बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळपासून सूर्यदर्शनही झालं नव्हतं. काळ्या ढगांनी डोक्यावर मैफल जमवल्यामुळं आज दिवसभर तरी पाऊस असाच बरसत राहिल हे अगदी पक्क होतं. समोर रस्त्यावर वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणं सुरू होती. खूप गर्दी नसली तरी वाहनांची एकामागून एक ये-जा सुरू होती. रेनकोट घालून बच्चे कंपनी शाळेकडं निघाली होती. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची, गाड्या जाण्यामुळं पाण्यातून उडणाऱ्या फवाऱ्यांची मजा लुटत ते पुढं निघाले होते. पावसामुळं झालेल्या चिकचिकीने काही चाकरमान्यांचे चेहरे त्रासिक झाले होते. कधी थांबणार हा पाऊस, कधी सूर्यदर्शन होणार, असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. चहाच्या टपऱ्यांबाहेर मुला-मुलींचा घोळका आडोसा बघून थांबला होता. वाफाळलेल्या चहासोबत चर्चांचा फड मस्त रंगला होता. विकेंडचे प्लान्सही ठरवले जात होते. बाहेर सगळं अगदी नेहमीप्रमाणं सुरू होतं. पण रोहनचं काहीतरी बिनसलं होतं. त्याला उगाचच अस्वस्थ वाटत होतं. आपल्याला काय होतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. कॉलेजच्या पोर्चमध्ये उभा राहून तो बाहेर काय चाललंय बघत होता.

“रोहन, चल सुरभीला जाऊ”, चिन्मय म्हणाला.

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
lokmanas
लोकमानस: पंतप्रधान ‘या’ प्रश्नांची उत्तरे देतील?
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?

“नको रे… मला भूक नाही. तुम्ही जा.”, रोहननं विषयच संपवला.

“काय रे… काय झालंय तुला… गेल्या काही दिवसांपासून बघतोय… असा का वागतोयस… काय बिनसलंय…” चिन्मयनं रोहनच्या खांद्यावर हात टाकून त्याला विचारलं.

“काही नाही रे… उगाच मला पिळू नकोस… मी एकदम मस्त आहे…” रोहननं हात बाजूला काढत विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

“चल मी निघतो… मला लायब्ररीत जाऊन पुस्तक बदलून घ्यायचंय…” रोहन चिन्मयला सोडून चालू लागला.

चिन्मयच्या प्रश्नांपासून सुटका करून घेतली असली, तर रोहनला जाणवत होतं की आपलं रुटिन बिघडलंय. काहीतरी नक्कीच गडबड आहे. काय आहे हे मात्र त्याला जाणवत नव्हतं…

लायब्ररीत गेल्यावर फ्रिजमधलं पाणी ग्लासमध्ये घेत असतानाच त्याला प्राजक्ता दिसली. दोन दिवस प्राजक्ता कॉलेजला आली नव्हती. आज ती एकदम समोर आल्यामुळे रोहनला हलका धक्काच बसला. आपण ग्लासमध्ये पाणी भरतोय, हेच तो विसरून गेला आणि तिच्याकडेच बघत बसला. प्राजक्ता खूपच क्युट दिसत होती. पिंक कलरचा पंजाबी कुर्ता व्हाईट कलरचे लेगइन… नेहमीप्रमाणे मोकळे सोडलेले केस आणि कपाळावर अगदी बारीक टिकली… प्राजक्ताचे डोळे बोलके होते, ती काहीही नाही बोलली तरी तिचे डोळे सगळं काही सांगून जायचे… प्राजक्ता फ्रिजरच्या दिशेनेच येत होती. ती आपल्या दिशेने येतेय बघितल्यावर रोहनने पटकन हातातलं पाणी ट्रेमध्ये ओतून ग्लास जागेवर ठेवला आणि तो लायब्ररीच्या रिसेप्शनकडे चालू लागला. पण तिकडे जातानाही त्याचं लक्ष सारखं प्राजक्ताकडंच होतं.

प्राजक्ताला बघितल्यावर रोहनच्या मनातील अस्वस्थता कमी झाली होती. खरंतर आपण अस्वस्थ का आहोत, याचं कारण त्याला समजल होतं. हा सगळा बदल काय घडतोय, हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत होता.

