अधुरी प्रेम कहाणी म्हटलं की सहज प्रश्न पडतो की, what is the reason behind break up. पण इथं ब्रेकअपचं कारण साफ आहे ते म्हणजे ‘इगो’… आता कोणाचा म्हणालं तर both are equally responsible for this situation. टाळी एका हातानं वाजत नसते म्हणतात ना अगदी तसचं काही तरी. दोघांनाही माहिती होतं की, एकानं माघार घेतली तर सर्व काही ठिक होईल. पण इथं तसं झालं नाही. कदाचित सात वर्षांच्या प्रेमात दोघांचा एकमेकांवर अतुट विश्वास त्यास कारणीभूत असावा. परिणामी माझ्यासाठी तो माघार घेईल यावर ती ठाम असावी. अन् आजवर जिचा शब्द खाली पडू दिला नाही ती आपला शब्द खाली पडू देणार नाही, या भ्रमात तो निवांत असावा. दोघांच्या याच विश्वासापायी प्रेमाच गणित बिघडलं.

सम्याची अन् प्रितीची नजरा नजर झाली ती सम्याच्या मामाच्या लग्नात. ही घटना साधारणतः आठ वर्षांपूर्वीची. गावाकडच्या त्या लग्नात प्रिती अशा स्टाईलमध्ये अवतरली की, अख्या गावच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ज्या गावात पोरानं चष्मा चढवला की, लोक कावरी बावरी होतात अशा गावात ही पोरगी स्लीवलेस टॉप आणि जीन्समुळे सर्वांच्या नजरेत सहज भरून गेली. सम्या प्रोफेशनल फोटोग्राफर नसला तरी गळ्यात कँमेरा लटकवून मामाच्या लग्नात फोटोग्राफरच्या तोऱ्यात मिरवत होता. तिला पहिल्यानंतर तो ही तिच्याभोवती घुटमळू लागला. सम्याचे ते नखरे बघून त्याच्या आईचा पार चढला. थोड्याच वेळात आईची अर्थात मम्मीची हाक त्याच्या कानी पडली.  “दाद्या इकडे ये रे बाळा!”, बाळा म्हटल्यावर आई बांउन्सर मारेल ही अपेक्षा सम्याला नव्हती. मात्र आईने त्याला चक्क गुगलीच फेकली. बांऊन्सर एक वेळ सोडता येतो पण गुगलीमुळे अगदी दांडी गुल्ल होण्याची शक्यता अधिक असते. सम्याच्या आईची गुगली ही अशीच होती.

“आरे का सकाळच्यान त्या पोरीला का चिटकाय जातोयस? आरे ‘तुझ्या ‘बा’ ला कळालं तर तो जीवच घेईल माझा’ म्हणलं पोराला माहेरच्या पाहुण्यात गुंतवायला लग्नाला गेली व्हतीस का?” सम्याला आईच्या त्या गुगलीचा अर्थ कळायला फार वेळ लागला. व्हॉटस्अॅप अन् फेसबुक दुर्मिळ असण्याच्या त्या काळात एसएमएसच्या माध्यमातून समीर आणि प्रिती यांच्यातील प्रेम फुलत गेलं. मग कॉल सुरू झाले अन् कॉल सुरू होताच भेटीचा इरादा ठरला. कोल्हापूरचा रंकाळा हे दोघांच्या पहिल्या भेटीचे साक्षीदार. मेसेज आणि कॉल नंतर दोघांचे पहिल्या भेटीच हे ठिकाण. प्रेमाचं पहिलं बोलण सुरू झालं ते रंकाळ्याच्या पडक्या कट्ट्यावरून. यात सम्याने पुढाकार घेऊन इंग्लिशमधील तीन शब्द जड झालेल्या जीभेने अडखळत बोलून मोकळा झाला. तिच्या स्मितहास्यानं सम्या गोंधळून गेला आणि हसायला काय झालं? मी मजाक नाही करत म्हणून वेळ घेऊन उत्तर दिलंस तरी चालेलं असं थोड लाजतच सांगून गेला.

पंधरा एक मिनिटे प्रिती स्मित हास्य करत सम्याकडे एकटक पाहतच राहिली. प्रपोज केल्यानंतर प्रिती एक पाऊल मागे सरेल. खाली मान घालून पायाचा अंगठा जमिनी लगत दाबेल. हा सम्याचा अंदाज फोल ठरला. कारण तिचा तोरा न्याराच होता. कोल्हापूरची पोरगी लवंगी मिर्ची अर्थात तिखट असते हे ऐकिवातील तो स्वत: अनुभवत होता. प्रिती एक पाऊल पुढे होती. अर्थात लग्नात दिसली त्याही पेक्षा ती बिनधास्त असल्याची जाणीव सम्याला रंकाळ्यावर अनुभवायला मिळाली. ती त्या पडक्या कट्ट्यावरून उठून भडंग वाल्याच्या गाड्याकडे गेली. एका प्लेटमध्ये खमंग भंडग घेऊन सम्याला म्हणाली लय मोठ धाडस केलंस खाऊन घे थोडं.
तिच्या बोलण्याचा रोख सम्याच्या लक्षात येत नव्हता. तिनं सम्याचं तोंड खाण्यात गुंग केलं अन् सम्या ज्याची वाट बघत होता त्यावर बोलण्यास सुरूवात केली.
”हे बघं मला विचार करायची सवय नाही. मी किती हट्टी आहे याची कल्पना तुला वर्षभरातील बोलण्यातून आलीच असेल. मी टोकाचे निर्णयही विचार न करता घेते. मी तुझ्यासारखा आजूबाजूच्यांचा विचार करण्यात धन्यता मानत नाही. त्यामुळं विचार तू कर. जर तू मला माझ्या या स्वभावसह स्वीकारशील का?”
अर्थात सम्याला मिळालेला होकार म्हणजे नियम व अटी लागू अशा प्रकारचा होता. प्रितीचं हे उत्तर ऐकून सम्याला काय बोलायचं कळत नव्हतं. कारण तिनेफारच मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा केला होता. प्रिती पुन्हा त्याच्याजवळ आली एवढापण विचार करत बसू नकोस की माझा विचार बदलेल. चल आता का रात्रभर बसायच्या इरादाय काय?

या भेटीनंतर हो ना…. या शब्दांविना दोघांची मनं जुळत गेली. दिवसेंदिवस भेटी वाढत गेल्या. शारीरिक मर्यादा ओलांडताना त्यांना बऱ्याचदा नकली काळ्या मण्यांनी साथ दिली होती. या सगळ्याचा शेवट अस्सल मणी माळून होईल, अशा गप्पा प्रत्येक भेटीतं व्हायच्या. पण सम्याला एक कळलं… प्रेम संबंध जसजसे लांबत आहेत तसतसे लाँग लाईफचं स्वप्न अशक्य होतं चाललं आहे. मार्च एंडिगला प्रितीच्या फोननं समीरचा अंदाज खरा ठरला. प्रितीच्या फोननं त्याला हैराण करुन सोडलं. “तुझी गरज भागली… अखेर तू पुरूषच ना! आता मी तुला आणखी वेळ देऊ शकत नाही. पुढील महिन्यात तुला कळेलंच. नंतर सांगितल नाही असं म्हणू नकोस.”
फोनवरील प्रितीच्या या वाक्यानं तो कासावीस झाला. आठवड्याभरात खरं मंगळसूत्र घेऊन आलास तर ठिक नाही तर विसरून जा! असा इशाराच प्रितीनं त्याला दिला होता. हा संवाद पहिल्यांदा होत नव्हता. त्यामुळे प्रिती मार्च एंडिंगलाच एप्रिल फुल करत असावी, असा विचार करत समीरनं स्वत:ला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रितीच्या बोलण्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत किशोरदांच्या आवाजातील ‘ओ मेरे .. दिल के चैन…अब तुम्ही फैसला की जिए!’ गाण्याच्या ओळी गात त्यानं फोन डिसकनेक्ट केला. प्रितीला या संगीतातील तुम्ही फैसला की जिए!….एवढचं मनाला भावल. ती फैसला घेऊन मोकळी झाली. दोन एक दिवसांत सम्याला प्रितीच्या बोलण्यात तथ्य असल्याची जाणीव झाली. तिनं आयुष्याचा जोडीदार निवडल्याचं सत्य समीरला नाकारता येत नव्हतं. आता फक्त तो विचार करत होता, की दोन भिन्न विचार एकत्र आलेच कसे? प्रेमाच्या सगळ्या उपमा… फोल असल्या तरी प्रेम आंधळ असतं हे वाक्य न खोडता न येण्यासारखेच आहे हे त्याला पटलं होतं.

– तीन फुल्या, तीन बदाम