गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, फेसबुक आणि आयबीएम या खरे तर ज्या व्यवसायात आहेत, त्यामध्ये प्रसंगी एकमेकांच्या स्पर्धक असलेल्या अशा जगातील बडय़ा कंपन्या गेल्या वर्षी एकत्र आल्या. खरे तर त्यांचे एकत्र येणे हीच जगातील सर्वात मोठी घटना होती. विषय होता आर्टििफशन इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. या विषयावरील संशोधन, त्याचे उपयोजन आणि त्या संदर्भातील नियमनाचे निर्णय घेणे आदी विषयांवरील कामासाठी या सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन काही अब्ज डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. प्रसंगी एकमेकांच्या विरोधात असलेल्या कंपन्यांनी एकत्र यावे, असे या विषयात आहे तरी काय, याचा विचार २०१७ या नव्या वर्षांत आपल्याला करावाच लागेल, अशी स्थिती आहे.

त्याच वेळेस कंपन्यांच्या पातळीवर त्यांचे काय सुरू आहे, याचाही आढावा घ्यायला हवा. डीपमाइंड टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही गुगलचीच कंपनी त्यांनीही गेल्या वर्षीपासून या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयामध्ये सर्वाधिक निधी संशोधनासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने जाहीर केले की, त्यांच्या आर्टिफिंशल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिसर्च ग्रुपमध्ये येणाऱ्या काळात तब्बल पाच हजार इंजिनीअर्स आणि संशोधक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावर संशोधन करतील. हे जाहीर करताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले की, मायक्रोसॉफ्टला स्वत:च्या व्यवसायात तर रस आहेच पण त्याच वेळेस हे मानवासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान सर्वानाच उपलब्ध व्हावे आणि त्याचा लाभही सर्वाना व्हावा, यासाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील असणार आहे. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण व्हायला हवे, असा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर ते म्हणाले की, यापुढे बाजारपेठेत येणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या प्रत्येक उत्पादनामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंश हा असणारच; तुम्ही मायक्रोसॉफ्टचे फोटो अ‍ॅप वापरा, स्काइप वापरा किंवा ‘ऑफिस ३६५.

खरे तर त्यांनी सांगण्याप्रू्वीच अनेक कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे अंश आपापल्या यंत्रणांमध्ये वापरण्यास केव्हाच सुरुवात केली आहे. इन्स्टाग्राम किंवा पिक्सआर्ट वापरताना तुमच्या आवडीचे फोटो तुमच्यासमोर येणे यामध्येही त्याचा अंश दडलेला असतो आणि गुगलमध्ये सर्च करताना तुमच्या उपयुक्ततेची वेबसाइट समोर येणारा अल्गोरिदम तयार करण्यामध्येही ही कृत्रिम बुद्धिमत्ताच वापरण्यात आलेली असते. फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माइक श्रोफर गेल्या वर्षअखेरीस म्हणाले की, इमेज रेकग्निशनच्या क्षेत्रात फेसबुक आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते आहे. सॅमसंग आणि अ‍ॅपलसारख्या मोबाइल कंपन्या सध्या जगभरातील भाषांचे नसíगक उच्चारण संगणकाला कळावे, यासाठी सर्वाधिक प्रयत्नशील आहेत. माणसाप्रमाणेच संगणकालाही भाषा कळावी, तिचे आकलन व्हावे असे त्यांना वाटते.

तसा एक प्रयत्न मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी ‘ताय’च्या निमित्ताने करूनही पाहिला मात्र तो प्रयोग वादग्रस्त ठरला आणि अवघ्या काही तासांमध्येच त्यांना माघार घ्यावी लागली. एखाद्या ट्वीटला माणसाप्रमाणेच ते समजून घेऊन रिप्लाय करेल असा हा प्रोग्राम त्यांनी तयार केला होता. तो माणसासारखाच वागेल, असे अपेक्षित होते. तो वागलाही तसाच, अर्थात त्याने अश्लील भाषा वापरण्यास, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि अखेरीस तो प्रयोग काही तासांतच बंद करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला.

या पाश्र्वभूमीवर या सर्व कंपन्या एकत्र आल्या आहेत, हे समजून घ्यावे लागेल. या नव्या विषयामध्ये असलेल्या संधी आणि आव्हाने सामान्यांना समजावून सांगायची आहेत, असे त्यांनी वरकरणी सांगितलेले असले, तरी या जगात मोफत कधीच काही नसते हे सामान्य माणसाने समजून घेणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील भविष्यातील संधी या कंपन्यांनी नेमक्या हेरलेल्या आहेत आणि त्या दिशेने माणसाला घेऊन जाण्यासाठी त्या एकत्र आल्या आहेत. यामागे साहजिकच त्यांच्या व्यवसायाची शाश्वती हे महत्त्वाचे कारण असले तरी त्यातील नियमनाचा भाग आपल्यासाठी सोपा होणार आहे. ‘ताय’ या प्रोग्रॅमच्या बाबतीत जसा मोठा वाद होऊन जगभरात गोंधळ उडाला तसा गोंधळ भविष्यात होणे या कंपन्यांना परवडणारे नसेल, त्यामुळेच या नव्या तंत्राच्या नियमनाबाबतचे काटेकोर नियमही करावे लागतील. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झालेले रोबो नंतर तुमचे-माझे दैनंदिन आणि कठीण कामही करणार आहेत. यंत्र आणि मानव एकमेकांसमोर उभे ठाकले की, अनेक प्रश्न निर्माण होतील, असे समाजशास्त्रज्ञांना वाटते कारण एखादा माणूस ज्या पद्धतीने विचार करतो, त्या पद्धतीने यंत्र किंवा रोबो विचार करणार नाहीत. त्यामुळेच ते सुकर होण्यासाठी या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या पार्टनरशिप ऑफ आर्टिफिंशल इंटेलिजन्स या संस्थेमध्ये प्रगत संशोधनासाठी संशोधक, विचारवंत, धोरणात्मक निर्णय घेणारे, भाषातज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे इंटरऑपरेटिबिलिटीचा मुद्दाही हाताळण्यात येईल. म्हणजेच विविध कंपन्यांनी आपापल्या पद्धतीने यंत्रणांचा विकास केला तर त्यात प्रमाणीकरण नसल्याने वापरकर्त्यांची संख्या मर्यादित राहू शकते. मात्र कंपन्यांच्या यंत्रणांमधील वापर, जोडणी सुकर असेल त्याचा फायदा सर्वच कंपन्यांचे ग्राहक वाढण्यात होणार आहे.

या पाश्र्वभूमीवर हे आधी समजून घ्यावे लागेल की, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय. यंत्रांना विविध प्रकारचे निर्णय स्वत:हून घेण्यासाठी हुशार करणे म्हणजेच ती क्षमता प्राप्त करून देणे किंवा अशी हुशारी प्राप्त करून देणे की, ज्यामुळे आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहून नेमके व अचूक निर्णय त्यांना मानवी मदतीशिवाय घेता येतील. आर्टिफिंशल इंटेलिजन्स हा शब्दप्रयोग सर्वप्रथम १९५५ साली अमेरिकन संशोधक डॉन मॅकार्थी याने केला. त्याने केलेली व्याख्या खूपच सोपी होती. यंत्रणांना हुशार बनविणारे विज्ञान आणि अभियांत्रिकी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. पण आजवरचा या क्षेत्राचा प्रवास हा अनेक टप्प्यांमधून गेला आहे. १९७० ते ८० या वीस वर्षांमध्ये या विषयाशी संबंधित अनेक संशोधन प्रकल्प बंद पडले. मात्र ९०च्या दशकात पुन्हा या विषयाला चांगले दिवस आले आणि मग त्यात गणित, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, मेंदूंमधील मज्जातंतूचे शास्त्र अशा अनेक शास्त्रशाखांची भर पडत हा विषय बहुआयामी झाला. दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय बाद होत आत त्याला भावभावना असलेली नसíगक बुद्धिमत्ता या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली आहे. खरे तर कृत्रिम ते नसíगक बुद्धिमत्ता अशी या विषयाला कलाटणी देणाऱ्या प्रयोगाला या वर्षी मोठय़ा प्रमाणावर सुरुवात होते आहे.

त्यातील पहिला टप्पा हा मानवी आवाज आणि भाषेचा असणार आहे. म्हणूनच जगभरातील प्रमुख कंपन्या या आवाजाची ओळख आणि भाषांची जाण संगणकाला किंवा यंत्राला प्राप्त करून देण्याच्या मागे लागल्या आहेत. आतापर्यंत बिटस् आणि बाइटस् हेच चलन होते आता तुमचा आवाज हेच भविष्यातील चलन असणार आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनपासून ते तुमच्या घरातील किंवा कार्यालयातील यंत्रणांपर्यंत सारे काही केवळ आवाजाच्या माध्यमातून नियंत्रित केले जाणार आहे. तुम्हाला हातपाय फारसे हलवावे लागणारच नाहीत.

कोणत्याही विषयांत इतरांपेक्षा अधिक माहिती असलेल्या आणि तुलनेने त्यांच्यापेक्षा कमी चुका करणाऱ्या व्यक्तीला आपण स्मार्ट म्हणतो. पण हाच स्मार्ट शब्दप्रयोग आपण मशीन्सच्या म्हणजेच यंत्रांच्या बाबतीत करतो, त्या वेळेस नेमके काय अपेक्षित असते? अलीकडे यंत्रांच्या बाबतीत कमीत कमी वेळेत सफाईदारपणे केलेली कामे हाही निकष त्यात जोडला जातो. मग माणसाला रोबोंपेक्षाही स्मार्ट व्हावे लागेल, असे काही संशोधकांना वाटते. या क्षेत्रात संधी आहेत तेवढीच आव्हानेही आहेत.. पण आता तेवढय़ावरच न थांबता यंत्रांनाही मानवी भावभावना आणि क्षमता प्राप्त करून देण्याच्या दिशेने विज्ञानाचा आणि पर्यायाने संशोधकांचा प्रवास सुरू आहे. हा प्रवास कृत्रिम नव्हे तर नसíगक बुद्धिमत्ता यंत्रांना प्राप्त करून देण्याचा असणार आहे. यात सारे काही शक्य आहे, असे जगभरातील संशोधकांना वाटते आहे एक गोष्ट वगळता; ती म्हणजे माणसाला माणूस बनवणारी मानवतेची सनातन मानवी मूल्ये! ती कशी आणणार या यक्षप्रश्नाला मात्र अद्याप उत्तर सापडलेले नाही!

vinayak-signature

vinayakparab
vinayak.parab@expressindia.com