हिमालयात भटकंती करण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीयाने केव्हा ना केव्हा पाहिलेले असतेच. अनेकांना तर त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाचे प्रचंड आकर्षण असते. शुभ्र रंग अंगावर मिरवणारा हा उंच हिमालय आहेदेखील तेवढाच देखणा! सुमारे अडीच हजार किलोमीटर्सच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला नानाविध प्रकारचे जैववैविध्य पाहायला मिळते. भारतापुरते बोलायचे तर ईशान्य भारतापासून ते काश्मीरला काराकोरमच्या पर्वतरांगांपर्यंत तो पसरलेला आहे. याची भारताकडील आणि पलीकडची या दोन्ही बाजू तेवढय़ाच देखण्या आहेत. मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत उकाडय़ाने हैराण होण्यापेक्षा हिमालयाच्या कुशीत काही घटका व्यतीत करणे हे केव्हाही आनंददायी. म्हणूनच या खेपेस उन्हाळी मोसमासाठी ‘लोकप्रभा’ने पर्यटन विशेषांकामध्ये हिमालयाचा विशेष विभागच सादर केला आहे. यामध्ये चीनने हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळवत बांधलेल्या रेल्वेतून पर्यटनाचा वेगळा अनुभव सादर केला आहे, गौरी बोरकर यांनी, तो विशेष आकर्षण ठरावा. तर आत्माराम परब आणि हृषीकेश यादव या हिमालयवेडय़ा अवलियांनी त्यांना जाणवलेला हिमालय आणि त्यातील पर्यटनाचे अनेक पर्याय समोर ठेवले आहेत. यातील काही कुणालाही परवडतील असे आहेत ते युथ हॉस्टेल्सशी संबंधित आहेत. पर्यटनाचे साधारणपणे तीन प्रकार असतात. वाटा धुंडाळणे, सहल म्हणून भटकणे आणि साहसी क्रीडा प्रकार. हे तीन प्रकार ‘लोकप्रभा’ने या अंकात सादर केले आहेत. शिवाय या सर्व तज्ज्ञांनी ऋतुमानानुसार नियोजन कसे कराल, याचे मार्गदर्शनही सविस्तर केले आहे.

अध्यात्म आणि हिमालय यांचेही नाते तेवढेच अनोखे आणि गहिरे आहे. हिमालयाची ही बाजूही आशुतोष बापट यांनी सविस्तर उलगडली आहे. कोणत्या वातावरणात काय कराल आणि काय टाळाल याची माहितीही या लेखांमध्ये आहे. हे सारे पर्यटकांसाठी मोलाचे ठरावे.

सर्वाना काही हिमपर्यटनास जाणे शक्य होईलच असे नाही. मग आपल्याच महाराष्ट्रात खिशाला परवडेल असे भटकायचे असेल आणि  वेगळे अनवट काही पाहायचे असेल तर त्याचीही काळजी आम्ही याच अंकात घेतली आहे. एरवी रखरखीत म्हणून मराठवाडय़ाकडे दुर्लक्ष केले जाते, तर खान्देशही उकाडय़ामुळे असह्य़ असणारा असे म्हणून या दोन्ही प्रदेशांना बाजूला ठेवले जाते. या अंकात आम्ही या परिसरांचा अनुशेष भरून काढला आहे. प्राची पाठक यांनी प्रत्यक्ष पायाखाली घातलेला हा खान्देशही भटकंतीची या प्रदेशातील आस निर्माण करणारा आहे, तर आशुतोष बापट यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगळी ठिकाणे धुंडाळून सादर केली आहेत. याशिवाय प्रसाद निक्ते यांनी दाखविलेला युरोप, दक्षिणेतील मंदिरांची भटकंती आणि अमित सामंत यांनी घडवलेली राजस्थानची सफर सोबत आहेच. केवळ रंजक माहितीच न देता इतिहास, भूगोल आणि सामान्यज्ञानातही भर पडेल, अशी काळजी घेण्यात आली आहे. असा हा अंक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे!
vinayak-signature
विनायक परब @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com