“फक्त सात मिनिटं राहिलीत. स्टेशन येईल. काही मिनिटांनंतर तू माझ्या आयुष्यात कायमची नसशील. तू पूर्ण प्रवासात काहीच बोलली नाहीस. जाताना मनात काहीतरी ठेवून तू निघून गेलेली मला नाही आवडणार. प्लीज बोल ना!” केतन प्राजक्ताला तळमळून सांगत होता.
ट्रेन वेगानं धावत होती आणि वेळही. खिडकीतून स्टेशन दिसत होतं. काही महिन्यांपूर्वी आयुष्यात आलेल्या प्राजक्ताचा निरोप घेताना त्याला जड जातं होतं. अगदी काल परवापर्यंत जिला बघितल्याशिवाय दिवसाची सुरूवातही होत नव्हती, ती आता दूर निघून जाणार होती. डोळे अक्षरश: भरून आले होते. पण डोळ्यातून एक टिपूसही त्याला काढायचा नव्हता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेनचा वेग मंदावत होता. दोघंही गर्दीतून ट्रेनमधून खाली उतरले. सात मिनिटं संपली होती. प्राजक्ता आता काहीच बोलणार नाही त्याला कळून चुकलं होतं.

‘का बोलेल ती माझ्याशी? मी काय केलं होतं तिच्यासाठी? तिला कधीच सुखात ठेवू शकलो नाही मी. आणि आता जाता जाता ती माझ्याशी नीट बोलेल अशी अपेक्षा तरी मी कशी ठेवू शकतो तिच्याकडून?’ तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देण्याचा त्याने प्रयत्न केला. ती एकदा गेली की परत कधीच येणार नव्हती त्यालाही माहिती होतं. पण सायलीसाठी तिला आयुष्यातून दूर करणं भाग होतं. शेवटी तो क्षण आला. आता रस्ते वेगळे होते कायमचे. प्लॅटफॉर्मवर लागोपाठ दोन ट्रेन आल्या. लोकांचे लोंढे बाहेर पडू लागले, मागून येणाऱ्या प्रवाशांच्या धक्क्याने प्राजक्ता केतनपासून बाजूला फेकली जाणार एवढ्यात केतनने तिचा हात घटट् पकडला.
”असाच हात आयुष्यभर घट्ट पकडून ठेवला असतास तर…” तिनं मनातल्या मनात म्हटलं. त्याच्याकडे पाहिलं अन् दीर्घ श्वास घेतला.
”चल निघते” जड अंतःकरणाने ती बोलत होती. केतनला धडधडू लागलं होतं. आता इतकावेळ घट्ट करून ठेवलेल्या मनाचा बांध फुटणार होता.

”जाताना एकदा मिठी पण नाही मारणार का तू? प्लीज! असं नको जाऊ” मोठ्या मुश्किलीने त्याला एवढंच बोलता आलं. त्याला प्राजक्ताला घट्ट मिठी मारायची होती. तिच्या डोक्यावर किस करून तिची माफी मागायची होती. पण प्राजक्तानं ती संधीही त्याला दिली नाही.
”चल केतन निघते मी. काळजी घे स्वत:ची” त्याच्याकडं न पाहता ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे केतन बघत बसला. आतून तो पार कोलमडून पडला होता. इथेच पूलावर त्याला धाय मोकलून रडायचं होतं. आक्रोश करायचा होता. प्राजक्ता गर्दीत आणि त्याच्या आयुष्यातूनही नाहीशी झाली होती कायमची. केतनला सावरणं खूप अवघड जात होतं. पुढे यापेक्षाही मोठा धक्का त्याला पचवायचा होता. आजूबाजूला हजारो माणसं होती. पण जवळचं कोणीच नव्हतं, त्यानं डोळे पुसले आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागला. समोरून ट्रेन येत होती. ‘याच ट्रेनच्या खाली येऊन जीव द्यावा का?’ त्याला सारखं वाटतं होतं.

‘पण मग मी स्वत:चं बरं-वाईट केलं, तर आई-वडिलांकडे कोण बघणार?’ एक विचार मनात आला अन् त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली होती, तो ट्रेनमध्ये चढला आणि कोपऱ्यात खिडकीकडे जाऊन बसला. खिशातून मोबाईल बाहेर काढला. प्राजक्तासोबतचा फोटो त्याने पाहिला. केतनला स्वत:चे फोटो काढायला अजिबात आवडायचे नाही, पण प्राजक्ताने त्यादिवशी हट्टच केला होता. केतनला घट्ट मिठी मारलेला सेल्फी होता तो. प्राजक्ताच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. पण त्या आठवणी त्याला नको होत्या, त्याने प्राजक्तासोबत काढलेले सगळे फोटो डिलिट करण्याचा निर्णय घेतला. फोटो डिलिट करणार एवढ्यात फोन वाजला. व्हॉट्सअॅपवर मेसेज आला होता. तो प्राजक्ताचा मेसेज होता.

