अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- काशीनाथ विष्णू फडके!

चिपळूणकरांच्या निबंधमालेची सुरुवात झाली, त्याच्या आसपासचा काळ हा मराठी समाजात आत्मपरीक्षणाचा काळ होता. त्याचे पडसाद तत्कालीन लेखनात पडलेले दिसतात. इथला शिक्षित झालेला तरुणवर्ग बालविवाह, स्त्रीशिक्षण, इंग्रजीचे फायदे-तोटे, धर्मसुधारणा आदी विषयांवर गंभीरपणे व्यक्त होत होता. त्याच वेळेस ठाण्यातील एक तरुण मात्र याच विषयांवर उपहास, उपरोध, कारुण्य, विसंगती व अतिशयोक्तीने युक्त लिखाण करीत होता. तो तरुण म्हणजे काशीनाथ विष्णू फडके आणि त्यांचे हे लिखाण होत होते ते त्यांच्या ‘हिंदुपंच’ या साप्ताहिकातून. २१ मार्च १८७२ रोजी हिंदूुपंचचा पहिला अंक निघाला. फडके हे त्याचे संपादक होते. त्यात ‘पंचआजोबा’ या टोपणानावाने ते लिहीत.

What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

या आजोबांच्या घरी विलायतची मेल येत असत. एका आठवडय़ात त्यातून एक ढेकूण आला. त्यावर आजोबांनी लिहिले होते-

‘‘गेल्या आठवडय़ात खुद्दांकडे जे विलायतच्या मेलमधून टपाल आले त्यातील एका वर्तमानपत्राच्या घडीत आतल्या बाजूला पुष्कळ दिवस खायला न मिळून पोटाची पत्रावळ झालेला असा एक चपटासा ढेकूण बसलेला आढळला. आता हा ढेकूण खुद्द लंडन शहरात जेथे हे पत्र छापले गेले त्या छापखान्यातला असो अथवा विलायतचे टपाल घेऊन येणाऱ्या पी. आणि ओ. स्टीमरमधील पोस्टाच्या खोलीत असलेल्या ढेकूण मंडळींपैकी असो. कसेही असले तरी हा खपाटपोटय़ा ढेकूण विलायतेहून उपवास करीत न्यूजपेपरबरोबर खुद्दाचे ऑफिसात दाखल झाला ही एक अपूर्व गोष्ट  आहे यात संशय नाही. विलायत म्हणजे थंड मुलूख असल्यामुळे तिकडील प्राणिमात्र व पदार्थमात्र गोरे ऊर्फ पांढरे असावयाचे असा पुष्कळांचा समज आहे व तो पुसट पुसट खराही आहे असे पंच सरकारांचे या ढेकणावरून अनुमान होते. कारण हा आलेला ढेकूण इंडियन ढेकणापेक्षा बराच गोरा असून याचे अंगपिंडही इकडील ढेकणांपेक्षा सुदृढ आहेसे वाटते. विलायती वस्तू नवीन इकडे आलेली सर्व जिज्ञासूंस बघावीशी वाटते. तद्वत् वरील विलायती ढेकूणही सर्वास बघण्याची इच्छा होणे साहजिक आहे. विलायती ढेकणास हिंदुस्थानातली उष्ण हवा सोसते किंवा नाही याचा (एक्स्पेरिमेंट) अनुभव आजपर्यंत कोणी बघितल्याचे खुद्दांनी ऐकिले नाही. तो अनुभव बघण्याचाही हा अनायासे योग घडून आला आहे. तरी हा ढेकूण फार दिवस इकडे वाचेल असे पंच सरकार समजत नाहीत व म्हणून लगबगीने सर्व विलायती ढेकूण बघणेच्छूस खुद्द असे कळवितात की, ज्या कोणास सदरील श्वेतद्वीपीय प्राणी पाहण्याचा समय साधणे असेल त्यांणी फार जलदीने कोठेतरी खुद्दांचे ऑफिस आहे तेथे बरोबर चार चार पैसे घेऊन यावे. कारण असे केले म्हणजे पाहणारांची दाटी होणार नाही व फीचे जे उत्पन्न होईल ते ढेकूण रक्षणार्थ जे पोलीस, चपराशी, शिपाई, व द्वारपाल ठेविले आहेत त्यांच्या मुशाहिऱ्याकडे लावण्यास येईल. खुद्दांस त्या फीतील एका कवडीची आशा नाही. खुद्दांचा हा परोपकारार्थ उद्योग आहे. सर्वानी जलदी करावी. वेळेवर प्रसंग बघून प्रसिद्ध इचलकरंजीकर नाटककारांप्रमाणे दाटी कमी होण्याकरिता फीचे दर वाढविले जातील. थोडय़ा खर्चात विलायती ढेकूण बघून घ्या व धन्य माना. धावा! धावा!’’

