अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- नारायण बापूजी कानिटकर!

मागील लेखात आपण वामन दाजी ओक यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’नंतरचा, म्हणजेच १८७४ नंतरचा काळ हा ओक यांच्या लेखनाच्या बहराचा होता. याच काळात ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील नाटय़लेखनाने नारायण बापूजी कानिटकर हे नाव चर्चेत आले होते. १८७५ साली प्रकाशित झालेले ‘मल्हारराव गायकवाड यांचे नाटक’ हे कानिटकरांचे पहिले नाटक. त्यातील हा एक प्रसंग –

Joseph Mengele nazis Doctor The Disappearance of Josef Mengele
चारचौघांतला ‘क्रूरकर्मा’!
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
riche class Nariman Point Air India Economy Tata Group
नवश्रीमंत वर्गाचा नवा मंत्र!
holi temprature rise
होळी पौर्णिमेपर्यंत तापमान ४० अंशावर जाणार? तापमानवाढीचा वेग दुप्पट, तज्ज्ञही झाले अवाक!

‘‘(मल्हारराव मद्रासेस जाण्यासाठी गाडींतून निघतात त्यावेळचा नाटकाचा अखेरचा प्रसंग.)

लोक : (सरकारास लवून मुजरे करितात; व डोळ्यांतून पाणी काढितात.)

आबाशास्त्री : गेलें हो गेलें, बडोद्याचें जीवित्व गेलें! आतां दुसरें कसेंही झालें तरी पूर्वीचे दिवस खचित येणार नाहींत. आज एक आमच्यासारख्यांचा अन्नदाता नाहींसा झाला.

श्रीधरभट : सरकार निघालेच ना. शेवटीं बडोद्यांतील धर्मराजा बडोदें सोडून चालला ना! शिव शिव! प्रभु म्हणजे केवळ धर्ममूर्ति होती. कोणीही जावो, त्याची आपली संभावना उत्तम प्रकारची व्हावयाचीच. अहो, काय बडोद्याचें नांव ऐकून काशीरामेश्वरापासून भिक्षुक धांवत येत होते. पुष्कळ राजे पाहिले; पण ब्राह्मणांचा समाचार घेणारा असा प्रभु पाहिला नव्हता!

दीपचंद : गेली पहा, ती गाडी गेली, दूरवर गेली, आतां तर दिसेनाशी झाली. देवा! कठीण दिवस आले आतां! महाराज तर गेले. काय बरें ह्य़ांचे कारकीर्दीत आबादानी असे! इतके दिवस सुखाने काढले.

जनकोजी : सरकार महाराज! गेलतना शेवटीं आमास्नी सोडून! राजा पण राजा होता, भारीच भोळा स्वभाव. बामणांच्या पायगुणांनीं हा प्रसंग आला. तरी आम्ही मराठे गडी सांगत होतों. पण महाराजांस आमचें म्हणणें गोड नाहीं लागलें. आणि आज आमास्नीहि टाकून गेले. (रडतो).

कृष्णाजीपंत : चला, आतां काय, येथें जरी सहस्र वर्षे उभे राहिलों तरी गाडी पुन: परत येणार आहे काय, व पुन: महाराज भेटणार आहेत काय? नव्हतें ह्य़ा राजाच्या प्रारब्धीं सुखानें राज्य करण्याचें! आतां पुढें कसेंहि होवो, पण ही घडी पुन: बसणें नाहीं. ह्य़ा देशीं कायतें मोठें असें हिंदूंचें राज्य हेंच, त्याचाहि हा प्रकार! प्रारब्ध!! चला आतां!!! (सर्व दु:खानें जातात.)’’

मल्हारराव हे बडोद्याच्या गादीचे उत्तराधिकारी. मात्र मल्हाररावांनी संस्थानची संपत्ती खर्चून सोन्याच्या तोफा बनवल्या. यात संस्थानचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. मल्हाररावांची ही चूक लपवण्यासाठी बडोद्याचे रेसिडेंट कर्नर फेयर यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. अशा घातकी वर्तनामुळे लॉर्ड सॅलीस्बरी यांनी १८७५ मध्ये त्यांना पदमुक्त केले. या पाश्र्वभूमीवर कानिटकरांनी हे नाटक रचले.

या काळात कानिटकर वकील म्हणून प्रसिद्ध झाले होते. चिंचवड संस्थानचे विश्वस्त म्हणून ते काम पाहात होते. ते करत असतानाच पुढील काळात त्यांनी भरीव नाटय़लेखनही केले. त्यांची तब्बल तेरा नाटके प्रसिद्ध झाली. ‘मल्हारराव..’नंतर ‘शशिकला आणि रत्नपाल’ (१८८२) हे ‘रोमिओ ज्युलिएट’वर व ‘प्रतापराव चंद्रानना’ (१८८३) हे ‘केनिलवर्थ’ या कादंबरीवर आधारित नाटक  त्यांनी लिहिले. पुढे १८८६ साली लिहिलेले ‘तरुणीशिक्षण नाटिका’ हे नाटक विशेष गाजले. स्त्रीशिक्षण व स्त्रियांची उन्नती या प्रश्नावर तेव्हा सनातनी व सुधारक असे दोन गट पडले होते. कानिटकर हे या दोन भूमिकांचा सुवर्णमध्य साधणारे होते. तेच त्यांनी या नाटकांत केले आहे. त्यातील हा काही भाग –

‘‘रंगू : तुमच्या लेक् चरांचा कंटाळा आला बाई! एका शब्दावर किती तरी तुमचं बोलणं निघतं! पण काय हो चिमाबाई, पूर्वी बायका खऱ्याच काहो इतक्या स्वतंत्र होत्या?