……………………….

रोहन मुळचा सांगलीचा. घरातला एकुलता एक मुलगा. रोहनचे वडील शाळेत शिक्षक तर आई गृहिणी… लहानपणापासूनच तो अगदी शिस्तीत वाढलेला. शाळा, क्लास, अभ्यास आणि घर याच चौकटीत लहानाचा मोठा झालेला. रोहनच्या घरची परिस्थिती अगदी बेताचीच. सुवाच्च हस्ताक्षरामुळं रोहनचं कायम शाळेत कौतुक व्हायचं. हस्ताक्षरामुळंच त्याला शाळेमध्ये खूप बक्षिसंही मिळाली होती. बारावीच्या परीक्षेत डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो पुण्यात आला होता. रोहननं वकिल व्हावं, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळं त्यानं पुण्यात एलएलबीलाच प्रवेश घेतला. पुण्यात नवखा त्यात कोणाशी फारसं बोलण्याची रोहनला सवय नाही. त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही अगदी लिमिटेड. कॉलेजमध्ये अगदी दोन-तीन जणांशीच त्याची मैत्री झाली होती.

प्राजक्ता पुण्याचीच… वडील ऑन्कोलॉजिस्ट… खासगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारे… आई कॉर्पोरेट कंपनीत लीगल डिपार्टमेंटची हेड… घरी प्राजक्ता आणि तिचा लहान भाऊ प्रणव… अगदी चौकोनी कुटूंब… प्राजक्ता एकदम मोकळ्या स्वभावाची… मित्रमैत्रिणींमध्ये रमणारी… अभ्यास एके अभ्यास करत न बसता भरतनाट्यममध्येही तिनं प्रावीण्य मिळवलं होतं. प्रायोगिक नाटकांमधूनही तिनं छोट्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

…………………………..

आपल्यात काय बदल झालाय… हे रोहनला कळू लागलं. प्राजक्ताला बघितल्यावर आपल्याला छानसं वाटतं, हे त्याला जाणवू लागलं. हा बदल कसा स्वीकारायचा हे समजून घेणं त्याला थोडं जड जात होतं. कोणाजवळ व्यक्त व्हावं हे सुद्धा समजत नव्हतं. आपण इथं शिकण्यासाठी आलोय. घरच्यांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करायच्या असतील, तर हे सगळं बाजूला ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा विचार त्याच्या डोक्यात येत होता आणि स्थिरावू पाहात होता. पण मनाच्या कप्प्यात प्राजक्तानं घरं केलं होतं. तिचं दिसणं, हसणं, मनमोकळं वागणं सगळं काही परत परत डोळ्यापुढं येत होतं आणि मनावर हळूवार प्रेमाची फुंकर घालत होतं…

कॉलेजमध्ये ‘इंडियन लीगल सिस्टिम’चं लेक्चर सुरू होतं. गेल्यावेळी दिलेल्या असाईनमेंट देशपांडे सरांनी तपासून आणल्या होत्या. त्यावर चर्चा सुरू होती. असाईनमेंटमध्ये काय अपेक्षित होतं आणि प्रत्यक्षात काय पुढ्यात आलंय, याची ते सर्वांनाच माहिती देत होते. त्यांच्यासमोर रोहनची असाईनमेंट होती… त्यांनी सर्वांसमोरच रोहननं लिहून दिलेल्या असाईनमेंटच तोंडभरून कौतुक केलं. असाईनमेंट कशी असावी, म्हणून त्यांनी सगळ्यांना रोहननं लिहून दिलेलं वाचायला सांगितलं. त्यातही त्यांनी त्याच्या हस्ताक्षराचं कौतुक केलं. अगदी मोती पेरल्यासारखे हस्ताक्षर पाहून त्यांना खूप आनंदच झाला होता. खूप वर्षांनी त्यांनी इतकं सुंदर हस्ताक्षर पाहिलं होतं. त्यांच्या या कौतुकानं वर्गातील सगळ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष रोहनकडं गेलं. प्राजक्ताचंसुद्धा… ती रोहनकडं बघत असताना रोहनचंही तिच्याकडं लक्ष गेलं आणि तिनं स्माईल केलं!!!

लेक्चर संपल्यावर सगळ्यांनी रोहनकडं येऊन त्याचं असाईनमेंट  मागितली. त्याचं अक्षर बघून सगळे अवाक् झाले होते.

“एक नंबर रोहन… किती छान अक्षर आहे तुझं…” सगळ्यांची प्रतिक्रिया एकसारखीच होती. त्याला पाठीवर थाप मारून सगळे त्याला काँग्रॅज्युलेट करत होते. प्राजक्ता त्या गर्दीत नव्हती. ती थोडी लांबच उभी होती. सगळे रोहनपासून लांब गेल्यावर प्राजक्ता त्याच्या जवळ आली. रोहनपुढं हात करत तिनं त्याला काँग्रॅज्युलेट केलं आणि पुन्हा एकदा स्माईल केलं. आणि ती तिथून निघून गेली. आपण नक्की कुठं आहोत, हे काही क्षण रोहनला समजतच नव्हतं. त्याचक्षणी बाहेर पावसात जाऊन चिंब भिजावं, असं त्याला वाटू लागलं. रोहन व्हरांड्यामध्ये प्राजक्ताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता.

हस्ताक्षर हेच रोहन आणि प्राजक्ता यांना जवळ आणणारं कारण ठरलं होतं. रोहनची अभ्यास करण्याची पद्धत, त्याच्या नोट्स, रेफरन्स बुक्सचं वाचन या सगळ्यामुळं प्राजक्ता रोहनकडं अभिमानानं बघू लागली होती. अर्थात त्यामागं आपुलकीही होतीच. रोहन हॉस्टेलला राहात असल्यामुळे प्राजक्ता त्याच्यासाठी घरून डबाही आणू लागली होती. तिन आई-बाबांनाही रोहनबद्दल सांगितलं होतं.

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताला बघितल्यावर रोहनची जी अवस्था होत होती. तीच आता प्राजक्ताची होऊ लागली होती. फक्त कॉलेजातच नाही, तर कॉलेज सुटल्यावरही ती जास्तीत जास्त वेळ रोहनसोबतच घालवण्याला महत्त्व देऊ लागली होती. रोहनलाही तिचा सहवास खूपच हवाहवासा होता. त्यामुळं तिच्या कोणत्याही मागणीला तो नकार द्यायचा नाही. प्राजक्ता आपल्या प्रेमात पडलीये, हे त्याला समजूलागलं होतं. पण आपल्या प्रेमाची कबुली देण्याचं त्याचं धाडस होत नव्हतं. पुढाकार घेणार कोण, एवढाच प्रश्न शिल्लक होता.

“आपण या रविवारी अलिबागला जाऊ या का?” प्राजक्तानं घरी निघण्यापूर्वी रोहनला विचारलं.

“जाऊ या की…आपण दोघचं जायचं की आणखी कोणाला घ्यायचं?” रोहननं प्रश्नार्थकपणे विचारलं.

“नको आणखी कोणी नको… मला तुझ्याशी बोलायचंय… आपण दोघचं जाऊ या…” प्राजक्ताच्या उत्तरानं पुढं काय घडणार याचा अंदाज रोहनला आला होता. त्याला हवाहवासा तो क्षण अगदी दोन दिवसांवर होता. त्यामुळं तो मनातून आनंदानं फुलून गेला होता. रविवारी सकाळी सात वाजता सारसबागेजवळ भेटायचं दोघांनीही ठरवलं होतं.

… आणि रविवार उजाडला. प्राजक्ता घरात आवरत असतानाच मोबाईलवर रोहनचा मेसेज होता… मी सांगलीला पोहोचलोय… आपण आज नाही जाऊ शकत… मी तुला फोन करतो…

प्राजक्तानं लगेचच रोहनला फोन लावला… पण पलीकडून “आपण ज्या नंबरला कॉल केला आहे तो स्वीच्ड ऑफ म्हणजे बंद आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा…” असा रेकॉर्डेड मेसेज ऐकायला आला.

(क्रमशः)

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित