नेहमीप्रमाणे बसमध्ये चढले, पण यावेळी ती सीट रिकामी नव्हती. सीटवर तोच बसला होता. निखील. त्यानं नेमकं मागं वळून पाहिलं होतं. पण काहीच रिअॅक्शन दिली नाही. मी बसमध्ये चढल्याचं पाहिल्यानंतर त्यानं मान वळवली. मी अलगद सीटपर्यंत जाऊन पोहोचले. तो आत सरकला आणि मला बसायला जागा दिली (काहीही न बोलता). मी त्याच्याकडं पाहात होते. पण त्याचं लक्ष सरळ होतं. त्याचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते. माझ्याकडं पाहण्यासाठी तो तयारच नव्हता. मी देखील काहीच न बोलता बॅग मांडीवर घेऊन त्याच्या बाजूला बसले. पुढची पाच मिनिटं कोणी काहीच बोललं नाही. काय करू? हा असा का काहीच रिप्लाय देत नाहीये? इतका अॅटिट्यूड!!! असे सगळे विचार मनात सुरू होते. इतके दिवस भेट होऊ न शकल्याचा एकतर राग मनात होताच, म्हणून मी देखील काहीच बोलले नाही. मग ठरवलं याचे तीन रुपये देऊन विषय संपवून टाकू.

पर्समधून तीन रुपये काढणार इतक्यात तो पुटपुटला. “ऐक ना… मला नंबर मिळेल का तुझा?” त्याच्या आवाजात वेदना जाणवली. मी कोणताही विचार न करता नंबर दिला. त्यानं नोटडाऊन केला आणि आपल्या स्टॉपवर उतरण्यासाठी तो पुढं जाऊन उभा राहिला. यावेळी मागं वळून पाहिलंच नाही. सरळ निघून गेला. माझ्या हातात तीन रुपये तसेच राहिले.

मला काहीच कळेना. त्याला काय झालंय? पण त्यानं माझा नंबर मागितला यावरून मला कळंल होतं की त्याच्याही मनात काहीतरी नक्कीच सुरू होतं. आमच्या पहिल्या भेटीपासून. मग तो इतके दिवस कुठं होता. मला दिसला का नाही? असे सगळे विचार सुरू झाले होते. ओ…शिट त्याच्या डोक्यावर आज कॅप होती, याची आठवण झाली. त्याने केस कापले होते. माझ्या मनाला चटकन काटा टोचल्यागत झालं आणि डोळे विस्फारले. मी पुन्हा ब्लॅँक झाले होते… नाना विचारांचा घोळ मनात सुरू झाला होता. आता त्याच्या फोनची मी वाट पाहू लागले. मी कॉलेजातून घरी यायला निघाले तेव्हा त्याचा फोन आला. मी उचलला… हॅलो म्हटलं. तिथूनही सेम रिप्लाय आला. “निखिल बोलतोय”, मी हो कळंल इतकंच म्हटलं.

Love Diaries : किस्मत कनेक्शन…

माझे वडील गेले, त्यानं सांगितलं. माझ्या मनात आलेली शंका खरी ठरली होती. इतके दिवस दिसला नाहीस? कुठं होतास? या सर्व प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला होता. मी गप्पच बसले होते. पुढचे काही दिवस आम्ही काहीच बोललो नाही. बसमधून एकत्रच प्रवास सुरू होता. पण दोघंही शांत. दोनएक आठवड्यांनी आमच्यात बोलणं सुरू झालं. व्हॉट्सअॅपवर चॅटिंगदेखील सुरू होतं. मी कॉलेज स्टुडंट आणि तो जॉबला… आमच्यात वयानं पाच वर्षांचा फरक होता. पण मी याचा जास्त विचारच करत नव्हते. मला त्याच्यासोबत बोलावस वाटतं, भेटावस वाटतं एवढंच मला कळत होतं. महिन्याभरानं भेटीगाठी होऊ लागल्या. आम्ही खूप फिरायचो… तो त्याच्या ऑफिसच्या गोष्टी सांगायचा आणि मी माझ्या कॉलेजात मैत्रिणींसोबतचे किस्से. बोलण्यासाठी आमच्याकडं खूप काही होतं. एकदा मरिन ड्राईव्हवर असंच नेहमीसारखं गप्पा मारल्यानंतर निघालो. चालता चालता निखीलने माझा हात पकडला. “आपलं काय होणार?”, असा माझ्याही मनात असलेला प्रश्न त्यानेच विचारला. त्यामुळं माझ्याकडं उत्तर नव्हतंच. ‘तू जसं म्हणशील तसं’, असा रिप्लाय मी दिला. तो खूप विचार करू लागला होता. काहीच बोलत नव्हता. मग मी त्याचा हात आणखी जवळ घेऊन… सोड जास्त विचार करू नकोस, असं म्हणून त्याचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.

आमची लव्हस्टोरी आता वेगळंच वळण घेऊ लागली होती. निखीलचे बाबा गेल्याच्या सहा महिन्यांनंतर त्याच्यावर वर्षभरात लग्न करण्यासाठीचा दबाव घरच्यांकडून निर्माण होऊ लागला होता. याची कल्पना निखीलला आधीपासूनच होती. बाबा गेल्याच्या वर्षभरात मुलाचं लग्न करावं लागतं किंवा मग तीन वर्षे थांबावं लागतं, अशी प्रथा आहे. निखीलची आई तीन वर्षे थांबण्यासाठी तयार नव्हती आणि माझ्याबद्दल त्यानं घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण मी त्याच्याहून पाच वर्षांनी लहान होते. त्यानं माझ्यासमोर हा विषय काढला. मला फक्त इतकंच ठावूक आहे, की माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे इतकंच मी नेहमी त्याला सांगत होते. निखील द्विधा मनःस्थितीत होता. वर्षभरात लग्न करण्याचा पर्याय त्याच्यासमोर होता, पण तसं करता येत नव्हतं आणि घरचे तीन वर्षे थांबून वय आणखी वाढल्यानंतर लग्न करण्यासाठी तयार नव्हते. बाबा गेल्याच्या दु:खातून आई नुकतीच सावरत होती. त्यात आपण सुजाताच्या बाबतीत घरी सांगायचं म्हणजे त्याला खूप जोखमीचं वाटत होतं.

घरच्यांनी आणलेली स्थळं तो नाकारत होता. निखील खूप फ्रस्ट्रेट झाला होता. एक दिवस त्यानं सर्व राग आम्ही भेटलो तेव्हा माझ्यावरच काढला. खूप खूप बोलला मला.. मन हलकं केलं त्यानं… माझ्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहून तो देखील रडू लागला आणि हात पकडून माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी काहीच म्हटलं नाही. दोघांचेही डोळे पाणावले होते. मी थोड्यावेळानं सावरून त्याचा हात मोकळा केला… मी त्याला बाजूला केलं. तू जा… नको विचार करूस माझा… सावर स्वत:ला. कर तू लग्न, असं म्हणून मी तिथून निघून गेले. मागं वळून पाहिलंच नाही. त्यानंही थांबवलं नाही. पुढचे बरेच दिवस आमच्यात काहीच संवाद झाला नाही. राहून राहून त्याला फोन करावं, असं वाटत होतं. पण मी प्रत्येकवेळी टाळत होते. बसमधून जाणं देखील टाळलं.

अचानक त्याचे फोन येणं सुरू झालं होतं. पण मी एकही फोन उचलला नाही. कारण, निखीलने मला त्यादिवशी थांबवलं नव्हतं. तेव्हाच मला आता काय करायला हवं ते कळलं होतं. त्याचे सारखे सारखे येणाऱ्या कॉल्समुळे मी आता अस्वस्थ होऊ लागले होते. मी कायमचं ‘कनेक्शन’ बंद करण्याचा निर्णय घेतला. नवं सिमकार्ड घेतलं. पुढचे सहा महिने आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. दरम्यान, निखिलनंही फोनवरून संपर्क साधण्याशिवाय त्याने दुसरा कोणताच प्रयत्न केला नव्हता. मी नंबर बंद केल्यानं माझा निर्णय त्याच्याही लक्षात आला असणार म्हणा. माझं रुटिन लाईफ आता सुरू झालं होतं. पुन्हा बसनं प्रवास करू लागले होते (निखिलशिवाय). एक दिवस अनपेक्षित घडलं. माझ्या बस स्टॉपवर निखील आधीपासूनच उभा होता (वाट पाहात). मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असतानाच त्याला ओळखलं होतं. मी थोडा वेळ स्तब्धचं झाले होते. तो माझ्याकडे बघत होता आणि मी ही. रस्ता ओलांडून बस स्टॉपकडे गेले. त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. बस आली मी चढले… रिकाम्या सीटवर जाऊन बसले. निखील मागून आला आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला. त्याला बसायचं होतं हे कळलं मला.. मी आत सरकले.

तुला हेच हवं होतं ना…घे एक वर्ष पूर्ण झालं, असं निखील म्हणाला. माझं लक्ष त्याच्या हाताकडं होतं. मी लग्नाची अंगठी शोधू पाहत होते. पण ती दिसेना. इतक्यात निखिल म्हणाला. मी आलेली सर्व स्थळं आजवर फेटाळतोय… आणि आता वर्षही ओलांडून गेलोय. त्यासाठी मी किती विरोधाला सामोरा गेलोय तुला त्याची कल्पना देखील नाही. मी सुन्न झाले होते. निखिल माझ्यासाठी थांबला होता. त्यानं लग्न केलं नव्हतं. माझ्याविना तोही राहू शकला नव्हता, हे मला कळलं. मी सारखं त्याला टाळल्यानं त्यालाही माझा राग आला होता. मी बोलत नसल्यानं आता हिला वर्षभरानंतरच भेटायचं असं त्यानं ठरवलं होतं. निखीलच्या या निर्णयानं आता सर्वकाही विरून गेलं. ‘डिस्क्नेक्ट’ झालेलं ‘किस्मत कनेक्शन’ आता पुन्हा ‘कनेक्ट’ झालं होतं…

मी बॅगेतून हेडफोन्स काढले… मोबाईलला कनेक्ट केले. एक इअरफोन त्याच्याकडे आणि एक माझ्याकडे….हातात हात आणि ‘जनम जनम साथ चलना यू ही’ गाणं ऐकत प्रवास सुरू झाला… तो आजही सुरूये…
– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित