तो तिच्यासोबत खूश होता यातच मुक्ता खूश होती. तिचे बाकीचे मित्र-मैत्रिणी तिला सतत विचारायचे की तू ठिक आहेस ना? तेव्हा ती ठामपणे हो असं उत्तर द्यायची. एकदा माऊली त्याच्या गर्लफ्रेण्डची ओळख ग्रुपमध्ये व्हावी म्हणून तिला डिनरला घेऊन आला होता. तेव्हा मुक्ताच्यासमोरच तिच्याशी काय बोलायचं यावरुन इतर मित्र-मैत्रिणी थोडे गप्पच होते. ती शांतता पाहून मुक्ताच तिच्याशी बिनधास्त बोलायला लागली. तिच्या ऑफिसबद्दल, आवडींबद्दल सगळ्याबद्दल सहजतेने बोलत होती. माऊली गप्पांच्या ओघात सहज बोलून गेला की, ‘मुक्ता हिच्यासमोर काहीच नाही…’ ते एक वाक्य तिच्या मनात खोलवर रुतलं. त्याच्या त्या वाक्याने ती आतून पुरती कोसळली होती. डोळ्यात आलेलं पाणी कोणाला दिसायला नको म्हणून तिने अथक प्रयत्न केले होते. त्याचं हे वाक्य तिथे जमलेल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं. तिच्या बाजूला बसलेला तिचा मित्र भाग्येष हळूच तिच्या कानात बोलला, ‘घाबरू नकोस मी आहे.’ पण रंगाचा बेरंग नको म्हणून ती काहीच बोलली नाही. मनावर दगड ठेवून हसायचं कसं हे ती पहिल्यांदा अनुभवत होती. त्यानंतर कोणचं माऊलीशी आणि त्याच्या गर्लफ्रेण्डशी बोलायला तयार नव्हतं. म्हणून ते दोघं जाईपर्यंत मुक्ता एकटी तिच्याशी बोलत होती. मुक्ता तिच्याशी एवढं का बोलते याचा सुरुवातीला इतरांना फार राग आला. त्यांनी तिला तसा जाबही विचारला. तेव्हा मुक्ता म्हणाली की,

“आपलं नाणं खोटंय, त्यात त्या मुलीचा काय दोष. तिला आपल्या ग्रुपमध्ये काय चालतं ते थोडीच माहिती आहे. दुसऱ्या मुलीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. जे काही बोलला ते माऊली बोलला ती नाही.”

काही महिन्यांनी माऊली आणि त्याच्या गर्लफ्रेण्डचं ब्रेकअपही झालं. पण मुक्ताने का झालं, कसं झालं, कधी झालं असे प्रश्न विचारले नाहीत. तिला त्यात काहीही स्वारस्य नव्हतं.

माऊलीचा स्वभाव इतर मुलांसारखा नव्हता. तो समजायला थोडा कठीण होता. शिवाय तो नेहमीच बोलायचा,

“प्रत्येकजण चेहऱ्याला मास्क लावून फिरत असतो. आपला खरा चेहरा कधीच कोणाला कळत नाही. माणूस घरी एक असतो, मित्रांसोबत एक तर ऑफिसमध्ये अजून वेगळा असतो. प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे मास्क लावतो.” त्याच्या या वाक्याप्रमाणेच त्याचं वागणंही होतं.
तो घरी श्रावणबाळ होता. जो कधीही आई-वडिलांच्या आज्ञेबाहेर नसणारा. पण बाहेर मित्रांमध्ये मात्र तो पुरता वेगळा होता. पार्टी, नाईट-आऊट करणं यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. पण तरीही त्याचं मन तिला कळायचं. तो काय विचार करेल किंवा ती काय रिअॅक्ट करेल ही गोष्ट दोघांनाही अगदी न सांगता अचूक कळायची. त्याची ती मास्कची फिलॉसॉफी मुक्ताकडे फारशी चालायची नाही.

तिचं आणि माऊलीचं नातं थोडं वेगळंच होतं. दोघांचं एकमेकांशिवाय पटायचं नाही. सहा–सात महिने एकमेकांसोबत चांगले गेले की कोणत्याही शुल्लक गोष्टींवरून त्यांच्यात असा काही वाद व्हायचा की ते परत एखादं दोन महिने बोलायचेही नाहीत. मग कधी तरी पुन्हा बोलणं सुरू व्हायचं. तिने एकदा त्याला प्रपोजही केलं होतं. पण त्याने मात्र नकार दिला होता. त्याने नकार दिला म्हणून तिने त्यांच्यातलं मैत्रीचं नातं कधीच तोडलं नव्हतं. माझं प्रेम आहे म्हटल्यावर समोरच्याचही आपल्यावर प्रेम हवंच असा काही तिचा अट्टाहास नव्हता. पण आपल्या मनातल्या भावना त्याला कळल्या पाहिजेत म्हणून तिने त्या सांगितल्या होत्या. असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि ती दोघं एकमेकांसोबत चांगला काळ घालवत होती.

