एक काळ होता, साधारण २५३० वर्षांपूर्वीचा; जेव्हा दूरदर्शन हे एकमात्र चॅनल होते. त्या वेळेस मराठी, हिंद आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये नवी दिल्लीचा पत्ता असलेल्या जाहिराती यायच्या. त्यात रेडिओ कम रेकॉर्डर, टेपरेकॉर्डर, व्हिडीओ कमी किमतीत, असे लिहिलेले असायचे आणि एका पत्त्यावर मनीऑर्डर करायला सांगितलेली असायची. कमी किमतीच्या आमिषाने अनेकांनी मनीऑर्डर केलेली असायची आणि मग पोस्टाने आलेल्या त्या पुडक्यात किंवा बॉक्समध्ये वाळलेले गवत किंवा मग रद्दी कागदच सापडले, अशा आशयाच्या अनेक कथादंतकथा खूप मोठय़ा प्रमाणावर तेव्हा ऐकायला मिळायच्या. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास आता २१ व्या शतकात ऑनलाइन शॉिपगपर्यंत येऊन पोहोचला आहे.

दिवाळी हा एका अर्थाने सणांचा राजाच. श्रावणापासून सुरू झालेल्या सणांची चढती कमान दिवाळीला अगदी उत्तुंग पातळीवर असते. त्यामुळे साहजिकच दसरा ते दिवाळी हा भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये सर्वाधिक खरेदीचा कालखंड मानला जातो. वर्षांनुवर्षे बाजारपेठेनेही हा अनुभव घेतलेला असल्याने त्यानुसारच सारी तयारीही केली जाते; पण गेल्या अनेक वर्षांमध्ये या खरेदीच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. ते सारे बदल टिपण्याचा प्रयत्न ‘लोकप्रभा’च्या या ‘शॉपिंग विशेष’मध्ये के ला आहे. हल्लीच्या तरुण पिढीला ब्रँडचे अधिक आकर्षण आहे; पण तो आवाक्याबाहेर असेल तर त्यासाठी त्यांनी नवे पर्यायही शोधले आहेत. हे पर्याय आपल्या शहराच्या परिसरात नेमके कुठे उपलब्ध आहेत, तरुणांचा अ‍ॅक्सेसरीजना पसंती देण्याचा ट्रेंड असे सारे काही या अंकात देण्याचा ‘लोकप्रभा’चा प्रयत्न आहे.

महत्त्वाचा बदल आहे तो ऑनलाइन शॉिपगमध्ये. याला सुरुवात झाली तेव्हा भारतात हे काही चालणार नाही. इथे प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून पाहण्याची लोकांची सवय आहे. कपडे आणि दागिने तर नाहीच नाही, असे म्हटले जात होते; पण आता पिढी बदलली आहे आणि ट्रेंडदेखील हेच ऑनलाइनने सिद्ध केले. दागिन्यांची व कपडय़ांची खरेदीही मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन होते आहे. या व्यवसायात फार कुणी नफ्यात नाही तरीही ते होण्यामागे आणि वाढण्यामागे ‘बिग डेटा’चे जुळून आलेले गणित आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘बिग डेटा’ ही भविष्यातील मोठय़ा बाजारपेठेची आणि अनेक संधींची नांदी आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक प्रकारची माहिती आपल्याला भरावी लागते. या माहितीच्या केलेल्या विश्लेषणातून आणि आपण करत असलेल्या खरेदीतून आपल्या सवयी विश्लेषक बाजारपेठेला लक्षात आणून देतात. त्यानुसार आवडीनिवडी आणि सवयी लक्षात घेऊन भविष्यातील उत्पादने तयार होतील किंवा त्यानुसार त्यांचे मार्केटिंग केले जाईल. अर्थात या ‘बिग डेटा’च्या माध्यमातून कंपन्या ग्राहकांच्या सर्वाधिक जवळ पोहोचून त्यांचे सारे काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ‘बिग डेटा’ची किंवा त्यातील काही भागाची गरजेनुसार, इतर कंपन्यांना विक्री हादेखील यातील एक महत्त्वाचा भाग असणार आहे. एकुणात काय, तर त्याच भविष्यातील बाजारपेठेसाठी आणि ‘बिग डेटा’साठीच सध्याची ऑनलाइन झटापट सुरू आहे!

सो, हॅपी शॉपिंग!
01vinayak-signature

विनायक परब