LOVE is the color of rainbow असं म्हटलं जातं. जीवनात सप्तरंगांची अनुभूती देणाऱया प्रेमाला वर्णभेदाचा स्पर्श नसतो. अमोल आणि मीराचं नातंही असंच विश्वासाच्या भावनेनी जुळलं होतं. सुंदरतेची व्याख्या ठरावी अशा मीरासमोर अमोल अगदी फिका होता. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम. समाजाच्या वर्णभेदी नजरेने मात्र दोघांना छळलं..

मीरा आणि अमोल एकाच ऑफीसमध्ये नोकरीला. तेथेच दोघांची ओळख झाली. ओळखीचं स्थित्यंतर होऊन हळूहळू त्यांच नातं प्रेमाच्या ट्रॅकवर येऊन कधी पोहोचलं हे दोघांनाही कळलं नव्हतं. दोघांमध्ये कलामीचं अंडरस्टॅण्डिंग.

एकत्र लंच टाईम..आणि शिफ्ट टाईमही एकच त्यामुळे दोघांना गप्पा मारण्यासाठी तसा बरा वेळ मिळायचा. ऑफीसमध्ये अमोलची ओळख तशी बऱयापैकी होती, तर मीरा अगदी जेमतेम माणसांना ओळखणारी. मूळात मीराला जास्त ओळखी नकोशा वाटतात. त्यामुळे मीराची मोजक्यांसोबत ओळख होती. अमोल वर्णाने गडद असल्याने मीरासारखी सुंदर मुलगी त्याची गर्लफ्रेंड होऊ शकत नाही, असा समज असणारी आणि मीरामध्ये इंट्रेस्टेड असणारी मंडळीही ऑफीसमध्ये होती. मीरामध्ये इंट्रेस्ट असणारे ‘सोकॉल्ड’ आशिक तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अमोलकडे विचारणा देखील करायचे. अमोलला मीरा सुरूवातीपासूनच आवडत होती, पण तरीही मीराबद्दल विचारणा करणाऱयांवर त्याने केव्हाच राग व्यक्त केला नाही. उलट अशी एखादी व्यक्ती तुझ्याबद्दल विचारत होती..असं सगळं अमोल मीराला सांगायचा.

केवळ सुंदरतेतच नाही, तर विचारांचाही स्मार्टनेस जपणारी मीरा अशा प्रस्तावांना थेट फेटाळून लावायची. मीरा आणि अमोलमध्ये वैचारिक साम्य होतं हीच दोघांचा मनोमिलनाची सुरूवात होती. दोघांना एकमेकांच्या सहवासाची सवय व्हावी इतके दोघं एकमेकांमध्ये गुंतले गेले आणि पुढे मग प्रेमाचं अतुट नातं निर्माण झालं. दोघांपैकी कोणालाच प्रपोज वगैरे करण्याची गरजच भासली नाही. ऑफीस व्यतिरिक्त दैनंदिन जीवनातही दोघं भेटू लागले होते. एकाचवेळी दोघांनी फेसबुकवर ‘इन अ रिलेशनशिप’ स्टेटस अपडेटकरून फेसबुकीजगासमोर आपल्या प्रेमाची कबुली देखील देऊन टाकली. मीरानेच तसा निर्णय घेतला.

मीराचा बॉयफ्रेंड आहे का रे? तिचं ब्रेकअप झालंय का रे? कसली आयटम दिसते यार..विचारू का रे हिला, तुला काय वाटतं? असे प्रश्न विचारून अमोलला हैराण करणाऱयांची तोडं त्यामुळे बंद झाली होती. आता तेच लोक मीराकडे पाहून अयोग्य निवडीची जाणीव करून देण्यासाठीचे केविलवाणे हसू चेहऱयावर दाखवून लागले होते. पण मीरा अशावेळी अमोलच्या जवळ येऊन अतिशय स्मार्टपणे काहीही न बोलता सर्वांना उत्तर द्यायची.

नुसतं ऑफीसमध्येच नाही, तर ट्रेन, बस, गार्डन, हॉटेल, समुद्रकिनारा जिथे जिथे अमोल-मीरा एकत्र फिरायचे तेव्हा समाजाची वर्णभेदी नजर नुसती दोघांना छळायची. पण दोघांनीही विशेषत: मीराने याचा केव्हाच त्रास करून घेतला नाही. प्रेमाच्या नात्याने दोघांनी एकमेकांना घट्ट बांधून ठेवलं होतं.

मीराने अमोलच आपला आयुष्यभराचा सोबती असल्याचा निश्चय केला होता. पण अमोलच्या बाबतीत समाज आणि आपल्या घरातील मंडळी यांच्यात काही फरक असणार नाही याची कल्पना तिला होती. अमोल कसा वाटतो? अशा ओघात मीराने आपल्या घरच्यांसमोर आपल्या मनातील सर्व भावना अमोलच्या नकळत आधीच व्यक्त केली होती. कारण नकार मिळणार याची कल्पना तिला होतीच..त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी होतं. अगदी झालंही तसंच..मीराचे आई-वडिल आणि भाऊ देखील अमोलकडे वर्णभेदी नजरेने पाहात होते आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. पण मीराने अमोलसोबतच्या लग्नासाठीचे प्लान्स आधीच करून ठेवले होते. फक्त अमोलने हिंमत करून लग्नासाठीची विचारणा आपल्याकडे करावी याची ती वाट पाहात होती. अमोल मनमिळावू आणि तितकाच ‘कूल बॉय’ टाईप असला तरी लग्नाची मागणी करण्यासाठी तो काही इतक्यात तयार नव्हता. किंबहूना तो यासाठी खूप घाबरत होता. मीरा लग्नासाठी होकार देईल याचा कॉन्फिडन्स त्याच्याकडे नव्हता. पण तरीही त्याने गप्पांच्या ओघात मीराचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

“मीरा..लग्नाच्या बाबतीत तुझं मत काय?”

“हो..आपलं लग्न ना..करूयात ना. बोल कधी करायचं उद्या?”

मीराचं हे असं झटपट उत्तर देणं अमोलला पटलं नव्हतं

“अगं.. i am not jokeing मी सिरिअसली विचारतोय..”

“अमोल..मी याचीच वाट पाहातेय..”

“कशाची?”

“गधड्या..तू सिरिअस होण्याची..तू ठरव कधी घरी सांगायचं ते, मग मी सांगते पुढचं काय ते”

अमोलने काही दिवस यावर विचार करून सर्व कंगोरे जाणून घेऊन मोठ्या हिमतीने मीराला घरी सांगण्यासाठी कळवलं.
आपल्या घरातून नकार मिळणार असल्याचं मीराला आधीच ठावूक होतं. अमोलने ज्याक्षणी घरी लग्नाबाबत विचारण्याची तयारी दाखवली. तेव्हा मीराने तातडीने अमोलला भेटायला बोलावलं.

मीराने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. अमोलला तसं तिने सांगितलं, पण तो तयार नव्हता.
“अमोल..लग्नाची मागणी करण्याची हिंमत दाखवलीस ना. मग मी आता तुझ्यासोबत कोर्टात लग्न करण्याची हिंमत दाखवतेय..तुला साथ द्यायची आहे की नाही..हे तू ठरव.”

अमोलच्या डोक्यात नानाविध विचारांचं चक्र सुरू झालं होतं. लग्नाच्याबाबतीत अमोलच्या घरच्यांची तशी काहीच अडचण नव्हती. पण मीराच्या कोर्ट मॅरेजच्या निर्णयाने त्याला मीराच्या घरच्यांच्या निर्णयाची जाणीव झाली होती. मीराचं तिच्या घरच्यांशी नातं तुटणार हे अमोलला आता कळलं होतं. त्यामुळे काय करावं हे अमोलला कळत नव्हतं.

अखेर अमोलने मीराचा हात हातात पकडून साताजन्माच्या गाठीचं वचन दिलं आणि निर्णय घेतला. लग्नानंतर मीराची तिच्या घरच्यांशी नाळ तुटणार असल्याचे विचार अमोलच्या मनात सुरू होते. पण त्यासाठी तिला प्रत्येक क्षणात साथ देण्याचा..कोणतीही कमतरता भासणार नाही..याची काळजी घेण्याचा निश्चय केला होता.

अमोलच्या निर्णयाने मीरा भारावली होती. दोघांनीही आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला विश्वासात घेऊन कोर्टात आजन्म साथ देण्याची शपथ घेतली आणि साईबाबांच्या मंदिरात जाऊन एकमेकांना वरमाला घालून पुढील संपूर्ण आयुष्य सुखं-दु:ख वाटून घेण्याचा निर्णय घेतला.
मीराने लग्न केल्यानंतर घरी फोन करून याबाबत माहिती दिली आणि साईबाबा मंदिरात आम्ही वाट पाहात असल्याचं कळवलं. लग्न झाल्यानंतर पुढचे चार तास दोघं मीराच्या घरच्यांचा आशिर्वाद मिळेल यासाठी वाट पाहात होते. पण कोणीच आलं नाही. आपल्या घरच्यांशी आपली नाळ तुटल्याची जाणीव झाल्याने मंदिरातून निघताना मीराचे डोळे पाणावले..अमोलला मीराच्या मनाची अवस्था कळली होती. तो फक्त यावेळी तिला आधार देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. मीराने काही वेळाने स्वत:ला सावरून..चेहऱयावर स्मित हास्य करून अमोलचा हात हातात घेऊन.. अमोल..yes we are happy, let’s begin our new life असं म्हणत संसाराला सुरूवात केली. चार वर्ष ओलांडली..दोघं खूप आनंदात आपलं आयुष्य जगत आहेत. आणि हो..दोघांनाही एकत्र फिरताना वर्णभेदी नजरेने पाहणाऱयांवर या दोघांना हसू येतं…


– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित