“मी २८ वर्षांचा झालोय. तरी अजूनही मी सिंगलच आणि त्या निखिलनं गेल्या पाच सहा वर्षांत दहा मुली पटवल्या असतील. सतत गर्लफ्रेंडसोबत याचं गुलुगुलु सुरु असतं. यांना बऱ्या मुली पटतात आणि मला एकही पटवता येत नाही…” अथर्वनं निखिलकडं पाहिलं. कॉफीचा कप पूर्णपणे भरला होता. कॉफीचा एक घोट घेत तो आपल्या जागेवर येऊन बसला. पुन्हा तेच विचार. “सगळे म्हणतात सिंगल आहेस ना तेच बरं आहे, कशाला गर्लफ्रेंड वगैरच्या भानगडीत पडायचं? पण असे म्हणणारेच स्वत: कमिटेडच असतात.” हातातला कप अथर्वनं खाली ठेवला आणि लॅपटॉप पुन्हा सुरु केला.

“सिंगल आयुष्य कितीही सुखी असलं तरी शेवटी एक जोडीदार हवा असतोच ना! आपलं सुख दु:ख शेअर करण्यासाठी…” अथर्वच्या डोक्यात पुन्हा तोच विचार आला. पण ते विचार बाजूला करत तो कामाला लागला कारण डेडलाइन होती. मीडिया फिल्डमध्ये डेडलाइन पाळलीच पाहिजे, हे त्याला चांगलच ठावूक होतं. तो कामाला लागला. कामच एवढं होतं की आजही ऑफिसमधून निघायला त्याला उशीर झाला. पार्किंगमधली गाडी काढली अन् घरी जायला निघाला. “मी सिंगल आहे म्हणून बिंधास्त माझ्या अंगावर काम टाकून हे लोक निघून जातात.” पुन्हा अथर्व पुटपुटला आणि गाडीचा वेग वाढवत एकदाचा घरी पोहोचला.

आवडीचे शर्ट शोधण्यासाठी त्यानं त्यादिवशी कपाट उघडले. एवढ्यात कोपऱ्यात ठेवलेल्या आपल्या जुन्या फोनकडं त्याचं लक्ष गेले. “अरे यात आपले जुने काँटॅक्ट नंबर आहेत” त्याला आठवलं. आपल्या नव्या मोबाईलमध्ये त्यानं ते कॉपी करून घेतले. रात्री काँटॅक्ट नंबर तपासताना अनेक जुन्या मित्र मैत्रिणींचे नंबर त्याला दिसले. त्यातले एक नाव त्याला खूपच ओळखीच वाटलं ‘परिसा’.

त्याला एकदम ती आठवली. आपल्यासोबत याच चॅनेलमध्ये इंटर्न म्हणून ती काम करायची. तो गालातल्या गालात लाजला. “किती पटवायचा प्रयत्न केला होता या मुलीला.. शेवटी शेवटी पटली पण होती पण मग मीच माती खाल्ली. तिला कँटिनमध्ये भेटायला बोलवलं होतं. बिचारी आलीही. तिला इम्प्रेस करायला बरंच काही काही ऑर्डर केलं होतं. तेवढ्यात एक सिनिअर आला अन् मी तिथून पळ काढला. इंटर्नच्या प्रेमाची चर्चा नको म्हणून मीच पळालो. तिला तिथेच टाकून. बिल पण बिचाऱ्या एकटीनं भरलं आणि एवढं मागवलं तेही तिच्याच गळ्यात पडलं. कसली भडकली होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आली तेव्हाही रागावलेली होती, माझी तर सॉरी बोलायची हिंमतच झाली नाही आणि त्यानंतर ती काही मला दिसलीच नाही. तिची इंटर्नशिप संपली होती.” अथर्व सारं काही आठवून हसत होता.

“आता तीन एक वर्षे झाली असतील ना या गोष्टीला?” तो वर्षे मोजत होता. “कशी दिसत असेल आता ती? तेव्हासारखी सुंदर की आणखी कशी? चल व्हॉटसअॅप प्रोफाइल चेक करु” त्यानं व्हॉट्सअॅप प्रोफाइल चेक केलं.

“हे काय ठेवलंय हिने? केटी पेरी.” प्रोफाईल बघून अथर्वनं डोक्यावर हात मारला.

“काय करु? करु का तिला मेसेज? कशी रिअॅक्ट करेल. आपल्याला ओळखत तरी असेल का ती?” अथर्वच्या डोक्यात गोंधळ वाढत होता.

“पण मेसेज करायला काय जातंय?” असं म्हणत अथर्वने मेसेज केला.

“hi! कशी आहेस? ओळखलंस का? मी अथर्व.”

अथर्वच्या छातीत धडधड वाढली. तिच्या रिप्लायची तो वाट पाहात होता. पाचव्या मिनिटांला रिप्लाय आला.

“हॅलो! तुला मी कसं मी विसरेन. तू चांगला लक्षात आहे माझ्या.”

अथर्वनं लगेच एक स्मायली पाठवला.

“सॉरी, अग मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो तेव्हा.. तू अजूनही माझ्यावर चिडली आहेस का ?”

“अरे लेट इट बी बाबा, तीन वर्षे झालीत आता या गोष्टीला. मी विसरले आहे सगळं.”

आता कुठे मनावरच दडपण कमी झाल्यासारखं अथर्वला वाटू लागलं.

“बाय द वे तू डिपी बदलशील का?” अर्थवने पटकन मेसेज केला.

“का बदलू? मला आवडते बाबा केटी पेरी.”

“पण मला तुला बघायचंय. तीन वर्षे तुला पाहिलंच नाही.”

“बरं बदलते.”

परिसानं लगेच डिपी बदलला.

लांब केस, गुलाबी कुडता, डोळ्यात काजळ आणि कुडत्यावर मँचिंग झुमके. “वा क्या बात है!” अथर्व मनात लाजला. एव्हाना त्यानं पाच सहा वेळा तिचा डिपी पाहिला होता. आधीपेक्षाही ती खूप सुंदर दिसत होती.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्यानं पहिलं परिसाचं लास्ट सीन चेक केलं. “अजून उठली नाही ती.. गुड मॉर्निंग मेसेज पाठवतो तिला.” त्याचा मोह अनावर झाला. पटकन मेसेज टाइप करुन त्यानं सेंडही केला. अर्ध्या तासानं तिने रिप्लायही केला

“व्हेरी गुड मॉर्निंग.”

“अरे वा आज खूश दिसतायत मॅडम, एकदम व्हेरी गुड मॉर्निंग वगैरे”

“खूश नाही रे पण असा रिप्लाय दिला की समोरच्या व्यक्तीचा दिवस पण छान जातो,” परिसानं लगेच रिप्लाय दिला.

“तू फेसबुक किंवा हँगआउटवर आहेस का?” अथर्वने विचारलं

“हो आहे ना!”

“एक विचारू? प्लीज रागावू नकोस, मला फक्त तूझं नावच माहितीये. तूझं आडनाव सांग ना. म्हणजे मला तूला अॅड करता येईल” अथर्वने अगदीच डेस्परेट होऊन मेसेज केला.

परिसानं लगेच आपलं आडनाव सांगितलं. पाचव्या मिनिटाला तिला शोधून अथर्वनं फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली. तिने रिक्वेस्ट अॅक्सेप्टही केली. अथर्वनं प्रोफाईल चेक करायला सुरुवात केली. परिसाचा फोटो अथर्वला एवढा आवडला की सगळेच फोटो डेस्पोसारखा लाईक करण्याचा सपाटच त्यानं लावला. परिसा त्याच्या मनात भरली होती. फोटो पाहून तो तर तिच्या प्रेमातच पडला होता. ऑफिसच्या कामात त्याचं मनच लागत नव्हतं. फेसबुकवर तिचे फोटो सारखे सारखे बघण्यात तो बिझी होता.
एवढ्यात मागून आवाज आला.

“काय रे अथर्व. नवी गर्लफ्रेंड वगैरे पटवलीस की काय? मगापासून फोटो बघतोय”, मागून निखील ओरडला.

“अरे ए गप्प ना. का ओरडतोस..? कशात काही नाही आणि तू माझा बाजार उठवतोस” अथर्व निखीलवर ओरडला.

“हा निखील पण ना…” अथर्व वैतागला. “इथून काही परिसाशी बोलता येणार नाही. ऑफिसमध्येही मोबाईलला रेंज पकडत नाही. फेसबुकवर बोललो तर हा निखील काही मला ठेवणार नाही. काय करु? काय करु? आयडिया हँगआऊटवर कनेक्ट होतो तिला. म्हणजे कोणाला कळणारही नाही. अथर्वने ऑफिसच्या बाहेर जाऊन परिसाला मेसेज केला.

“hi तुझ्या हँगआउटवर एक रिक्वेस्ट येईल. ती अॅक्सेप्ट करशील का? मला तुझ्याशी बोलायचंय. पण इथं व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर बोलता येणार नाही. प्लीज.. प्लीज”

परिसानंही लगेच ओके पाठवलं.

अथर्व आत आला आणि त्यानं लगेच हँगआऊटवर परिसाला एक रिक्वेस्ट पाठवली. humtumforever2228@gmail.com या अकाऊंटवरून परिसाच्या हँगआउटवर रिक्वेस्ट आली. “आताच अथर्वचा मेसेज आला होता. कदाचित त्याचीच रिक्वेस्ट असेल.” परिसानं अॅक्सेप्ट केली. “पण, असं का नाव ठेवलंय याने?” परिसाची उत्सुकता वाढली. तेवढ्यात समोरून अथर्वचा मेसेज आला.

“Hi!”

“hi ” परिसानंही रिप्लाय दिला “ए तू असं का नाव ठेवलयं? humtumforever2228 वगैरे. याचा अर्थ काय?”
अथर्वने एक स्मायली पाठवली. “काही नाही असंच”

“असंच कसं? काहीतरी असेल ना? सांग ना प्लीज. फनी असलं तरी मी नाही हसणार.”

“बरं.. अग सकाळी तूझं प्रोफाईल चेक केलं ना तेव्हा तुझी बर्थ डेट समजली. तू २२ वर्षांची आहेस ना? आणि मी २८ वर्षांचा. म्हणून 2228 आणि तीन वर्षांपूर्वी मी तुला कँटिनमध्ये सोडून पळालो होतो ना. आता असं कधीच नाही करणार. आजपासून आयुष्यभर आपण एकमेकांचे घट्ट मित्र बनून राहू humtumforever.” म्हणून ठेवलंय “humtumforever2228”
परिसा फक्त हसली. अथर्वची कल्पना तिला खूपच आवडली.

परिसा आणि अथर्व आता रोज एकमेकांशी व्हॉट्सअॅप आणि हँगआउटवर कनेक्ट होत होते. परिसानं अथर्वचं आयुष्यच पूर्णपणे बदलले होते. फक्त आठवड्याभरापूर्वी आयुष्यात आलेल्या परिसानं त्याचं एवढं आयुष्य व्यापलं होतं की आता दिवसाची सुरूवात आणि शेवटच त्याचा परिसापासून होत होता. दिवसेंदिवस परिसाला भेटण्याची त्याची इच्छा अधिका अधिक तीव्र होत चालली होती. कशी असेल ती? त्याला तिला पाहायचंच होतं. शेवटी न राहवून त्याने विचारले

“या रविवारी काय करतेस? भेटू या का आपण? मला तुला सॉरी बोलायचंय प्लीज.”

“ओके भेटू मलाही रविवारीच सुट्टी असते.” तिच्या रिप्लायनं अथर्व खूश झाला.

अथर्व रविवारची वाट पाहत होता आणि अखेर रविवार आलाच.

अथर्वने सकाळी सकाळी तिला मेसेज केला.

“गुड मॉर्निंग, आजच लक्षात आहे ना? भेटण्याचे प्रॉमिस केलंय मला तू”

एक तास झाला परिसानं हँगआउटवर मेसेज वाचला पण रिप्लाय मात्र दिला नाही. अथर्व नाराज झाला. दर पाच सहा मिनिटानं तो हँगआउट आणि व्हॉट्सअॅपवरचे तिचे लास्ट सीन चेक करत होता. अखेर दुपारी तीन वाजता परिसाचा मेसेज आला.

“hi गुड आफ्टरनून, सॉरी फॉर लेट रिप्लाय. मी थोडी बिझी होते. आज भेटायचं लक्षात आहे माझ्या. भेटूयात. पण कुठे जायचं?”

“तू सांग तिथे जाऊ”

“अरे पण बघ ना बाहेर पावसानं काळोख केलाय. कसं जाणार आपण? परिसानं सोबत एक सॅड स्मायली पाठवला.

“ती काळजी तू नको करुस. मी नेईन बरोबर तुला. तू फक्त जागा सांग.”

“कुलाब्याला जाऊयात का? लिओपोल्ड कॅफेमध्ये?” परिसानं मेसेज केला.

“ओके. मी तुला चर्चगेटला भेटते.” परिसानं पुढचा रिप्लाय केला.

“अग कशाला? मी येतो ना तूला घ्यायला.. तू कुठे राहतेस तेवढं सांग.”
परिसानं आपला पत्ता त्याला मेसेज केला.

“ओके येतो तुला घ्यायला.” अथर्व परिसाला भेटण्यासाठी खूपच एक्साइट झाला होता.

“तू बाईकनं येतोयस का? प्लीज हळू ये. पावसात बाईक स्लिप होतात. मला काहीच घाई नाही.” परिसाचा पुढचा रिप्लाय.
“वेडी कुठची” परिसाचा शेवटचा मेसेज पाहून अर्थव मनातल्या मनात हसला.

कडक इस्त्री केलेला शर्ट त्यानं बाहेर काढला. मोबइल घेतला. पंधरा मिनिटं घरातून लवकर निघाला. ट्रॅफिकमुळं परिसाला वाट पाहायला लावायची त्याची इच्छा नव्हती. आपल्या स्विफ्ट गाडीत तो बसला. कसलं भारी वाटलं त्याला. गाडी घेतली खरी पण या गाडीत याआधी कधीच मुलगी बसली नव्हती. २८ वर्षांत आज पहिल्यांदाच तो एका मुलीसोबत बाहेर जाणार होता. कोणीतरी त्याच्या बाजुच्या सीटवर बसणार होतं. दिलेल्या वेळेच्या आधीच तो परिसाच्या घराशेजारी पोहोचला. तिही एकदम वेळेत आली. ठरलेल्या जागी पोहोचून तिने अथर्वला फोन केला.

“हॅलो मी पोहोचले. कुठं आहेस तू? मला दिसत नाहीस. तुझी कोणती बाईक आहे? मला सांग म्हणजे पटकन मला शोधता येईल”

तिथून अथर्वचीही नजर तिचा शोध घेत होती. एक पाठमोरी मुलगी फोनवर बोलताना त्याला दिसली. “हा हीच परिसा असणार” अर्थव पुटपुटला…

पलीकडून आवाज आला. ‘अरे सांगतोय ना. कोणती बाईक आहे तुझी? लवकर सांग पाऊस केव्हाही पडेल.”

“अग राणी माझी बाईक नाही. गाडी आणलीये मी. मागं वळ आणि ग्रे रंगाच्या स्विफ्टकडं सरळ चालत ये. मी गाडीत बसलोय.”
अथर्वची धडधड वाढली. एवढ्यात परिसानं गाडीचा दरवाजा उघडला आणि ती गाडीत येऊन बसली. अथर्वनं एक छान स्माइल दिली. परिसानं केस वर बांधले होते. केसांतून निघालेली हलकीशी बट तिच्या गालांवर आली होती. नेव्ही ब्लू रंगाचे ट्रान्सपरंट शर्ट तिने घातला होता. डोळ्यांत काजळ, हातात मोजक्या अॅक्सेसरिज. छोटीशी स्लिंग बॅग आणि ओठांवर रोझ पिंक लिपस्टिक. तिच्या फॅशन सेन्सने पहिल्या भेटीतच अथर्वला तिने घायाळ केले होते. तिच्यावरून नजर हटवू नये, असं त्याला वाटत होतं. पण कसं बसं मन सावरत त्यानं तिला हॅलो म्हटलं. तिनेही लाजत उत्तर दिलं. “निघायचं का?”, परिसा म्हणाली.

अथर्वने गाडी काढली. काही वेळातच दोघंही मरिन्स लाइन्सच्या सिग्नलपाशी येऊन थांबले. एवढ्यात पावसाची जोरदार सर आली. मगासपासून गप्प असलेली परिसा जोरात म्हणाली “वॉव यार पाऊस. मला तर कधीपासून मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर उभं राहून चिंब चिंब भिजायचं होते. चल ना प्लीज भिजूया ना”. परिसानं एक्सायटेड होऊन अथर्वचा हात पकडला. अथर्वला मूळात पाऊस अजिबात आवडायचा नाही. पण परिसाचे मन त्याला दुखवायचं नव्हतं.

“ओके मी गाडी बाजूला पार्क करतो. मग तू उतर. पण मी नाही येणार”

“नाही तू पण चल ना”, परिसा लाडीकपणे म्हणाली.

“अग मला गाडी चालवायची आहे. भिजलो तर थंडी वाजेल. मग गाडी चालवताना त्रास.” अथर्वनं काहीतरी कारण पुढं केलं.
परिसा गाडीतून खाली उतरली आणि पटकन कट्ट्यावर उभी राहिली. पावसात लाटा जोरात कट्ट्यावर आदळतात आणि मग पाणी कठड्यावर उभं राहणाऱ्यांच्या अंगावर उडतं. परिसाला माहिती होतं म्हणून तीच जागा पकडून ती उभी राहिली. पावसाची जोरदार सर आणि लाटांनी परिसा चिंब न्हाऊन निघाली होती. गाडीची काच खाली करून अथर्व तिच्याकडं पाहत होता. मनात नाना भावनांच्या विजा चमकू लागल्या होता. पावसात चिंब भिजलेली ती किती छान दिसत होती. “काय करु जाऊ का मागून आणि मिठी मारू का तिला?” एकामागून एक भावनांचा कल्लोळ मनात उठला होता. शेवटी एक विचार चमकून गेला. त्यानं गाडीचा दरवाजा उघडला आणि पाठमोऱ्या असलेल्या परिसाच्या दिशेने चालू लागला.

क्रमश:

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित