पाहिले ना मी तुला… तू मला न पाहिले… अगदी या गाण्यातील कडव्या प्रमाणे नसलं तरी काहीशी मिळतीजुळती आणि म्हटलं तर अत्यंत अल्प काळापुरतीची अशीही प्रेमकहाणी म्हणता येईल. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना उशिरानं कळलं… आणि हा उशीरच त्यांच्या प्रेमातील अडसर ठरला…

अमित आणि मनाली दोघं एकाच कॉलेजमध्ये… फक्त त्यांचे वर्ग वेगळे. एकाच ट्यूशनमुळं त्यांची ओळख झाली.. ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं. अमित हा तसा मध्यमवर्गीय घरातला. तो कॉलेजमध्ये असतानाच वडील सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते. त्याला एक मोठी बहीण तिचे लग्न झालेलं. तर तिकडे मनालीचंही तसंच पण तिच्या वडिलांची शेती होती. त्यांचं सुखवस्तू कुटुंब होतं. तिचा मोठा भाऊ व्यवसाय करायचा. समाजात त्यांच्या कुटुंबाचा दरारा होता….

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Gold Silver Price
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

मनाली अत्यंत समजूतदार व शांत स्वभावाची तर अमित समजूतदार असला तरी थोडा चंचल, अस्थिर स्वभावाचा. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांत यांची ओळख झाली. सकाळी कॉलेजमध्ये तर संध्याकाळी ट्यूशनमध्ये भेटणं, बोलणं इथंपर्यंतच त्यांची मैत्री होती. एकमेकांना नोट्स देणे. वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवणं या गोष्टी त्यांच्यात चालायच्या. प्रेम वगैरे अशा काही भावना त्यांच्यात नव्हत्या. दोघांचंही कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. याचाच अर्थ त्यांची भेटही बंद झाली. मोबाइल वगैरे प्रकार त्यावेळी नव्हते. त्यामुळं व्हाट्सअॅप, फेसबुक अशी संपर्काची साधनं दुरापास्तच…

रोज दोन वेळा भेटणाऱ्या व्यक्तींची भेटच आता बंद झाली. दोघेही आपापल्या मार्गी लागले. मनालीने पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला. अमितने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी तो नोकरीही करत असत. ट्यूशनमध्ये कॉलेजमधील अनेक मित्र-मैत्रिणी असल्यातरी नंतरच्या काळात अमितला सातत्याने एका व्यक्तीचीच उणीव भासू लागली. ती म्हणजे मनाली..

त्याला वारंवार तिचाच चेहरा दिसत असे. तिच्याच आठवणीत तो रममाण होऊ लागला. पण मनालीपर्यंत आपल्या भावना कशा पोहोचवायच्या हा मोठा प्रश्न त्याला पडला होता. दिवसांमागून दिवस चालले होते. अमित एका ठिकाणी पार्टटाइम जॉब करत होता. या कामाच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता मनालीच्या घराजवळील गल्लीतून जात असत. त्याला ही संधी हवीच होती. या निमित्ताने मनालीला पाहता येईल म्हणून तो मुद्दामहून तिच्या घरासमोरून वळसा मारून जात असत. तो त्या रस्त्यावरून दहा वेळा गेल्यानंतर मनालीचं एखाद्यावेळी दर्शन व्हायचं. मग एकमेकांकडे पाहून हसणं वगैरे होऊ लागले. त्यातच त्याला इतका आनंद व्हायचा की सांगण्याची सोय नाही. हे असं सुमारे सहा महिन्यांपर्यंत चाललं. अचानक अमितच्या घरासमोरून वाढलेल्या फेऱ्या आणि जाताना आपल्या घराकडे पाहत जाण्याचा त्याचा शिरस्ता सुरूवातीला मनालीच्या लक्षात आला नाही. काहीना काही निमित्त करून तो मनालीच्या घराखालील दुकानात जाऊ लागला. अनेकवेळा मग त्यांची तिथे भेट होत. एकमेकांची ख्यालीखुशालीची विचारणा होऊ लागली….

एकेदिवशी अमितची आणि मनालीची तिच्या घराखाली पुन्हा एकदा भेट झाली.

“अरे अमित काय म्हणतोयस.. आज काय काम काढलं या दुकानात”, मनाली म्हणाली.

“अगं वडिलांची आयुर्वेदिक औषधं फक्त याच दुकानात मिळतात. ती घेण्यासाठी आलो होतो.” अमित म्हणाला.

“अरे पण तू दोनच दिवसांपूर्वी आला होतास ना. तेव्हा घेतली नाहीस का मग?” मनालीने पुन्हा प्रश्न विचारला.

मनालीच्या या प्रश्नामुळं अमित अचानक गडबडला. कारण दोनच दिवसांपूर्वी अमितला या दुकानात आलेलं मनालीनं पाहिलं होत. अमित प्रत्येक वेळी औषधाच्या बहाण्याने या दुकानात यायचा पण चॉकलेट्स वगैरे घेऊन जायचा.

