िहगोली लोकसभा क्षेत्रातील अपंग लाभार्थीचे तपासणीचे शिबिर एप्रिल महिन्यात घेण्यात आले होते. त्यातील पात्र ३ हजार ५०९ लाभार्थ्यांना ३ कोटी ५० लाखांचे साहित्य २१ सप्टेंबर रोजी कळमनुरीत वाटप होणार असल्याची माहिती खासदार राजीव सातव यांनी दिली.
अपंग लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याबाबत खासदार सातव यांनी सांगितले की, कळमनुरी प्रियदर्शनी सेवासंस्था व सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय-दिल्ली व भारतीय कृत्रिम अंग निर्मिती मंडळ-कानपुर, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र- िहगोली यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ एप्रिल रोजी अपंगाच्या तपासणीचे शिबिर कळमनुरीत घेण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांपकी ज्यांना विविध उपकरणांची आवश्यकता आहे, अशा ३ हजार ५०९ लाभार्थ्यांना २१ सप्टेंबर रोजी कळमनुरीत साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
अपंगांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये स्वयंचलित तीन चाकी सायकल-३, तीन चाकी एकहाती सायकल-७५, तीनचाकी दोनहाती सायकल-३५८, कमोडयुक्त खुर्ची-८, चाकाची खुर्ची-मोठी २५२, चाकाची खुर्ची-१५७, तीनचाकी सायकल लहान मुलांकरिता-५३, कुबडय़ा-८२६, अंधांसाठी डिजिटल काठय़ा ४४९, घडीच्या व साध्या अंधाराच्या काठय़ा ७४, अंधांची पाटी ४ नग, ब्रेलकिट ३४०, श्रवणयंत्र १५९८, एमआरआय किट ५४३ आदी सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांचे साहित्य २१ सप्टेंबर रोजीच्या आयोजित शिबिरात वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याकरिता प्रत्यक्ष लाभार्थीनी आपले ओळखपत्र आणि सद्भावना शिबिरात तपासणीप्रसंगी दिलेली फाईल घेऊन स्वत: साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शिबिराचे संयोजक खासदार राजीव सातव यांनी केले आहे.