“हॅलो..!! कुठे आहेस..?” श्रेयसने विचारलं..

“अरे, मुंबई सेंट्रलला पोहोचलेय.. १५ मिनिटांत पोहोचतेय..” श्रद्धानं उत्तर दिलं..

supriya pathare talks about struggle story
१८ घरची धुणीभांडी, आईची मेहनत अन्…; सुप्रिया पाठारेंना आठवले संघर्षाचे दिवस; फक्त ‘एवढी’ होती पहिली कमाई
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच

“ओके.. मी चर्चगेटला पोहोचलोय.. तू ऑफिसला पण असंच लेट जातेस का..?” श्रेयसने थट्टा केली..

“ए मी ऑफिसला वेळेवरच पोहोचते.. आणि तसंही मला उशीर झाला नाहीये.. आपण १० वाजता भेटणार होतो.. आणि अजून १० वाजले नाहीयेत.. १५ मिनिटं शिल्लक आहेत.. आणि मी वेळेतच पोहोचणार आहे..” श्रद्धाने लगेच उत्तर दिलं..

“मी मस्करीत म्हटलं होतं.. किती मोठं स्पष्टीकरण देतेस तू..? एका श्वासात सर्व बोलून टाकलंस.. किती भराभरा बोलतेस..? त्यापेक्षा भराभरा ये ना..” श्रेयस म्हणाला..

“हो रे.. येते.. लवकर येते.. तू नेमका कुठे उभा आहेस..?” श्रद्धानं विचारलं..

“तू फास्ट ट्रेननं येते आहेस ना..? म्हणजे ट्रेन मोस्टली प्लॅटफॉर्म नंबर तीन किंवा चारवर येणार.. त्यामुळे मी तीन आणि चारच्या कॉमन प्लॅटफॉर्मवर थांबलोय.. ये लवकर..” श्रेयसनं म्हटलं..

“अरे किती भराभरा बोलतोस..? एका श्वासात सर्व बोलून टाकलं.. किती बोलतोस अरे..?” श्रद्धा म्हणाली..

“अच्छा.. आता माझीच वाक्यं मला ऐकवणार का तू..? ये लवकर.. वाट बघतोय..” श्रेयस म्हणाला..

“हो.. येते.. लगेच पोहोचते..”

श्रद्धा आणि श्रेयसची ही पहिली ठरवून केलेली भेट.. श्रेयसला कधी नव्हे ती रविवारची सुट्टी होती.. आणि नेहमी सुट्टीच्या दिवशी घरातच थांबणारा, सुट्टीच्या दिवशी ट्रेननं प्रवास करण्यासाठी अजिबात उत्सुक नसलेला श्रेयस आज श्रद्धाला भेटायला थेट चर्चगेटला आला होता.. श्रद्धा आणि श्रेयस पहिल्यांदाच एकमेकांना अशा प्रकारे भेटले होते.. श्रद्धा थोड्या वेळाने चर्चगेटला पोहोचली..

गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या पायजम्यात श्रद्धा अतिशय सुंदर दिसत होती.. तिच्या हातात एक लहानशी बॅग होती.. काळेभोर केस श्रद्धानं एका खांद्यावरुन पुढे घेतले होते.. रविवार असल्यानं चर्चगेट स्टेशनवर गर्दी कमी होती.. त्यामुळे लांबून येणारी श्रद्धा श्रेयसला लगेच दिसली.. आपल्या दिशेने येणाऱ्या श्रद्धाला श्रेयस काही वेळ पाहतच राहिला.. श्रद्धाला भेटण्यासाठी श्रेयसने शर्ट आणि जिन्सला अगदी न विसरता इस्त्री केली होती.. एकमेकांना हाय हॅलो म्हटल्यावर श्रेयस आणि श्रद्धा मरीन ड्राईवला गेले. मार्च महिना असल्याने ऊन जास्तच होतं.. मात्र तरीही एकमेकांना भेटत असल्याचा आनंद जास्त होता..

“तू ऑफिसला पण वेळेआधीच पोहोचतोस ना..? आजही लवकरच आलास..? किती वाजता आलास चर्चगेटला?” श्रद्धाने गप्पांना सुरुवात केली..

“फार नाही.. २०-२५ मिनिटं लवकर आलो.. पण मी ऑफिसला लवकर येतो, हे तुला कसं कळलं..?” श्रेयसनं उत्सुकतेनं विचारलं..

“तू त्या दिवशी बँकेत आला होतास ना.. सॅलरीमधून काही पैसे कट होत होते दर महिन्याला, त्याची तक्रार करायला.. तेव्हा ऑफिसला जायचं आहे म्हणाला होतास तू.. तेव्हा मी खूप अर्जंट आहे का..? असं विचारलं होतं.. तेव्हा तू खूप काही अर्जंट नाहीये आणि माझं ऑफिस याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे, असं सांगितलं होतंस.. बँकग्राऊंड फ्लोअर आणि ऑफिस फर्स्ट फ्लोअरला असूनही तू ३० मिनिटं आधी आला होतास.. आणि तुझं काम मात्र पाच मिनिटांत झालं होतं..” श्रेयसची उत्सुकता पाहून श्रद्धानं त्याला सविस्तर सांगितलं..

“अच्छा.. ओके.. इतकं व्यवस्थित लक्ष ठेवलं जातं का माझ्यावर..? आणि तीन-चार महिने झाले असतील या घटनेला.. तुला अजूनही लख्ख आठवतंय..?” श्रेयसनं पुन्हा उत्सुकतेनं विचारलं..

“अरे तुझं काम संपल्यावर तू जे काही बोललास ना, त्यावरुन अगदी बरोबर लक्षात राहिलास तू माझ्या..” श्रद्धानं श्रेयसला ते कारण सांगण्याचा प्रयत्न केला.. “मी फक्त एकदा विचारलं, सर तुम्ही होम लोनमध्ये इंटरेस्टेड आहात.. तर तुझं उत्तर होतं.. आहे मी इंटरेस्टेड.. पण तुमच्या बँककडून नाही घेणार.. काही दिवसांपूर्वी फक्त प्रिंटरचा प्रॉब्लेम होता म्हणून तुमच्या एका एम्प्लॉईनं मला दुसऱ्या ब्रांचला पाठवलं होतं.. जी बँक प्रिंटरचा प्रॉब्लेम आहे, असं सांगून कस्टमरला दुसऱ्या ब्रांचमध्ये फक्त पासबुक प्रिंट करायला पाठवते, त्या बँकेतून होम लोन घेण्यात मला काडीचाही रस नाही,” असं अगदी शांतपणे म्हणून तू तिथून निघून गेला होतास..” श्रद्धाने संपूर्ण घटना श्रेयसला सांगितली..

“तसं घडलं होतं माझ्यासोबत, तुमच्याच बँकेत.. तुझ्या बाजूला जी मुलगी बसली होती ना, तिनेच मला दुसऱ्या ब्रांचला पाठवलं होतं.. ते जाऊ दे.. तुझ्या हे लक्षात आहे का श्रद्धा..? तीच आपली पहिली भेट.. तेव्हाच आपण पहिल्यांदा भेटलो..” श्रद्धासोबत श्रेयसदेखील भूतकाळात हरवून गेला..

श्रद्धा आणि श्रेयस एकाच बिल्डींगमध्ये काम करायचे.. श्रद्धाचं ऑफिस ग्राऊंड फ्लोअरला.. तर श्रेयसचं ऑफिस फर्स्ट फ्लोअरला.. श्रद्धा ज्या बँकेत काम करत होती, त्याच बँकेत श्रेयसचं सॅलरी अकाऊंट असल्यानं काहीवेळा येणं-जाणं झालं आणि दोघांच्या मैत्रीचं खातं उघडलं.. श्रेयसच्या तक्रारी, शंका श्रद्धानं व्यवस्थित हाताळल्या.. त्यामुळे दोघांची ओळख मैत्रीपर्यंत पोहोचली.. नंबर एक्सचेंज झाले.. चॅटिंग सुरू झालं.. त्यानंतर मग भेटायचं ठरलं..

श्रेयस आणि श्रद्धाची पहिली भेट अगदी छान होती.. याआधी जेव्हा जेव्हा दोघे बँकेत भेटले होते, तेव्हा तेव्हा त्यांनी एकमेकांना अगदी व्यवस्थित नोटीस केलं होतं, हे मरीन ड्राईव्हवरच्या गप्पांमधून दोघांनाही समजलं होतं.. दोघंही घरी जाताना एकाच ट्रेननं गेले.. हळूहळू भेटीगाठी वाढू लागल्या.. ऑफिस बिल्डिंगपासून मरिन ड्राईव्ह अगदी हाकेच्या अंतरावर असल्यानं मग दोघे ऑफिस सुटल्यावर समुद्राजवळ गप्पा मारत बसू लागले.. दोघांची मैत्री घट्ट होत होती.. ऑफिसनंतर लगेचच मैत्रिणींसोबत घरी जाणारी श्रद्धा श्रेयससोबत वेळ घालवण्यासाठी थांबू लागली.. मॉर्निंग शिफ्ट असल्यावर श्रेयस अनेकदा ४ वाजता फ्री होऊनही श्रद्धासाठी थांबायचा.. ६ वाजता श्रद्धा ऑफिसमधून निघायची.. मग दोघेही मरिन ड्राईव्हला छान फेरफटका मारायचे.. दुसऱ्या दिवशी पुन्हा मॉर्निंग शिफ्ट असताना, त्यासाठी पहाटे ४ वाजता उठायचे असूनही श्रेयस श्रद्धासोबत वेळ घालवायचा.. दिवसभराचा थकवा, कामाचा ताण श्रद्धाला भेटताच कुठच्या कुठे पळून जायचा.. श्रद्धाच्या मनाची स्थितीदेखील तशीच काहिशी होती.. श्रेयसचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागला होता.. मात्र श्रेयसच्या शिफ्टमुळे कधीकधी दोघांना फारसा भेटता यायचं नाही.. तरीही श्रेयसला अर्धा-एक तास उशीर होणार असेल तर श्रद्धा त्याच्यासाठी थांबायची..

श्रेयस आणि श्रद्धाची भांडणंदेखील व्हायची.. बऱ्याचदा श्रद्धाच समजूतदारपणा दाखवायची.. मात्र एकदा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.. दोघांनी एकमेकांशा अबोला धरला.. जवळपास महिनाभर दोघे एकमेकांशी बोलत नव्हते.. श्रेयसचा स्वभाव पाहता तो पुढाकार घेईल, असं वाटतं नव्हतं.. दोघांचं नातं जवळपास संपल्यात जमा होतं.. श्रद्धानंही दुर्लक्ष केलं.. मात्र तरीही मनातून आठवणी काही जात नव्हत्या.. न राहवून श्रद्धानं मेसेज केला.. तेव्हा श्रेयस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता.. डेंग्यूमुळे श्रेयसला अशक्तपणा आला होता.. त्यावेळी श्रद्धा कामातून वेळ काढून दर तासाला त्याला फोन करायची.. विचारपूस करायची.. त्यामुळे तुटलेलं नातं डेंग्यूमुळे बचावलं असं श्रेयस गमतीनं म्हणायचा.. थोड्या दिवसांनी श्रेयस ऑफिसला जाऊ लागला.. मात्र शिफ्टमुळे श्रद्धाला भेटणं त्याला शक्य होतं नव्हतं..

“बरेच दिवस आपण भेटलो नाही ना..?” एकदा रात्री श्रद्धा फोनवर श्रेयसला म्हणाली..

“हो ना.. मी पण तोच विचार करत होतो.. माझी सेकंड शिफ्ट आहे ना.. दुपारी २.३० वाजता ऑफिसला जातो.. तेव्हा तू कामात असतेस.. ऑफिसला गेल्यापासून कामाला सुरुवात होते.. मग थेट ११ वाजता फ्री होतो.. कधीकधी तर ११.३० होतात ऑफिसमधून निघेपर्यंत.. महिनाभर तरी असंच सुरु असणार.. पुढच्या महिन्यात मी सरांना सांगून मॉर्निंग घेतो.. म्हणजे संध्याकाळी आपल्या एकत्र वेळ घालवता येईल..” श्रेयसनं श्रद्धाच्या प्रश्नाला उत्तर दिलं..

“ओके चालेल.. तू जेऊन निघालास ना..?” श्रद्धाने विचारलं..

“हो.. जेऊन निघालोय मी.. तुझं जेवण झालंच असेल ना..? काय करतायत सगळे..? झोपले का..?” श्रेयसनं विचारलं..

“हो.. सर्व झोपले.. मी जागी होते.. म्हटलं तू फ्री होशील.. मग तुझ्याशी बोलेन आणि झोपेन.. तू जा सांभाळून.. चल बाय.. गुडनाईट..” श्रद्धाने संवाद आवरता घेतला..

“ऐक ना श्रद्धा.. पुढच्या महिन्यात ऑफिसचे काही फ्रेंड्स बाहेर जातोय.. पहिल्या आठवड्यात शनिवार-रविवार फिरायचा प्लान आहे.. तू येशील का..? आपल्याला सोबत वेळ घालवता येईल.” श्रेयसनं विचारलं..

“शनिवार-रविवार..? घरचे नाईट आऊटची परवानगी देतील का, याबद्दल शंका वाटतेय.. मुलीदेखील सोबत आहेत का..? असतील तर मला घरी सांगता येईल..” श्रद्धाने उत्तर दिलं..

“मेघना, अनघा, अपर्णा येणार आहेत.. तू तसंही त्यांना ओळखतेस.. येशील का प्लीज..?” श्रेयसने विनवणीच्या स्वरात विचारलं..

“अरे प्लीज काय..? मला यायचंय तुझ्यासोबत.. त्यामुळे आपल्याला छान वेळ घालवता येईल.. फक्त मला घरी विचारावं लागेल.. बाबांचा मूड चांगला असेल तेव्हा विचारते आणि परवानगी मिळवते..” श्रद्धा आत्मविश्वासाने म्हणाली..

“ओके.. नो प्रॉब्लेम.. चल झोप आता तू.. मला उद्या दुपारचं ऑफिस आहे.. पण तुला लवकर उठायचं आहे.. झोप शांतपणे.. गुडनाईट.. स्वीट ड्रिम्स..” श्रेयस प्रेमानं म्हणाला..

काही दिवसांनी श्रद्धा आणि श्रेयस मित्रांसोबत अलिबागला गेले.. दोन दिवस दोघांनी खूप मजा केली.. समुद्राजवळचा वॉक, लाटांमध्ये भिजणं, नारळांच्या बागेत फेरफटका मारणं अशा अनेक आठवणी सोबत घेऊन श्रद्धा आणि श्रेयस मुंबईत परतले.. संपूर्ण पिकनिकमध्ये श्रेयसने श्रद्धाची खूप काळजी घेतली होती.. श्रद्धा आणि श्रेयसला पाहून मित्रांना अनेकदा गाडी मैत्रीपलीकडे गेल्याचं दिसत होतं.. मात्र अद्याप काहीही ऑफिशियल नव्हतं..

एकमेकांना वेळ देण्यासाठी श्रेयस आणि श्रद्धा खूप प्रयत्न करत होते.. दोघांनाही एकमेकांची खूप काळजी होती.. देवावर फारसा विश्वास नसणारा श्रेयस फक्त श्रद्धा म्हणायची, म्हणून देवळात जाऊ लागला होता.. दोघेही दिवसातून एकमेकांना फोन करायचे.. ऑफिसमध्ये किंवा घरी काहीही झालं तरी त्या दिवशी फोनवरच्या आवाजातील बदलाने दोघांना काहीतरी बिनसलं असल्याचं समजू लागलं होतं.. दोघेही अगदी छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत होते.. एके दिवशी अचानक रात्री गप्पा मारताना श्रद्धाला श्रेयसला पाहायचं होतं.. व्हिडिओ कॉल करायचा म्हटला तर घरातल्या लाईट्स लावाव्या लागणार आणि घरातल्या झोपलेल्या मंडळींना जाग येणार, असा प्रॉब्लेम होता.. मात्र श्रद्धानं हट्टच धरला.. तेव्हा मग बाथरुममध्ये जाऊन तिथली लाईट लावून श्रेयसनं श्रद्धाला व्हिडिओ कॉल केला.. तेव्हा श्रद्धाचा आनंद चेहऱ्यावरुन ओसंडून वाहताना श्रेयसलादेखील गंमत वाटली होती..

दोघांचंही अगदी छान सुरु होतं.. नातं मैत्रीच्या पुढे गेलं होतं.. आता फक्त पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न होता.. मात्र आयुष्यात कसोटीचाही काळ असतो.. सर्वकाही चांगलं सुरु असताना अचानक संकटं येतात.. मग ते चांगले दिवस म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती की काय, असा विचार मनात येतो.. श्रद्धा आणि श्रेयससोबतही तसंच काहीसं घडलं.. श्रद्धा काही दिवसांसाठी गावाला गेली होती.. तिचं गावाला जाणं श्रेयसला माहिती होतं.. मात्र तिथे असं काही घडेल, ज्यामुळे श्रद्धाच त्याच्यापासून दुरावेल, याचा विचारदेखील श्रेयसनं केला नव्हता..

(क्रमश:)

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित