अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- गोपाळ हरि देशमुख ऊर्फ लोकहितवादी !

गोपाळ हरि देशमुख ऊर्फ लोकहितवादींची ‘शतपत्रे’ अनेकांना ठाऊकच असतील. भाऊ महाजनांनी सुरू केलेल्या ‘प्रभाकर’मध्ये १८४८ ते १८५० दरम्यान ती प्रसिद्ध झाली होती. त्यातील ‘जुन्या समजुती’ या शीर्षकाचे पत्र पाहा-

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
pashmina, Ladakh
लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

‘‘आमचे लोकांच्या पुष्कळ मूर्खपणाच्या समजुती आहेत व इतकी ज्ञानाची प्रसृति झाली आहे, तरी लोकांचा वेडेपणा अद्यापि दूर झाला नाहीं. माझे आढळण्यांत जा समजुती आल्या आहेत, त्यांची आपले पत्रद्वारें एक यादी प्रसिद्ध करून असें इच्छितों कीं, कोणी समजदार मनुष्य असेल, त्याणें त्याविषयीं प्रतिपादन किंवा निषेध करावा. मला वाटतें कीं, या समजुती मूर्खपणाच्या आहेत, किंवा शहाणपणाच्या आहेत, याचा निश्चय झाला म्हणजे संशय जाईल.

१) ब्राह्मणाशिवाय अन्य वर्णानें विद्या करूं नये. संस्कृत विद्या एकीकडेच आहे. परंतु एकादा मराठा किंवा इतर जातीचा कारकून ब्राह्मणांनी पाहिला म्हणजे त्यांचे अंगाचे तिळपापड होतात, हें काय?

२) ज्ञान व विद्या वाढवूं नये. कारण शहाणे व वेडे एका दरानें विकतील, असें भय बाळगतात.

३) जरी कोणी अपराध करूनही ब्राह्मणांची घरें भरलीं, तरी त्यास पुण्यवान् असे जाणतात. याचें उदाहरण बाजीराव पेशवे यांचे अपराध कोणी मनांत आणीत नाहींत, व ब्राह्मण-प्रजा त्यास योग्य मानितात.

४) देव ब्राह्मणांकरितां कशींही कर्मे केलीं तरी चिंता नाहीं.

५) जा यंत्रानें बहुत लोकांचें काम थोडे माणसांचे हातून करितात, तें चालू करूं नये. म्हणजे डाक, छापखाना, टंकसाळ हे कारखाने लोकांचें पोटिस्त बुडविणारे म्हणून त्यांचा द्वेष करितात.

६) सरकार करील तें करील. सत्तेपुढें शहाणपण नाहीं.

७) सर्व गोष्टी नशिबानें घडतात. शहाणपण व उद्योग यांचा उपयोग नाहीं.

८) सर्व सुख द्रव्यापासून आहे. त्यापलीकडे सुख नाहीं व सर्व गुणांचेही अधिष्ठान तेंच आहे.

९) विद्या पोट भरावयाकरितां शिकावी व ती श्रीमंतांही शिकणें जरूर नाहीं.

१०) देशाचार, वृद्धाचार, शिष्टाचार, इत्यादिक जुन्या चालींविरुद्ध आचरण करूं नये. मागील चाल चालत आली ती चालवावी. याविषयीं आग्रह धरितात.

११) वाईट गोष्ट असेल आणि ती चार लोकांचें पोट भरण्याचें साधन असेल तर मांडू नये.

१२) घर सोडून बाहेर जात नाहींत व मुलांस वगैरे घरीं बाळगण्याविषयी फार उत्कंठा धरितात.

१३) मुलें, नातवंडें झालीं म्हणजे जन्माचे सार्थक झालें, असें वडिलांस वाटतें. यास्तव मुलांची लवकर लग्ने करितात.

१४) इंग्रजांचे राज्यांत पैशास बरकत नाहीं. पाऊस कमी व जरीमरी फार म्हणतात. व याचें कारण देवताक्षोभ झाला आहे व इंग्रजांचे कायदे व रीति वाईट आहेत म्हणून समजतात.

१५) ब्राह्मणानें अपराध केला तरी त्यास शासन करूं नये व त्याचें सर्वस्वीं चालविण्यांत महापुण्य आहे, असें मानतात.

१६) धष्टपुष्ट ब्राह्मणास केला तरी तो धर्म; परंतु आंधळ्या कुळंब्यास किंवा लंगडय़ा महारास दिलें तर तो धर्म नव्हे.

१७) पहिल्या लढाया व दंगे वगैरे होते, तेव्हां शिपायांचें पोट भरत होतें. आतां जिकडे पहावें तिकडे सामसूम झालें आहे, हें वाईट, असें कित्येकांस वाटतें. कुळंबी माजले व ब्राह्मण त्यांचेबरोबर झाले, हें वाईट वाटतें.

१८) उद्योग न करावा, हें थोरपणाचें चिन्ह व थोरांनी वेडे, भोळसर असावें. व द्रव्याचा उपयोग इतकाच कीं, चार लोकांचें चालवावें. स्वस्थ खावें व निजण्यांत व स्नानसंध्येंत आयुष्य घालवावें, हाच थोरपणा असें समजतात.

१९) संस्कृत विद्येखेरीज बाकीच्या विद्या व भाषा नरकाचें साधन आहेत.

२०) स्नान-संध्येचा डामडौल करील, तो धर्मशील आणि पुण्यवान्; मग त्याची वर्तणूक कशीहि असो.

२१) स्त्रियांना विद्या शिकवूं नये; कारण व्यभिचार अधिक वाढेल.

२२) थोडा पराक्रम व थोडीसी ब्राह्मणावर भक्ति केली कीं, ईश्वराचा अवतार म्हणोन त्याची लोकांत प्रसिद्धि होते. जसें शिवाजी भवानीचा आवतार, माधवराव पेशवे विष्णूचा आवतार इत्यादि.

२३) मुलगा झाला तर संतोष, मुलीचा संतोष नाहीं, अशी रूढि आहे.

२४) स्त्रियांचा पुनर्विवाह करूं नये. कारण कीं, जिच्या प्रारब्धीं सुख असेल तिचा नवरा मरणार नाहीं, जी अभागी तिचा मरतो.

२५) नवसानें देव पावतो, व मनुष्याचे सुखदु:खावर नवग्रहाचा अमल चालतो. म्हणून त्याचें नांवानें ब्राह्मणास दानें वगैरे केलीं म्हणजे पीडा दूर होते. तसेंच दु:शकुन मानणें इत्यादि.

२६) स्वार्थ पहावा. लोकांची काळजी करूं नये.

२७) आपल्या पाठीमागें कसें होईल, याची काळजी करूं नये. ‘आपण मेला, जग बुडाला’ इत्यादि म्हणी आहेत.

२८) पुष्कळ पैसा उधळला म्हणजे लोकांत कीर्ति होते, मग तो पैसा कोठूनही येवो.

२९) यत्किंचित् कारणाकरितां खळवाद करितात, आणि भिकारी होतात; पण त्यांस सोडीत नाहींत.

३०) परक्याजवळ हात जोडून रहातात, पण आपले स्वकीयांशीं लढाई करितात; अशी चाल आपले लोकांची आहे.

एकूण तीस प्रश्न मीं घातले आहेत. हे जास अमान्य असतील, त्याणें लिहून कळविल्यास मला फार संतोष होईल. परंतु या समयीं मूर्खपणाच्या समजुती इतक्या दृढ आहेत कीं, त्यांस असें वाटेल कीं, काय हे प्रश्न? यांची उत्तरें काय द्यावयाचीं आहेत? पण तसें नव्हे. या गोष्टी मोठय़ा आहेत व लोकांच्या गैर समजुती जाव्या व त्याणीं सुज्ञ व्हावें अशी इच्छा जास असेल त्यासच हें पत्र आहे. इतर जे लक्ष्मीचे बंधु आहेत, त्यांचा हिशेब व गणना आमचे मनात मुळींत नाहीं. ते बोलले सारखे, न बोलले सारखे.’’

हे पत्र वाचल्यावर लोकहितवादींच्या भाषाशैलीचा प्रत्यय येईलच, परंतु येथे त्यांनी केलेली तत्कालीन समाजाची चिकित्सा नजरेत अधिक भरण्यासारखी आहे. पेशवाईच्या अस्तानंतर इथल्या समाजाला उदारमतवाद, नव्या विद्याशाखा, विज्ञाननिष्ठा, उद्यमशीलता यांची ओळख नुकतीच होऊ लागली होती. लोकहितवादींनाही या नव्या विचारांविषयी आस्था होती. या पाश्र्वभूमीवर आपल्या समाजातील आचार-विचार ताडून पाहिले तर मोठी निराशाच पदरी येणार होती. ती लोकहितवादींच्याही पदरी आलीच आणि ते इथल्या समाजाची कठोर चिकित्सा करण्यासाठी उभे ठाकले. ती करताना त्यांनी आपली मते कोणतीही भीडभाड न ठेवता मांडली. ‘शतपत्रे’ वाचताना ते जाणवतेच. खरे तर ‘प्रभाकर’मध्ये असे १०८ पत्रलेख प्रसिद्ध झाले होते. त्यात ‘इंदुप्रकाश’ आणि अहमदनगरच्या ‘वृत्तवैभव’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या निबंधांची भर घालून १९५ निबंधांचा ‘लोकहितवादीकृत निबंधसंग्रह’ १८६६ मध्ये  प्रकाशित झाला होता. याच संग्रहाची शतसांवत्सरिक आवृत्ती १९६७ मध्ये मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केली. ती अ. का. प्रियोळकरांनी संपादित केली होती. त्यातील २९ जानेवारी १८६५ रोजी लिहिलेल्या ‘सरकारनें काय करावें?’ या निबंधातील हा उतारा पाहा-

‘‘आतां या जगामध्यें अनेक देश आहेत, त्यांमधून पाहिलें तर कोठें वंशपरंपरेचे राजे आहेत. कोठें लोकसत्तात्मक राजे आहेत. कोठें मनस्वी राजे आहेत व कोठें प्रतिबंधित राजे आहेत, असें दिसून येतें. याप्रमाणें सर्व मासले हल्लीं पृथ्वीवर आहेत. याविषयीं विचार केला तर असें दिसतें कीं, ज्या ज्या देशांत जसजशी लोकांची स्थिती आहे तसेंतसें तेथील राज्य आहे. देशांतील लोकांची जशी स्थिती आहे तशीच तेथें वहिवाट चालते. आणि त्या धोरणानें जुलमी कायदे किंवा मोकळिका मिळतात. घरांत जो वडील असतो तो आपले कुटुंबातील लोक जसे शाहाणे असतील तदनुसार त्यास स्वतंत्रता उपभोगूं देतो. आणि लहान बालकें असतील त्यांस दटाऊन ठेवितो. कारण त्यांस मोकळीक दिली असतां तीं भलतेंच करतील. त्यांचे अंगीं मोकळीक वागविण्याचें सामथ्र्य आलें म्हणजे त्यांचे कलावर त्या वडील माणसांची वागणूक होते. व तसें न होईल तर तें कुटुंब लागलेंच विभक्त होऊन त्या वडिलांच्या सत्तेचा त्याग करितें. तद्वत सरकार निर्बल किंवा रयत अधिक शाहाणी झाली म्हणजे त्यांचा परस्पर मेळ राहात नाहीं..

सरकारचे वागणुकीचे कांहीं अवश्य धर्म आहेत. त्याप्रमाणे सरकार चाललें म्हणजे प्रजा अर्थातच सुखी होते. प्रजेस सुखी असावें अशी स्वाभाविक इच्छा आहे. परंतु त्यास प्रतिबध्धक ज्या गोष्टी आहेत त्या नाहींशा झाल्या म्हणजे बाकी सर्व तजवीज प्रजा आपण होऊन करितात. रोगाचें मुख्य कारण दूर झालें म्हणजे रोग जातो. त्याप्रमाणें हरकती दूर झाल्या म्हणजे प्रजा सुखी व उद्योगी होते. मग प्रजेस सरकारांनीं पैसा दिला पाहिजे असें नाहीं व सुखी होण्याकरितां खजिना लुटविला पाहिजे असें नाहीं. जितका रयतेस सरकारचा बेभरवसा तितका जुलूम होतो. याजकरितां सरकारने जितका देववेल तितका दिलभरवसा रयतेस दिला पाहिजे व कायदे करून ते कोणी तोडणार नाहींत, असा बंदोबस्त ठेविला पाहिजे. उगीच डामडौलाकरितां किंवा दुष्ट कामाकरितां सरकार कर बसऊं लागेल तर अन्याय आहे. शत्रूनाशाविषयीं सरकारनें  शूर असावें पण क्रूर असूं नये. आपली सत्ता वाढविण्याकरितां व लोभाकरितां नाना प्रकारच्या गैरमसलती काढून त्या खर्चाकरितां प्रजेवर कर बसविला तरी तो जुलूमच आहे. लोकांस अज्ञानांत ठेविलें तरी तोही जुलूम आहे आणि सरकार जो कर घेतें, तो केवळ कर्ज आहे. त्याची झाडाझडती बरोबर व यथान्याय द्यावी, असें सरकारांनीं मनांत वागविलें पाहिजे. नाहींतर ‘राज्याअंतीं नर्क’ हेंच खरें आहे व याच वाक्यास अनुसरणारे चोर राजे बहुत आहेत. त्यांत मनस्वी राजे तर धुमश्चक्रीच करितात. कारण त्यांस कांहीं जबाबदारी व विचारपूस नसते व लोक जुलूमानें दीन झालेले असतात..

सरकार चालविण्यामध्यें मुख्य मर्म असें आहें कीं, सरकार जितकें घटत जाईल तितकें बरें आहे. व लोकांची सत्ता जितकी वाढत जाईल तितकी चांगली आहे. अगदी सरकारची गरज नाहीं अशी स्थिती असावी, असें मनांत येतें; पण अशी स्थिती लोकांस प्रत्यक्ष कधीं येईल असें तर दिसत नाहीं. पण जितकी सरकारचे गरज कमी होऊन लोकांचे हातीं कारभार येईल तितकें चांगलें आहे.. केवळ अडाणी देशांत सरकार मायबाप असतें. किंवा सरकार चोर असतें. मध्यम सुधारलेले देशांत सरकार मित्र असतें. व फार सुधारलेले देशांत सरकार चाकर आहे असें मानून सरकाराशीं लोक वागतात. सरकारचे गैरवाजवी सत्तेची वृध्धी होऊं देत नाहींत व सरकारच्या चुक्या सरकारास सांगतात. व त्यांचे दोष छापून प्रसिद्ध करितात. वाईट सरकारांत अशी कारभाराची प्रसिद्धि नाहीं. तेथें सर्व गुप्तपणा असतो. परंतु चांगले सरकारांत सर्व कारभार उघडा असतो. पाहिजे त्याणें पाहावा. ज्ञानावर सरकारचा प्रतिबंध नसतो. परंपरेचे राज्याचें सरकार असो किंवा कारभारी यांचें सरकार असो किंवा सत्तात्मक सरकार असो, त्यांत कांहीं चोरी नसते. सरकार आपले कारभाराचे प्रसिध्धीस अनुकूल होऊन लोकांस माहिती सांगतें. आणि हेंच चांगलें राजाचें लक्षण आहे. राज्य कोणाचेंही अजरामर नाहीं. परंतु अशा पायावर बांधलेली इमारत फार दिवस टिकते व पेंढारीपणाचें चोरटें राज्य व त्या राज्यांतील प्रजा निर्बळ होऊन त्वरित नाशाप्रत पावते.’’

या निबंधसंग्रहाव्यतिरिक्तही लोकहितवादींनी विपुल लेखन केले आहे. त्यात धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, इतिहासविषयक लेखनाचा समावेश आहे. लोकहितवादींच्या समग्र वाङ्मयाचे गोवर्धन पारिख व इंदुमती पारिखयांनी संपादित केलेले दोन खंड महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने अनुक्रमे १९८८ व १९९० साली प्रकाशित केले आहेत. त्यात काही लेखन वाचायला मिळेल.

संकलन प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com