लिखना है मुझे भी कुछ गहरा सा…
जिसे कोई भी पढे…
पर समझ सिर्फ तुम सको…

वॉट्सअॅपवर आलेला हा फॉरवर्डेड मेसेज सिद्धार्थच्या थेट ह्रदयाला जाऊन भिडला. तो परत परत वॉट्सअॅप उघडून तोच मेसेज वाचत होता. भूतकाळातील आठवणींचा पट त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. आज बऱ्याच दिवसांनी या मेसेजमुळं त्याला ज्योतीची आठवण आली होती. ज्योतीची ती पाठमोरी प्रतिमा पुन्हा त्याच्या डोळ्यापुढं उभी राहिली आणि सिद्धार्थची तंद्री लागली.

घड्याळात दुपारचे चार वाजायला आले होते. तेवढ्यात आईनं हाक मारल्यामुळं तो पुन्हा भानावर आला.

“अरे काय करतोय सिद्धार्थ… ऑफिसला जायचं नाही का?” आईनं हाक मारत त्याला विचारलं.

“काही नाही गं आई… डोळा लागला होता.. आलो पाच मिनिटांत खाली” त्यानं उत्तर दिलं.

शुक्रवार असल्यामुळं सिद्धार्थच्या नाईटचा आज शेवटचा दिवस होता. तो पटकन आवरून खाली आला. आईनं केलेला चहा घेऊन बाहेर पडला. ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत सव्वापाच वाजले होते. डेस्कवर पोहोचून त्यानं कामाला सुरुवात केली. आज त्याच्याकडं पान एकची जबाबदारी नव्हती. शहर आवृत्तीची पानं लावायची होती. त्यामुळं त्यानं कोणकोणत्या बातम्या रिपोर्टरकडून आल्या आहेत, हे सिस्टिममध्ये पाहिलं. रिपोर्टर्स डायरी बघून आणखी कोणत्या बातम्या येणार आहेत, याचा अंदाज घेतला आणि पानांचं नियोजन करून ठेवलं.

सिद्धार्थ स्वतःला कामात गुंतवून टाकण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या मनातून ज्योतीचा विचार जातच नव्हता. खरंतर आज बऱ्याच दिवसांनी त्याला इतक्या तीव्रतेने ज्योतीची आठवण आली होती. त्यानं परत पुढ्यात असलेल्या बातम्यांचं संपादन करून त्या प्रुफ रिडिंगसाठी सोडायला सुरुवात केली. पान वेळेत जायला हवीत म्हणून सिद्धार्थनं जाणीवपूर्वक स्वतःला त्या विचारांपासून काहीवेळ दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. घड्याळात सात वाजायला आले होते. समोर असलेल्या टीव्हीवरही अॅंकर वेगवेगळ्या बातम्या सांगत होता. अधून मधून जाहिराती येत होत्या. न्यूजरूममध्ये सगळं नेहमीप्रमाणं सुरू होतं. इतक्यात टीव्हीवर फ्लॅश दाखवण्यास सुरुवात झाली. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोट झाल्याची बातमी टीव्हीवर झळकली. स्फोटामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत असल्याचं अॅंकर सांगत होता. ऐन गर्दीच्यावेळी स्फोट झाल्यामुळं जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. या बातमीमुळं न्यूजरूममधील अनेक जण टीव्हीपुढं गोळा झाले होते. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना सुरुवातही झाली होती. काहीजण पुण्यातील आपल्या नातेवाईकांना फोन करून ते कुठं आहेत, ते ठिक आहेत ना, याची खातरजमा करत होते. बॉम्बस्फोटांबद्दल एकामागून एक अपडेट्स येत होते आणि त्याची तीव्रता स्पष्ट होत होती. या स्फोटांमुळं सिद्धार्थही हादरला होता. शिक्षणाच्या निमित्तानं या शहरात ७-८ वर्षे घालवल्यानं त्याचा पुण्याशी वेगळाच ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्याला या शहरातचं पहिल प्रेम मिळालं होतं. त्याला ज्योती मिळाली होती. तिचा सहवास मिळाला होता. आपुलकची, मायेची उबदार साथ मिळाली होती. आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत, असे काही क्षण याच शहरानं दिले होते. त्यामुळं सिद्धार्थही हातातलं काम सांभाळून पुण्यातील स्फोटासंबंधीचे अपेडट्स बघत होता.

सिद्धार्थनं पुणं सोडून सुमारे तीन वर्षे उलटली होती. पण या तीन वर्षांत तो परत कधीच पुण्याला गेला नाही. पुणंही नको आणि तिथल्या आठवणीही नको. साधी नगर-पुणे अशी पाटी असलेली एसटी जरी दिसली तरी तो पटकन नजर दुसरीकडं वळवायचा. स्फोटाच्या बातमीमुळं त्याला ज्योतीची पुन्हा एकदा तीव्रतेने आठवण आली. त्यानं एक-दोन मित्रांना फोन करून ज्योतीबद्दल त्यांच्याकडं विचारणा केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळं तो जास्तच घाबरला. ज्योती ज्या ऑफिसमध्ये काम करते ते याच रोडवर आहे आणि संध्याकाळी सातच्या सुमारासच ती ऑफिसमधून बाहेर पडते, अशी माहिती त्याला समजली होती. त्याच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. त्याचक्षणी सिद्धार्थनं पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानं हातातल्या बातम्यांवर आवश्यक संस्कार करून त्या पानात लावण्यासाठी दिल्या. राजेशला त्यानं शहराची पानं बघायला सांगितली आणि तो ऑफिसमधून बाहेर पडला.

सिद्धार्थला घेण्यासाठी चिन्मय आधीच शिवाजीनगरला येऊन थांबला होता. दोघंही लगेचच जंगली महाराज रस्त्याच्या दिशेने निघाले. बाईक बालगंधर्वजवळ आली आणि…
……………………………….
“संध्याकाळी भेटू या ना… तू येतीये ना…” सिद्धार्थ ज्योतीला विचारत होता.

“हो रे… मी येते साडेसातपर्यंत आपल्या नेहमीच्या ठिकाणी” ज्योतीनं सांगितलं.

आणि ठरल्या वेळेप्रमाणं ती आलीसुद्धा… बालगंधर्व रंगमंदिरामागचा पूल त्या दोघांचं नेहमीचं भेटण्याचं ठिकाण. या पुलावर गप्पा मारत बसायला तिला खूप आवडायचं. त्याच कारण तसं वेगळं होतं. ट्रक किंवा बस अशी अवजड वाहनं या पुलावरून गेल्यावर तो किंचितसा वरखाली व्हायचा. पुलावर बसलेल्या माणसांना हे हालणं अगदी व्यवस्थित जाणावयचं. ज्योतीला हा अनुभव खूप आवडायचा. त्यामुळं ती तासनतास या पुलावर गप्पा मारत बसायची. शिवाय पुलाच्या एका बाजूला असलेल्या खत्री वडेवाल्याकडे मिळणारा वडापाव आणि दुसऱ्या बाजूला अतिशय साध्या अशा मधुबनमध्ये मिळणारा चहा आणि भजी त्या दोघांचीही हॉट फेव्हरिट ठिकाणं होती. सिद्धार्थ आणि ज्योतीतील प्रेम बहरताना याच पुलानं पाहिलं होतं. त्या दोघांमधील नाजूक क्षणांचा, लुटूपुटीच्या भांडणांचा हा पूलच साक्षीदार होता.
……………………………

सिद्धार्थला तो पूल दिसला. पण यावेळी पुलाच्या सुरुवातीला उंचावर मोठे बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि त्यावर ‘अवजड वाहनांना प्रवेश बंद’ अशी सूचना लिहिली होती…

पुढं जंगली महाराज रस्त्यावर बरीच गर्दी होती. पोलिसांनी वाहतूकही दुसऱ्या रोडनं वळवली होती. संभाजी बागेच्या गेटपासून पुढं कोणालाच सोडत नव्हते. तिथं पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांचीच वर्दळ होती. स्फोटामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वॉट्सअॅपच्या माध्यमातून सिद्धार्थपर्यंत पोहोचली होती. त्यांची नावे मात्र कळली नव्हती. जखमींना ससूनसोबतच आसपासच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. दोघांनीही त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचं ठरवलं. चिन्मयनं गाडी घोले रोडवरून पुढं नेली. मॉडेल कॉलनीतून जात असताना सिद्धार्थला अकाऊंटसच्या क्लासची गल्ली दिसली….
………………………………….

पावसाळा सुरू होऊन महिना उलटला होता. सगळीकडं हिरवाई बहरली होती. श्रावण असल्यानं रिमझिम सरी आणि उन्हाचा लपंडावही सुरू होता. ज्योती रिमझिम पावसात भिजत क्लासकडं येत होती. ती छत्री घरी विसरली होती. त्यामुळं हातातली बॅग डोक्यावर धरून ती चालत चालत येत होती. त्यातच अचानक पाऊस थांबून उन पडलं. झाडांमधून येणारी तिरपी किरणे तिच्या चेहऱ्यावर पडली. केसांवर, गालांवर पडलेले पावसाचे थेंब आणि त्यावर पडणाऱ्या किरणांमुळं तिचं रुप अजूनच उजळलं होतं. क्लासमध्ये पोहोचल्यावर तिन रुमालानं चेहऱ्यावरचे थेंब टिपले. केस मोकळे करून परत क्लचरनं बांधले.

अकाऊंटसाठी ज्योतीनं हा क्लास जॉईन केला होता. आणि सिद्धार्थही त्याच क्लासमध्ये होता. क्लासमध्ये ज्योती पुढून दुसऱ्या रांगेतील बेंचवर बसायची तर सिद्धार्थ मागून दुसऱ्या रांगेमध्ये. नोट्सच्या निमित्तानं सिद्धार्थनं ज्योतीची ओळख काढली आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली. पुढं पुढं ही ओळख घट्ट मैत्रीमध्ये आणि मग प्रेमात रुपांतरित झाली होती.
…………………………………

सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून या सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅकसारख्या झराझरा जात होत्या. इतक्यात चिन्मयन समोरून येणाऱ्या गाडीवाल्याला सावध करण्यासाठी जोरात हॉर्न वाजवला आणि सिद्धार्थ खाडकन भानावर आला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं त्याला घाम आला होता. रुमाल काढून त्यानं घाम पुसला. चिन्मयन हॉस्पिटलबाहेर गाडी पार्क केली आणि चौकशी करायला दोघेही आत गेले. चौकशी कक्षाकडं गेल्यावर त्यांनी तिथं अॅडमिट असलेल्या जखमींची यादी बघण्यास सुरुवात केली. पण त्यामध्ये त्यांना ते नाव काही सापडले नाही. त्यांनी तिथं असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडं ज्योतीबद्दल विचारणा केली. पण त्यांनी एकामागून एक विचारलेल्या प्रश्नांवर दोघांकडं कोणतीच उत्तर नव्हती. त्यात तुमच आणि त्यांचं नातं काय? असा प्रश्न एकानं विचारला. त्या प्रश्नानंतर काहीच न बोलता सिद्धार्थनं चिन्मयला घेऊन तिथून काढता पाय घेतला.

(क्रमश:)

– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित