महाराष्ट्रीयांचा सर्वाधिक लाडका सण म्हणजे गणेशोत्सव. गेली चार वष्रे हा सण साजरा करताना ‘लोकप्रभा’ने गणेशोत्सवाच्या प्रथा-परंपरांबरोबरच गणपती ही देवता नेमकी आली कुठून, कशी आणि तिचा विकास कसा होत गेला या सर्व अंगांचा संशोधनात्मक पद्धतीने आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यंदाचे पाचवे वर्ष याच प्रयत्नांना अधिक जोमाने पुढे नेणारे आहे. हा शोध क्रमप्राप्तच ठरतो, कारण आपण गणपतीला बुद्धिदेवता म्हणतो.

यंदाच्या अंकात प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. आनंद कानिटकर यांनी गणपतीच्या अफगाणिस्तानातील मुळाचा शोध घेतला आहे तर ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी भारताबाहेरच्या गणपतीची केवळ माहिती न देता, त्याची स्थानिक परंपरा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.  या व इतर सर्व शोधलेखांमुळे आपल्याला अनेक प्रश्न पडतील. गणपतीच्या जुन्या मूर्ती आणि हत्ती असलेल्या देवतेचे किंवा हत्तीचे अंकन आपल्याला पूर्वी भारताचाच भाग असलेल्या विद्यमान अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सापडते.  चिनी प्रवासी शुआन जांगच्या दैनंदिनीमध्येही येथील दोन शहरांची नगरदेवता म्हणून हत्तीचा उल्लेख सापडणे, तत्कालीन नाण्यांवरील त्यांचे अंकन, दोन ग्रीक लेखकांच्या लिखाणातही त्याचा उल्लेख येणे आणि पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्येही आलेला हत्तींचा व त्याच्याशी संबंधित हास्तिनायनांचा उल्लेख हे निव्वळ योगायोग नाहीत हेच आपल्याला हे लेख वाचल्यानंतर लक्षात येईल.

खरे तर आता गणपतीचा पोस्टप्रोसेस्युअल पुरातत्त्वविज्ञानाच्या पद्धतीने शोध घेण्याचीच गरज आता यामुळे अधोरेखित होते आहे. कारण त्याच्याशी संबंधित कथा-दंतकथांमधून हे लक्षात येते की, गणेश किंवा गणपतीपेक्षा तो ‘विनायक’ या नावानेच सुरुवातीस प्रचलित होता. सुरुवातीचे सर्व संदर्भ ‘विनायका’चेच आहेत. असे का?  गणपतीच्या प्रतिमेत उंदीरमामा केव्हा स्थानापन्न झाला याचाही शोध आपल्याला संस्कृतीतील बदल सांगणारा असेल. हिंदू ग्रंथांमध्ये ‘विनायक’ ‘तुषित’ स्वर्गातून आल्याचा उल्लेख येतो. गौतम बुद्धही याच तुषित स्वर्गातून आल्याचा उल्लेख बौद्ध ग्रंथांमध्ये येतो. बौद्ध, हिंदू, जैन सर्वानीच त्याचा देवता म्हणून स्वीकार करावा, असे त्यात काय आहे?

आजवर आपण केवळ कलेतिहास, धर्मशास्त्र, प्रतिमाशास्त्र, प्राचीन साहित्य व पुरातत्त्वविज्ञान याच अंगांनी गणपतीचा शोध घेतला. आता गरज आहे ती, याला भाषाशास्त्रीय शोधाची जोड देण्याची, कारण गणपती सापडणाऱ्या हास्तिनायनांना ग्रीकांनी ‘अस्तेकनॉय’ म्हणणे हाही निव्वळ योगायोग नाही.  त्याचप्रमाणे ‘विनायक’ असाच त्याचा उल्लेख चीन, जपान, कोरिया व मेक्सिकोतही प्राचीन काळी होणे हाही योगायोग नाही. त्यामुळे गरज आहे ती ‘मूळारंभ आरंभ’ असे म्हणत नव्याने या ‘विनायका’चा शोध घेण्याची. त्यासाठीच ‘लोकप्रभा’ने टाकलेले हे पाचवे पाऊल!
vinayak-signature
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com