या हिंदुपंचचे स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य होते आणि त्याचे प्रमुख होते पंचआजोबा. ते स्वत:ला सरकार, खुद्द, आम्ही असे म्हणवितात. इंग्रज सरकारप्रमाणेच आजोबांच्या राज्यातही त्यांचे स्वत:चे राजकीय-परराष्ट्र खाते, हेर, आरोग्य आणि न्यायखातेही आहे. त्यात आजोबा अनेकांच्या नेमणुका, बदल्या करत असतात. इंग्रजी शासनपद्धती आणि शिष्टाचारानुसारच या खात्यांचे काम चालत असते. त्याविषयीचे अहवाल, नोटिसा हिंदुपंचमधून प्रसिद्ध होत. राज्याचे प्रजाजनही यातून आपली गाऱ्हाणी मांडत. त्यात पत्रे लिहीत, जाहिराती देत, कोर्टात खटले लढवत. राज्यात देशी-परदेशी पाहुणेही येत. आजोबा त्यांना मानपत्र लिहीत. पंचआजोबा जसे हे सरकार चालवीत तसेच ते राज्यातील प्रजेची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरीही जात. प्रत्येक घरातील लेकी, सुना, नातवंडे यांच्याशी त्यांचे विशेष सख्य जमे. आजोबा सण-उत्सवांनाही हजर राहत. तिथली संभाषणे ऐकत. एका श्रावणात आजोबांनी संकट सोमवारची सांगितलेली ही ‘नवी’ कहाणी पाहा-

‘‘ऐका संकट सोमवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एत ढेरपोटय़ा होता. होता मेला कसाबसा तरी. पण बाई, मोठा लघळ नी चघळ होता. त्याचा नी त्याच्या गावच्या लोकांचा जणू काय उभा दावा होता. पण तो बाई साह्य़बांकडे जाऊन जाऊन त्यांची भारी बाई हांजी हांजी करीत असे. साह्य़बांना फळांच्या डाल्या पाठवायच्या; त्यांच्या मुलांलेकरांना आपल्या लठ्ठ पोटावर खेळवायचं. त्यांच्या मडमांची थुंकी झेलायची, साह्य़बांनी गद्धा म्हटलं तरी हसण्यावारी व थट्टेवारी नेऊन आपला मऊमेणपणा दाखवायचा. त्यांणी आपले काळे कुळकुळीत नी कुर्रकुर्र वाजणारे नवे बुट जरी त्याच्या उंच कपाळावर मारले तरी ते निमूटपणे सोसायचे. त्याबद्दलचा विधिनिषेध मानायचा नाही. बिचारा सांबाचा अवतार. कुणाचं हूं का चूं म्हणून ऐकायचं नाही. येऊन जाऊन साहेब लोक काय ते पूज्य. कसे बरे पूज्य असणार नाहीत? त्यांची भक्ती नी त्यांच्याबद्दलचं प्रेम यांनीच तर तो ढेरपोटय़ा इतक्या योग्यतेला आला. एका संकट सोमवारी त्याला बाई सरकारातून रावबहादुरीची पदवी देण्यात आली आहे. म्हटला म्हणजे, आडवा फोडला तर चक्र अन् उभा फोडला तर शंख. पण अशाला बाई सरकारनं रावबहादुरी दिली. अशा चांगल्या निर्गुणनिराकार माणसाला लोकं मेली नावं ठेवतात. लोकांना काही बाई समजत नाही. अशा पडल्या काळी जर आपलं आपल्याला ओळखून मनुष्य वागलं तर भगवान त्याचे हेतू सहज पूर्ण करील. असा संकट सोमवारचा महिमा आहे. हे संकट सोमवारचं व्रत कुणी केलं? हे संकट सोमवारचं व्रत ढेरपोटय़ांनी केलं. आणखी हे संकट सोमवारचं व्रत कुणी केलं? त्याच्याबरोबरच्या हांजी हांजी करणाऱ्यांनी केलं. आणखी हे संकट सोमवारचं व्रत कुणी केलं? हडक्या दलालानं केलं. आणखी हे संकट सोमवारचं व्रत कुणी केलं? त्याच्या मागे पुढे चालणाऱ्या सनकसनंदनांनी केलं. ते व्रत तुम्हा आम्हाला कधीही फल न देवो.’’

आजोबांचे, अर्थात- फडके यांचे तेव्हाच्या राजकीय-सामाजिक चळवळी करणाऱ्यांशी मित्रत्वाचे संबंध होते. असे असले तरी राजकीय-सामाजिक विषयांवरील लेखनातही त्यांचा मिस्कील- खोडसाळ स्वभाव प्रकर्षांने दिसून येतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांच्या चळवळीबद्दल आजोबांनी नोंदवलेली ही प्रतिक्रिया-

‘‘भटुरगे ही जात फार उन्मत्त, दुसऱ्यावर वर्चस्व ठेवणारी, कपटी, वेळ येईल तशी वागणारी, घरभरी म्हणण्यापेक्षा घरबुडवी, एवंच गुणादुर्गुणांची खाण अतएव प्रदर्शनात ठेविण्यासारखी, प्रत्यक्ष मूर्ती असून हिंदुधर्माचे जे काय पवित्र गाठोडे ते सर्व तिच्याच हाती असून आज निपटनिरंजन अल्लाचे भक्त व मेंढपाळांचे कळपचे कळप या देशात चमकले व चमकू लागले आहेत असे खडबडीत ठाकून ठोकून अनुभवास येत असता किंवा मिशनरी अथवा सालव्हेशन आर्मीच्या झुंडीच्या झुंडी हे भटुरगेनाम धर्म बोचके हिरावून घेण्याकरिता युक्तिप्रयुक्तीने, लालचीने सपाटून प्रयत्न करीत असता श्रमसाफल्य होत नाहीत व भटुरग्यांच्या मुहूर्तावाचून किंवा पंचांग श्रवणावाचून मनुष्यमात्र हिंदूचे अडलेलेच आहे. तस्मात् या भटुरग्यांची ऊर्फ उच्च म्हणविणाऱ्या बामणांची हंबेलंडी उडविण्यास किंवा त्यांचे ते गुहेत ठेवलेले धर्मतत्त्व हिरावून घेणे आवश्यक असून तसे झाल्यावाचून आकाशाच्या बापाच्या पाखरेखाली किंवा ख्रिस्ताच्या तारणाखाली या लंडाचा इंडिया येण्याचा संभव नाही, असे निश्चित ठरवून हणगोजीराव लोखंडे वृद्ध आणि आनुभविक पंचास किंवा खुद्दांस अशी शिफारस करण्याकरिता विनंती करीत आहेत की, सर्व भटुरग्यांस मायंदळ झालेल्या अपकारी खात्यात नोकरी ऊर्फ चाकरी देण्याविषयी चार शब्दांनी सरकारास्नी खुलवून सांगा आणि तसे झाले म्हंजे भटुरग्यांच्या घ्राणेंद्रियात मद्यरूपी हवा संचार करता करता हृदयात वास करू लागली की आटपलेच धर्माचे बोचके नी काय? मग नको ती साल्वेशन आर्मी, नको ते मिशनरी मंडळ, नको ते दीनबंधूचे रडगाणे नको तो एकेश्वरी, नको तो ब्राह्म आणि स्त्रीशिक्षणक्रम, आपोआप सर्वत्र मेंढपाळ पसरून शेवटचा जय गोपाळ पसरून देण्यास उशीर लागणार नाही.

– ठंठणपाळ.’’

हिंदुपंच ठाण्याच्या सूर्योदय प्रेसमध्ये छापले जात असे. तिथूनच ‘सूर्योदय’ हे साप्ताहिकही प्रसिद्ध होत असे. त्याचेही संपादक फडके हेच होते. पंचच्या लेखनकामाठीत फडके यांना वामन बाळकृष्ण रानडे हे साह्य़ करीत असत. पंचला जेव्हा २७ वर्षे पूर्ण झाली तेव्हा आजोबांनी लिहिले-

‘‘आजपर्यंत खुद्दांनी जी लोकसेवा केली ती परमप्रिय व उदार आश्रयदात्यांनी मान्य करून घेऊन त्यांचा आश्रय कायम ठेवला.. महाराष्ट्र भाषेत अशा प्रकारचे पत्र एवढेच असून या २६ वर्षांचे मुदतीतही ते अद्वितीय राहिले आहे.. थेरडा पंच हा अर्थाडॉक्स आहे का रीफॉर्मर आहे? याचा निकाल कोणालाही नक्की करता येईलच असे सांगता येणे नाही, नीतिदृष्टीने खुद्दांचे पुराणपुरुषत्व ‘वेलनोन’ असलेच पाहिजे. म्हणजेच सर्वदा नीतीच्या बाजूचेच प्रतिपादन करावयाचे.. तथापि, नवीन गोष्टीविषयी म्हाताऱ्याला अप्रीती नाही. अर्थाडॉक्स म्हणजे नवे विद्वेषी. त्यांची नवीन गोष्टीवर अप्रीती असते. ह्य़ा वर्गात पंचसरकार आपणास सुतराम घालू इच्छित नाही. रीफॉर्मर म्हणजे सुधारणा मताचे. मानवी सुखाला नीतिज्ञानदृष्टय़ा, कालदेशमन्वंतराप्रमाणे वाढवीत जाण्याविषयी ज्यांची प्रवृत्ती ते सुधारक होत. नवविद्वेष्यांनी सुधारक हा निंदाव्यंजक शब्द मानला आहे. पण तो अत्यंत गौरवाचा व यथार्थस्वरूपदर्शक आहे. नीतिदृष्टीला अनुसरून (असलेल्या) सर्व प्रकारच्या नवीन सुधारणा खुद्दांना आवडल्या आहेत, व त्यांचे यथोचित प्रसंगी अभिनंदन करण्यास म्हाताऱ्याचे कलम कचरत नाही. दंभाचा स्फोट, गोपनाचा प्रकाश, पापाचरणाचा निषेध, सत्कृत्याचा गौरव, सुधारणेचे अभिनंदन, नीतिवानांचे स्तवन, प्रिय भगिनी व्हिक्टोरियाक्का-संबंधाने ओतप्रोत राजनिष्ठा आणि खिन्न, उदास, चिंतामग्न व आपद्ग्रस्त अशांना क्षणक तरी विश्रांती देणे ही खुद्दांच्या नित्य कर्तव्यातील मुख्य कार्ये होत.’’

पुढे १९०४ पासून पंचचे संपादन कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ तात्या फडके हे करू लागले. ते पंचमधून तत्कालीन नेमस्त गटावर टीका करत. १९०६ मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा त्या शिक्षेस गोपाळ कृष्ण गोखले जबाबदार आहेत, असे सूचित करणारे लेखन पंचमधून प्रसिद्ध झाले. तेव्हा गोखल्यांनी पंचवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तात्या फडके यांनी कोर्टात माफी मागितली, पण सरकारने हा खटला पुढे चालवला व शेवटी १९०९ मध्ये पंचवर जप्ती आली.

पंचआजोबा व हिंदुपंच यांच्या या प्रवासाचे विस्तृत वर्णन सरोजिनी वैद्य यांच्या श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संक्रमण’ या लेखसंग्रहात वाचायला मिळते. हे पुस्तक एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राविषयी रस असणाऱ्यांनी आवर्जून वाचायलाच हवे.

संकलन प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com