आज कॉलेजचं रियुनिअन होतं… जवळपास पाच वर्षांनी सगळे एकत्र आले होते… कँम्पसमध्ये पार्टी सुरू होती… कट्ट्यावर बसून सगळे जुन्या आठवणींना उजाळा देत होते… पण क्षितीचे काही त्यात लक्ष लागत नव्हतं. घोळक्यातून वाट काढत ती खाण्याच्या टेबलापाशी पोहोचली. तिला पाणी हवं होतं. हातात पाण्याचा ग्लास घेऊन ती तोंडाला लावणार एवढ्यात तिचं लक्ष समोर गेलं. तिनं त्याला पाहिलं. काळ शर्ट, सहा फूट उंच, गोरा, हँडसम, फ्रेंच स्टाईल दाढी आणि काहीसे तांबूस डोळे, एका हातात कोल्ड ड्रिंक तर दुसरा हात जीन्सच्या पॉकेटमध्ये ठेवून सगळ्यांपासून तो दूर उभा होता…
”तो समीर आहे का?”, तिने स्वत:लाच प्रश्न केला.
”हो, तो समीरच आहे.”, तिची खात्री पटली. त्यानंही तिच्याकडं पाहिलं दोघांचीही नजरानजर झाली, पण नजर चोरत क्षितीने मान खाली घातली आणि जणू आपण त्याला ओळखत नाही, अशा आवेशात ती तिथून निघून गेली. तोही मान खाली घालून चालू लागला आणि आपल्या जुन्या ग्रुपमध्ये मिसळून गेला.
… त्याला पुन्हा पाहून क्षिती खूपच अस्वस्थ झाली होती. पाच वर्षे ज्याचा काही पत्ताच नव्हता, तो असा आपल्यासमोर येऊन उभा राहिल याची तिने कल्पनाही केली नव्हती.
”तो इथे येणार हे आधीच कळलं असतं तर आपण इथे आलोच नसतो” क्षितीच्या डोक्यात विचार आला.
ती सगळ्यांपेक्षा दूर कोपऱ्यात जाऊन बसली, तिला परत ग्रुपमध्ये जायचे नव्हते. कारण तिथे समीर होता आणि त्याच्या समोर उभं राहून काही घडलंच नाही, असा आव आणून थांबणं तिला शक्य नव्हतं.
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी कँटिनमध्ये बसून तिनं त्याच्याशी शेवटचा संवाद साधला होता. आजही तो संवाद तिच्या मनाला काट्यासारखे बोचत होता.
…………………….

”समीर ऐक ना! आज कॉलेजचा शेवटचा दिवस… त्यानंतर असे दिवस आयुष्यात पुन्हा कधीच वाट्याला येणार नाही, या शेवटच्या दिवसाचा शेवटही गोड व्हावा, असं मला वाटतंय… आपण तीन वर्षे एकमेकांना ओळखतो, आपल्या दोघांतलं नातं हे मैत्रीपलीकडचं आहे. ते नातं आपण नेहमीच आपल्या फ्रेंडपासून लपवून ठेवलं. पण आता आपण कॉलेजमधून बाहेर पडतोय तेव्हा त्यांना सांगायला काहीच हरकत नाही. खूप चोरून प्रेम केलं. आता मला सगळ्यांना ओरडून सांगायचंय की तू माझा आहेस आणि मी तुझ्याशीच लग्न करणार” क्षिती इतकी खूश होऊन बोलत होती की आपल्या बोलण्यानं समीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय हेही तिला कळलं नाही.
”समीर चलना ग्रुपमध्ये आत्ताच सांगून टाकू आपण. सगळ्यांना कसला धक्का बसेल ना आपली लव्हस्टोरी ऐकून? त्या कृतिका, नेहा, मैत्रीचं तोंड तर बघण्यासारखं होईल हे कळल्यावर. तुझ्यावर लाईन मारतात त्या सगळ्या. पण या सगळ्या गोपिकांचा पत्ता आता मीच कट करणार.”
…………………………

एवढ्यात जोरजोरात हसण्याच्या आवाजानं तिची तंद्री भंगली. ज्या कृतिका, मैत्री आणि नेहाचा पत्ता कट करण्याच्या बाता आपण पाच वर्षांपूर्वी समीरसमोर करत होतो त्यांच्यातच तो जाऊन उभा होता… थट्टा मस्करी करत होता. तिने चोरून त्याला पाहिलं आणि ती मनातून दुखावली. त्याचं लक्षही नव्हतं क्षितीकडे. तो मुद्दामहून आपल्याकडं बघणं टाळत असणार हे क्षितीला माहिती होतं. एकदा का एका गोष्टीकडे पाठ फिरवली की मग तो त्या गोष्टीकडे ढुंकूनही बघणार नाही, हा त्याचा स्वभाव तिला माहिती होता. तो नावाप्रमाणेच होता… वाऱ्यासारखा. त्याला कैद करणं क्षितीला जवळपास अशक्य होतं, क्षितीचा तो प्रयत्न फसला होता. तो हँडसम होता, हुशार होता कॉलेजमध्ये असला तरी त्याचे वाचन अफाट होतं, अनेक वादविवाद स्पर्धेत तो प्रतिस्पर्ध्यांना गार करायचा, शिवाय अभिनयातही हातखंड होता. कॉलेजच्या तिन्ही वर्षांत सर्वाधिक बक्षिसं तर समीरमुळंच मिळाली होती. कॉलेजमधली अशी एकही मुलगी नसेल जी समीरवर फिदा नसेल. एरवी कॉलेजच्या कँम्पसमध्ये मुलं मुलींना प्रप्रोज करायची आणि इथे समीरलाच मुलींकडून प्रपोज यायचे. पण समीर वेगळा होता. एकाही मुलीला भिक घालायचा नाही तो. तो असं का वागायचा? कोणालाच कळायचं नाही.

इतर मुलींकडे तो बघतही नसला तरी ग्रुपमधल्या क्षितीवर मात्र त्याचा खूप जीव होता. त्यानं कधीच आपलं खासगी आयुष्य कोणासमोर उघड केलं नाही, त्यामुळे क्षिती आणि त्याच्यात काय सुरू आहे ते दोघे सोडून कोणालाच ठावूक नव्हतं. इतर मुलींसारखी क्षिती त्याच्या प्रेमात पडली होती आणि पुढाकार घेऊन तिनेच त्याला प्रपोज केलं होतं, त्यानं तिला साफ नकार दिला होता. अगदी एकदा नाही दहावेळा.
”क्षिती तूला मी दहावेळा नकार दिला असेल, पण तरीही तू का माझ्यामागे लागते? नकार देण्याइतकं तुझ्यात काहीच कमी नाही पण प्लीज मला समजून घे मला नाही ठेवायचंय रिलेशन. मी इतर मुलींनाही तेच सांगतो तुलाही तेच सांगेन.”, समीर प्रत्येकवेळी तेच म्हणायचा.
”प्रेम हा एक विषय सोडून क्षिती तू काहीही बोल माझ्याशी मी अगदी रात्रभर तुझ्याशी गप्पा मारेन… पण प्लीज हे i love you वगैरे बोलू नकोस, नाहीतर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही.” त्याने तिला स्पष्ट सांगितलं.

(पूर्वार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम
 

© सर्व हक्क सुरक्षित