स्वत:ला सावरत लगेच तो म्हणाला, “परवा दिवशी एक औषध मिळालं नव्हतं. त्यांनी आज यायला सांगितलं.” असं म्हणत त्याने थाप मारली अन् घाबरून तिथून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे या दोघातील हे संवाद त्या दुकानदाराने ऐकले होते…

अमितला तिच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवायच्या होत्या. पण, त्यांची हिंमत होत नव्हती. मनाली दररोज संध्याकाळी घराजवळील गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचे अमितला समजलं होतं. मग तोही काही ना काही निमित्त करून मंदिरात जाऊ लागला. तिची भेट घेऊ लागला. तो जाणूनबुजून भेटत असला तरी आपण योगायोगानेच भेटत असल्याचे तो तिला जाणवू देऊ लागला. कदाचित मनालीला अमितच्या मनातली गोष्ट समजली असावी. तीही त्याला तसा प्रतिसाद देऊ लागली. ती त्याला टाळत नव्हती. मग ते कुठल्या ना कुठल्या कारणाने भेटू लागले. पण एकमेकांच्या मनातील प्रेमाच्या भावना त्यांनी काही व्यक्त केल्या नव्हत्या…

दरम्यानच्या काळात तिचा वाढदिवस आला. कॉलेजमध्ये असताना स्लॅमबुकमध्ये तिचा वाढदिवस लिहिलेला असल्याने तो त्याच्या लक्षात होता. त्याने तिला एक चांगलं गिफ्ट दिलं. अमितच्या वाढदिवसाला तिनेही त्याला एक भेट दिली…

काही दिवसांनी तिने दोघांचाही एका कॉमन मित्र नितीनकडे कदाचित याविषयी बोललं असावं. नितीनने अमितची भेट घेतली. त्याला थेट प्रश्न विचारला की, तुझं मनालीवर प्रेम आहे का? असेल तर लवकरच घरच्यांना सांग आणि दोन्ही कुटुंबांनी पुढच्या गोष्टी सुरू करा, असा सल्ला त्याने दिला. कदाचित मनालीनेच थेट अमितला न बोलता, नितीनला अमितकडे पाठवलं असावं. तिला अमितच्या भावना जाणून घ्यायच्या असतील. अमितला या गोष्टीवर विश्वासच बसेना…

अमित त्याच्या स्वभावाप्रमाणेच थोडासा गडबडला. हातात विशेष अशी नोकरी नव्हती. एखादी नोकरी करावी, अन् मनालीच्या आई-वडिलांना सांगावं असं त्याच्या मनात होतं. मनालीच्या काकूलाही याबाबत समजलं होतं. त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता असं अमितला नंतर समजलं. अमितने आपल्या आईला याची कल्पना दिली…

मधल्या काळात दोघं भेटत होते. एके संध्याकाळी एका आइस्क्रीम पार्लरमध्ये ते भेटले. अमितने तिच्या आवडीचं आइस्क्रीम मागवलं. पण नेहमीप्रमाणे त्यांच्या संवादात जिवंतपणा नव्हता. काही क्षण शांततेत गेल्यानंतर मनाली म्हणाली, “अमित माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी स्थळ शोधण्यास सुरूवात केलीये.”, असे म्हणताच अमितच्या पायाखालची वाळू सरकली.

मनू !.. इतकेच शब्द अमितच्या तोंडातून निघाले. मनालीने त्याचा हात हातात घेतला. अमित या धक्क्यातून थोडा सावरला.

“मनू, अंग मी अजून स्वत:च्या पायावर उभा नाही. इतक्यात आपण लग्न केलं तर आपल्याला भविष्यांत समस्यांना सामोरं जावं लागेल. मला काही दिवस दे. मीही माझ्या आई-वडिलांना सांगतो. आपण दोन्ही कुटुंबीय एकत्र बसू आणि लवकरच ठरवू,” त्याने आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या.

यावर मनालीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिला तिच्या वडिलांच्या स्वभावाची माहिती होती. अमितला ती हवी होती. पण परिस्थितीसमोर तोही हतबल होता. त्याला वाटत होतं की मनाली त्याच्यासाठी थांबेल. पण….

काही दिवस दोघांचीही भेट झाली नाही. पण अमितला मनूची आठवण काही स्वस्थ बसू देत नव्हती. तो वारंवार तिच्या घरासमोरून जात असत. पण पूर्वीसारखी ती घरच्या गॅलरीत उभी असलेली दिसत नसत. तो पुन्हा अस्वस्थ होऊ लागला. एकेदिवशी त्याला मनालीचं लग्न झाल्याचं समजलं. त्यावेळी त्याला मोठा धक्काच बसला. या धक्क्यातून तो लवकर बाहेर आला नाही….

उशिरा निर्णय घेणे अमितला महागात पडलं. त्याचं प्रेम यशस्वी होतंय असं म्हणता म्हणता त्यांची प्रेम कहाणी अधुरीच राहिली. प्यार का दर्द है.. मिठा मिठा… प्यारा प्यारा… असं म्हणतात. परंतु, यांच्याबाबतीत मात्र हे जरा उलटंच घडल.

– तीन फुल्या, तीन बदाम