अंतरा-अमोघच्या नात्याबद्दल घरी समजून काही दिवस झाले होते.. सर्व काही सुरळीत होतं.. आता कोणी पटकन फोन चेक करेल, फिरताना पाहिल, असं काही टेन्शन नव्हतं.. आधी घराजवळ गेल्यावर गप्पा आवरत्या घेणारे अंतरा आणि अमोघ आता थेट एकमेकांसोबत फोनवर बोलत बोलत घरी जात होते.. दोघांमध्ये सर्व काही उत्तम सुरु आहे, हे पाहून आई-बाबांनादेखील आनंद वाटत होता.. एक दिवस अंतराला भेटायला जातो सांगून अमोघ घराबाहेर पडला.. अमोघ आणि अंतरा दादर चौपाटीवर फिरत असताना अचानक अमोघला बाबांचा फोन आला.. बाबांनी व्हिडिओ कॉल केलेला पाहून अमोघ थोडा चक्रावून गेला..

“हॅलो बाबा.. तुम्ही आणि चक्क व्हिडिओ कॉल..?” असं म्हणत असताना आता अमेयला मोबाईल स्क्रिनवर अंतराचे आई-बाबादेखील दिसू लागले..

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
Can a woman ever retire from housework
समुपदेशन : बाई रिटायर्ड होते?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Student locked himself in room friends immediately called police
VIDEO: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानं २ तास दार उघडलं नाही; मित्रांनी बोलवले पोलीस अन्..शेवट पाहून व्हाल लोटपोट

“अरे तू अंतराला भेटायला जातो म्हणून निघालास.. मग मी तुझ्या आईला म्हटलं की आपण जाऊया अंतराच्या घरी.. तिच्या आई बाबांना भेटता येईल.. गप्पा मारता येतील..”

“आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं..?” अंतराच्या आईनं विचारलं..

“अजिबात नाही.. मग झाल्या का गप्पा..?” अंतरानं विचारलं..

“सुरुच आहेत.. अंतराच्या आवडी निवडी विचारतेय तिच्या आई-बाबांना..” अमोघची आई म्हणाली..

“ओके.. सुरु राहू दे तुमच्या गप्पा..” अमोघनं संभाषण आवरत घेतलं.. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना बाय म्हटलं..

वाचा: Love Diaries : ‘सेटल’मेंट

अमोघ आणि अंतराच्या घरचेदेखील आता जवळ येऊ लागले होते.. सर्व काही उत्तम सुरु होतं.. घरच्यांना सर्व कल्पना दिल्याने आता कसलंच टेन्शन नव्हतं.. दिवस पुढे सरकत होते.. अंतरा आणि अमोघचं ऑफिसनंतर भेटणं सुरु होतं.. अंतरा अधेमधे अमोघच्या घरी जायची.. अमोघदेखील अंतराच्या घरी जाऊन सर्वांना भेटायचा..

“अरे अमोघ, पुढल्या महिन्यात तुला सुट्टी मिळेल ना..?” एके दिवशी अमोघच्या बाबांनी विचारलं..

“हो.. मिळेल ना.. काही काम आहे का..?” अमोघनं ऑफिसची तयारी करता करता उत्तर दिलं..

“अंतराच्या बाबांचा फोन आला होता.. ते म्हणाले साखरपुड्यासाठी पुढच्या महिन्याची तारीख ठरवायची का..?”

“काय..? साखरपुडा..? बाबा काय चाललंय तुमचं..? अहो, आम्हाला इतक्या लवकर नाही करायचाय साखरपुडा..” अमोघनं बाबांना समजवण्याचा प्रयत्न केला..

“अरे, अंतराचे आई-बाबा म्हणतायत, साखरपुडा करुन घेऊ आता.. लग्न नंतर करता येईल..” बाबांनीदेखील अमोघला समजवण्याचा प्रयत्न केला..

“आपण नंतर बोलू या विषयावर.. ऑफिसला जातो आता..” अमोघ घरातून निघाला.. त्याने लगेच अंतराला फोन केला..

“अंतरा खूप महत्त्वाचं बोलायचंय तुझ्यासोबत..” अमोघ घाईघाईतच म्हणाला..

“साखरपुड्याबद्दल ना..? मला पण आताच कळलंय.. तुलाच फोन करणार होते मी..”

“एवढ्यात कुठे साखरपुडा..? अजून सेटलदेखील झालो नाहीय आपण दोघेही..”

“मीदेखील आई बाबांना तेच सांगत होते.. म्हटलं आम्ही सेटल झाल्यावर पुढील सर्व गोष्टी ठरवू.. पण त्यांना वाटतं आपली भांडणं होऊन ब्रेक अप वगैरे झालं तर.. म्हणून त्यांना वाटतं साखरपुडा करावा..”

“इतकी वर्ष आपण नातं टिकवलं ना..? मग पुढेही टिकेल ना.. त्यासाठी साखरपुडा करायची काय गरज आहे..? आधी सेटल तर होऊ द्या यार..”

“सर्व सांगून झालं.. पण ते ऐकायलाच तयार नाहीयत..”

दोघांचे आई-बाबा हट्टालाच पेटले होते.. आत्ताच्या मुलांचं काय ब्रेक अप वगैरे होत असतं.. म्हणून साखरपुडा झालेलं बरं, या विचारानं त्यांनी साखरपुड्याची घाई केली आणि अमोघ आणि अंतराच्या मनात नसतानाही साखरपुडा उरकण्यात आला.. आता किमान लग्नाची घाई केली जाणार नाही, अशी अंतरा आणि अमोघची अपेक्षा होती.. मात्र अंतराला मोठा भाऊ असल्यानं त्याआधी मुलीचं लग्न करु, असा विचार आई-बाबांनी केला.. अमोघचे आई-बाबादेखील तयार होते.. सर्व काही इतक्या वेगाने घडत होतं की दोघांनाही विचार करायलादेखील वेळ मिळत नव्हता.. आई-बाबांना कसं समजवायचं हेच दोघांना कळत नव्हतं.. काही बोलायला गेलं की इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जायचं.. दोन्हीकडून आईंच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहू लागायच्या आणि त्यात समजवण्यासाठी घेतलेले सारे कष्ट वाहून जायचे..

“हे खूपच होतंय यार.. सध्याचं सॅलरी पॅकेज खूप कमी आहे.. लग्नाचा खर्च तरी परवडेल का आपल्याला..? आई-बाबांच्या जीवावार सगळं करण्यात काय पॉईंट आहे..” अमोघ प्रचंड वैतागला होता..

“मी पण खूप समजवण्याचा प्रयत्न करतेय अरे.. पण ऐकायलाच तयार नाहीत.. म्हटलं काही महिन्यात जॉब बदलतो आम्ही.. मग वाढेल सॅलरी.. लग्नानंतर दोघांची पूर्ण सॅलरी खर्च झाली तर मग सेव्हिंग्ज कशा करणार..? भविष्याचा विचार नको का करायला..? पण कळतच नाहीय आई-बाबांना कितीही समजवलं तरीही..” अंतराला अमोघनं पहिल्यांदाच इतकं संतापताना पाहिलं होतं..

“हे बघ अंतरा तू शांत हो.. आपण एक काम करु.. दोघेही मिळून दोन्ही आई-बाबांना समजवू.. दोघांनी जॉब बदलले की इन्कम वाढेल.. मग आम्ही करु लग्न.. असं सांगू आपण घरच्यांना..” अमोघनं अंतराला समजवून शांत केलं..

एकीकडे अमोघ आणि अंतरा लग्न पुढे कसं ढकलता येईल, यासाठी प्रयत्न करत होते.. तर दुसरीकडे दोन्ही घरांमध्ये लग्नाची तयारी अगदी फास्ट ट्रॅकवर सर्व सुरु होती.. त्यात दोन्ही घरातलं ‘पहिलंच कार्य’ त्यामुळे अगदी उत्साहात सर्व सुरु होतं.. साड्या, केटरिंग, मंडप डेकोरेटर अशी सर्व तयारी अगदी जोरात होती.. लग्नाच्या पत्रिका छापण्याआधी एकदा घरच्यांसोबत बोलू, म्हणून अमोघ आणि अंतराने एक शेवटचा प्रयत्न केला.. अंतराचे बाबा जवळपास सर्व समजले होते.. त्यांनाही अंतरा आणि अमोघचं आर्थिक गणित चुकेल, हे कळलं होतं.. मात्र तेवढ्यात अंतराच्या आईला ‘यंदा लग्न नाही’, या विचारानेच रडू कोसळलं.. माँसाहेबांच्या अश्रूंनी सर्व कष्टांवर पाणी फेरलं होतं.. आता लग्न अटळ होतं.. अमोघ आणि अंतरानं पत्रिकेचं डिझाईन फायनल करुत त्या प्रिंटला दिल्या..

“हे बघ अंतरा, आता आपलं लग्न होणारच आहे.. कितीही समजवलं, कितीही सांगितलं आणि अगदी नाराजी जरी व्यक्त केली तरी घरचे काही ऐकणार नाहीत.. त्यामुळे आता निगेटिव्ह होण्यापेक्षा पॉझिटिव्ह होऊ..” ऑफिसनंतर भेटल्यावर अमोघनं अंतराला समजवण्याचा प्रयत्न केला..
“पॉईंट आहे.. आता कितीही आदळआपट केली तरी काहीही होणार नाही.. पण पॉझिटिव्ह व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं..?”

“लग्न आपल्या इच्छेविरुद्ध होतंय, हेच आता मनातून काढून टाकायचं.. लग्नानंतर तुझं फक्त घर बदलणार आहे अंतरा, असा विचार कर.. लग्नानंतर पण मी तुझा बॉयफ्रेंडच असेन.. सर्व काही आता सारखंच असेल.. उलट लग्नामुळे काही फायदेच होतील..” अमोघ अंतराला खूप सकारात्मकपणे समजावत होता..

“म्हणजे नेमकं काय होईल लग्नानंतर..?” अंतराच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं..

“आपण कधीपासून एकमेकांना म्हणतोय ना, आताच्या क्षणी सोबत असायला हवं होतं, खूप मिस करतोय वगैरे.. आता लग्न होणार असल्यानं हे सगळं शक्य आहे.. पण तुला थोडं कंट्रोल करावं लागेल.. कारण आपल्याला फॅमिली प्लानिंग करायचं आहे..” अमोघ खोडकरपणे म्हणाला..

“अच्छा..? म्हणजे फक्त मलाच कंट्रोल होणार नाही, असं वाटतं का तुला..?”

“मस्करी केली.. काय तू पण लगेच सुरु होतेस..”

“सोबत वगैरे राहायला मिळणार हे सर्व ठिक आहे.. पण फायनान्शियल स्टेबलिटीचं काय..?” अनघानं विचारलं..

“लग्न झालं की ऑफिसला जॉईन होऊ.. महिन्याभरानंतर लगेच दुसरा जॉब शोधायला सुरुवात करु.. दोन ते तीन महिन्यात मिळेलच.. फार फार तर सहा महिने लागतील.. मग बऱ्यापैकी सेटल होऊ.. तोपर्यंत आता आहोत तसेच राहू..” अमोघनं अंतराला अगदी व्यवस्थित समजावलं..

अमोघचा हा प्लान अंतराला आवडला होता.. काही दिवसांनी दोघांचं लग्न झालं.. आई बाबांच्या भाषेत बोलायचं तर ‘पोरांचा संसार सुरु झाला..’ मात्र अमोघ आणि अंतरामधलं नातं काही बदललं नव्हतं.. प्लानप्रमाणे दोघांनी लग्नानंतर जॉब शोधण्यास सुरुवात केली.. अंतराला दोनच महिन्यात दुसरा जॉब मिळाला.. अमोघला आणखी दोन महिने लागले.. आता दोघांचंही इन्कम वाढलं होतं.. दोघेही बऱ्यापैकी सेटल झाले होते आणि पुढे एकमेकांच्या साथीने व्यवस्थित सेटल होऊ, असा दोघांना विश्वास होता.. लग्नाआधी केलेली ‘सेटल’मेंट यशस्वी ठरली होती..

 

समाप्त.

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित