प्रतिवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन येण्याच्या दोन दिवस आधीपासून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे संदेश सोशल मीडियावरून फिरू लागतात. पर्यावरण संवर्धनाचे संदेश असलेली टी शर्टस् घातलेली मंडळी त्या दिवशी हातात लहानसे रोपटे घेऊन दिसतात.  दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये सेलिब्रिटीज आणि मंत्री-संत्री यांचे वृक्षारोपण करतानाचे फोटो प्रसिद्ध होतात. अनेकदा खड्डा तोच असतो, दरवर्षी त्यात लावले जाणारे रोप बदलते, असे प्रकार याहीपूर्वी उघडकीस आले आहेत. म्हणजेच आपण जी झाडे लावल्याचे मिरवतो, त्याची पुरेशी काळजी घेणे मात्र टाळतो. पुतळा बसविणाऱ्यानेच त्याची काळजी घेण्याची तयारी दर्शविल्याशिवाय परवानगी मिळणार नाही, अशी नवीन तरतूद करण्याचे निश्चित झाले; तसेच आता झाडांच्या बाबतीतही करावे लागणार की काय अशी दुरवस्थाच आहे. अन्यथा एवढय़ा सर्व वर्षांमध्ये कोटय़वधींच्या संख्येने झालेल्या वृक्षारोपणानंतर अनेक सुस्थितीतील जंगलेच या देशात अस्तित्वात यायला हवी होती. पण तसे झालेले दिसत नाही. पर्यावरणाला आपण गृहीतच धरले आहे. पाऊस पडला नाही, अवकाळी पाऊस-गारपीट झाली, दुष्काळ पडला की, मग आपण पर्यावरणाच्या नावे गळे काढतो, या परिस्थितीला आपणच खरे जबाबदार आहोत.

आपण पर्यावरणाचे काय करून ठेवले आहे, याचा प्रत्यय घ्यायचा तर एखाद्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ, तीर्थस्थळ किंवा गड-किल्लय़ाला भेट द्यायला हवी. खरे तर तीर्थस्थळी आपण जातो ते देवदर्शनाच्या निमित्ताने. पुण्य गाठीशी असावे, असेही अनेकांच्या मनात असते. पण तिथून परत येताना अनेकांनी ते तीर्थस्थळ प्लास्टिकमय करण्यास पुरता हातभार लावलेला असतो. पर्यावरणाची ही विदारक अवस्था लक्षात आल्यानंतर त्यावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने ‘लोकप्रभा’ने सर्वप्रथम ‘भीमाशंकरच्या मस्तकी, कचऱ्याची गंगा’ ही कव्हरस्टोरी केली. त्यासाठी ‘लोकप्रभा’चे वरिष्ठ प्रतिनिधी सुहास जोशी यांनी भीमाशंकरचे जंगल पूर्णपणे पालथे घालून वार्ताकन केले. त्याची दखल घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अभयारण्याच्या परिसरातील आमदार- खासदारांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांकडून स्वच्छता मोहीम पार पाडली. मात्र आता हे जंगल एकदाच स्वच्छ करून भागणार नाही तर त्यासाठी ही मोहीम ‘स्वच्छ भारत’ मोहिमेप्रमाणे अखंड सुरू ठेवावी लागेल. मोहीम अखंड सुरू ठेवणे हाही उपाय नाही तर खरा उपाय हा मानसिकता बदलण्याचा असणार आहे.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Navratri fasting diet: Which foods to lose weight and detox with?
Navratri Diet Plan: नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या…
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता

कचरा करण्याची आपली ही सवय काही जात नाही. अखेरीस ही सवय आपल्याच मुळावर येणारी आहे, हे लक्षात घेऊन आता गड-किल्ले, देवस्थाने, तीर्थस्थळे यांच्या परिसरातील कचरा, प्लास्टिक यांचे प्रदूषण किती भीषण आहे, याचे जळजळीत वास्तव मांडणारी एक मोहीमच ‘लोकप्रभा’ने हाती घेतली आहे. या ‘लोकप्रभा कॅम्पेन’मध्ये या वेळेस आम्ही छत्रपतींची पहिली राजधानी असलेला राजगड आणि आगरी-कोळी समाजाची कुलदेवता असलेल्या एकवीरा या देवस्थानांच्या प्रदूषणाचा प्रश्न मांडला आहे.  जवळपासच्या कोणत्याही तीर्थस्थळाला भेट दिल्यास समोर येणारे वास्तव हे साधारणपणे सारखेच असणार आहे. सर्वत्र पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच आणि सोयीच्या म्हणून वापरून फेकलेल्या थर्माकोलच्या प्लेटस् आणि ग्लासेस. एकवीरेला तर डोंगरातून खाली येणाऱ्या ओढे-ओहळ मार्गामध्ये हेच थर्माकोल अडकून पडले आहे. थर्माकोल हे घातक प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आहे, हे लक्षात आल्यानंतरही त्याच्या वापरावर र्निबध किंवा त्याच्या पुनर्वापराच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. किमान जोपर्यंत योग्य पुनर्वापर प्रक्रिया सापडत नाही, तोपर्यंत त्याचा वापर टाळणे हे तर आपल्या हातात आहे. पण हाती खुळखुळणारा पैसा आणि अंगात मुरलेला बेगुमानपणा यामुळे आपण पर्यावरण प्रदूषण करतो आहोत याचेही भान आपल्याला राहिलेले नाही. गडकिल्ले आणि एकवीरेसारखी देवस्थाने ही आपली तीर्थस्थळेच आहेत. गडकिल्ले म्हणजे तर शिवतीर्थच असे आपण म्हणतो. पण दिसणारे वास्तव भीषण आहे. या शिवतीर्थावर सर्व ब्रॅण्डसच्या दारूच्या बाटल्या सापडतात. हे शिवतीर्थ की शिव‘तीर्थ’ असा प्रश्न पडावा! हे आपल्या समाजासाठी लज्जास्पद आहे! अंतिम वास्तव हेच असणार आहे तर मग किल्ल्यांच्या व्यापारी वापराच्या प्रस्तावास, त्यामुळे त्यांचे पावित्र्य भंग होईल असे म्हणून गळे काढण्यात काय अर्थ आहे?

पूर्वी थोडय़ा आडवाटेवरच्या गड-किल्ल्यांवर जायचे तर सोबत एखादा वाटाडय़ा न्यावा लागायचा, अन्यथा वाट चुकण्याची तयारी ठेवावी लागे. आता मात्र कचऱ्याचा मार्ग धरा की, तुम्ही वाट न चुकता नेमके पोहोचणार, हे भयाण वास्तव आहे. आज आपण कदाचित या कचऱ्याच्या मार्गाने इच्छित स्थळी नेमके पोहोचूही; पण हा कचरा आपल्याला ज्या दिशेने नेतो आहे ते गंतव्य स्थान भीषण असणार आहे, याची खूणगाठ वेळीच बांधलेली बरी!

या सर्वच ठिकाणी ‘लोकप्रभा’ला काही महत्त्वाचे मुद्दे जाणवले ते म्हणजे इथे तीन-चार व्यवस्थापनांच्या हद्दी एकत्र येतात. स्थानिक ग्रामपंचायत, मंदिराचे व्यवस्थापन किंवा संस्थान, वन खाते, पुरातत्त्व खाते. यातील प्रत्येक जण आपल्या हद्दीपुरतेच बघण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये सुसूत्रतेचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळेच येथील पर्यावरणाचे बारा वाजलेले दिसतात. अशा परिस्थितीत एकमेकांकडे दोषारोपाचे बोट दाखविण्यास पुरता वाव असतो. यातील काही ठिकाणी तर तेथील प्लास्टिक गोळा करून विकणे हा येथील काही कुटुंबांचा उद्योग आहे, त्यांच्या हाती ३००-४०० किलो प्लास्टिक एक-दोन महिन्यांत हाती लागत असेल तर प्लास्टिकचा कचरा किती होतो याचा विचारच न केलेला बरा. कारण प्लास्टिक वजनाने हलके असते. त्यामुळे किलोभर प्लास्टिकसाठी गोळा कराव्या लागणाऱ्या बाटल्यांची संख्याही अधिकच असते. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही काही वर्षांपूर्वी असाच प्रयोग झाला होता, त्यावेळेस लक्षात आले होते की, दररोज उद्यानात येणारे पर्यटक सुमारे ३०० किलो प्लास्टिक उद्यानात टाकून जातात. शनिवार-रविवारी हाच आकडा ६५० ते ७०० किलोपर्यंत जायचा. हे सारे महासत्ता होण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या देशवासीयांसाठी नक्कीच भूषणास्पद नाही.

या साऱ्या प्लास्टिकचा प्राणिमात्रांवर होणारा परिणाम यावर तर विचार करायला आपण अद्याप सुरुवातही केलेली नाही. मध्यंतरी प्राणितज्ज्ञांनी सांगितलेले अनुभव भयानक होते. राष्ट्रीय उद्यानातील हरणांच्या पोटातून काही किलो प्लास्टिक काढण्यात आले होते. एरवी प्लास्टिकमुळे मेलेल्या गाई-बैलांची संख्याही अधिक आहे. गोमाता म्हणून त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना गोमातेच्या, या वेदना अद्याप लक्षात आलेल्या दिसत नाहीत. शहरात वावरणाऱ्या गाई-बैलांची आतडी प्लास्टिकमुळे फाटून ते मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण जेव्हा हेच सारे जंगली प्राण्यांच्या संदर्भात होताना दिसते तेव्हा प्लास्टिकचा हा भस्मासुर आपण जंगलातही नेल्याचा साक्षात्कार भयावह ठरतो!

डोंगर-दऱ्यांतील या प्लास्टिकच्या भस्मासुराला वेळीच आवर घालावा लागेल. गड सर करण्यासाठी शिवछत्रपतींचे मावळे कमरेला दोर लावून जिवाची बाजी लावत वर चढायचे, त्याची नोंद इतिहासात आहे. आता छत्रपतींचे हे गडच प्लास्टिकच्या भस्मासुराच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आधुनिक मावळ्यांना कमरेला दोर लावून खाली दऱ्या-खोऱ्यांमध्ये उतरावे लागले, अशी नोंद अर्वाचीन इतिहास घेईल. ते नक्कीच भूषणास्पद नसेल!
vinayak-signature
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com