आता समीर ऐकणार नाही, आपल्या भावनांना आवर घालायचं तिनं ठरवलं, पण कधी ना कधी समीर स्वत: आपल्या प्रेमात पडेल, असा विश्वास होता तिला. पण भविष्यात हाच विश्वास फोल ठरणार तिला कुठं माहिती होतं. तिनं समीरच्या कलाने घेण्याचा निर्णय घेतला. प्रेम हा विषय टाळून ती समीरच्या आवडीच्या विषयावर चर्चा करायची. वेगवेगळे विषय, पुस्तकं, गाणी अशा समीरच्या जिव्हाळ्याचे विषय बोलण्यात येऊ लागल्यानं समीरही तिच्याशी तासन् तास चर्चा करायचा. इतर मुलींसारखी क्षिती नव्हती हे त्याला लक्षात येत होतं. क्षिती त्याला आवडू लागली होती, पण त्यानं कधीही कोणाला कळू दिलं नाही. क्षितीशी गप्पा मारणं, तिच्याशी चर्चा करणं, वेगवेगळ्या विषयावर वाद घालणं त्याला आवडू लागलं होतं. क्षितीला तो नोटीस करू लागला होता, रात्री झोपताना ती आज कशी दिसत होती हे सांगायला तो विसरायचा नाही. क्षितीचं दिसणं, तिचं लाजणं, तिचं बोलणं, तो हळूहळू निरखू लागला होता. आपण नकळत क्षितीत गुंतत चाललो आहे, याची पुसटशी कल्पना त्याला येतं होती. पण त्याला तिच्यात आणखी गुंतायचं होतं.

आपल्या मनासारखं होतंय म्हणून क्षितीही समाधानी होती. समीर हळूहळू आपल्यावर प्रेम करू लागलाय या कल्पनेनेच ती खुलून गेली होती. भूतकाळातल्या समीरच्या आणि प्रेमाच्या आठवणीत क्षिती पूर्ण रमली होती. जणू आपण त्यातून बाहेर येऊच नये, असं तिला वाटत होतं. पुन्हा एकदा क्षिती भूतकाळातून बाहेर आली… आपण इथं रियुनिअनसाठी आलो आहोत, मज्जा मस्ती करायला आलो आहोत या विचारानं तिचं चित्त पुन्हा थाऱ्यावर आलं.

एवढ्यात मैत्री आली. ”अरे क्षिती काय हे आपण सगळे भेटलो आहोत आणि तू का अशी कोपऱ्यात बसली आहेस?”
”जरा बरं वाटत नाहीये.” क्षितीनं टाळण्याचा प्रयत्न केला.
”हे बघ गाणी सुरू झालीत, चल डान्स फ्लोअरवर. कॉलेजमध्ये फेस्टिव्हला जसा कल्ला करायचो तसाच करू, तसेच नाचू चल.” मैत्रीचा उत्साह उतू चालला होता. तिनं क्षितीचा हात पकडला आणि ओढत तिला फ्लोअरवर घेऊन गेली.
क्षिती तशीच उभी राहिली. तिला नाचायचं नव्हतं कारण समोर समीर होता, पण मैत्री आणि ग्रुपमधले इतर काही आपल्याला बाहेर सोडणार नाही तिला ठाऊक होतं. सगळे क्षितीला नाचण्यासाठी फोर्स करत होते, मैत्री तर क्षितीचे दोन्ही हात पकडून तिला लहान मुलांसारखं नाचवत होती. धांगडधिंडा सुरू होता अन् अचानक माहोल बदलला… रोमॅंटिक गाणी सुरू झाली… डिस्को लाईटऐवजी मागे डिम लाईट्स ऑन झाल्या… प्रत्येकानं आपापला पार्टनर निवडून नाचायला सुरुवात केली. क्षिती मात्र तशीच उभी राहिली. ठोंब्यासारखी. फ्लोअरवरून ती खाली जाणार एवढ्यात अगदी सिनेमात दाखवतात तसंच काहीसं घडलं. समीरनं क्षितीचा हात पकडला. एक हात क्षितीच्या कमरेभोवती गुंफत त्याने तिला जवळ ओढलं, क्षितीने आपला एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या हातात घेऊन दोघंही नाचू लागले. क्षितीला फारच ऑकवर्ड वाटतं होतं. तिने शक्यतो समीरच्या नजरेला नजर देणं टाळलं ती खाली बघून त्याच्या लयीत नाचण्याचा प्रयत्न करत होती, समीरनं तिला आणखी जवळ खेचलं. क्षितीला फारच अवघडल्यासारखं होत होतं, पण मनातून ती सुखावतही होती. समीरचा तो स्पर्श क्षितीसाठी काही नवा नव्हता. तिने समीरच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याचा पहिला स्पर्श तिला आठवला.

Love Diaries : जाने तू… या जाने ना!
…………………………
”क्षिती माझ्या घरी येतेस?” समीरनं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात तिला पहिल्यांदा विचारलं होतं. तिनंही नकार दिला नाही. ती समीरसोबत त्याच्या घरी गेली होती, दोघंही आपल्या भावनांना आवर घालू शकले नाही, समीरनं क्षितीला जवळ ओढतं तिला पहिल्यांदा किस केलं होतं, त्यादिवशी समीरच्या कुशीत शिरून एकमेकांचा हात हातात घेत दोघांनी संध्याकाळ घालवली होती.
”क्षिती तुला माहितीय आजपर्यंत मला खूप मुलींनी प्रपोज केलं, पण मी कधीही कोणाकडं पाहिलं नाही, तू पण मला खूप वेळा विचारलं होतं… मी तुलाही नकार दिला, पण आता असं काय घडलं ते माझं मलाही कळलं नाही आणि तुझ्यात वाहवत जाण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही.” समीरनं प्रेमाची कबुली दिली. किती सुंदर दिवस होता आयुष्यातला कोणाचंही होण्यात किती समाधान असतं.
……………………….
क्षितीनं भूतकाळातून पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि अचानक तिनं समीरचा कमरेवरचा हात झटकून दिला. ती फ्लोअरवरून खाली उतरली सगळेच नाचण्यात दंग होते त्यामुळं क्षिती समीरकडं कोणाचंही लक्ष गेलं नाही, मुळात त्या दोघांमध्ये कॉलेजमध्ये अफेअर होतं याची कल्पनाही ग्रुपमध्ये कोणाला नव्हती.
त्या दिवशी समीरच्या घरात जे काही झालं आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेलं अफेअर याची कॉलेजमध्ये कधीही चर्चा करायची नाही, असं प्रॉमिस समीरने तिच्याकडून घेतलं होतं. आपलं खासगी आयुष्य कोणासमोरही उघडं करू नये, मग समोरचा मित्र किंवा मैत्रिण कितीही जवळचा का असेना, अशा मताचा समीर होता. क्षितीलाही तो वारंवार तेच बजावायचा. त्यामुळं कॉलेजमध्ये समीरबद्दल फारसं कोणालाच काही माहिती नव्हतं. क्षिती सरळ वॉशरुममध्ये गेली. बेसिनजवळ पोहोचून तिनं चेहऱ्यावर पाणी मारलं, डोळ्यातलं पाणी त्या पाण्यात कसं मिसळलं तिलाही कळलं नाही. तिने टिश्यूनं डोळे पुसत आरशात पाहिलं. आणि कॉलेजच्या शेवटच्या दिवशी कँटिनमध्ये समीरच्या तोंडातली वाक्य तिला स्पष्ट आठवू लागली.
…………………………
”बघ क्षिती कोणालाही आपल्याबद्दल काहीही सांगण्याचा मूर्खपणा तू करणार नाहीस.” समीर तिच्यावर वैतागला होता.
”पण का? आता आपण रिलेशनशिपमध्ये आहोत मग सांगायला काय हरकत आहे? आणि तसंही मी तुझ्याशीच लग्न करणार आहे.” तिनं त्याला मनवण्याचा प्रयत्न केला.
”बघ क्षिती मला चुकीचं समजू नकोस पण मला हे रिलेशनशिप नाही ठेवायचं. कॉलेजमधून बाहेर पडून मला काहीतरी करायचं आहे. माझी काही स्वप्न आहेत आणि प्रेम वगैरे करून किंवा तुझ्यात अडकून मला त्याची माती करायची नाही. माझ्या महत्त्वाकांक्षेच्या आड प्रेम आलेलं मला पाहायचं नाही.” समीर तिच्या मनाचा विचार न करता बोलत होता.
”मी कॉलेज संपल्यानंतर बाहेरगावी जाणार आहे शिक्षणासाठी” तो म्हणाला
”काय? आणि हे तू मला आता सांगतोस समीर? का?” तिच्या डोळयात पाणी जमू लागलं.
”बघ इथ रडून तू प्लीज तमाशा करू नकोस क्षिती, प्रॅक्टिकल हो. कॉलेजचं आयुष्य संपलंय आता. करिअरची रेस सुरू होणार आहे. मला काहीतरी बनायंचय. टिपिकल प्रेम करून मला ते बागेत वगैरे भटकून एकमेकांशी तासन् तास गप्पा मारून माझा वेळ फुकट घालवायचा नाही आणि तूही तसाच प्रॅक्टिकल विचार कर आणि कॉलेजसोबत हेही प्रकरण इथे संपलं असं समज”
”संपलं? असं तू कसं बोलू शकतोस? मग इतकं प्रॅक्टिकल होतास तर तू जवळ तरी कशाला आलास? आणि प्रेम नव्हतं तर त्या दिवशी तुझ्या घरी ते काय होतं? ते सगळं तू का केलंस? मला उत्तरं दे या सगळ्यांची.” तिचा ताबा सुटला होता.
”तू मला का दोषी धरतेस? तू मला १० वेळा प्रप्रोज केलं, तेव्हा मी तूला अनेकदा नकार दिला होता, पण तेव्हा ऐकलं नाहीस आणि त्यादिवशी माझ्या घरी घडलं त्यात तू मला एकट्याला का दोष देतेस? त्यावेळी तू नाही म्हणू शकत होतीस क्षिती… पण तू असं केलं नाहिस आणि तो क्षण असा होता की नाही राहिला स्वत:वर ताबा” त्यानं आपली बाजू मांडली.
”आणि आपल्यात तसंही काही झालं नाही की ज्यानं तुला गिल्टी वाटेल. बघ क्षिती तू खूप चांगली आहेस. तुला कोणीही चांगला मुलगा मिळेल. पण मला नाही राहता येणार यात. माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि तुझ्यात अडकलो तर मी कधीच माझी स्वप्नं पूर्ण करू शकणार नाही. पण ज्या दिवशी मी स्वत:च्या पायावर उभा राहिन आणि लग्नाचा विचार करेन तेव्हा मी नक्कीच तुझ्याकडं येईन” तो ठामपणे सांगत होता.
”म्हणजे तू सगळं ठरवलं आहेस तर? आणि तुझं करिअर सेट झाल्यावर समजा तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर? कशावरून तू माझ्याशी लग्न करणार?” तिने रडत विचारलं.
”विश्वास ठेवणं अगर न ठेवणं तुझ्या हातात आहे क्षिती. पण आता मला जाऊ दे. माझी वाट वेगळी आहे आणि प्लीज ग्रुपमधल्या इतर कोणाला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस. कोणी विश्वास ठेवणार नाही आणि ठेवलाच तर आपल्याविषयी गॉसिप्स करायला त्यांना विषय मिळेल. आपल्या खासगी गोष्टींचा तमाशा व्हावा, असं मला वाटतं नाही.”
”तूझं सगळंच प्लान होतं तर? खूप छान वागलास तू, जा तू तूझ्या स्वप्नांमागे मी नाही अडवणार कधीच. हा शब्द आहे माझा तुला. ही शेवटची भेट” क्षिती मागे वळून न बघता चालू लागली. पुढं कधीच तिनं त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही ना त्यानं कॉन्टॅक्ट केला.
……………………
आपण बराच वेळ वॉशरूमध्ये आहोत तिच्या लक्षात आलं, तिनं रुमालानं चेहरा पुसला. पर्समध्ये मेकअपचं सामान होतं, चेहरा नीट केला आणि पुन्हा काही घडलंच नाही, असा मुखवटा चेहऱ्यावर ठेवून ती बाहेर आली.
तिनं दरवाजा उघडताच बाहेर हाताची घडी घालून समीर उभा होता. तिच्या छातीत धडधडू लागलं, अख्ख कॉलेज कँम्पसमध्ये पार्टी करतंय आणि आपण पहिल्या मजल्यावर एकटेच समीरच्या समोर. तिला भीती वाटू लागली. समीर पुढे आला ”किती लांब पळणार आहेस क्षिती तू?” त्याने थेट तिला प्रश्न विचारला.
एकही शब्द न बोलता तिनं नजर दुसरीकडे वळवली.
”एक विचारू?” त्यानं तिला विचारलं, तीन वर्षांत पहिल्यांदा समीर स्वत:हून तिच्याशी बोलायला आला होता.
”अजूनही सिंगल आहेस?” त्यानं हसत विचारलं. तिनं पुन्हा उत्तर देणं टाळलं, मुळात तिला त्याच्याशी काही बोलण्याची इच्छाच नव्हती. ती वाट काढत बाजूला झाली आणि खाली गेली.

समीर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून पुन्हा गालात हसला. पार्टी संपली होती, जेवणं आटोपली. सगळे घरी जायला निघणार होते. कॉलेजचा ग्रुप पुन्हा एकदा गोळा झाला शेवटचा निरोप द्यायला. पुन्हा भेटू, कॉन्टॅक्टमध्ये राहू अशी खोटी आश्वासने एकमेकांना देत होते. क्षिती शांतच होती आणि समीर तिच्याकडं बघत होता तिला खूपच अवघडल्यासारखं होतं होतं
”बस अजून पाच एक मिनिटं, मग आपली सुटका” ती स्वत:ला समजावत होती.
एवढ्यात समीर पुढे झाला ”guys, निघण्यापूर्वी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी लग्न करतोय लवकरच. सगळ्यांनी लग्नाला यायचं हा!”
सगळ्यांनी आनंदाने आरडाओरडा सुरू केला, पण क्षितीच्या काळजात मात्र चर्र झालं. एका क्षणात पुन्हा एकदा तुटलेल्या हृदयाचा पार चुराडा झाला होता. तिला ऐकून रडायला येत होतं पण तिने स्वत:ला सावरलं.
”अरे कोण आहे ती लकी मुलगी जिला कॉलेजचा हँडसम मुलगा नवरा म्हणून मिळणार?” मैत्रीनं छेड काढत विचारलं.
”अरे फोटो तर दाखव, आमच्या होणाऱ्या वहिनीचा” एकजण म्हणाला.
”फोटो कशाला प्रत्यक्षातच भेटवतो” समीर म्हणाला. क्षितीला खूपच राग येत होता. आता निघून जावं असं तिला वाटतं होतं.

”कधी आहे लग्न?”
”ती म्हणेल तेव्हा” तो म्हणाला
”म्हणजे? ए मित्रा प्लीज कॉलेजमध्ये असल्यासारखं सस्पेन्स ठेवू नकोस, सांग” नेहा म्हणाली.
”अगं म्हणजे होणाऱ्या बायकोला प्रपोज करायचं आहे अजून… तिनं होकार दिल्यावरच तर लग्न होणार ना!”
”मग काय मुहूर्त शोधत होतास का?”, ग्रुपमधल्या राजनं त्याला चिडवलं.
”हो तसंच काहीसं. आज मिळाला मुहूर्त. म्हटलं आजच प्रपोज करू.” सगळे समीरच्या आनंदात सहभागी होते आणि क्षिती मात्र शांतपणे समीरचा तमाशा बघत होती. तिच्या लेखी तो तमाशाच होता.
”चल मग मित्रा फोन लाव वहिनीला आणि कर प्रपोज…” राज उत्साहात म्हणाला.
”अरे फोन कशाला डायरेक्ट समोरासमोरच करतो ना प्रप्रोज” मान खाली घालून उभ्या असलेल्या क्षितीच्या जमखेमवर मीठ चोळण्यासाठी तो जरा जोरातच म्हणाला. क्षितीचा जळफळाट तो एन्जॉय करत होता. ती आधीच रडायला आली होती आपण आणखी काही बोललो तर ही रडायलाच लागेल म्हणून समीरनं आवरतं घेतलं.
खिशातून त्यानं अंगठी काढली आणि सगळेच जोरात ओरडले, क्षितीनं हळूच नजर वर उचलून पाहिलं.
”तर प्रपोज करतो तुमच्या होणाऱ्या वहिनीला” असं म्हणत त्यानं खिशातून फोन बाहेर काढला.
”हा माझ्यापुढं मुद्दाम फोन बाहेर काढून असं करतोय, कॉलेजमध्ये माझ्या भावनांचा खेळ मांडला आणि आता पुन्हा एकदा मला कमीपणा दाखवण्यसाठी इथे मुद्दामहून त्यानं सारं नाटक चालवलं आहे ” ती मनातल्या मनात म्हणाली.
”ए राज हा घे फोन आणि व्हिडिओ ऑन कर” खिशातून काढलेला मोबाईल त्यानं राजकडं दिला, सगळेच गोंधळात पडले. एवढ्यात हातात रिंग घेऊन तो क्षितीकडे चालत गेला आणि तिच्याच काय पण इतरांच्याही लक्षात येण्याआधी तो गुडघ्यावर बसला. क्षितीला मोठा धक्काच बसला.

”miss kshiti joshi will you marry me?” सगळेच एकदम अवाक् होऊन बघू लागले. क्षिती आणि समीर? हे काय चालूय त्यांना कळतचं नव्हतं. क्षिती तर अगदी गार पडली होती, भानावर यायला तिला दोन एक मिनिटं गेली.
”अहो मॅडम काय होकार आहे की नकार?” समीरनं हसत विचारलं. ती अजूनही धक्क्यात होती.
”guys, क्षिती आणि माझं कॉलेजमध्ये अफेअर होतं. अर्थात हे मी सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. कॉलेजनंतर मी क्षितीसोबत ब्रेकअप केलं होतं, कारण मला माझी स्वप्न पूर्ण करायची होती. तिला एक सुंदर आयुष्य मला द्यायचं होतं म्हणूनच मी तिच्यापासून लांब राहिलो, पण जेव्हा केव्हा लग्नाचा विचार करेन तेव्हा तिच्याशीच लग्न करेन हे तिला सांगितलं होतं, म्हणूनच आज तुमच्या समोर तिला प्रपोज करतोय”
क्षितीला मात्र आता रडू यायला लागलं… समीर परत येईल, अशी आशाही तिला नव्हती पण त्यानं आपला शब्द पाळला होता. समीरनं तिला मिठीत घेतलं आणि रुमालाने तिचे डोळे पुसले.
”काय मग मॅडम देताय ना उत्तर? लग्नाची तारीख नक्की करायची आहे.” समीरनं पुन्हा एकदा तिला विचारलं.
मान खाली घालत क्षिती लाजली. तिनं होकार दिला होता.

(उत्तरार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित