गेल्याच आठवडय़ात जगभरात अमली पदार्थविरोधी दिन पाळण्यात आला. त्यानिमित्ताने विविध आकडेवारीही जाहीर झाली. ही आकडेवारी देशाच्या पातळीवर नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जाहीर केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अ‍ॅण्ड क्राइमने (यूएनओडीसी) ही आकडेवारी जाहीर केली.

या दोन्ही अहवालांमधील आकडेवारी ही अनुक्रमे महाराष्ट्र राज्य आणि भारतासाठी इशारा देणारा घंटानादच ठरावी. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशभरात दाखल झालेल्या अमली पदार्थविरोधी गुन्ह्य़ांची संख्या तब्बल ४६ हजार ९२३ म्हणजेच तब्बल ४७ हजारांच्या आसपास आहे. त्यातील तब्बल १४ हजार ६२२ सर्वाधिक गुन्हे हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्याखालोखाल पंजाबचा क्रमांक लागतो, तिथे घडलेल्या गुन्ह्य़ांची संख्या ही १४ हजार ४८३ आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ५ हजार ७४२ गुन्हे दाखल झाले आहेत. याहीपेक्षा भयानक आकडेवारी आहे ती, अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जाऊन आत्महत्येस कवटाळणाऱ्यांची. या आकडेवारीमध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो, २०१४ च्या आकडेवारीनुसार अमली पदार्थाच्या आहारी जाऊन आत्महत्या केलेल्यांची महाराष्ट्रातील संख्या १३७२ आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (५५२) आणि केरळ (४७५)चा क्रमांक लागतो.

National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत
Who Are Bjp 23 Candidates in maharashtra ?
Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे जीवन पूर्णपणे विस्कटलेले असते किंवा विस्कटण्याच्या मार्गावर तरी असते. यामध्ये सर्वाधिक भरणा हा तरुणांचा असतो. कारण पौगंडावस्थेतील आकर्षणापोटी अनेकदा अमली पदार्थाच्या सेवनाला त्यांच्या आयुष्यात सुरुवात होते. या अहवालातील आकडेवारीमध्ये आत्महत्या करणाऱ्यांपकी तरुण किती याची आकडेवारी देण्यात आलेली नाही. मात्र यात सर्वाधिक संख्या ही तरुणांचीच असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त करणे हेही चिंताजनकच आहे. आयुष्यातील ताणतणाव असह्य़ झाल्याने आत्महत्या करण्याचा विचार अनेकांच्या मनात येतो. पण विचार मनात येऊनही आत्महत्या न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र अमली पदार्थाच्या आहारी गेलेली व्यक्ती आत्महत्या करण्यास लगेचच प्रवृत्त होते, असे संशोधकांना लक्षात आले आहे. शिवाय अमली पदार्थाच्या आहारी गेल्याने आपले अस्तित्व हरवून अपघाती मृत्यू झालेल्यांची संख्याही अधिक आहे. त्या आकडेवारीचा समावेश या अहवालामध्ये नाही.

कारण काहीही असले तरी एकूणच अमली पदार्थामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची संख्या अधिक असणे हे चिंताजनकच आहे. खरे तर आपण तरुणांकडे मनुष्यबळ तेही सर्वाधिक काम करण्याची क्षमता असलेल्या वयोगटातील सर्वोत्तम मनुष्यबळ म्हणून पाहतो. मात्र या मनुष्यबळाची हानी नेमकी कुठे होते आहे, याकडे आपले पुरेसे लक्ष नाही असेच दिसते. याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या अमली पदार्थविरोधी विभागाने तयार केलेला जागतिक अहवाल होय. हा अहवाल गेल्याच आठवडय़ात जारी करण्यात आला. या अहवालामध्ये स्पष्टपणे असे म्हटले आहे की,  अमली पदार्थातील हिरोइनच्या तस्करीसाठी भारताचाच प्रामुख्याने वापर केला जातो.  हिरोइनची तस्करी करण्यासाठी भारत हे नंदनवनच मानले जाते. शिवाय सध्या अमली पदार्थाच्या बाजारपेठेत हिरोइनचे महत्त्व इतर नव्याने आलेल्या पदार्थाच्या तुलनेत तसे कमी झाले आहे. त्याचे बाजारपेठीय मूल्यही कमी आहे. मात्र कदाचित म्हणूनच त्याकडे थोडे दुर्लक्ष होत असावे.