तिला डायरी लिहायची प्रचंड आवड. दिवसभरात जरी ते शक्य झालं नाही तरी ती सुट्टीच्या दिवशी नक्कीच एखादं पान तरी लिहितेच. आतापर्यंत तिला अनेक डायरी माऊलीने गिफ्ट म्हणून दिल्या होत्या. त्यात ती तिला सुचणाऱ्या कविता, चारोळी, काही चांगली वाक्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मनातलं सारं काही ती डायरीमध्ये लिहायची. दोघांमध्ये ठरलेला खोटा वाद म्हणजे डायरी वाचायला देणं. मुक्ताला तिची डायरी वाचलेली अजिबात आवडायची नाही. ती वाचायची माऊलीलाही परवानगी नव्हती. पूर्ण मुक्ता कोणाला कळू नये एवढंच तिचं म्हणणं असायचं. पण मुक्ताला अधिक जाणून घ्यायला किंवा नेमकी त्याच्याबद्दल त्या डायरीमध्ये तिने काय लिहिलंय हे जाणून घेण्याची त्याची उत्सुकता असायची. स्वतःची डायरी वाचायला देणं सोडून मुक्ताने त्याची एकही गोष्ट ऐकली नाही असं कधी झालं नाही.

दोघांचे असेच हसत- खेळत दिवस जात होते. अचानक एक दिवस ऑफिसमधून येताना माऊलीच्या गाडीचा अपघात झाला. तेव्हा मुक्ताही ऑफिसमध्ये होती. जेव्हा तिला हे कळलं तेव्हा ती सगळं सोडून त्याच रात्री त्याला भेटायला गेली. त्याला काही झालं तर नसेल ना या विचाराने तिचं डोकं बधिर झालं होतं. तिच्याच ग्रुपमधला मित्र शरद आणि ती एकत्र त्याला पाहायला गेले. नंतर प्रत्येक दिवशी ती त्याला त्याच्या तब्येतीबद्दल आणि पायाबद्दल विचारायची. असंच एका रात्री एक-दोन वाजेपर्यंत बोलणं झाल्यावर दोघं झोपी गेले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिने गुड मॉर्निंगचा मेसेज त्याला टाकला. पण त्याचं नेट बंद असल्यामुळे व्हॉट्सअपवर तो मेसेज त्याला गेलाच नाही. उशिरा उठेल या विचाराने ती ऑफिसमध्ये गेली आणि ऑफिसच्या कामात व्यग्र झाली. दुपारी जेवताना त्याला मेसेज करावा म्हणून तिने व्हॉट्सअपची त्याची चॅट विंडो ओपन केली तरी तिला एकच टीक दिसत होती. अजूनपर्यंत त्याने नेट कसं काय बंद ठेवलं या विचाराने तिने माऊलीला फोन लावला. त्याचा फोनही लागेना म्हणून तिने त्याला टेक्स्ट मेसेज टाकला. एक, दोन, तीन १०-१२ टेक्स्ट मेसेज, कित्येक व्हॉट्सअप मेसेज आणि फोन करुनही त्याच्याबद्दल तिला काहीच कळत नव्हते. आता मात्र तिचं मन घाबरायला लागलं. इतर मित्रांना विचारावं तर तू अजूनही त्याचीच काळजी करतेस का, असा उलट ओरडा तिलाच पडणार म्हणून तिने कोणाला विचारलेही नाही.

मन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था तिची झाली. तो संपूर्ण दिवस आणि ती रात्र मुक्ता एक मिनिटही स्वस्थ बसली नाही. डोळ्यातून सतत वाहणाऱ्या धारा घरातल्यांना कळू नये म्हणून फार मुश्किलीने तिने रोखून धरल्या होत्या. रात्री न राहून तिने ग्रुपमधल्या एका मैत्रिणीला नयनाला त्याच्या घरी फोन करुन त्याची तब्येत विचारायला सांगितले. मिनलने दुसऱ्या दिवशी माऊलीच्या घरी फोन केला तेव्हा त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं असं कळलं. मुक्ताला हे कळताच तिच्या मनातल्या काळजीची जागा रागाने घेतली. आदल्या रात्रीपर्यंत बोलत असतानाही माऊलीला उद्या माझं ऑपरेशन आहे, असं साधं सांगावसंही वाटलं नाही, याचा तिला भयंकर राग आला.
(क्रमशः)
– तीन फुल्या, तीन बदाम