अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे कळावे आणि आपण आज या वळणाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, याबद्दलचे प्रश्न सुजाण वाचकांना पडावेत याकरता हे सदर. यावेळचे मानकरी आहेत-  सदाशिव काशिनाथ ऊर्फ बापू छत्रे!

गेल्या आठवडय़ात बाळशास्त्री जांभेकरांच्या लेखनाचा नमुना आपण पाहिला. ते पुढे ज्या हैंद शाळा शाळापुस्तक मंडळी या त्यावेळी देशी भाषांमधून पुस्तके करवून घेणाऱ्या संस्थेच्या डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी या पदावर आले, तिथे आधी सदाशिव काशिनाथ ऊर्फ बापू छत्रे हे काम पाहत होते. त्यांनी जॉर्ज जाव्‍‌र्हिस या इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीने अनेक पुस्तके लिहिली. ती मुख्यत: भाषांतरित आणि बालवाङ्मयात मोडणारी होती. परंतु त्यांत तेव्हाची मुंबई इलाख्याची भाषा, विशेषत:  कोंकणी शब्द आढळून येतात. त्यांचा जन्म मुंबईच्या वाळकेश्वरचा असल्यानेच कदाचित त्यांच्या लेखनात हे मुंबई वळण दिसून येते. बापू छत्र्यांच्या अशा ग्रंथांपैकी एक म्हणजे ‘बाळमित्र’ हे पुस्तक. त्याच्या प्रस्तावनेतील हा अंश पाहा..

Prakash Awade, dhairyasheel mane,
कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?

‘‘जे मुलांच्या शिक्षारूप ग्रंथांविषयी परिश्रम करितात, त्यांस यद्यपि इतर ग्रंथकर्त्यांसारिख्या कीर्तीचा लाभ होत नाहीं, तथापि वास्तविक पहातां असें वाटतें कीं, असल्या कवींचे ग्रंथ मोठमोठय़ा काव्यांहून अधिक उपयोगी व अधिक उपकारक आहेत. लहान मुलांस मर्यादा व सद्गुण लावणें; त्यांस कुमार्गापासून उद्योग करणें महापंडितांसही योग्य होय. अल्पमति आहेत ते मुलांची प्रवृतिनिवृत्ती, त्यांचें खेळणें, रुसणें, त्यांचे हर्षविषाद इत्यादी गोष्टी आपल्या मनास आणायास योग्य नाहींत ह्मणून ह्मणोत; परंतु ज्यांची लोकहितावर दृष्टी आहे; जे दीर्घदृष्टीनें जाणतात कीं, एका मनुष्याच्या सत्कर्मदुष्कर्मानें सगळ्या सृष्टीचा फेरफार होत असतो, ते मुलांच्या ठायींही सद्गुणदुर्गुण पाहून त्यांच्या विचारांविषयीं अनास्था करीत नाहींत. शरीर तर सर्वाचें तेवढेंच, पण त्यांतल्या रहाणारांची योग्यता भिन्नभिन्न आहे; ती बहुतकरून लहानपणापासून बऱ्यावाईट शिक्षेप्रमाणें परिणामास पावते; ह्मणून मनुष्यांचें भावी स्वरूप उत्तम शिक्षेवर आहे. ह्य़ासाठीं जो मनुष्य मुलांच्या शिक्षेकडे आपल्या गुणांचा व्यय करितो, त्याचा परिश्रम किती स्तुत्य ह्मणावा!.. ह्य़ा ग्रंथकर्त्यांनें दोन गोष्टी मनांत आणून हा ग्रंथ केला आहे; एक तर मुलांचे रंजन; आणि दुसरें, त्यांस सद्गुण सहज लागावे. एथें त्यांची भाषा, त्यांचे खेळ, त्यांचे उद्योग व त्यांचीं अपेक्षितें हीं सांगितल्यामुळें त्यांस वाचतां वाचतां आवड उत्पन्न होऊन इकडे त्यांस न कळत सहज चांगले गुण लागावे, ह्मणून ह्यास ‘बाळमित्र’ हें नाव दिलें आहे..’’

छत्र्यांचे हे ‘बाळमित्र’ १८२८ मध्ये प्रकाशित झाले आहे. तेव्हा ते बरेच लोकप्रियही झाले होते. मूळ फ्रेंच भाषेतील बक्र्विन या लेखकाच्या ‘चिल्ड्रेन्स फ्रेंड’ या पुस्तकाचे हे भाषांतर. मूळ पुस्तकाच्या इंग्रजी रूपांतरावरून छत्र्यांनी ते मराठीत आणले. मराठी भाषेची फ्रेंच व इंग्रजी या भाषांशी तुलना करताना ते लिहितात-

‘‘फ्रेंच व इंग्रेजी भाषा ह्य़ांचा विचार करितां, ह्य़ा भाषा आज शेंकडों वर्षे सुधारत आल्या आहेत, त्यांत सर्व विषयांवर ग्रंथ आहेत आणि त्यांत मनांतील सर्व अभिप्राय शब्देंकरून व्यक्त करितां येतात. ह्य़ा भाषा महान महान बुद्धीमानांना परिचित आहेत; तर असल्या भाषांत जो रस आला आहे, तो रस मराठी भाषेंत कसा येईल? ह्य़ा भाषेंत (म्हणजे मराठीत) आज दिवसपर्यंत व्याकरण आणि कोश हे कोणीं केलेच नाहींत व विद्वान लोकांचे चित्त कधीं रमलेंच नाही. ह्य़ा भाषेंत शब्दसंग्रह थोडा असून भाषणांची शैलीही प्रौढ नाहीं..’’

येथे दिलेला प्रस्तावनेचा अंश हा ‘बाळमित्र भाग-१’च्या १८८८ साली आलेल्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीतील आहे. त्यात भाषेच्या अंगाने काही बदल  करण्यात आले होते. या मधल्या काळात भाषेत कोणते बदल झाले हे दाखवून देणारी ‘बाळमित्र’च्या  १८२८ सालच्या मूळ पहिल्या आवृत्तीतील ‘मुलें जीं स्वतंत्र व्हावयास इच्छित होतीं’ या गोष्टीची ही सुरुवात पाहा-

‘‘कामू- आहा बाबा! मला वाटतें कीं, मी मोठा असतों तर बरें होतें! मोठा तुझे इतका.

आबाजी- माझे लाडक्या, तुला असें कां वाटतें?

कामू- एवढय़ासाठीं कीं, मग मला कोणाचे आज्ञेंत रहाणें नलगे. माझे मनास येईल तें करीन.

आबाजी- मला वाटतें कीं, मग तूं मोठे चमत्कार करिशील.

कामू- यांत काय संशय? तसें झाल्यास दाखविलें असतें.

आबाजी- आणि जाई, तुला पण स्वतंत्र व्हावेंसें वाटतें गे?

जाई- होय बाबा, मलाही तसेंच वाटतें.

कामू- आहा! जर आम्ही दोघें स्वतंत्र झालों, तर मग काय पाहिजे?

आबाजी- बरें तर मुलांनो, हें तुमचें कोड मी पुरवीन. उद्यां सकाळपासून तुम्हांस मोकळीक देतों कीं, जें तुमचे मनास येईल तें करा.

कामू- बाबा, तूं थट्टा करितोस.

आबाजी- नाहीं, मी खरेंच म्हणतों. उद्या तुमची आई, मी किंवा दुसरीं कोणी घरांतील मनुष्यें तुम्हांस काहीं आडकाठी करणार नाहींत.

कामू- आहाहा! तसीं झालों असतां आम्ही किती सुखी होऊं!

आबाजी- मुलांनो, तितकेंच नव्हे, मी तीं मोकळीक उद्यांचेच दिवसापुरती देतों असें नाहीं; तर जंवपर्यंत तुम्ही होऊन माझे पाठीस लागाल कीं नको बाबा, आतां तुझा अधिकार तूं फिरून घे, तंवपर्यंत देईन.

कामू- आहा! असें झालें तर मग आम्हीं फार दिवस स्वछंद वागूं.

आबाजी- बरें तर, तुम्ही आपलीं आपणांस संभाळतीं झालींत हें पाहून मला संतोष वाटला; तर आतां उद्यांपासून तुम्ही मोठी मनुष्यें व्हायास सिद्ध व्हावें आणि मनास येईल तें करावें.’’

..या गोष्टीत पुढे काय काय होते ते ‘बाळमित्र’मधूनच वाचायला हवे!

संकलन : प्रसाद हावळे

प्रसाद हावळे- prasad.havale@expressindia.com