आज गुरूपौर्णिमा आहे आणि समर्थाच्या शब्दांत आपण नित्याचा नेम जाणून घेत आहोत, हा मोठा योग आहे.. ज्याच्या जीवनात सद्गुरूबोध पूर्णत्वानं प्रकाशित आहे त्याला प्रत्येक दिवस गुरूपौर्णिमेचा आहे.. अशी गुरूपौर्णिमा आपल्या प्रत्येकाच्या अनुभवास येवो ही सदिच्छा व्यक्त करून आपला विषय पुढे सुरू करतो.. तर समर्थ काय सांगतात, ‘‘आतांही जयास वाटे भेटावें। रामें मज सांभाळीत जावें। ऐसें दृढ घेतलें जीवें। तरी ऐका मी सांगेन।।’’ अहो त्या परमतत्त्वाची आजही भेट हवी आहे ना? मग त्याचा उपाय अर्थात त्यासाठीचा नेम सांगतो.. समर्थ सांगतात, ‘‘श्रीराम जयराम जयराम। ऐसा कांहींएक करूनियां नेम। जप कीजे तेणें आत्माराम। जोडेल नियमें।।३८।।’’ फार अर्थगंभीर आहे बरं हा चरण.. त्रयोदशाक्षरी मंत्र सांगतात, पण त्याचाच आग्रह नाही बरं का! काय म्हणतात? ऐसा कांहींएक करूनियां नेम। असा काही तरी नेम करावा.. पण ऐसा कांही म्हणजे काहीतरीच नव्हे बरं, तर हा त्रयोदशाक्षरी मंत्र जसा नित्याशी जोडलेला आहे ना, तशा नित्याशी, शाश्वताशी जोडलेल्या किंवा शाश्वताशी जोडणाऱ्या मंत्राचा किंवा साधनेचा नेम करावा.. असा जप झाला, अशी साधना झाली तर तो आत्माराम जोडला जाईल.. पण त्यासाठी जपाचा, साधनेचा काही नियम मात्र हवा! कारण तो आत्माराम जो आहे तो जोडेल नियमें।। तो नियमाच्या बळावर जोडला जाणार आहे.. मग पुढे जे सांगतात ते फार महत्त्वाचं आहे.. अगदी साधकावस्था संपून सिद्धावस्था आल्याचं वाटू लागलं तरी ते विसरता कामा नये.. हा नेम कसा सांभाळावा, हे सांगताहेत.. समर्थ म्हणतात, ‘‘परी कोणासी कळों नेदावा। जप अंतरींच करावा। जैसा कृपणासी धनठेवा। सांपडला एकांतीं।। ३९।।’’ हा जो नेम सुरू आहे तो कुणालाच कळू देऊ नये.. तो अंतरंगातच करीत राहावा.. माउली म्हणतात ना? जपमाळ अंतरी! तशी अंत:करणातच नामाची माळ फिरत राहावी.. एखाद्या कृपणाला एखाद्या निर्जन जागी मोठी संपत्ती सापडली तर तो त्याचा डिंडोरा वाजवेल का? अगदी त्याप्रमाणे ही जी आध्यात्मिक संपत्ती आहे, श्रीमंती आहे ना ती अगदी लपवून ठेवावी.. आणि आपल्याला जन्मापासून प्रसिद्धीची, जाहिरातीची हौस आहे! थोडं केलं की त्याचा किती गवगवा करतो आपण.. आणि सत्कर्म करायचं, पण त्याची प्रसिद्धी जराही होऊ द्यायची नाही, अशी सक्ती झाली ना तर सत्कर्मातला निम्मा रसच आटेल आपला.. आपला जप तासन्तास सुरू असतो, हे लोकांना उमगलं नाही तर मग त्यात काय गोडी! काहींना नादाचे, प्रकाशाचे अनुभवही येतात आणि त्या अनुभवानं वृत्तीची अंत:र्मुखता वाढण्याऐवजी ते दुसऱ्यांना सांगून स्वत:चं साधक म्हणून ‘पोहोचलेपण’ बिंबवण्याची बहिर्मुखता वाढत जाते. समर्थ बजावतात, ‘‘कांहीं साक्षात्कार जाला। तो सांगों नये दुसरियाला। जरी आळकेपणें सांगितला। तरी पुन्हा होणार नाहीं।। ४५।।’’ साक्षात्कार झाला तरी तो दुसऱ्याला सांगू नये आणि मानाच्या लोभापायी तो सांगितला तर लक्षात ठेवावं की, तो साक्षात्कार पुन्हा होणार नाही! मग सांगतात, ‘‘पुन्हा साक्षात्कार कैंचा। जाला तरी वरपंगाचा। हा मी आपुले जीवाचा। अनुभव सांगतों।।४६।। लोकांपाशीं सांगावें। कां जे लोकीं बरे म्हणावें। अल्पासाठीं आपुलें करावें। अनहित कैसें।।’’ जो काही साक्षात्कार होतो तोदेखील वरवरचाच असतो आणि वर हे मी अनुभवाचं सांगतोय, असं समर्थ स्पष्ट सांगतात! तो वरवरचा असतो म्हणूनच तर तो ओसरतोही. अशा ओसरणाऱ्या साक्षात्कारासाठी नव्हे, तर जे कायमचं टिकणारं आहे, त्याच्याच प्राप्तीसाठी साधना असावी. मग लोकांच्या अल्पजीवी वाहवासाठी आपणच आपलं अनहित का करावं?

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

-चैतन्य प्रेम