अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- कृष्णशास्त्री चिपळूणकर!

आतापर्यंत आपण जे जे ग्रंथकार पाहिले त्यातील बहुतांशजणांच्या लेखनशैलीत भाषेचे ‘मुंबई वळण’ प्रामुख्याने दिसत होते. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मराठीला पुणेरी वळणावर आणण्याचे कार्य ज्यांनी केले त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे नाव घ्यावे लागते. पुण्याच्या संस्कृत पाठशाळेत शिक्षण घेतलेल्या शास्त्रीबुवांनी पुढे पूना कॉलेजमधून इंग्रजीही शिकून घेतली आणि १८५२ मध्ये ते अनुवादक म्हणून सरकारी नोकरीत रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘साक्रेतिसाचे चरित्र’ हे अनुवादित पुस्तक लिहिले. यानंतरच्या काळात त्यांनी पुणे पाठशाळेत साहाय्यक प्राध्यापक, दक्षिणा प्राइझ कमिटीचे चिटणीस, पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस अशा पदांवर काम केले. एकीकडे त्यांचे हे ‘करिअर’ सुरू होतेच, पण त्याच वेळी त्यांच्या हातून मोजकी तरीही निरनिराळ्या प्रकारांतली ग्रंथरचना झालेलीही दिसते. यातला १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलकृत ‘प्रिन्सिपल ऑफ पोलिटिकल इकॉनमी’चे भाषांतर. त्याच्या प्रस्तावनेत शास्त्रीबुवा लिहितात,

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Loksatta kutuhal artificial intelligence Peter Norvig
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : दोन उत्कृष्ट मार्गदर्शक

‘‘व्यवहारांतल्या गोष्टींच्या यथार्थ उपपत्ति समजणें जर आवश्यक आहे, तर अर्थशास्त्राचा अभ्यास फारच आवश्यक आहे असें मानलें पाहिजे. कारण, अर्थशास्त्रांत ज्या गोष्टींचें निरूपण केलें आहे, त्या गोष्टीं नेहमींच्या व्यवहारांतल्या आहेत, व त्या गोष्टींच्या भ्रांतिपासून मोठ मोठे अनर्थ होण्याचा, व त्यांच्या यथार्थ ज्ञानापासून मोठें कल्याण होण्याचा संभव आहे. देशांतील संपत्तीचें स्वरूप, तिचीं कार्ये, तिचीं प्रधान व गौण कारणें, तिच्या मर्यादेचीं कारणें, देशांतील सरकारशीं तिचा संबंध, परदेशच्या व्यापाराशीं तिचा संबंध, तिचा क्षय ज्या कारणांनीं होतो तीं कारणें, इत्यादि अनेक विषयांचें प्रतिपादन ह्य़ा शास्त्रांत आहे; व ह्य़ा विषयांचें यथार्थज्ञान होणें लोकांस किती आवश्यक आहे, हें ह्य़ा शास्त्रांत त्याविषयांविषयीं जे सिद्धांत ठरवले आहेत ते, व लोकांत ह्य़ा विषयांविषयीं ज्या समजुती आहेत त्या, ह्य़ांची तुलना करून पाहिलें असतां, लक्ष्यांत सहज येईल.’’

या ग्रंथात त्यांनी तेरा भागांत राजकीय अर्थशास्त्राचे विवेचन सादर केले आहे. त्यातल्या ‘संपत्तीचे उत्पत्तीस कारण जो श्रम त्याविषयीं विचार’ या भागाच्या सुरुवातीला आलेला हा उतारा पाहा-

‘‘धनोत्पत्तीस श्रम कारण म्हणून वर सांगितलें. तो श्रम दोन प्रकारचा आहे. कांहीं श्रम, धनोत्पत्तीस साक्षात् कारण आहे; व कांहीं, परंपरेनें कारण आहे, – म्हणजे कांहीं श्रमानें मनुष्यास सुख देणाऱ्या वस्तूच साक्षात् उत्पन्न होतात व कांहीं श्रम त्या वस्तूंची सामग्री वगैरे सिद्ध करण्यास लागतो. उदाहरणार्थ वस्त्रें घेतलीं असतां, कोष्टय़ाच्या श्रम, वस्त्ररूप धनोत्पत्तीसच साक्षात् कारण आहे; व सूत काढणाऱ्यांचा श्रम, वस्त्ररूप धनाची जी सामग्री, तिच्या उत्पत्तीस कारण आहे. ह्य़ाप्रमाणें शेतकरी, पिंजारी इत्यादिकांचा श्रमही वस्त्रोत्पत्तीस परंपरेनें कारण समजावा. आतां शेतकरी, पिंजारी, सूत काढणारा, इत्यादि लोकांच्या श्रमापासून कापूस, पिंजलेला कापूस, सूत इत्यादि धनरूप फलें साक्षात् उत्पन्न होत असतां, त्यांचा श्रम, वस्त्रास परंपरेने कारण मानून, वर सांगितलेला भेद करावयाचें प्रयोजन काय? अशी कोणास शंका येईल; तीवर असें उत्तर आहे कीं, ह्य़ा श्रमकर्त्यांच्या श्रमाचें कापूस वगैरे फळ असलें, तरी त्या श्रमाचें शेवटचें फळ वस्त्रच होय. हे श्रमकर्ते जो कापूस वगैरे उत्पन्न करतात, तो कापूसाकरताच करीत नाहींत, तर वस्त्रांकरितां करतात, आणि त्या सर्वास त्यांच्या श्रमाची मजुरी वस्त्रापासून, किंवा वस्त्राच्या किमतीपासूनच, प्राप्त होते. त्यांस ती मिळण्यास दुसरें स्थान नाहीं; त्यांच्या श्रमाचें वास्तविक फळ वस्त्र होय; ह्य़ास्तव त्यांचा श्रम त्या वस्त्रास परंपरेने कारण आहे, अशी कल्पना करणें अवश्य आहे.’’

परंतु हा ग्रंथ म्हणजे मिलच्या ग्रंथातील केवळ एकाच प्रकरणाचे भाषांतर होते. शास्त्रीबुवांनी १८५६ मध्ये दुसरे प्रकरणही भाषांतरित केले होते, पण ते प्रकाशित झाले नाही. या ग्रंथाने त्यांचे अनुवादकौशल्य दाखवून दिले. अनुवादाच्या हातोटीबरोबरच शास्त्रीबुवांकडे आणखी एक गुण होता, तो म्हणजे मूळ विषय समजावून घेऊन तो सुगम शैलीत सांगणे. त्यांच्या या गुणाचे दर्शन घडवणारा ‘अनेकविद्यामूलतत्वसंग्रह’ हा ग्रंथ १८६१ मध्ये प्रकाशित झाला. त्यात रसायनशास्त्र, ज्योतिष, गणित, साहित्य, कला, नीती आदी अनेक विषयांची माहिती देण्यात आली होती. त्यातला ‘छापण्याची कला’ या टिपणातील हा भाग पाहा-