चिमणी : रंगूबाई, तुम्ही विचारतां मात्र, पण त्याचं उत्तर मी देऊं लागलें म्हणजे म्हणतां लेक् चर देतें. बायका स्वतंत्र होत्या यांत काय संशय? हे चावटपणे पुढें निघाले! हं:! बायकोनं नवऱ्याशीं दुसऱ्यादेखत बोलूं नये, नवऱ्याच्या शेजारीं जेवायला बसूं नये, एका सांदींकोपऱ्यांत सदा उभं असावं, काबाडकष्ट करावे; आणखी नवरोजींचा मात्र सदा टिकोजीपणा! अशी बायकांची स्थिति असून, पुन्हां पुरुषांचं आपलं त्यांच्याविषयीं, त्या साहसी, कपटी, मायावी, बेभरंवशांच्या, आणखी धर्माचा नाश करायला देवानं उत्पन्न केल्या आहेत असं म्हणणं आहेच! अहो, पूर्वी स्त्रियांना केवढा मान होता म्हणतां? प्रत्यक्ष रामचंद्राचीच गोष्ट घ्याना. त्यानं आपल्या सगळ्या भावांदेखत, हनुमानादेखत, फार तर काय? प्रत्यक्ष गुरु वाल्मिकीदेखत कीं हो आपल्या लाडक्या सीताबाईला आपल्या मांडीवर घेऊन तिच्या गळ्यांत हात घालावा!

ठकू : भिंतीवर काढलेल्या रामचंद्राच्या चित्राची ही गोष्ट. ग्रंथांतरी रामचंद्र सर्वादेखत सीतेच्या गळ्यांत हात घालून बसत होते असं कुठें असेल तर निराळी गोष्ट. मला वाटतं असं कांहीं कुठें आढळणार नाहीं.

रंगू : ही ठकू कांहीं तरी बोलते झाले. मोठी आली आहे पुरुषांची तरफदारी करायला! चिमणे, म्हण तो श्लोक, ऐकूं दे तर खरा.

चिमणी : कोणता बरं तो श्लोक? आठवितें अं, (डोक्याला हात लाविते) हं आठवला – यस्यां यक्षा: -(मेघदूतांतला श्लोक) आहाहा! काय मौज आहे?

रंगू : बाई, तुला त्याचा अर्थ समजतो म्हणून तुला मौज. आम्हांला दगडाबाईंना काय त्याचं!

चिमणी : कालिदासाच्या मेघदूत काव्यांत यक्षानें मेघाला आपल्या अलकानगरीची खूण पटण्याकरितां पुष्कळ खाणाखुणा सांगून वर्णन केलं आहे. त्यांतलाच हा श्लोक आहे. यक्ष म्हणतो, ‘‘मेघा, ज्या नगरीमध्यें यक्ष हे रूपयौवनसंपन्न स्त्रियांसहवर्तमान स्फटिकाच्या आणि म्हणूनच नक्षत्राच्या प्रतिबिंबरूप फुलांनी बांधल्यासारखे वाटणाऱ्या वाडय़ांत येऊन, तुझ्या गंभीर शब्दासारखा ज्यांचा शब्द आहे अशा पुष्कराचं म्हणजे जलतरंगाचं मंद वाजविणं होत असतां कल्पवृक्षापासून उत्पन्न झालेलं, आणखी विषयोपभोग हेंच ज्याचं मुख्य फळ असें मद्य पितात!’’ असा या श्लोकाचा अर्थ आहे. रंगूबाई, अशा प्रकारची प्राचीन काळीं गंमत असे बरं.

रंगू : अग बाई! जलतरंगाचं वाजविणें म्हणजे? स्त्री-पुरुष एके ठिकाणीं असतां गाणंबजावणं होत असे?

चिमणी : अहो रंगूबाई, गाणंबजावणंचसं काय? कालिदासाच्या तोंडच्या श्लोकांतून काढावं तेवढं थोडं!

रंगू : आहाहा! धन्य ते पुरुष आणखी धन्य त्या स्त्रिया! नाहीं तर आम्ही पहा! काय आमचं सौख्य?’’

या नाटकानंतर १८९२ साली त्यांची दोन नाटके प्रसिद्ध झाली. एक होते – ‘बाजीराव मस्तानी’, तर दुसरे ‘संमति कायद्याचें नाटक’. यातील संमतिवयाच्या कायद्यावर आधारित नाटकाने तेव्हा फारच खळबळ उडवून दिली. या नाटकातून कानिटकरांनी सुधारक गटावर उपहासपूर्ण लिहिले होते. त्यावर, कानिटकरांचा वाडा पुण्यातील पुष्करणी हौदाजवळ होता, त्याचाच आधार घेऊन सुधारक मंडळींनी ‘पुष्करणी शेक्सपीयर’ असे कानिटकरांचे नामविडंबन केले होते.

पुढे १८९४ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘बाजी देशपांडे’ हे कानिटकरांचे नाटक त्यांच्या नाटय़लेखन शैलीचा प्रत्यय देणारे आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत त्यांनी ऐतिहासिक नाटक लिहिण्यामागची आपली भूमिका सांगितली आहे –

‘‘महाराष्ट्र भाषेंत इतिहासप्रसिद्ध मोठमोठय़ा राजांची, मुत्सद्दय़ांचीं व वीरांची चरित्रें अलीकडे प्रसिद्ध होऊं लागलीं आहेत ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्याप्रमाणें महाराष्ट्र इतिहासांतील ह्रदयंगम भागांवर संविधानकें रचून त्यांचीं ऐतिहासिक नाटकें बनून त्यांचे प्रयोग रंगभूमीवर होतील तर त्यांपासून भावी पिढीला एक प्रकारचें वळण लाविल्याचें श्रेय येणार आहे. शृंगारिक संगीत नाटकांचा वीट येऊन नीतिवर्धक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकग्रंथ निर्माण होऊन त्यांचे प्रयोग रंगभूमीवर होऊं लागले तर त्यांपासून समाजास मोठा फायदा होणार आहे.’’

या नाटकातील सुरुवातीचा हा प्रसंग पाहा –

‘‘तुळाजी – ये चांगू, येसा. आज कुस्ती व्हऊ द्या.

चांगोजी – तुमी बसा राव कुस्त्या पगात. आपल द्येसपांड आल ना राव गडाकून.

येसाजी – लयी गमती सांगत्यात तकुडल्या.

हरजी – आपल्या पांढरीतल गडी ग्येल व्हत, त्याणी लयी गंमात क्येली. न्वोडग अक्षी च्वापचोपू काढल अन् काय?

तुळाजी – तस व्हनार बगा. चला किर समद आपन जाऊ की.

चांगूजी – त्ये वखत चांगल द्येसपांड चला ह्मनत व्हत त्येव्हा घातलत समद्यानी श्येपूट! थुत्तिच्याभन! तुमाला ह्य़े गाव कदीबी सुटायच न्हायी.

येसाजी – अक्षी घरधनीनीप बसाया व्हाव. तिनबी कांदाभाकूर रानामंदी आणली की राव खुलल.

हरजी – त्ये बगा द्येसपांड आल. रामजी पाटील बी आल. आता काय गमती गमती सागंत्याल तकुडच्या.

(रामजी पाटील व देशपांडे येतात. मंडळी मुजरे करतात.)

रामजी – बसा, समदे बसा. तव्हा द्येसपांड, अक्षी भार झाली ह्मनताना? आपल्या मऱ्हाटय़ानी अगदी शिकस्त क्येली अं?

देशपांडे – पाटील, तें कांहीं विचारूं नका. त्या मुसंडय़ांना रानोमाळ पळतां पळतां पुरेवाट झाली. सगळे त्यांचे लोक अगदीं गारद झाले.

पाटील – धन हाय ह्माराजांची. द्येवच अवतरला ह्मनायचा; दुसर काय? पण कायव्ह द्येसपांड, तुमी आमाला या पांढरीच पुर वतनदारच करून ठय़ेवल ह्मनाना. आमच्या परलब्दी न्हायीच ह्मनायचीना त्या परभूच्या पायाची चाकरी घडायची? तुह्माला अस वाटत राव, कीं आमी पाटील मंजी काय? आता झालो ह्मातार, तव्हा आमच्या पून काय व्हनार! पुन राव, ह्य़े अक्षी समजून ऱ्हा की, ह्य़े आमच पांढर क्यास झाल हायती तरीबी इच्याभन, हा रामजी पाटील पनासाना भारी हाय!

बाजी – पाटील, तुह्मासारखी शिवराजांची चाकरी दुसरं कोण करणार आहे? तुह्मी या प्रांतांतून शेकडों मावळेगडी जमा करून पाठवितां हें काय थोडं आहे? शिवराज तुमची नेहमी आठवण करितात. आज त्यांनीं मुद्दाम जासूद पाठविला आहे. त्यानें महाराजांकडला निरोप आणला आहे. हजार मावळे बहाद्दरांची भरती करून पाठवायची आहे.

रामजी – आमची समजूत तर अक्षी ब्येस करता द्येसपांड! या ख्येपला हा रामजी सवता ह्माराजांच्या पायाप जाणार. कायर गडेव्ह, हायना तयारी निधन्याची?

तुळाजी – आमा समद्यांची योका पायावर तयारी हाय.’’

कानिटकरांची नाटके म्हणजे त्या काळातील एका सामाजिक विचारप्रवाहाचा कलात्मक आविष्कार होता. तो विचारप्रवाह जाणून घेण्यासाठी ही नाटके वाचायलाच हवीत.

संकलन : प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com