सोशल मीडियावर सतत फेरी मारणं, वारंवार मोबाईलमध्ये डोकावणं आणि उगाचच भलत्या सलत्या पोस्ट करत राहणं हा नैनाचा स्वभावच झाला होता. ‘नैना’… कामाच्या निमित्ताने दार्जिलिंगहून थेट मुंबईत आलेली मुलगी. स्वत:च्या कुटुंबापासून फारच दूर झाली होती. त्यामुळे तिने १ बीएचकेच्या फ्लॅटमध्ये सोशल मीडियालाच आपलं जोडीदार बनवलं होतं. भरपूर फॉलोअर्स, सतत बदलणाऱ्या ट्रेंड्सची माहिती ठेवणारी नैना अगदी ‘यो’…. म्हणतात ना तशीच मुलगी. साऊंड इंजिनियर असलेल्या नैनाचं व्यक्तिमत्त्व पहिल्याच नजरेत कोणाला भावेल इतकंही चांगलं नव्हतं, जे तिलाही पटायचं. हो… पण, मुंबईत आल्यानंतर तिने या गोंधळलेल्या शहराला आणि इथल्या गल्लीबोळांना, इथल्या पावसाला असं काही आपलंसं केलं होतं की ते खुद्द मुंबईकरांनाही जमलं नसावं.

हा आठवडा बराच दगदगीचा गेला. त्यामुळे वीकेंडला नैना बरीच निवांत होती. शुक्रवारी रात्रीपासूनच ती टीव्ही लावून बसली खरी. पण, तिच्या हातालला मोबाईल काही केल्या सुटेना. रात्रीचा दीड वाजून गेला होता आणि मोबाईलची लाईट ब्लिंक झाली. इथे नैनाने फक्त रात्रीचं जेवण खाण्यापुरताच मोबाईल टेबलवर ठेवला त्याचवेळी नेमकी ही लाईट ब्लिंक झाली. इन्स्टाग्रामवर कोणाचीतरी फॉलो रिक्वेस्ट आली होती तिला. त्याकडं तिने फारसं लक्ष दिलं नाही. पण, पुढच्याच मिनिटाला इन्स्टा मेसेंजरवर त्या फॉलोअरचा मेसेज आला. नैनाने तेही टाळलं आणि फेसबुक वॉल स्क्रोल करु लागली. बघते तर काय, ‘सराहा’ नावाच्या कोणत्या तरी मेसेंजर अॅपच्याच अपडेट होत्या तिथे. प्रत्येकजण त्यांना आलेल्या मेसेजना पोस्ट करण्यातच बिझी होता.

तिने कुतूहलाने अॅप इन्स्टॉल करुन त्यामध्ये रजिस्टर केलं.
“वॉट द फ…. क्या कूल चीज है ये…”

नैनाने तिचा ‘सराहा’ आयडी, लिंक फेसबुक, व्हॉट्सअप अशा सर्व ठिकाणी पोस्ट केला. एकटेपणानं ग्रासलेली नैना दोन दिवसांपासून तिला येणाऱ्या निनावी मेसेजेसमुळे फार आनंदात होती. पण, या आनंदताच एक असा मेसेज आला ज्याने तिला गोंधळात टाकलं.
‘नैन…’
‘शराफत, नजाकत, रुह का रास्ता हो तुम
अंजान थे हम जो चौराहे पे ढुंढते रह गए
वक्त कुछ यू निकल गया जैसे सरकती रेत
जिसे मन्नत सुना न पाए हम वो तुटा तारा हो तुम’,

हा शायराना मेसेज वाचून नैना खडबडून गेली. कारण ‘नैन’ तर तिला शाळेतले मित्रमैत्रीणीच म्हणायचे. त्याच्यातले किती तरीजण आता तिच्या संपर्कातही नव्हते. त्यामुळे ‘नो चान्स…’, असं म्हणून तिने विषयच सोडला. पण, अनेक नावं तिच्या डोक्यात घोंगावू लागली होती. कारण तशी हिच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नव्हती.

आज ती नेहमीपेक्षा जरा जास्तच आनंदात होती. कारणं तशी खूप होती. पण, समोरून तिच्या आनंदावर विरजण टाकण्यासाठी ‘नमित’ आला आणि प्रेझेंटेशनमधल्या ढिगभर चुका काढून तिला खडसावून गेला. ‘किप युवर फोन देअर अॅण्ड कॉन्सन्ट्रेट ऑन युवर वर्क.’ असं म्हणून त्याने धाडकन तिच्या केबिनचा दरवाजा ओढून घेतला.

रात्री घरी परतताना नैनाने नमितला खंडीभर शिव्या शाप दिले होते. कारण कधीच तिच्या केबिनमधून आवाज बाहेर गेला नव्हता. कधीच तिच्या कामावर आणि तिच्यावर कोणी आवाज चढवला नव्हता. त्या दिवसापासून नमित आणि नैना एकमेकांना नजरेसमोरही धरत नव्हते. नैना तर त्याला आता मारणार की नंतर हीच भीती होती सर्वांना. पण, ‘सराहा’मुळे तिला काही फरक पडत नव्हता. कारण त्यावर येणारे मेसेज पाहून तिचं लक्ष विचलित होत होतं. मेसेजेस वर मेसेजेस येत होते, नैनाला आनंद होत होता. पण, तिच्या डोक्यातून अजूनही तो शायराना अंदाज गेला नव्हता. कारण तो मेसेज होताच तसा. न विसरण्यासारखा. चौकटीबाहेरचा.

तिने तो मेसेज फेसबुकवर पोस्ट न करण्याचं ठरवंल. का, कोण जाणे तिला तो मेसेज इतका का आवडला होता. असो…. घरी ‘सराहा’ अॅपचा आनंद आणि ऑफिसमध्ये खडूस नमितचा चेहरा अशा दोन विचित्र प्रसंगांना नैना तोंड देत होती. सोशल मीडियाप्रती असणारं तिचं प्रेम टिचभरही कमी झालं नव्हतं. असं करता करता दुसरा वीकेंड उजाडला. रात्री दोनच्या ठोक्याला नैनाला पुन्हा ‘नैन’… असा उल्लेख असलेला आणखी एक मेसेज आला. यावेळी कोणता शेर नव्हता तर शाहरुखचा ‘किसी चीज को अगर शिद्दत से चाहो…’ हा डायलॉग होता. तिचं मन पुन्हा चलबिचल झालं. कोण करतंय हा मेसेज, हाच प्रश्न तिच्या मनात घर करत होता. त्या एका मेसेजच्या नादात नैना भांबावली होती. एका अॅपने तिला बरंच बदललं होतं. आता तर घाबरवलं होतं. इतक्यातच नैनाचा फोन वाजला. वेळ होती रात्री तीनची. ‘हॅलो नैन….’, असा आवाज आला आणि ‘नैन’ हा शब्द ऐकून, ‘जी हां. आप कौन?’ हेच ती वारंवार विचारू लागली. कोणतही उत्तर न देताच त्याने फोन ठेवला. पलीकडे ‘तो’च होता हे आता तिला कळून चुकलेलं.

(पूर्वार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम