आयुष्य वेगानं सरत आहे, क्षणाक्षणानं काळ आयुष्य खात आहे आणि मग समर्थ विचारतात, ‘‘घडीनें घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो।।’’  एकदा आयुष्य संपलं की तुझी सोबत कोण करतो? इथं ‘सोडू पहातो’ च्या दोन अर्थछटा आहेत. म्हणजे बाबा रे, एकदा या देहातून चैतन्य गेलं की या देहाला जे माझेपणानं चिकटून होते तेच या देहाचा त्याग करतात! या देहाच्या आधारावर मी ज्यांच्याशी माझेपणानं चिकटून राहातो त्यांच्या देहातलं चैतन्य गेलं की मीदेखील त्या देहाचा त्यागच तर करतो.. आणि हे अगदी स्वाभाविक आहे.. मग देहाचा अंत ओढवल्यावर जे मला सोडणार आहेत आणि मी ज्यांना सोडणार आहे, त्याचं भान जगताना का बाळगू नये? आता ही गोष्ट नकारात्मक नाही. एका क्षणी हे सारं काही सोडून जायचं आहे, हे भान राहीलं तर जगण्याची जी अमूल्य संधी लाभली आहे तिचा कितीतरी सार्थ वापर सुरू होईल! आपण जगतो, पण खरंच आपण जगू शकतो याचं मोल आपल्याला उमगत असतं का? जोवर या देहाला काही होत नाही, जोवर एखादा आजार बळावत नाही, जोवर या देहाची तक्रार सुरू होत नाही तोवर या देहाचा आपण कसा वापर करत असतो? ज्या देहाच्याच आधारावर आपण जगतो, ज्या देहाचीच आपल्याला अनन्य गोडी आहे त्या देहाचीदेखील आपण खरी काळजी घेत नाही. खरे किंवा साधे आजार सोडा, आपले बरेचसे आजार हे आपल्या वागण्याच्या, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयींतूनही उद्भवतात. हे खाणं-पिणं शरीराला घातक आहे, हे माहीत असूनही ते सोडवत नाही इतकं आपलं देहापेक्षा मनावर अधिक प्रेम आहे. तेव्हा या जगण्याचा एकमात्र आधार असलेल्या देहाचं जिथं आपल्याला खरं मोल उमगत नाही तिथं जगण्याचं खरं मोल कसं उमगणार? तेव्हा देहांताचं, मृत्यूचं स्मरण बाळगून जगणं ही गोष्ट नकारात्मक नाही, उलट हे भान आलं, हे स्मरण राहीलं तर वेळेचा आणि क्षमतेचा अधिकाधिक योग्य वापर दक्षतेनं केला जाईल. मग हा देह गेला की या देहाचे म्हणून जे काही आणि जे कुणी आहेत त्यांचाही संग सुटणार आहे, हेच समर्थ ‘‘देहांतीं तुला कोण सोडूं पहातो।। ’’ या चरणातून सांगत आहेत. याच चरणाची दुसरी अर्थछटाही सखोल आहे. ती जणू सांगते की, एकदा आयुष्य संपल्यावर, देहांत झाल्यावर या देहापासून काय दुरावतं आणि काय दुरावत नाही, याचा विचार कर! देह सरला तरी या देहाच्या आधारावर पोसला गेलेला वासनापिंड काही नष्ट होत नाही! हा वासनापिंड मला सोडत नाही. त्यातूनच नव्या जन्माची बीजं पेरली गेली असतात. या जन्मीच्या अनंत अपूर्त इच्छांनीच हा वासनापिंड पोसला गेला असतो. यातल्या कित्येक इच्छा या अवास्तव आणि अहंकारप्रेरितही असतात. त्यामुळे आंतरिक तोल बिघडवणाऱ्या अनेकानेक विकारांचं खतपाणी या वासनाबीजाला मिळालं असतं. त्यातूनच आणि त्या विकारांनुरूपच पुढचा जन्म वाटय़ाला येत असल्यानं जगतानाच आंतरिक तोल साधेल असं जगण्याचं भान आलं पाहिजे, हेच जणू समर्थ सुचवत आहेत. त्यामुळे सद्गुरूबोधानुरूप जगण्याची प्रेरणा लाभेल, तसं जगण्याचा प्रामाणिक अभ्यास सुरू झाला की जगतानाच आंतरिक जडणघडणीकडे लक्ष जाईल. सद्गुरू बोधानुरूप अंतरंगाची मशागत सुरू झाली की जगात वावरताना मनातली अस्थिरता, अस्वस्थता, अशांतता ओसरत जाईल. जगणं अधिक ध्येयानुकूल आणि सकारात्मक होत जाईल. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं मोल हळूहळू जाणवू लागेल आणि तो क्षण वाया जाऊ नये, याचं भान येत जाईल. मग बोलणंच कशाला जगण्यातला प्रत्येक व्यवहार सद्गुरूप्रेरित होऊ लागेल. वावगं बोलणंच नव्हे, तर आपल्या जगण्यातला प्रत्येक वावगा व्यवहारही बोचू लागेल.

-चैतन्य प्रेम

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…