“आपल्याला आता निघायला हवं…”

“हं..”

“सोड मला..आणि माईंड यू…आपण टॅक्सीत आहोत!”

“हं…….”

“चैतन्य, काय हे…”

पण तनुजाला तिचं वाक्य पूर्ण करण्याची सवड त्यानं मिळू दिली नाही…तिची बोलती बंद झाली. (आता कशी? असा प्रश्न ज्यांना पडेल ते निव्वळ थोर असून, आम्ही थोरांना स्पष्टीकरण देत नाही!)

छ्त्रपती शिवाजी एअरपोर्टवरून निघालेली टॅक्सी आता दादरच्या जवळ आली होती. तनुजा खरंतर मनातून सुखावली होती. जवळपास दोन महिन्यांनंतर तिला चैतन्य प्रत्यक्ष आणि प्रकट (हाही चैतूचाच शब्द…तिला मजा वाटली, आपण मनातल्या मनातसुद्धा त्याच्याच शब्दांत विचार करायला लागलो की…!) असा दिसला होता. गेले दोन महिने एका प्रोजेक्टसाठी म्हणून तो अमेरिकेला गेला होता. आणि एअरपोर्ट्वरुन त्याला रिसीव्ह करायला ती आली होती.

ज्या रिसर्च इन्स्टिट्यूटमधे ती रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होती, तिथेच जेमेतेम वर्षभरापूर्वी चैतन्य ज्युनिअर असिस्टंट म्हणून जॉइन झाला होता. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, नव्याने समजलेल्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची सवय, ठरलेल्या वेळात आपलं काम पूर्ण करून दुसऱ्याच्या कामात मदतीसाठी दाखवलेला उत्साह आणि या सगळ्याच्या जोडीला उत्तम विनोदबुद्धी. तो इन्स्टिट्यूटमधे आल्यापासून हास्याचा एक थर हवेत भरून असल्याचा भास सगळ्यांना होऊ लागला होता. तिथल्या स्टाफपैकी कुणाला हास्यविनोदाचं वावडं होतं असं नाही…पण एकूणातच सगळे, ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशाप्रकारे डेड्लाईन्सच्या मागे असत… पण चैतन्य आला आणि त्याने आपलं नाव सार्थ केलं.

चैतन्य आला तेव्हा त्याला मिळालेला प्रोजेक्ट तनुजाशी संबंधित नव्हता. साहजिकच एकत्र काम करण्याचा फार कधी प्रश्नच उदभवला नाही. चैतन्य त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करून पेपर प्रेझेंटेशनच्या खटपटीला लागला आणि त्याच दरम्यान तनुजाच्या टीममधला एकजण काही कारणांमुळे काम सोडून गेला. इन्स्टिट्यूटने मग आपसूकच चैतन्यला तनुजाच्या प्रोजेक्टमधे सामील करून घेतलं. रोजचे रोज सात-आठ तास एकत्र काम करण्याची वेळ आली आणि तिथून गोष्टीला सुरुवात झाली.

“तनुजा मॅम, तुम्ही लंच इतक्या घाईघाईत का उरकता? दिवसभरात एवढीच वेळ आहे.. जेव्हा खरंच निवांतपणा मिळतो.. सॉरी इफ आय अ‍ॅम टू मच इन्क्विझिटिव्ह, बट प्लीज एंजॉय योर फूड..”

“मॅम, या अश्या अर्दन कलर्सपेक्षा तुम्हाला फ्रेश पेस्ट्ल शेडस सूट होतील…”

“स्माईल इज द बेस्ट मेकप मॅम…”

“ब्राव्हो मॅम…किती पर्फेक्ट अ‍ॅनालिसिस केलंय तुम्ही…या झाडं वेलींना बोलता आलं असतं तर तुमचं कौतुक करताना मुळीच थकले नसते ते”

“मागच्या वर्षीच्या केरळ प्रोजेक्टच्या संदर्भातली लेक्चर सिरीज ऐकलीये मी मॅम… यू वेअर सिम्प्ली अमेझिंग!”

“आपल्या डिपार्ट्मेंटच्या अ‍ॅन्युअल फंक्शनमधे माझ्यासोबत ड्युएट गाल तुम्ही…तनु..जा मॅम…? तुम्ही उशीरा रात्रीपर्यंत लॅबमधे काम करत असता तेव्हा तुमचं गोड सुरातलं गुणगुणणं मी ऐकलंय..”!!!

नीट ओळख होऊन अजून जेमतेम सहाच महिने होताहेत..आणि हा पठ्ठ्या इथपर्यंत पोहोचला….

येत्या सप्टेंबरमधे पस्तीसावं लागेल आपल्याला. तनु स्वत:शीच विचार करत होती. चाळीशी जवळ आली तरी वाट्त नाही इतकं वय. शाळेत असल्यापासून स्पोर्टस, स्विमींग वगैरे व्यायामाची सवय होतीच तिला. त्यामुळेच तर आजही एक दिवस जरी जिम चुकली तरी तिला अपराधी वाटे. उजळसावळी, तजेलदार, सरळ नाक, पाणीदार बोलके डोळे, व्यायामामुळे बांधेसूद राहिलेलं शरीर, सुरेल गोड गळा आणि तल्लख बुद्धी… चटकन नजरेत भरावी अशीच होती तनुजा… कॉलेजला असल्यापासून तिच्यावर लट्टू होणारे शेकडो असत. पण ती हसून सोडून देत असे. एम.एस्सी. पूर्ण झाल्यावर लगेचच तिला याच इन्स्टिट्यूट्मधून जॉब ऑफर आली आणि तिने तो घेतलासुद्धा. गोल्ड मेडल मिळवून युनिव्हर्सिटीत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थिनीला हा जॉब अगदी डिझर्व्हिंगच होता. पण इथपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी काही केकवॉक नव्हता. ती दहावीत असताना तिच्या आईचं अचानकच मेंदूचं दुखणं उदभवलं.. आणि योग्य निदान होऊन उपचार मिळायच्या आत तिची आई गेलीच… धाकटा भाऊ आठवीत आणि सगळ्यात छोटी बहीण तर अगदी चौथीत होती. वडिलांचा फिरतीचा जॉब, ते नसतंच घरी फारसे. त्या कुटुंबावर आभाळ कोसळलं. आईच्या माहेरी एक मावशी सोडली तर आणखी कोणी नव्हतं. तीच धावून आली..आणि आई-वडिलांचा संसार मावशीच्या मदतीने तनुजाने मार्गी लावला. दहावीला बोर्डात, बारावीतही तोच प्रकार…ग्रॅज्युएअशन आणि मास्टर्स दोन्हीच्या वेळी गोल्ड मेडल..हे सगळं घर-नोकरी सांभाळून. तिची भावंडही शिकून सवरून, फार लवकर प्रेमबिमात पडून लग्न करून सुटी झाली… पण तनुजाचं एकला चलो रे संपेना! तिला कितीतरी जणांनी मागणी घातली…पण जीव लावावा-ओवाळून टाकावा, असं कोणी आलंच नाही तिच्या वाटेत…

नाही म्हणायला एकदा, अगदी एकदा तिच्या मनात वसंत फुलला होता. रिसर्चला सुरुवात झाली ते नवेकोरे अभ्यासमग्न दिवस होते. आणि लंडन युनिव्हर्सिटीतले एक प्राध्यापक डॉक्टर तनुजाच्या इन्स्टिट्यूट्मधे दाखल झाले काही दिवस. त्यांची लेक्चर्स असायची. रिसर्चबाबत सगळे दृष्टिकोन बदलायला भाग पाडणारी. वयाच्या अवघ्या तिशीच्या आत डॉक्टरेट मिळवलेले हे प्रा. विल्सन बुद्धिमान तर होतेच; पण हॅण्डसम म्हणावेत इतके आकर्षक होते. तनुजाला प्रेमात पडायला जराही वेळ लागला नाही. तनुजाची अभ्यासू वृत्ती, प्रखर बुद्धिमत्ता यांमुळे विल्सनही तनुजाकडे ओढले गेले. प्रेम अगदी बहरात होतं…

साहजिकच, त्यांच्या प्रेमाची चर्चा इन्स्टिट्यूट्मधे घडू लागली. तनुजा आणि डॉक्टर विल्सन हा अगदी परीकथेत शोभावा असाच जोडा होता. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. नातं पुढे न्यायचं म्हणून त्या दोघांनी रीतसर एंगेजमेंटही केली. अभ्यास-रिसर्च आणि प्रेम…आयुष्य कसं चहूदिशांनी फुलून आल्यासारखं तनुजाला वाटत होतं. आणि डॉक्टर विल्सन यांच्या लंडन परतीचा दिवस उजाडला. प्रेमाच्या आणा-भाका, शपथा.. सगळं झालं. डॉक्टर परतले..ते पुन्हा कधीही ना भेटण्यासाठी… पत्र-फोन-इमेल..सगळे संपर्क तोडून डॉक्टर परागंदा झाले आणि तनुजा सैरभैर…

(पूर्वार्ध)

– तीन फुल्या, तीन बदाम