अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळच्या मानकरी आहेत- ताराबाई शिंदे!

‘मराठी वळण’ या सदरात आपण आधुनिक मराठी गद्याचा प्रवास कसा झाला, हे जाणून घेत आहोत. या काळात उत्क्रांत होत असलेल्या मराठी गद्याला इंग्रजी शिक्षणामुळे सुरू झालेल्या आधुनिकतेच्या प्रक्रियेचा स्पर्श झाला आहे. ही आधुनिकता ज्यांच्या लिखाणातून प्रखरपणे अधोरेखित झाली, अशांमध्ये ताराबाई शिंदे हे प्रमुख नाव. १८८२ साली त्यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्त्रीजातीचे दु:ख, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा व त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे, अशी मांडणी ताराबाईंनी या पुस्तकात केली आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग-

bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

‘‘ज्या परमेश्वरानें ही आश्चर्यकारक सृष्टि उत्पन्न केली, त्यानेंच स्त्रीपुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगीं वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगीं आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहींत हे अगदीं स्पष्ट करून दाखवावें याच हेतूनें हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहें. यांत अमुकच जाती किंवा कुळ याकडे माझें मुळींच लक्ष नाहीं. स्त्रीपुरुषाची तुलना आहें..

तरी मी निरंतर मऱ्हाठमोळ्याचे अटकेंतली गृहबंदीशाळेंतील मतिहीन अबला असून हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळें या निबंधांत असंगत व तुटक मजकूर अगदीं मऱ्हाठशाई जाडी भरडी व अतिशय कडक भाषा असते, पण रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजींचे नित्य नवीं भयंकर उदाहरणें दिसून येत असतांही तिकडे कोणीच लक्ष न देतां स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणीं लादतात, हें पाहून स्त्रीजात्याभिमानानें माझें मन अगदीं खळबळून तळतळून गेलें त्यामुळें मला निर्भीड होऊन असेंच खडखडीत लिहिल्यावांचून रहावेना.’’

ताराबाईंचे पुस्तक येण्याच्या आधी मराठीत मिसेस फरार यांची काही पुस्तके व मुक्ताबाई साळवे यांचा निबंध प्रसिद्ध झाला होता. या लेखनाने मराठीत स्त्रियांच्या वैचारिक गद्यलेखनाची सुरुवात झाली होती. यातील मिसेस फरार यांचे लेखन हे मुख्यत्वे १८३५ ते १८४० यांच्या दरम्यानचे आहे. तर मुक्ताबाईंचा निबंध हा १८५५ साली ‘ज्ञानोदय’मधून प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर ताराबाईंचे पुस्तक प्रसिद्ध झाले. हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा ठरली ती ‘विजयालक्ष्मी केस.’ सुरत येथील विजयालक्ष्मी या ब्राह्मण कुटुंबातील तरुण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला. त्याबद्दल सुरत न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्यावर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. या खटल्याला तेव्हा प्रचंड प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्रांतून त्याविषयी अनुकूल-प्रतिकूल मते व्यक्त होत होती. त्यातून स्त्रीजातीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत होता. हा खटला आणि त्या अनुषंगाने ‘पुणेवैभव’सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीवर उडवलेली टीकेची झोड यांमुळे ताराबाई अस्वस्थ झाल्या, आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी रोखठोक शब्दांत स्त्रियांची कैफियत मांडली आहे. पुस्तकातील हा उतारा पाहा –

‘‘अरे, जी तुह्मावर प्राणापेक्षां अधिक प्रीति करिते, तुमची आई देखील तुह्मांस लहानपणीं जपली नसेल तितकी ही आतां ऐन बाणीच्या वेळेस तुमच्या जिवास जपते; तुमच्या आज्ञेंत केवळ बिजली प्रमाणें लवते; या संसारांत नानातऱ्हांनीं तुमच्या अब्रूस कोणत्याही प्रकारें धक्का न बसावा ह्मणून जपते; जेव्हा पहावी तेव्हां सेवेंत हजर; दु:खासुखाचे वेळीं अमृताचे वल्लीप्रमाणें सदां सर्वदां सर्व सोसून निरंतर गोडच; सारांश तुह्माला जिकडून सुख होईल तें करण्यास सर्वदां तयार अशी जी ही तिला तुह्मी नानाप्रकारचे दोष देऊन या पृथ्वीतलाचे तळीं घालूं पहाता याची तुह्मांस कांहींच लाज वाटत नाहीं कारे? अरे, मूर्खानो स्त्रिया जातिनिशीं लाजाळू, नाजूक व उपजत मूर्ख. तुह्मी काय महाराज मोठे उपजत शौर्यवान, धैर्यवान, पैलवान, व्युत्पन्न, तेव्हां मातेच्या सुवर्णकुचकमंडलूंतले अमृतास ओंठ देखील लाविला नाहींच तें तुह्मी सर्व या अबलांस दिलें. कारण आपण सबल पडलांत तेव्हां हें असें करणें आपणांस कसें बरें साजेल? ह्मणून ही स्त्रीजाति अगदीं निर्बल, मूर्ख, साहसी, अविचारी; अशीं नानाप्रकारचीं निंद्य विशेषणें देऊन एकदांच त्यांच्या नांवाचा डंका ठोकलांत. त्यांना निरंतर बंदीवानासारिखे गृहतुरुंगांत कैदी करून ठेविलेत, व जिथें तिथें चढती कमान करून राव बनलेत. यामुळें तुह्मांला वाटतें कीं, बायको ह्मणजे काय? अरे, ‘ज्याचे हातीं ससा तो पारधी’ बाकी सारे गैदी समजलात. लहानपणापासून आपले हातीं सारी सिक्का आनीन ठेवून स्त्री जातीला अगदीं अंधरा कोठडींत या जगापासून दूर पडद्यांत जरबेंत निरंतर बटकीसारखी ताबेदारींत ठेवून जेथें तेथें तुह्मीं आपलेच गुणांचे दिवे पाजळलेत. त्यांना न विद्या, न कोठें जाणें न येणें. गेल्या तरी तेथें त्यांच्यासारिख्याच सर्व अज्ञान. एकीसारखी दुसरी. मग जास्त ज्ञान व शहाणपण त्यांना कोठून येणार?’’

या पुस्तकात ताराबाईंनी तीन विषयांची मांडणी केली आहे : १) विधवा पुनर्विवाहाला असलेल्या बंदीमुळे स्त्रियांची होणारी कुचंबणा, २) विवाहित स्त्रीचे शोषण, आणि ३) पुरुषांमधील दुर्गुण. हे करताना त्यांनी ‘मुक्तमाला’(१८६१), ‘मंजुघोषा’(१८६७) या कादंबऱ्या, ‘मनोरमा’(१८७१) हे नाटक व ‘स्त्रचरित्र’ हा कथासंग्रह यांसारख्या पुस्तकांतून करण्यात आलेल्या स्त्रीचित्रणाचाही रोखठोक समाचार घेतला. ‘मंजुघोषा’ कादंबरीत लेखक नारो सदाशिव रिसबूड यांनी भर्तृहरीच्या शृंगारशतकातील श्लोक देऊन स्त्रियांमधील दुर्गुण वर्णन केले होते. याच श्लोकातील शब्दप्रयोग वापरत ताराबाईंनी हे दुर्गुण खरे तर पुरुषांमध्येच अधिक आहेत, हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. त्यातील हा काही भाग-

‘‘प्रथम स्त्रीरूप यंत्रामध्यें जारण मारणापेक्षा बलिष्टता आहे तर तिजपेक्षां बुद्धीच्या मानानें तुम्ही जास्त बलिष्ट आहा. तुमच्या बुद्धिबळानें तुम्ही काय एक केलें नाहीं बरें? जें अघटित तें करून दाखविलें. तुम्ही जे महापराक्रम केले तेथे स्त्रीजातीची बलिष्ठता किती? कांहींच नाहीं. दुसरें स्त्रिया अनेक संशयाचा परिभ्रम भोंवरा हें खरें! कारण त्या अशिक्षित असल्यामुळें हरएक प्रकारचे संशय त्यांचे मनांत वास करितात. तरी त्यांच्या मनांतला संशय फक्त त्यांच्या संबंधापुरतांच असतो. पण तुमच्या मनांतले संशयाचें चक्र जर पाहूं गेलें तर त्यावर नजरसुद्धां ठरणार नाहीं. तुमचीं मनें नानाप्रकारचीं, देशी व परदेशी मानसिक व व्यावहारिक दगाबाजीनें अगदीं संभ्रमित असतात.. अशा प्रकारचे संशय स्त्रियांचे मनांत कधींच येणार नाहींत. तरी या जगांतील सर्व स्त्रिया प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे सतेज, अंतर्बाह्य़ गंगाजलाप्रमाणें निर्मळ आहेत असें मुळींच नाहीं. पण सर्व पृथ्वींतील स्त्रिया गोळा केल्या तर तुमच्यासारख्या संशयाचे भोंवऱ्यांत सांपडलेल्या शेकडा दहा सांपडतील. पण तुमच्यांत एक देखील या भोवऱ्यानें वेगळा सांपडणार नाहीं..

तिसरें, स्त्रिया उद्धततेचें केवळ गृहच. यांत आपली जाति काय कमी आहे. वजन करूं गेलें असतां शंभर दीडशें तोळे पारडें खालीच जाईल. चौथें, स्त्रिया अविचारकर्माचें नगरच. तर स्त्रियांचेच हातून अविचार घडतात? आणि तुम्ही पाजी, बेईमान, भरवंसा देऊन केसांनीं गळा कापणारे जे तुम्ही त्या तुमच्या हातून कधींच अविचार होत नाहीं? तुम्ही अगदीं विचारमंदिरें. अहारे शाबास! अरे, तुम्ही महापढीक शहाणें व विचारी असून तुमचे हातून नभूतोनभविष्यति, असे अविचार घडून व रोज घडत असतांही तुम्ही मोठे विचारी ह्मणवितां याला काय ह्मणावे? .. पांचवें, सकलदोषांचे निधान. सकलदोषांचें निधान प्रथम तुम्ही. तुम्हींच स्त्रियांना दोषपात्र होण्यास कारणभूत होता.. सहावें, शतश: कापटय़ांनीं व्यापलेले कोण बरें. अरे, कपटांत तर पहिला नंबर तुमचा. तुमचे कपट किती वर्णावें, पावलोपावलीं प्रत्यय येतो. सातवें, दुर्गुणांचें उत्पत्तिस्थान; तर दुर्गुणांची उत्पत्ति आधीं आपलेपासूनच झाली. प्रथम स्वधर्म सोडून मनमानेल तसें वर्तन करणें, दारू पिऊन रस्त्यांत लोळणें, पोऱ्यांचे तमाशे पाहात फिरणें, जुवा खेळणे, गांजा वगैरे ओढणें, रांडाठेवणें, इत्यादि वाईट व घाणेरडी आचरणें तुह्मी करूं लागला.. हे तुह्मी आपल्यावरून पहा. आपल्यासारखे, सारें जगत्रय आहे असें ज्याचें त्याचें मनावरून त्याला वाटतें. चोराच्या नजरेंत सारेच चोर. लबाडाला लबाड, शिंदळास सारेस शिंदळ दिसतात. याच्या उलट जे परोपकारी, धर्मशील, सत्यवादी, दयाळू, निष्कपटी, क्षमाशील आहेत त्यांना तसेंच दिसतें..

आठवे, स्वर्ग मार्गाचा नाश करणारें यमनगरीचें द्वारच, अशीं ज्यांना तुम्ही संबोधनें देता त्या स्त्रिया कोण बरें? तुम्हीं जन्म कोणाच्या पोटीं घेतलात.. तुह्मांला प्राणापेक्षां कोण जपलें, त्या तुमच्या आयाचना? ज्या तुमच्या कल्याणाकडे वारंवार पहातात, ज्यांना तुमचें मोठें भूषण वाटतें, व निरंतर तुह्माला भाऊ, दादा अशा मोठय़ा प्रेमानें हाका मारतात, त्या कोण तुमच्या बहिणाना? ज्या तुमच्या सुखादु:खाच्या वाटेकरणी, तुमच्या या संसारदरबारांतल्या मुख्य प्रधान, तुमच्यावर मनोभावापासून प्रीति करणारणी, त्या तुमच्या बायकाना? त्याही तरी स्त्रियाच आहेत ना?.. नववे, सर्व कपट लिलायुक्त पात्र, तुम्ही कपटयुक्त लिला पात्रें नाहींत का? अरे गृहस्थानो, तुमच्यासारखीं कपटपात्रें तर या पृथ्वीतलांत सांपडणार नाहींत. स्त्री तुम्हावर प्राणापेक्षां प्रीति करतेच यांत आंदेशा नकोच. कारण स्त्रियेचें मन एकदा एके ठिकाणीं बसलें ह्मणजे तो वज्रलेप. अरे, तुह्मी भ्रमर, या फुलावरून त्या फुलावर उडत फिराल. पण स्त्रीजाति तशी नाहीं हें आजमावून पहा.’’

हे पुस्तक प्रसिद्ध झाले खरे; मात्र त्याला तेव्हा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्या पातळीवर या क्रांतदर्शी पुस्तकाची दखल घ्यायला हवी होती तशी ती घेतली गेली नाही. १९७५ मध्ये स. गं. मालशे यांनी ते संपादित करून प्रकाशित केले, तेव्हा खऱ्या अर्थाने ते चर्चेत आले. पुढे १९९७ मध्ये विलास खोले यांनी संपादित केलेली ‘ताराबाई शिंदे-लिखित स्त्रीपुरुषतुलना’ या पुस्तकाची यथामूल संशोधित आवृत्ती प्रकाशित झाली. ती आपण आवर्जून वाचावी.

संकलन : प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com