गेली सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सातत्याने बोलत आहोत. कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी भाषणांमधून तर कधी वर्तमानपत्रांतून, चॅनल्सवरून तर अनेकदा थेट न्यायालयांमध्येही. आता तर सर्वोच्च न्यायालयानेच भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार मान्य केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. मात्र हे सारे करताना दोन्ही बाजूंना असणारी  मंडळी केवळ आणि केवळ टोकाचाच विचार मांडताना दिसत आहेत. समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तरच उपाय सापडेल, हे साधे तर्कट आपण का बरे बाजूला सारतोय, असा प्रश्न नेहमी मनात येतो.

सध्या केवळ मनुष्यप्राणी हाच आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू असून तुलनेने इतर साऱ्या जीवजंतूंना आपण तुच्छ ठरवले आहे. किंबहुना याच विचारसरणीमुळे आज नवनवीन समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आहे. विज्ञान हे केवळ उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी नाही तर ते मानवी समस्यांना भिडण्यासाठीही आहे, याचाही विसर पडलेला दिसतो. त्यामुळे वैज्ञानिक मार्ग अवलंबणे सोडून आपला प्रवास भलत्याच दिशेने सुरू आहे. सर्वात आधी आपण समस्यांच्या मुळाशी जायला हवे. कुत्र्याला समजून घ्यायचे तर तो मूळचा गवताळ अधिवासातील प्राणी आहे हे लक्षात घ्यायला हवे. आज कुठेही शहरात बसण्यापूर्वी कुत्रा काय करतो याचे निरीक्षण केले तर लक्षात येते की, तो स्वत:भोवतीच आधी गोल गोल फिरतो आणि मग बसकन मारतो. गवतात बसण्यापूर्वीची ही त्याची हजारो वर्षांची प्रक्रिया आज शहरीकरणानंतरही कायम आहे. पूर्वी तो गवत अशा प्रकारे मोडायचा आणि मग खाली बसायचा. त्याच्या काही सवयी आदिम आहेत, हेही समजून घ्यायला हवे.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

कोणत्याही प्राण्याची जंगलामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर पैदास होते त्या वेळेस किंवा एखादा प्राणी जंगलासारखा त्याचा अधिवास सोडून बाहेर येतो त्या वेळेस प्राणितज्ज्ञ प्रथम त्याच्या अन्नसाखळीवरचे परिणाम शोधतात. मग तो बिबटय़ा असेल, माकड किंवा मग हत्ती. त्याच्या या समस्येचे उत्तर त्याच्या अन्नसाखळीवरील परिणामांमध्ये दडलेले असते. अन्न मुबलक उपलब्ध असते तेव्हा त्याची पैदास वाढते. कुत्र्यांची संख्या वाढण्याच्या मुळाशी असलेल्या कारणांमध्ये हे सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे.

सजीवांच्या वाढीमध्ये प्रथिनांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कुत्र्याची प्रथिनांची गरज इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. त्याला शिजवलेल्या अन्नापेक्षा प्रथिने अधिक आवडतात व गरजेची असतात. सध्या शहरामधील माणसाच्या बदललेल्या खाद्यसवयी त्याची ही गरज वाजवीपेक्षा अधिक पूर्ण करतात. सध्या भटक्या कुत्र्यांची समस्या प्रामुख्याने शहरामध्येच आहे. हे समजून घेतले की, त्यामागचे कारण सहज नजरेसमोर येते. शहरातील माणसाच्या हाती पैसा अधिक असून रोज पोषण आहारामध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रथिने असलीच पाहिजेत, असा समज झाला आहे. त्यामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थ, चीज, अंडी, मांस, मासे यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच वाढले आहे. शिवाय शिळे अन्न आरोग्यासाठी चांगले नाही, असा सार्वत्रिक समजही वाढत चालला आहे. त्यामुळे घराघरांमध्ये होणारी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात हा खाद्यपदार्थ कमी झाला असून लोक शिळेपाके फेकून देणे पसंत करतात. कचरा म्हणून फेकून दिलेल्या याच अन्नावर शहरातील भटकी कुत्री पोसली जातात. कोणताही प्राणी मस्त पोसला गेला की तो दोन पद्धतीने अभिव्यक्त होतो, असे प्राणिशास्त्र सांगते व तसाच प्राणितज्ज्ञांना अनुभवही आहे. तो लैंगिकदृष्टय़ा नेहमीपेक्षा अधिक सक्रिय होतो किंवा माजल्याने आक्रमक होतो. कुत्रा हा आदिम काळापासून मुळात आक्रमक असाच प्राणी आहे. त्याला माणसाळवण्यामध्ये माणसाला यश आलेले असले तरी त्याच्या डीएनएमध्ये असलेल्या अनेक मूळ गोष्टी कायम आहेत. कुत्र्यांना मानवी कचऱ्यातून मिळणारा प्रथिनांचा वाढलेला आहार हा त्यांच्या प्रजननचक्राशी थेट संबंधित आहे, हे जवळपास प्रत्येक प्राणितज्ज्ञाला चांगलेच ठाऊक आहे.

