अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळणकसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- नारायण मेघाजी लोखंडे!

गेल्या आठवडय़ात आपण कृष्णराव भालेकरांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. भालेकरांनी १८७७ साली ‘दीनबंधु’ हे पत्र सुरू केले. ते सुरू झाले तेव्हा त्याचे १३ वर्गणीदार होते. पुढे १८८० पर्यंत त्यात वाढ होऊन ३२० वर्गणीदार झाले. मात्र भालेकर व त्यांचे बंधू रामचंद्रराव यांनी खूप कष्ट घेऊनही ‘दीनबंधु’ला हवी तशी गती आली नाही. उलट ‘दीनबंधु’ चालवण्यापायी या तीन-सव्वा तीन वर्षांच्या काळात भालेकरांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यात त्यांचे घर, जमीन, दागदागिने त्यांना विकावे लागले. शेवटी ते बंद पडले. मात्र ‘दीनबंधु’चा प्रवास एवढय़ावरच आटोपला नाही. १८८० च्या मे महिन्यापासून मुंबईमध्ये ते पुन्हा सुरू झाले. ते चालविण्याची जबाबदारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी घेतली होती. ते ‘दीनबंधु’चे नवे संपादक झाले. पहिल्याच अंकात लोखंडे यांनी लिहिले होते –

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

‘‘ब्राह्मणाखेरीज करून इतर लोकांचा कैवार घेण्यास व त्यांचे स्तुत्य विचार प्रगट होण्यास सन १८७७ सालचे सुरुवातीपर्यंत कोठेच साधन आम्हांकरिता नव्हते. आता हे साधन कोणते म्हणाल तर वर्तमानपत्र. एक चमत्कार मोठा समजला पाहिजे की, सांप्रत लोकांच्या कागाळ्या सरकारात समजाव्यात म्हणूून वर्तमानपत्रे साधन झाली आहेत, असे समजून ती वर्तमानपत्रे काय? ती छापतो कोण? त्यांजपासून आपणांस कोणते फायदे होतात हे समजू नये ही किती दु:खाची गोष्ट समजली पाहिजे बरे! ज्या लोकांस हे ज्ञान नाही, त्यांजकडून काय उपयोग होणारा आहे! असो, ईश्वर कृपाळू होऊन पुणे मुक्कामी भांबुर्डे येथे राहणारे माळी जातीस भूषण देणारी रत्ने रा. रा. रामचंद्रराव व कृष्णराव पांडुरंग भालेकर या उभयबंधूचे मनात ईश्वराने प्रेरणा करून सन १८७७ सालचे जानेवारीपासून आमचे लोक जे दीन होऊन राहिले आहेत त्यांचा कळवळा बाळगून दीनबंधु ह्य़ा नावाने प्रसिद्ध होऊन कडकडीत ब्राह्मणवस्तीत आज सवातीन वर्षेपर्यंत धीर धरून वर्तमानपत्र काढीत होते तितक्या अवकाशात जी काही दु:खे त्यांस भोगावी लागली असतील त्यांचा अनुभव त्यांसच माहित. दुसऱ्यास काय समजणारा आहे!!

हे खरोखरच आहे की, जर ते इनामदार किंवा जहागीरदार अथवा घरचे धनाढय़ असते तर त्यांनी आपला क्रम कधीच सोडला नसता. पण गांठचे खाऊन शेटची चाकरी करणे हे मध्यम लोकांस मुळीच सोयीस्कर होणार नाही. त्यांचे मनातून वागत होते की, आमचे लोकांचा प्रचंड भरणा असून, त्यांजकडून पाहिजे त्या प्रकाराने मदत मिळू शकेल, परंतु सर्व विचार एकीकडेस राहून फुकटदेखील पत्रे वाचण्याची गोडी व ईर्षां नाही, तेव्हा अर्थातच ह्य़ापासून उभयबंधूंना काय लाभ होणार याचा सिद्धांत करता येईल.. या उभय बंधूंनी आपले मानवीपणाचे कर्तव्यकर्म या सव्वा तीन वर्षांत उत्तम प्रकारे बजाविले त्याबद्दल त्यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी थोडीच.. हे ‘दीनबंधु’ बंद होऊ नये म्हणून मुंबईतील बरेच मंडळींच्या मनात येऊन त्यांनी हे पत्र पुण्याहून मुंबईस आणून सुरू ठेविले आहे.’’

लोखंडे हे कुशल संघटक होते. मुंबईतील विविध जाती-धर्मातील प्रभावशाली व्यक्तींबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. एकोणिसाव्या शतकातील कामगार चळवळीचे जनक अशी त्यांची ओळख आहे. गिरणीतील नोकरी सोडून त्यांनी ‘दीनबंधु’ चालवायला घेतले. त्यांच्यावरील सत्यशोधक समाजाचा प्रभाव ‘दीनबंधु’मधील त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. त्यांची शैली रोखठोक व तर्कशुद्ध होती. बोलीभाषेचा उपयोग करत ते लिखाण करत. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९४ साली मोठे स्वरूप प्राप्त झाले. त्याविषयी टिळकांनी ‘केसरी’त लेख लिहून आनंद व्यक्त केला. मात्र लोखंडेंना गणेशोत्सवाची ही टूम फारशी रुचली नव्हती, त्यांनी आपली नाराजी ‘दीनबंधु’तून व्यक्त केली –

‘‘गणपतीचे समारंभ जुन्या रीतीने हिंदू रजवाडय़ातच काय, हिंदूंच्या घरोघर होतात, म्हणून पुण्यास रजवाडी थाटावर किंबहुना त्यापेक्षाही जास्त आणि यंदा तेही कागदी गणपती झाले पाहिजे होते असे नाही. निरनिराळे बेगडी पोशाख, पायात चाळ बांधणे, वगैरे प्रकार करून आमच्या मराठय़ांच्या मुलांस रस्त्यात नाचावयास लाविणे, तरी त्यांच्या आई-बापांनी आपणास कृतकृत्य समजणे हेच का मराठय़ांचे शूरत्व? विद्या प्राप्त करून घेऊन जगात आपले नाव राखणे हे मराठय़ांचे हल्लीचे कर्तव्य आहे. रस्त्यावर मांडव घालून त्यात गणपती बसविणे, त्याजपुढे चौघडा वाजविणे, मुलांच्या पायात घुंघरे बांधून त्यांस नाचावयास लाविणे इतकेच नव्हे तर गणपतीने स्त्रीच्या गळ्यात हात घालून झोके खात बसणे किंवा अन्य तऱ्हेच्या चेष्टेच्या मूर्ती करून आमच्या हिंदूंच्या देवाची थट्टा करणे, ही चैन लहर किंवा करमणूक नव्हेत तर तो ‘केसरी’चा धर्म आहे. वाह वारे धर्म. अशाच लोकांनी आम्हांस आमच्या खऱ्या धर्मापासून दूर केले. पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी िदडय़ांची व ताबुताच्या जागी केलेल्या गणपतीपुढे नाचणाऱ्या मेळ्यांची समता दाखवून लोकांच्या डोळ्यात धूळ टाकणे ‘केसरी’सच शोभते. पंढरीस जाणाऱ्या लोकांचे भक्तिप्रेम व गणपतीसमोर त्यांच्या नाना प्रकारच्या मूर्तीची हिंदू प्रेक्षक आपापल्यात थट्टा करित असत तो प्रकार या दोहोत महदंतर आहे.’’

‘दीनबंधु’च्या मुखपृष्ठावर ‘‘जर्नल डीवोटेड टू द इन्टरेस्ट ऑफ वर्किंग क्लास’’ असे छापलेले असायचे. त्याखाली ‘‘‘दीनबंधु’चा हेतू सेतू व्हावेत दीन सुमतीचे। करिता विनतिही परतुनी खंडन करणे त्वरित दुमतीचे।’’ असा श्लोक दिलेला असे. त्यातून विविध विषयांवर लेखन प्रसिद्ध होत असे. मात्र ‘दीनबंधु’चे पहिल्या बारा वर्षांचे अंक आज उपलब्ध नाहीत.

पुढे १८९५ मध्ये टिळकांनी शिवजयंती उत्सवनिधी आणि शिवसमाधी जीर्णोद्धारासंबंधी पुढाकार घेतला. तेव्हा लोखंडेंनी लिहिले –

‘‘श्री शिवछत्रपतींचे स्मारक शोभेल असेच झाले पाहिजे. त्यांच्या नावाची पिंडी स्थापन करून त्या पिंडीजवळ नंदादीप जळत ठेवला व तिची पूजाअर्चा करण्याकरता एखाद्दुसऱ्या भटजीबुवाची योजना झाली, म्हणजे श्री शिवछत्रपतींचे स्मारक झाले असे मुळीच मानता येणार नाही. वास्तविकरीत्या पाहिले असता छत्रपतींना अद्वितीय शूर मुत्सद्दी पुरुषांच्या मालिकेतून काढून त्यांचे ठिकाणी नसते देवपण स्थापन करून त्यांचे देवदेव म्हणून देव्हारे माजवणे म्हणजे छत्रपती हे मनुष्य नसून ते अवतारी पुरुष होते असा भलता समज करून देणे, हे राष्ट्रास अत्यंत घातक आहे, मनुष्यमात्राचे स्मारक करताना त्याचे मनुष्यपण कायम ठेवण्याचा यत्न जरूर केला पाहिजे, बाकी तसे केल्यावाचून इतर मनुष्ये मोठमोठी कृत्ये करण्यास कदापि समर्थ व्हावयाची नाहीत.’’

लोखंडे यांनी ‘दीनबंधु’ची जबाबदारी घेण्याच्याही आधी त्यांची एक पुस्तिका प्रसिद्ध झाली होती. १८७६ साली लिहिलेल्या त्या पुस्तिकेचे शीर्षक होते- ‘पंचदर्पण’. त्यात लोखंडे यांनी जातीच्या आदर्श नियमनासाठी नऊ नियम विशद केले होते. ‘पंचदर्पण’ची ही सुरुवात पाहा –

‘‘प्रत्येक मनुष्यास आपणास सुख व्हावें अशी इच्छा असतें व त्याचा कल तें प्राप्त करून घेण्याकडे फार असतो, जेणेंकरून आपण सुखी होऊं ते करण्याकरितां आपल्या समजुतीप्रमाणें जेथपर्यंत होईल तेथपर्यंत झटत असतो. जे ज्ञानी, बुद्धिवान व सुशिक्षित आहेत तें आपला निर्वाह करून देशहिताकरितां आणि लोककल्याणाकरितां प्रयत्न करितात. त्याप्रमाणें असेंही कित्येक पुरुष आहेत कीं, या सृष्टींतील सर्व पदार्थ तुच्छवत मानून आपला काळ ईश्वरसेवनाकडेस आणि परमार्थाकडेस लावतात. आतां मनुष्याच्या सुखाकरितां राज्याची व्यवस्था असणे फार आवश्य आहे. त्याचें संपत्तीस, शरीरास आणि मनास कोणापासून इजा न होईल असा योग्य बंदोबस्त असला पाहिजे. रीतीभाती व वागण्याचें प्रकार परिणाम शुद्ध असले पाहिजेत. आणि मनुष्यास दु:ख होण्यास मुख्य जे मूळ कारण अज्ञान तें कमी होण्यास स्त्री-पुरुषास विद्या असणें जरूर आहे.

आतां वरील गोष्टी पृथ्वीमध्यें कोणत्याही स्थलांवर कोणत्याही काळीं ईश्वरानें तयार करून ठेवल्याचें आढळत नाहीं; या सर्व मनुष्याचें बुद्धिबलानेंच झाल्या पाहिजेत. बुद्धीचे बलेंकरून जितक्या कृती होतात त्या बहुधा अपुरत्या होतात व त्या अशा प्रकारच्या होत नाहींत कीं, त्या सदासर्वकाळ राहून सर्व काळीं व प्रसंगीं सफळ होतील. त्यांस पूर्णतेस आणण्याची आवश्यकता असते.

सृष्टीमध्यें कोणतीही वस्तू अगर युक्ती किंवा सुधारणा मनुष्यानें केलेली असो ती कनिष्ठ स्थितीपासून चांगल्या स्थितीपर्यंत आल्यावांचून राहाणार नाहीं. पुन: जी वस्तू अगर सुधारणा आज आपणास पूर्ण दशेप्रत आलेली आहे असें दिसतें तीच कांहीं काळानें अधिक चांगली होतें, असें जे या गोष्टीमध्यें रूपांतर होतें त्यांस सुधारणा झाली असें ह्मणावें. नाहींतर आज या हिंदुस्थान देशामध्यें अनेक जातिभेद असून त्या त्या जातीमध्यें अनेक तऱ्हेचे लोक बुद्धिवान आहेत. परंतु या दुनयेमध्यें चार दिवस सुखानें व सन्मानानें घालविण्याची इच्छा असणाऱ्याच्या ठायीं, जे जनप्रचार किंवा ज्या लोकरीती चालू असतात त्या सर्वाचे व्यावहारिक ज्ञान असणें अगदीं आवश्य आहे; आणि तें नसल्यामुळें निरुपयोगीं ठरतात असेंही जरी नाहीं, तरी प्रपंच सुज्ञ लोक ज्या मानानें सर्व प्रकारचे ऐहिक सुखोपभोग घेऊं शकतील त्याहून कमी मानानेंदेखील ते त्यांस साध्य होत नसतात, इतकेंच केवळ नाहीं, तर ज्यांस साहा शास्त्रें, आठरा पुराणें केवळ करतळा मळवत् भासतात, अशांसही जर एक व्यवहारज्ञान नसलें तर त्यांस लोक चित्राप्रमाणें समजतात. मग त्यांच्या विद्येचा आणि ज्ञानाचा काय उपयोग होत असेल हें सहजच लक्षांत येऊन जातें. आता तें ज्ञान कोणत्याही विद्येच्या योगें प्राप्त होत नाहीं. ते उपजत अंगस्वभावाप्रमाणेंच मनुष्यास अंगचेच असून, वयपरत्वें आणि विद्याव्यासंगें करून अधिक उणें मात्र झालेले आढळतात.. पण सार्वजनिक हित आणि तारतम्य विचार व लोकप्रियपणा जोडून जगामध्यें आणि ज्यांनीं त्यांनीं आपापलें ज्ञातीमध्यें सुधारणा आणि आपले ज्ञातीची कीर्ती होण्याचीं साधनें करून जगांमध्यें बरें ह्मणून घेण्याची टूक किंवा खुबी राखणे ही गोष्ट आज आपणा सर्वत्रांस योग्य आहे.’’

या पुस्तिकेत लोखंडे यांनी स्त्री-शिक्षण, लग्नाचे वय, पुनर्विवाह, विधवाविवाह, लग्नातील उधळपट्टी, व्यसने, घटस्फोट यांविषयी आपली मते मांडली आहेत. त्यातील हा काही भाग –

‘‘निर्थक खर्च जातींत अगर लग्नांत अगदीं करूं देऊं नये. आमचे देशबंधु येथें शंका आणतील कीं, आमचे जवळ पैसा असून आह्मी खर्च कां करूं नये? माझे प्रियकरहो तुह्मीच विचार करा कीं, निर्थक खर्च केल्यापासून काय फायदा होणार आहे? तुह्मी समजत असाल कीं, लग्नकार्यात खर्च केला ह्मणजे पुण्य घडतें! लोकांत कीर्ती होते! हे सर्व विचार तुमचे अगदीं खोटे आहेत. जरी कीर्ती होते असा समज असला तरी तो क्षणिक आहे. लग्नांत पुष्कळ जरी खर्च केला आणि थोडासा उणेपणा झाला तर त्या सर्वावर माती पडल्याप्रमाणें होऊन उलटें कर्जबाजारी होता! तोंच जर पैसा एखादे अनाथ व गरीब ज्ञाती गृहस्थांचे कार्याकडे खर्च केल्यास किती पुण्याई घडेल! याजविषयीं आपले शास्त्रांतही कन्यादान करणें मोठें पुण्य गणिलें असून आपण जाणूनबुजून व्यर्थ खर्च कां करितां?.. मुलाचे अगर मुलीचें आईबापानें सदासर्वकाळ मुलांचे हिताकडेस पाहात असावें. कारण कधीं

कधीं असेंही घडून येतें कीं, लहानपणीं लग्न करण्यापासून फारच तोटे होतात.. लहानपणीं लग्न झाल्यामुळें त्यांस मुळींच कांहीं समज नसून मुलास ही बायको मजला नको अगर मुलीस हा नवरा मजला नको असें सांगण्याचें ज्ञान नसतें, त्यामुळें पुढें उर्जित काळीं दोघामध्यें वैमनस्य येऊन कलह करण्यास लागतात, आणि ती स्त्री दुसरा नवरा करते अगर पुरुषही दुसरी बायको करतो; त्यामुळें संसाराची फारच नुकसानी होते..’’

लोखंडे यांच्याविषयी व त्यांच्या लेखनाविषयी आणखी जाणून घ्यायचे असल्यास अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले मनोहर कदम लिखित ‘भारतीय कामगार चळवळीचे जनक- नारायण मेघाजी लोखंडे’ हे चरित्र आवर्जून वाचायला हवे.

prasad.havale@expressindia.com