”मला माहितीये आयुष्यातल्या कठीण प्रसंगातून तू जातोय. तुझ्या आयुष्यातून निघून जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे, मी कशी जगणार? माझं काय होणार? पुढे मी काय करणार मला काहीच माहिती नाही. पण काही कळजी करू नकोस लवकर सगळं ठिक होईल. तुला माहितीय केतन तुझं सायलीवर खरंच खूप प्रेम आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी तुझ्या आयुष्यातली तिची जागा मी कधीच घेऊ शकत नाही आणि तुही मला ते प्रेम कधीच देऊ शकत नाही. मी याची तक्रार अजिबात करत नाहीये. सायली आणि तू एकमेकांसाठीच आहात. माझ्यामुळे कोणतीही अपराधीपणाची भावना घेऊन तू जागावं असं मला अजिबात वाटणार नाही. मगाशी तुला मिठी मारावी, असं खूप वाटत होतं. तुझ्याकडे न पाहताही निघून जाणं माझ्यासाठी सोप्प नव्हतं. पण जर मी तुला मिठी मारली असती, तुझ्याकडे पाहिलं असतं तर मी तुला जाऊच दिलं नसतं. पण माझ्यामुळे तुझी फरफट व्हावी हे मला अजिबात मान्य नाही. मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय आणि आपल्या प्रेमाच्या माणसाला असं सोडून जाताना काय त्रास होतो हे तुलाही चांगलंच माहितीये. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तुला कधीही मदत लागली तरी हक्काने हाक मार. जिथे असेन तिथून तुझ्यासाठी धावत येईन. पण आता मात्र मला जावंच लागेल. पुन्हा एकदा तेच सांगेन काळजी घे स्वत:ची आणि तिचीही”

तिचा मेसेज वाचेपर्यंत घळाघळा अश्रू डोळ्यातून कधी खाली उतरले त्यालाही कळलंही नाही. त्याने फोन बंद केला आणि तो खिशात ठेवला.
साऱ्या आठवणी अशा झरझर समोरून जात होत्या. तीन दिवसांपूर्वीच प्राजक्तापासून कायमचं वेगळं होण्याचा निर्णय अत्यंत तडकाफडकीने त्याने घेतला होता. तिला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा किती आकांडतांडव केला होता त्या मुलीने. जीव द्यायला निघाली होती ती. पण केतनची मनःस्थिती तिच्याहून वाईट आहे कळल्यावर सारं विसरून त्याला सावरायला त्याच्या घरी गेली होती. केतनला सारं आठवतं होतं.
”आठवड्याभरापूर्वी तिच्यासोबत माझ्याच घरात आमच्या लग्नाची स्वप्नं पाहिली होती. माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपलेल्या प्राजक्ताचा चेहरा मला अजूनही आठवत होता. झोपेतही माझा हात घट्ट पकडून ठेवला होता तिने. किती सुखात होतो आम्ही. सायली मला सोडून गेल्यानंतर तिनेच तर सावरलं होतं मला. माझ्या प्रत्येक आवडीनिवडी जपण्यासाठी किती धडपडायची ती. पण तिलाही सुखी ठेवू शकलो नाही मी. किती स्वार्थी निघालो मी पण तरीही काहीही तक्रार न करता ती मुलगी निघून गेली.”

चार महिन्यांपूर्वी प्राजक्ता त्याच्या आयुष्यात आली होती. प्राजक्तासारखी मुलगी आपल्यावर एवढं प्रेम करेल याचा स्वप्नातही विचार त्याने केला नव्हता. प्राजक्ता दिसायला सुंदर होती, तिच्यात काहीतरी वेगळं होतं. तिला नुसतं पाहिलं तरी बघत बसावसं वाटायचं तिला. खूपच हळवी होती ती. कोणाला आपलंस मानलं की भरभरुन प्रेम करायची ती, त्या व्यक्तीसाठी वाट्टेल ते करायला तयार व्हायची म्हणून केतनला प्राजक्ता आवडू लागली होती. तिच्याकडे पाहिलं की मनात एक वेगळाच आदर केतनला वाटायचा. “किती सुखी असेल ना तो माणूस ज्याच्या आयुष्यात ही मुलगी असेल.” तिला ओळखायला लागल्यापासून अनेकदा असाच विचार केतनच्या मनात आला होता. जिचा स्वप्नातही विचार केला नव्हता ती स्वत:हून आपल्या आयुष्यात येईल याची कल्पनाच त्याने केली नव्हती.

कॉलेजमध्ये असल्यापासून केतन सायलीच्या प्रेमात होता. अगदी लग्नही करण्याचा दोघांनी निर्णय घेतला होता. पण सायली एकदिवस केतनला सोडून निघून गेली होती. त्यानंतर वर्षभर सायलीच्या आठवणीत दिवस ढकलत चाललेल्या केतनच्या आयुष्यात प्राजक्ता आली होती. ज्यादिवशी प्राजक्ताने प्रेमाची कबुली दिली होती तो दिवस त्याला चांगला आठवत होता. प्राजक्ताने असंच कॉफी शॉपमध्ये त्याला बोलावून घेतलं होतं. केतन खुर्चीवर येऊन बसला नाही तोच प्राजक्ताने एका क्षणात आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. ”केतन, खरंतर सांगणार नव्हते तुला. कसं सांगायचं हेच कळत नव्हतं, पण आता राहवत नाही म्हणून अचानक बोलावून घेतलं. मला तू खूप आवडतोस तुझी काही हरकत नसेल तर आपलं मैत्रीचं नातं पुढे नेऊयात का?” जेव्हा प्राजक्ताच्या तोंडून हे ऐकलं होतं तेव्हा एसीमध्येही किती घाम फुटला होता त्याला. ती आपली थट्टा तर करत नाहीये ना?’ असं त्याला राहून राहून वाटतं होतं पण अशा बाबतीत प्राजक्ता थट्टा मस्करी करणाऱ्यातली नव्हती हेही त्याला माहिती होतं. तो काही काळ धक्का लागल्यासारखा तिच्याकडे बघत होता.

”प्राजक्ता, तू माझी मस्करी तर करत नाहीये ना? बघ आधीच सायली सोडून गेल्यानंतर मी सावरलो नाही त्यातून तू अशी मस्करी करत असशील तर मला आणखी वाईट वाटेल. तुझ्यासारख्या मुलीला मी कसा आवडू शकतो? तू नक्कीच माझी थट्टा करत असणार”
त्याच्या मनातली चलबिचल ओळखून प्राजक्ताने त्याचा हात हातात घेतला होता.
“केतन, मी थट्टा करत नाहीये. मी खरंच सांगतेय. मला तू मनापासून आवडतो. तुझा स्वभाव, माझ्याशी आदरानं बोलणं, तुझ्यातला संयमीपणा… सगळंच मला भावलंय. तुझ्या आयुष्यात याआधी काय झालं याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही. सायली गेल्यानंतर तुला सावरणं कठीण जातंय, पण आपण नव्यानं सुरूवात करू, मी आयुष्यभर तुझी साथ देईन.”
प्राजक्ताने अगदी ठामपणे त्याला सांगितंलं.
“किती आत्मविश्वासाने तिचा हात आपण घट्ट पकडला होता आणि बस चार महिन्यांत तो हात सोडूनही दिला.” त्याला आणखी वाईट वाटतं होतं. अपराधीपणाची भावना सारखी मनाला बोचत होती. “इथून गेल्यावर काय करेल ती? करेल का ती कोणावर प्रेम? माझ्यावर विश्वास टाकला होता तिने आणि मीच तिच्या भावना कुस्करून टाकल्यावर काय वाटलं असेल तिला? देवा तिला सुखात ठेव. तिच्यावर भरभरुन प्रेम करणारा जोडीदार तिला मिळू दे” त्याला रडण्यावर ताबा मिळवणं कठीण होत होतं. एवढ्या तरण्याताठ्या पोराला रडताना पाहून समोरच्या सीटवरच्या दोघा तिघांनी त्याला हटकलं, कोणी काही विचारेल म्हणून त्याने हातांच्या कोपऱ्यात डोकं लपवलं आणि पुन्हा एकदा आसवांना वाट मोकळी करून दिली. काही केल्या प्राजक्ताचा रडवेला चेहरा केतनच्या डोक्यातून जातच नव्हता. गेल्या तीन दिवसांत घडलेला घटनाक्रमाची चक्रं त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागली.
(क्रमशः)
– तीन फुल्या, तीन बदाम