कुत्र्यांच्या वाढलेल्या आक्रमकपणाचा संबंधही अशाच प्रकारे आपल्या शहरीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. आता शहरांमध्ये सोसायटय़ा, उंच इमारती, त्यांच्या कुंपणांच्या भिंती यामुळे कंपार्टमेंटलायजेशन झाले आहे. जशी माणसालाही फिरण्यासाठी मोकळी जागा आवश्यक असते तशीच ती कुत्र्यांसाठीही गरजेची आहे. यावर भटक्या कुत्र्यांना विरोध करणारी मंडळी मग आता यांना कुत्र्यांना फिरण्यासाठीही जागा हवी, असा टोकाचा युक्तिवाद करू शकतात. पण असा युक्तिवाद करण्यापूर्वी मूळ मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. फिरण्यासाठी मोकळी जागा नाही आणि शहरामध्ये सकाळपासून वाढलेली वर्दळ यामुळे कुत्र्यांना मोकळे फिरण्यासाठी जो वेळ मिळतो तो रात्रीचाच असतो. त्यामुळेच आपल्याला कुत्र्यांच्या टोळ्याच्या टोळ्या रात्री भुंकताना किंवा लोकांच्या मागे लागलेल्या दिसतात. कारण त्या वेळेस माणसे अतिशय कमी आणि गाडय़ाही फारशा नाहीत, रस्ते मोकळे अशी अवस्था असते. द्रुतगती मार्गावर सर्वाधिक वर्दळ असते  तिथे कुत्रे फिरकत नाहीत.

कुत्रा हादेखील इतर प्राण्यांप्रमाणेच स्वत:चा अधिवास ठरवून निश्चित करणारा (टेरिटोरिअल) प्राणी आहे. जागोजागी विष्ठा टाकणे किंवा लघवी करणे याचा संबंध त्याच्याशीच आहे. कारण तो आपला विभाग निश्चित करीत असतो. त्यांची घ्राणेंद्रिये सर्वात तीव्र आहेत. इतर कुणाच्या लघवीचा वास आला की, तो तिथे स्वत:च्या अस्तित्वाची खूणही त्याच पद्धतीने करतो. शहरामध्ये गाडय़ांचे टायर्स हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठिकाण असतात. पण गाडय़ा चल असल्याने ठिकाण बदलत असते. एकाच भागात पार्क होणाऱ्या गाडय़ाही बदलत असतात. त्यामुळे कुत्रे चक्रावून जातात, असे त्यांच्या एका मानसिक पाहणीत आढळून आले आहे. संभ्रमावस्थेमुळे येणारा ताण हा केवळ माणसालाच येतो असा आपला गैरसमज असतो. प्रत्येक सजीवाला ताण असतोच, तणाव किती असणार हे त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते असे प्राणिशास्त्र व मानसशास्त्रही सांगते. शहरातील भटके कुत्रेही नानाविध कारणांनी तणावग्रस्त आहेत. माणसामुळे वाढत्या शहरीकरणामुळे त्यांचीही जीवनशैली बदलली आहे, त्याकडे अद्याप आपण लक्षच दिलेले नाही. त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून त्यांच्या त्यांच्यामधील संघर्षही वाढले आहेत. त्यांच्या टेरिटोरिअल असण्याचा संबंध त्यांच्या अन्नसुरक्षा आणि प्रजननसाखळीशी संबंधित आहे. त्यामध्येही मोठे बदल झाले आहेत.

शहरांमध्ये असलेल्या चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडय़ा हा त्यांच्या अन्नाचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे आजवर अनेक पाहणींमध्ये लक्षात आले आहे. यातील सर्व मांसाहारी घटक हे त्यांच्या पोसण्याचे स्रोत असतात. मग ते माशाचे फेकून दिलेले काटे असतील किंवा मग मटणातील हाडे आदी. या गाडय़ा अनेक ठिकाणी रात्रभर सुरूच असतात. जिथे या गाडय़ा अधिक तिथे कुत्र्यांची संख्या अधिक हे समीकरणही अनेकदा पाहणीत लक्षात आले आहे.

यापूर्वीच्या काळात भटक्या कुत्र्यांचा डाएट हा पौष्टिक नव्हता. पण शहरी माणसाच्या बदललेल्या सवयीमुळे तोही आता पौष्टिकतेवर जगतो आहे. शिवाय माणसाप्रमाणेच त्या पौष्टिकतेमुळे त्याचे आयुर्मानही फार नाही तरी वाढलेले नक्कीच आहे. हा मुद्दाही आपण लक्षात घेतलेला नाही. त्यामुळे वाढलेले आयुर्मान व वाढलेली पैदास यामुळे संख्या बरीच दिसते. सर्वसाधारणपणे प्रथिनांच्या उपलब्धतेनुसार प्राण्यांची संख्या निसर्गात कमी-अधिक होत असते, हे सर्वमान्य तत्त्व आहे. शिवाय एरवी निसर्गात भक्षकदेखील ही प्राणिसंख्या नियंत्रित करण्याचे काम करतो. गावांमध्ये आजही अशा प्रकारे ही संख्या काही भक्षकांकडून नियंत्रित राहते. मात्र शहरात हा समतोल साधणारे कुणीही नाही. त्यामुळे साहजिकच संख्या मर्यादेबाहेर वाढणे हाच परिणाम आपल्याला दिसतो व त्यामुळेच भोगावाही लागतो. कोणत्याही जीवांची वाढ मर्यादेबाहेर झाली की, त्याचे परिणाम वाईटच होतात.

एखाद्याच्या मागे लागणे व त्याला हैराण करणे ही कुत्र्यांची प्रागैतिहासिक कालखंडापासून असलेली सवय आहे. त्यांच्यातील वाढलेल्या ताणामुळे ती सवय शहरात वाढलेली दिसते. पण आजही प्राणितज्ज्ञांना असे वाटते की, कुत्रा कितीही भुंकून अंगावर आला तरी तो प्राणघातक हल्ला करीत नाही. तुम्ही धावला नाहीत तर तो काही काळाने शांत होतो किंवा निघून जातो. पण लहान मुलांना हे लक्षात येत नाही. लहान मुलांनी घाबरणे व पळणे ही साहजिक गोष्ट असते. अशा वेळेस त्यांच्यातील प्रथिनांवर पोसलेला अल्फा मेल हल्ला करतो आणि इतर केवळ अनुकरण करतात व हकनाक कुणाचा तरी प्राण जातो.

याशिवाय सध्या रेबिज या कुत्र्यामार्फत पसरणाऱ्या विकाराची व त्यामुळे दगावणाऱ्यांची वाढलेली संख्या याचे मूळही मर्यादेबाहेर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्यांमध्येच आहे. त्यावर त्यांना मारणे हा सहज सोपा उपाय सुचवला जातो. हा लक्षणांवर केलेला उपाय आहे, मुळावर नाही. समस्या कायम संपवायची असेल तर शहरीकरणाच्या समस्यांशी असलेला त्याचा संबंध लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय सध्या भ्रष्टाचाराच्या कर्करोगाचा परिणाम निर्बीजीकरण फसण्याच्या रूपात पाहायला मिळतो आहे. हे वेळीच रोखले नाही तर  रेबिजच आपला बळी घेईल, हे माणसाने लक्षात ठेवायला हवे!
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com