‘‘ठशांनीं अक्षरें छापण्याची युक्ति प्रथमत: युरोपखंडात प्रकट झाली; पण ही युक्ति काढिली कोणी ह्य़ाचा पक्का निश्चय होत नाहीं. ही कल्पना आमच्या शहरांत उत्पन्न झाली म्हणून ह्य़ा खंडांतल्या पुष्कळ शहरांतल्या लोकांच्या ह्य़ा मानाविषयी बहुत दिवस वाद चालला आहे; परंतु हल्लीं बहुतांचें मत असें आहे कीं हालंद देशांत हालेम नामक एक गांव आहे, तेथें ही युक्ति उत्पन्न झाली. असें सांगतात कीं या गांवांत इसवी सन १४४० सांत लारेन्स कोस्तर म्हणून गांवचा एक अधिकारी होता. तो गांवाच्या शेजारीं एक रान होतें त्या रानांत एक दिवस बसला असतां त्यानें बसल्या बसल्या झाडाच्या सालीचीं आपल्या नांवाची प्रथमाक्षरें सुरीनें सहज मौजेनें कापिलीं. नंतर त्यानें तीं सालींचीं अक्षरें कागदावर ठेविलीं, आणि कांहीं वेळानें पहातों तों त्यांवर दव पडून तीं खालच्या कागदावर उमटलीं, असें त्याच्या दृष्टीस पडलें. हीं सहज घडलेली गोष्ट त्याच्या मनांत ठसून ती पुन: दुसऱ्या रीतीनें आणखी करून पहावी, असें त्यास वाटलें. मग त्यानें लाकडाचीं काहीं अक्षरें तयार करून तीं चिकट पाण्यांत बुडवून कागदावर दाबलीं तों तीं पहिल्यापेक्षा चांगलीं उमटलीं, असें त्याच्या दृष्टीस पडलें. पुन: लवकरच त्यानें शिशाचीं व जस्ताची अक्षरें करून आपल्या घरांत एक छापण्याचें यंत्र, ज्याला प्रेस म्हणतात, तें तयार केलें. ह्य़ाप्रमाणें त्यानें ह्य़ा उत्तम व परमोपयोगी कलेचा पाया घातला. ती कला काळगतीनें पुढें अधिकाधिक सुधारत जाऊन शेवटीं हल्लींच्या उत्तम दशेस येऊन पोंचली. असें सांगतात कीं, त्या कोस्तरापाशीं जान फास्तस् म्हणून एक चाकर होता, त्यानें ही युक्ति चोरून मेन्तज म्हणून जर्मनी देशांत गांव आहे, तेथें नेली; व तेथच्या लोकांस ह्य़ानेंच ही नवीन कला काढिली असें वाटून त्यास डाक्तर (विद्वान) व यांत्रिक अशा पदव्या प्राप्त झाल्या. ही कला उत्तरोत्तर सुधारून तिची योजना लोकांत ज्ञानाचा प्रसार करण्याकडे होऊं लागली; तेव्हांपासून मनुष्यांच्या स्थितींत मोठा भेद पडण्यास आरंभ झाला. मनुष्यास थोरपणा येण्यास मुख्य कारण ज्ञान आहे व तें ज्ञान प्राप्त होण्यास पुस्तके आवश्यक आहेत. पुस्तकें जर नसतील तर तोंडच्या नुसत्या सांगण्यानें ज्ञान कितीसें पसरणार आहे व आठवण धरून त्याचें काय संरक्षण व्हावयाचें आहें हें थोडासा विचार केला असतां सर्वाचे लक्षांत येईल. लिपीची कल्पना निघाल्यानें पुस्तकें  लिहिण्याची रीत उत्पन्न होऊन आठवण धरण्याचे श्रम पुष्कळ कमी झाले. तथापि हातानें लिहून पुस्तकें किती तयार होणार आहेत? लिहिण्याची मेहनत फार असल्यामुळें, तीं अर्थात महाग होईत व महाग असल्यामुळें मोठें श्रीमंत जे असत त्याजजवळ मात्र पुष्कळशीं पुस्तकें असत. त्या कारणामुळें जुन्या-काळीं पुस्तकें थोडीं असत. व गरीबगुरीबांस पोटाचा धंदा संभाळून विद्या करण्याची अगदींच सोय नसे.. पण छापण्याच्या युक्तीनें पुस्तकें स्वस्त होऊन गरीबांस विद्या शिकण्याची सोय झाली. ह्य़ा कल्पनेच्या योगानें पुस्तकें किती स्वस्त झालीं, हें सांगितलें असतां ऐकणाऱ्यास मोठा विस्मय झाल्यावांचून राहणार नाहीं. तसेंच हातानें पुस्तकें लिहिण्याची चाल होती त्या वेळीं ग्रंथ फार संक्षिप्तपणें लिहीत व ह्य़ामुळें ते दुबरेध होऊन त्यापासून विद्याप्रसार व्हावा तितका होत नसे. कोणी मोठाच पंडित असला तर त्याचा मात्र ग्रंथ प्रसिद्धीस येई, ह्य़ाकरितां लहानसहान विद्वानांस एखादी चांगली गोष्ट सुचली तरी ती लिहिली जात नसे. इत्यादि बहुत गोष्टी विद्या-वृद्धीस प्रतिकूल होत्या. छापण्याची युक्ति निघाल्यामुळें युरोपखंडात विद्या कला-कौशल्य वगैरे वाढलीं आहेत व ही कला मनुष्यांस हरएक प्रकारें उत्तमावस्थेस आणण्यास जितकी उपयोगी पडली आहे, त्याचा शतांशसुद्धा दुसरी कोणती गोष्ट पडली नसेल.’’

या ग्रंथात शास्त्रीयेतर विषयांवरील निबंधही कृष्णशास्त्रींनी लिहिले होते. त्यातला ‘मेल्याविषयी दु:ख’ हा लघुनिबंध पाहा-

‘‘सर्व दु:ख जाण्याविषयी आपण इच्छितों; पण मेल्याबद्दलचें जें दु:ख होतें, तेवढें मात्र जाण्याविषयी आपण कधी इच्छित नाही. हरएक जखम बुजून बरी होण्याविषयीं आपण झटता. हरएक हानि विसरण्याविषयीं प्रयत्न करितो; परंतु इष्ट जनाच्या मरणाने अंत:करणास जी जखम पडते, ती बुजू न देणे हा आपला धर्म वाटून ती आपण तशीच ठेवितो व ह्य़ा हानीचा विसर पडू न देता एकाती बसून ती मनात घोळीत असतो. व ज्या आईचे केळीच्या कोंबासारखं तान्हें बाळ डोळ्यादेखत गमावले असतें, त्याची आठवण झाली असता तिच्या हृदयास हजारों विगळ्या झोंबल्यापेक्षा अधिक वेदना होतात, पण त्या वेदना होऊ नयेत, त्या बाळाचा विसर पडावा, असे कोणत्या आईच्या मनात येणार आहे बरे? तसेच अत्यंत मायाळू आई मरण पावल्यावर, तिचे स्मरण झाले असता मन कासावीस होते, तर तिची आठवण बुजून जावो, असे ज्यास वाटतें, असे कोण मूल आहे बरे? .. मृत्यू एका प्रकारे किती चमत्कारिक पदार्थ आहे? शरीर चिंतन जळाले म्हणजे त्याबरोबर मनुष्याचे सर्व अपराध, सर्व व्यंग, सर्व द्वेषकारणे जळून नाहीतशी होऊन शुद्ध धातु जसा उरावा तसे मेल्या मनुष्याचे गुण मात्र दिसू लागतात. मोठा शत्रु का असेना, त्याचे प्रेत दृष्टीस पडले असता, पश्चात्ताप होऊन मनात असे खाऊ लागत, की शिव शिव. ह्य़ा असल्या बापुडय़ा दीन मातीशी कायरे मीं द्वेष केला? ह्य़ाच कारणाने वाली रक्तानें नाहालेला पाहून सुग्रीवास व रावण समरांगणी पाहून बिभीषणास शोक झाला, असे जें वाल्मीकीनें रामायणात वर्णिले आहे, त्याची उपपत्ति समजावी.’’

शास्त्रीबुवांचे हे नोकरी आणि भाषांतर-लेखनकार्य सुरू असतानाच त्यांनी ‘विचारलहरी’, ‘मराठी शालापत्रक’ या नियतकालिकांचे संपादनही काही काळ केले होते. शालापत्रकात त्या वेळी पुस्तकांच्या जाहिराती दिल्या जात. त्यात शास्त्रीबुवांच्या ‘पद्यरत्नावली’ या १८६५ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या जाहिरातीत ते लिहितात,

‘‘पद्यरत्नावली या नावाचा कवितात्मक नवीन मराठी ग्रंथ सुज्ञ व रसिकजनांच्या मनोरंजनार्थ करून नुकताच छापून तयार केला आहे. या ग्रंथात पाच प्रकरणे आहेत. ती येणेप्रमाणे- मेघदूत, अन्योक्तिकलाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली व विलाप; ही प्रकरणे कालिदास, भवभूती, बिल्हण, जगन्नाथराय इत्यादी अत्यंत रसिक जे प्राचीन कवी त्यांच्या ग्रंथांच्या आधाराने रचली आहेत. या ग्रंथात चमत्कारिक व सुरस वृत्तांचे श्लोक, आर्या, साक्या, दिंडय़ा इत्यादी वृत्ते योजिली आहेत. या कवितेत शब्दमाधुर्य, अर्थलालित्य, शृंगारकरुणादी रस कितपत उतरले आहेत याविषयीं ग्रंथकाराने स्वत: सांगणे बरोबर नाही. ते गुण असतील तर अनुभवाने वाचणारास कळतील. तथापि ज्यांनी अद्यापि तो ग्रंथ पाहिला नाही त्यांच्या माहितीकरिता इतके सांगणे आवश्यक वाटते की, विद्वान व मराठी कवितेचे अभिज्ञ असे जे रा. रा. परशुरामपंत तात्या गोडबोले, रावबहादूर भास्करराव दामोदर वगैरे कितीएक विद्वान गृहस्थ यांनी हा ग्रंथ पाहिला आहे व त्यांनी त्याची उत्कृष्ट तारीफ केली आहे. या ग्रंथातील कठीण शब्दांचे अर्थ समजण्याकरिता व त्यात आलेल्या पुराणप्रसिद्ध गोष्टींची माहिती होण्याकरिता खाली कितीएक टिपा घातल्या आहेत व कठीण शब्दांचा कोश शेवटास दिला आहे. तसेच मराठी कवितेत जे व्याकरणाचे विशेष असतात त्याविषयी एक निबंध शेवटी जोडला आहे.

या ग्रंथाची अष्टपत्री साच्याची एकंदर ९० पृष्ठे आहेत व त्याची किंमत बारा आणे ठेविली आहे. टपालाचे हशील शिवाय पडेल. या ग्रंथाच्या प्रती ज्यांस घेणे असतील त्यांनी पुण्यास ज्ञानप्रकाश छापखान्याच्या मालकाकडे लिहून पाठवावे म्हणजे त्या मिळतील. ता. २९ जुलई सन १८६५.

– कृष्णशास्त्री चिपळूणकर’’

पुढे सुमारे शंभर वर्षांनी ग. त्र्यं. माडखोलकरांनी एकेठिकाणी म्हटलेय की, ‘‘कृष्णशास्त्री हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले भाषाप्रभु, पहिले शब्दशिल्पी, पहिले शैलीकार साहित्यिक! आज जी प्रौढ, बव्हर्थ, प्रभावशाली, लालित्यपूर्ण मराठी भाषा शास्त्रीय, ललित आणि नियतकालिक वाङ्मयातून लिहिली जात आहे, ती अर्वाचीन मराठीची ग्रांथिक शैली शास्त्रीबुवांनी आपल्या आरस्पानी मुलायम कलमाने घडविली आणि रंगरूपाला आणली.’’ माडखोलकरांच्या या म्हणण्याचा प्रत्यय शास्त्रीबुवांचे साहित्य वाचल्यास नक्कीच येईल.

प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com

संकलन : प्रसाद हावळे