श्रीगोंदवलेकर महाराज यांनी मौनाच्या अभ्यासाबद्दल सांगितलंय की, बोलण्याआधी आपण जे बोलणार आहोत ते बोलणं खरंच आवश्यक आहे का, याचा विचार जरी केला तरी आपलं निम्मं बोलणं कमी होईल!  किती खरं आहे पहा.. कित्येकदा आपण नाहक गोष्टी खूप बोलत असतो आणि बोलण्यातून बोलणं वाढवतही असतो. कधी कधी असं होतं की वायफळ गप्पा सुरू असताना दुसऱ्यानं बोलणं थांबवलं तरी आपण ते सुरू करून देतो! आणि हे सारं बोलणं देहबुद्धीचं, आत्मस्तुती आणि परनिंदेचंच बहुतांश असतं. एखाद्याची स्तुती जरी आपण सुरू केली, तरी ‘सगळं कसं चांगलं आहे, पण’ असं एक ‘पण’च वळण लागलं तर त्याच्यातला अमका एक दुर्गुण सोडला तर तो खरंच किती चांगला आहे, असा सूर उमटवत बोलणं सूक्ष्म अशा निंदेतच रूपांतरित होऊ शकतं. बरं त्या आत्मस्तुती किंवा परस्तुतीमागेही स्वार्थ असतोच. परनिंदेत मत्सर, क्रोध असतो. तेव्हा आपलं बहुतांश बोलणं हे षट्विकारांनी ओथंबलेलं असतं, अहंप्रेरित असतं. जो नुसता बोलत बसतो त्याला बिचाऱ्याला कृतीला कुठून वेळ मिळणार? म्हणून समर्थ मनोबोधाच्या २३व्या श्लोकात ‘‘न बोलें मना राघवेंवीण कांहीं। जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं।।’’  हे पहिल्या दोन चरणांत सांगून मग अखेरच्या दोन चरणांत म्हणतात की, ‘‘घडीनें घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो।। ’’ हे आयुष्य प्रत्येक क्षणानं वाढत आहे आणि त्याचबरोबर जगण्याचा कालावधी प्रत्येक क्षणानं घटत आहे! जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन काळप्रवाहानं व्यापलं आहे. या काळाचा लघुत्तम घटक खरं तर त्रुटी आहे. त्रुटी म्हणजे पापण्यांच्या उघडझापीला लागतो तितकासा वेळ. त्यापेक्षाही कमी वेळाला निमिषार्ध असं आपण म्हणतो. तर कालाच्या इतक्या सूक्ष्म मापनाइतक्या सूक्ष्म चुकीला आपण त्रुटी म्हणतो. तर काळाचा लघुत्तम घटक त्रुटी आहे. तरी आपण स्थूलमानानं क्षणाला लघुत्तम घटक मानतो. तेव्हा हे आयुष्य क्षणा क्षणानं बनलेलं आहे. प्रत्येक क्षण क्षणात सरत आहे आणि काहीही केलं तरी गेलेला क्षण परत मिळवता येत नाही! प्रत्येक माणूस काही वर्षे जगतो. अर्थात प्रत्येकाचे जगण्याचे क्षण निश्चित आहेत. समर्थानीच म्हटलं आहे ना? की, ‘‘सरता संचिताचें शेष। नाहीं क्षणाचा अवकाश। भरतां न भरतां निमिष्य। जाणें लागे।।’’ (दासबोध, दशक ३, समास ९, ओवी ३). संचित आयुष्य सरलं की मग हा काळ क्षणभराचीही उसंत देत नाही. शेवटचे निमिष भरलं रे भरलं की जावंच लागतं! काळ काही पहात नाही की तुमच्यावर घर अवलंबून आहे का, एखाद्याच्या जाण्यानं तुमचं जगणं अवघड होणार आहे का, एखादी व्यक्ती तुमचा एकमेव भावनिक, मानसिक आधार आहे का.. काळ काहीही पहात नाही. त्याच्याइतका पक्का हिशेबी कोणी नाही. क्षणांचा हिशेब संपला की जगण्याचा हिशेब संपला! मग असं जर आयुष्य कोणत्या क्षणी भंग पावेल, हे सांगता येत नाही इतकं क्षणभंगुर आहे, तर त्या आयुष्याची संधी आपण नाहक बोलण्यात किती वाया घालवतो, याचा विचार मनाला कधी शिवणार? वायफळ बोलणंही सोडा, तत्त्वज्ञानावर, अध्यात्मावर, देवाधर्मावरही माणसं किती तासन् तास बोलण्यात रमतात. नुसतं बोलून काय उपयोग? नुसतं ऐकून काय उपयोग? नुसतं लिहून आणि दुसऱ्याला सांगून काय उपयोग? त्यातलं जगण्यात किती उतरत आहे, याकडेच लक्ष पाहिजे ना? आणि ते जर जगण्यात उतरायला हवं असेल तर प्रत्यक्ष प्रयत्नच अटळ आहेत ना? त्या प्रयत्नांसाठीच, त्या अभ्यासासाठीच तर हे आयुष्य मिळालं आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळ भरभर सरत असताना आपलं भिरभिरणं थांबलंच पाहिजे!

-चैतन्य प्रेम

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…