यापण्यापासून प्रथम आवरायचं आहे! मनात कशाचं मनन सुरू आहे, चित्तात कशाचं चिंतन सुरू आहे, बुद्धीला कशाचा बोध होत आहे, याकडे सदोदित लक्ष ठेवायचं आहे. मनात अशाश्वताचं मनन सुरू असेल, चित्तात अशाश्वताचं चिंतन सुरू असेल, बुद्धी अशाश्वताचाच बोध करण्यात रमत असेल, तर ते थोपवायचं आहे. मनाला, चित्ताला, बुद्धीला सदोदित शाश्वताकडेच वळवायचं आहे. त्या शाश्वताचा प्रत्यक्ष आधार सद्गुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावाचून मनाला मननासाठी अन्य विषय नसावा, चित्ताला त्यांच्यावाचून चिंतनासाठी अन्य विषय नसावा, बुद्धीला त्यांच्यावाचून अन्य बोध नसावा, या वृत्तीनं आपण जगात वावरत आहोत ना, याची अखंड तपासणी हाच निजध्यास आहे! आणि असं मनन, चिंतन करीत गेल्यानं व्यवहार बुडणार नाही की व्यावहारिक हानीही काही होणार नाही, बरं का! कारण बरेचदा एखाद्या गोष्टीवर गरजेपेक्षा अधिक विचार करीत राहिलो तर योग्य निर्णय घेताच येत नाही आणि उलट निर्णयाचा गोंधळही उडतो. त्यामुळे शाश्वताच्या चिंतनानं अशाश्वताशी असलेला संबंधही उमगतो आणि त्या अशाश्वताचं नेमकं स्वरूप उमगल्यानं त्यात गरजेपुरतं राहून कर्तव्यंही चोख पार पाडता येतात. हे साधण्यासाठी स्थूलातलं जे बोलणं आहे त्याकडेही बारकाईने लक्ष द्यावं लागतं. आपलं जगणं बहिर्मुख आहे आणि आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकायचे आहे. त्यामुळे बाहेरून आत असा आपला प्रवास आहे. ही अंतर्यात्राच आहे ना? तेव्हा आधी बाहेरचं जे बोलणं आहे, स्थूलातलं जे  बोलणं आहे ते आवरायचं आहे. ते जसजसं आवरू लागेल तसतशी अंतरंगातल्या बोलण्याची व्याप्ती जाणवू लागेल. मग ते आंतरिक बोलणंही कमी करण्याची गरज भासू लागेल आणि त्यासाठीचा अभ्यास सुरू होईल.

चैतन्य प्रेम

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…