04-lp-drugs

कोकेनच्या व्यापारासाठीही थायलंड, मलेशिया आणि फिलिपाइन्सच्या खालोखाल भारताचा वापर होतो. चीन आणि इस्रायलमध्ये जाणारे अमली पदार्थ या चार देशांच्या माध्यमातून पुढे पाठविले जातात, असा स्पष्ट उल्लेख या संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालामध्ये आहे. कोकेन आणि हिरोइनचा आशिया खंडातील वापर वाढल्याकडेही हा अहवाल लक्ष वेधतो. याहीपेक्षा गंभीर अशा एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे या अहवालाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. खरे तर या संदर्भातील अनेक बातम्या यापूर्वीही प्रसिद्ध झाल्या असून त्याची कल्पना पूर्वीच आपल्याला यायला हवी होती. रेव्ह पार्टीजच्या नावाखाली होणाऱ्या तरुणाईच्या आणि श्रीमंतांच्या पाटर्य़ामध्ये अमली पदार्थाचा वापर करून लंगिक अत्याचार होण्याच्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यासाठी काही खास अमली पदार्थाची निर्मितीही करण्यात आली आहे. एक्स्टसी ड्रग हे त्यापकीच एक. याच्या सेवनानंतर लंगिक उत्तेजना प्राप्त होऊन अत्याचार केले जातात. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश मुलींना एखाद्या पेयामधून ते देण्यात येते. नशा उतरते त्या वेळेस त्या मुलीला आपल्यावरील अत्याचाराची कल्पना येते. अनेकदा असे अत्याचार समाज काय म्हणेल या भीतीने बाहेर येतच नाहीत. मात्र आजवर अशी अनेक प्रकरणे आपल्याकडे उघडकीस आली आहेत. आता जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली जाणे हे आपल्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. मात्र आता तरी आपल्याला जाग येऊन अमली पदार्थविरोधी धोरण निश्चित करून त्यावर काटेकोरपणे नजर ठेवणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

भारतामध्ये पोलिसी यंत्रणेकडे अमली पदार्थविरोधी पथके असली तरी ती पुरेशी नाहीत याकडेही संयुक्त राष्ट्र संघांचा अहवाल आपले लक्ष वेधतो. भारतातील अमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भात माहिती मिळते ती नेहमीच हस्ते-परहस्ते, ती थेट कधीच नसते. कारण या संदर्भातील आंतरराष्ट्रीय आकडेवारीवर लक्ष ठेवून यातील व्यवहारांवर बारकाईने करडी नजर ठेवणारी यंत्रणा भारत सरकारकडे नाही, या त्रुटीवर या अहवालात बोट ठेवण्यात आले आहे. आता तरी ही आकडेवारी आणि याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. सध्याचा जमाना हा इंटरनेटचा आहे. इंटरनेटवरून ड्रग्ज खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याची नोंद या अहवालामध्ये करण्यात आली असून सर्वच देशांचे लक्ष या नव्या समस्येकडे वेधण्यात आले आहे. पूर्वी केवळ एक आकडीच असलेले हे प्रमाण आता २५ टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे, हा जगभरासाठी घंटानाद असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचा हा अहवाल सांगतो.

अमली पदार्थाची ही सुरुवात होते ती अफूपासून. २०१२च्या मार्च महिन्यात महाराष्ट्रामध्येही सांगली, बीडसारख्या काही ठिकाणी अमली पदार्थाची शेती होते असे लक्षात आले होते. त्या वेळेस त्यावर सर्वागांनी प्रकाश टाकणारी कव्हर स्टोरी ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केली होती. आता पुन्हा एकदा यानिमित्ताने ‘लोकप्रभा’ने या विषयाला नव्याने हात घातला आहे. दरम्यानच्या चार वर्षांत जग बरेच बदलले आहे आणि अमली पदार्थाचा व्यवसायदेखील. पूर्वी केवळ हिरोइन, कोकेन, चरस, गांजा अशीच नावे ऐकू यायची, आता तेही आहेतच, शिवाय त्यात इफेड्रिन आदींची भर पडत गेली आहे. पूर्वी एके काळी केवळ गरीब मंडळीच या नशेमध्ये अधिक दिसायची. तिथे आता श्रीमंत आणि अतिश्रीमंतांमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली ड्रग्जने केवळ प्रवेशच केलेला नाही तर आपली पाळेमुळे चांगलीच पसरलेली दिसतात. या अतिश्रीमंत समाजामधील प्रकरणे फारशी समाजासमोर येतच नाहीत. दुसरीकडे गुप्तचर संस्थांना असेही लक्षात आले आहे की,  देश खिळखिळा करण्यासाठीचा मार्ग म्हणूनही या देशातील तरुणाईला अमली पदार्थाच्या नादी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या मुद्दय़ाकडे आपण अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही.

शेवटी याचे अर्थकारणही आपण समजून घ्यायलाच हवे. पसा येतो कुठून आणि जातो कुठे, हेही समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अमली पदार्थाच्या व्यवहारातून येणारा पसा हाच दहशतवादासाठी वापरला जातो हे आता फारसे लपून राहिलेले नाही. त्यामुळे अमली पदार्थाचे व्यवहार ही दहशतवादाचीच दुसरी काळी बाजू आहे, हेही आपण वेळीच लक्षात घ्यायला हवे.

गेल्या दोन-तीन आठवडय़ांत अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्यांचे चित्रण करणाऱ्या ‘उडता पंजाब’ची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. पण पंजाबबरोबरच आपला म्हणजेच महाराष्ट्राचाही बुडत्याचा पाय खोलातच आहे हे या आकडेवारीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आपला ‘उडता महाराष्ट्र’ होणार नाही, यासाठी पावले टाकणे ही काळाची गरज ठरली आहे.
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com