उर्वीनं काव्याला फोन केला. ती घरीच असल्याचं समजल्यावर उर्वीला हायसं वाटलं. तिन आपली गाडी थेट काव्याच्या घरी नेली. काव्या तिच्या बेस्ट फ्रेंडपैकी एक. उर्वी तिच्यापासून कधीच काही लपवून ठेवायची नाही आणि कधी वाटलं तर ती तिचा सल्ला नक्की घ्यायची.

“आज एकदम दुपारीच माझ्याकडं… ऑफिसमधूनही लवकर निघालेली दिसतेस… काय झालंय?” काव्यानं विचारलं.

“काहीच समजत नाही. कस रिअॅक्ट व्हावं तेही कळत नाहीये. एक स्थळ आलंय. मला ते अजिबात आवडलेलं नाही. पण त्याच्याशी लग्न कर म्हणून बाबा मागं लागलेत. माझं काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच ते नाहीत.”

विषय नाजूक असल्याचं काव्याच्या लक्षात आलं होतं… तिनं उर्वीकडून अजून माहिती जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले. एकूण उर्वीला तो मुलगा किंवा त्याच्या घरचे फार काही आवडले नाहीत, हे काव्याच्या लक्षात आलं होतं.

“तुला जर तो मुलगा आवडला नसेल. तर तू बाबांना स्पष्टपणे नाही म्हणून सांग. बाबा काय म्हणतील याचा फारसा विचार करू नकोस. प्रश्न एका दिवसाचा नाही. संपूर्ण आयुष्याचा आहे. त्यामुळं गडबडीनं आणि कोणाच्या दबावाखाली निर्णय घेण्याची काहीच गरज नाही.” काव्यानं समजावलं.

“पण बाबांचं काय करू… त्यांना कसं सांगू… नाही म्हटलं तर ते चिडतील आणि त्याचा त्रास मला सहन करावा लागेल.” उर्वी सांगत होती.

“हे बघ बाबा चार दिवस चिडतील आणि नंतर शांत होतील. पण त्यांच्या चिडण्याचा विचार करून तू तुझ्या पूर्ण आयुष्याशी नाही खेळू शकत. जो मुलगा आपल्याला आवडलाच नाही. त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायचं, ही कल्पनाच न पटणारी आहे.” काव्यानं पुन्हा तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“तू स्पष्टपणे बाबांना नाही म्हणून सांग…” काव्यानं परत उर्वीला सांगितलं.

काव्याचं म्हणणं उर्वीला पटलं होतं. बाबांच्या दबावाखाली येऊन एवढा मोठा निर्णय घेण्याची तिची तयारी नव्हती. त्यामुळे ते स्थळ नाकारण्याचं तिनं निश्चित केलं.

……………………………………..

उर्वी कॉलेजमध्ये असतानाच गंभीर आजारमुळं तिच्या आईनं जगाचा निरोप घेतला. त्यानंतर घरातील मोठी मुलगी म्हणून सगळी जबाबदारी तिच्यावरच आली होती. घरात लहान भाऊ उत्कर्ष, बाबा आणि उर्वी असे तिघेच. पण तिनं परिस्थिती फार छानपणे ओळखून घरची सगळी जबाबदारी उचलली. घर सांभाळून तिनं आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आणि जॉबही मिळवला. घरच्या जबाबदारीमुळं तिनं स्वतःच्या लग्नाचा मुद्दा मागेच ठेवला होता. बाबांनी लग्नाचा मुद्दा काढला की ती काहीतरी कारण काढून तो टाळायची. पण वर्षे बदलत होती आणि उर्वीचं वय वाढत होतं. त्यामुळं बाबांनी गेल्या काही महिन्यांपासून तिच्या लग्नाचा विषय लावून धरला होता आणि त्यातूनच निर्माण झालेल्या कोंडीत ती सापडली होती.

……………………………….

तीन वर्षांपासून उर्वीसोबत काम करत असल्यामुळं नीरजला तिची सवय झाली होती. यापूर्वी त्यानं तिला इतकं डिस्टर्ब कधीच पाहिलं नव्हतं. नक्की काय झालं असेल, याचा विचार सारखा सारखा त्याच्या मनात येत होता. ऑफिसमधून घरी आल्यावरही त्याला राहून राहून उर्वीच आठवत होती. न राहवून त्यानं शेवटी तिला मेसेज केला.

“कशी आहेस? नॉर्मल झालं का सगळं?”

“मी ठिक आहे… डोन्ट वरी…” नीरजच्या मेसेजला उर्वीनं एवढंच उत्तर दिलं होतं.

“खरंच… काही टेन्शन नाही ना… घरी सगळं व्यवस्थित आहे ना…” नीरजनं रिप्लाय पाठवला.

नीरज तिच्या उत्तराची वाट बघत होता. बराच वेळ झाला, पण तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. उर्वीनं काहीच रिप्लाय न दिल्यामुळं नीरज जास्तच अस्वस्थ झाला. अजून सारंकाही ठिक झालं नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. उद्या ऑफिसमध्ये बोलू अस म्हणत त्यानं स्वतःच्या मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Love Diaries : ह्रदयी वसंत फुलताना… (भाग १)

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतानाच नीरजच्या मोबाईलवर उर्वीचा मेसेज आला होता.

“मी आज नाही येऊ शकत ऑफिसला. व्हेरी सॉरी…”

“ओके… टेक केअर…”

नीरजनं रिप्लायमध्ये ओके लिहिलं असलं तरी सगळं काही ओके नव्हतं. राहून राहून उर्वीचा चेहराच त्याच्या डोळ्यासमोर येत होता. उर्वीनं काल आपल्या मेसेजला काहीच रिप्लाय दिला नाही. आज ती ऑफिसलाही येणार नाही. काय झालंय… या गूढ विचारानं त्याच्या मनावर कब्जा मिळवला होता. डोक्यानं विचार करण्यापेक्षा आपण मनातील भावनांना अधिक महत्त्व देवू लागल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं.

उर्वीला काय झालंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना ती मात्र आपल्यापासून अंतर राखून राहते, हे त्याला कुठंतरी बोचत होतं. उर्वी आणि तो एकमेकांना चांगले ओळखत असले, तरी त्यांच्यामध्ये अंतर होते. दोघांनी कधीही आपल्या पर्सनल लाईफबद्दल, लग्नाबद्दल चर्चा केली नव्हती. जी काही चर्चा व्हायची ती ऑफिसपुरता मर्यादित आणि कधी ओघानं आलीच तर आवडीनिवडींबद्दल. त्यापेक्षा जास्त दोघांनी एकमेकांमध्ये इंट्रेस्ट दाखवला नव्हता.

उर्वीचं असं तुटक वागण्यामुळं नीरज जास्त गोंधळून गेला होता. आपण तिच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ तर करत नाही ना, असा प्रश्न त्याच्या डोक्यात आला. पण मन काही केल्या ऐकत नव्हतं. उर्वी अशी का वागते, या प्रश्नानं त्याच्या मनाला घेरून टाकलं होतं.

……………………………

बाबांना आज आपला निर्णय सांगून टाकायचा, हे उर्वीनं ठरवलं होतं. त्यासाठीच तिनं सुटी घेतली होती. त्यांचा मूड बघून विषय काढायचा म्हणजे फार कटकट होणार नाही, असंही तिनं मनाशी ठरवलं होतं.

दुपारी जेवणासाठी उर्वीनं बाबांना आवडणारी भरल्या वांग्याची भाजी केली होती. त्यांचा मूड नीट राहिल, याचं पुरेसं प्लॅनिंग तिनं केलं होतं.

जेवणानंतर तिनं विषय काढला.

“बाबा, मला तो मुलगा पसंत नाही. प्लीज, माझ्या लग्नाची इतकी घाई करू नका.” उर्वीनं थेट विषयालाच हात घातला.

“काय प्रॉब्लेम आहे मुलामध्ये… घरचं व्यवस्थित आहे. त्याला चांगली नोकरीये… मॅनेजर आहे… अजून काय वेगळं हवंय तुला… मुळात नाही म्हणण्याचं कारण काय?” बाबांनी थोडं रागावतचं विचारलं.

“पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, म्हणून मी त्याच्याशी लग्न करावं, असं तुम्हाला वाटतं का? बाबा, मला त्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचंय. तो जर मला आवडलाच नाही. तर मी कशी राहू त्याच्यासोबत. आणि मी याआधीही तुम्हाला सांगितलंय की जोपर्यंत मला मुलगा पसंत पडत नाही. तोपर्यंत मी लग्न करणार नाही. माझा लग्न करण्याला विरोध नाही. पण मला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचंय. माझी काही स्वप्न आहेत.” उर्वीनं अगदी शांत पण ठामपणे सांगितलं.

“सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत उर्वी. लग्न वेळीच झालं पाहिजे. आधीच खूप उशीर झालाय. तुझं ऐकत बसलो तर आणखी किती दिवस जातील सांगता येत नाही. तुला ते स्थळ पसंत नसेल, तर आणखी दोन-तीन स्थळं आहेत. ती बघून घे. पण मी आता जास्त दिवस थांबणार नाही.” बाबांनी उर्वीच्या लग्नाचं चांगलच मनावर घेतलं होतं.

………………………………

ऑफिसमध्ये उर्वी नसल्याचं नीरजला क्षणोक्षणी जाणवत होतं. आजच्या दिवसाचं ठरलेल काम करताना त्याला सारख्या अडचणी येत होत्या. ऑफिसच्या कामासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यतही उर्वीनं डोकावलंय, हे सुद्धा त्याला जाणवलं होतं. यापूर्वीही उर्वीनं सुटी घेतली होती. पण त्यावेळी तिची इतकी आठवण आली नव्हती. जितकी आज त्याला येत होती. काही केल्या उर्वीचा विचार त्याच्या मनातून जातच नव्हता. अचानक आपल्याला उर्वीची एवढी कमतरता का जाणवते आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तो करत होता.

उर्वीचा विचार करत असतानाच त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्यानं डिस्प्लेकडं बघितलं आणि त्याच्या चेहरा खुलला!!!

(क्रमशः)       

– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित