‘आधीच मंदीचा उल्हास त्यात मोदींच्या नोटाबंदीचा फाल्गुनमास’ हाच विचार यशवंतीच्या मनात सतत येत होता. आता आयुष्याच्या पन्नाशीत हाताशी आलेले सारे काही सोडून जाणार कुठे आणि नव्याने वाटेने जाण्याची ही वेळ नाही, असेच तिला सतत वाटत होते. त्यात ती एक स्त्री तीही पन्नाशीच्या आसपास आलेली. नवरा आणि एक मुलगी. काही संधी खुणावत होत्या पण मग कुटुंबाला सोडून राहावे लागले असते. उद्योग करावा तर, नोटाबंदी आडवी..

आजवर ती अनेकांच्या उपयोगी पडली होती खरी; पण आता मात्र तिच्या मदतीला कुणीच येत नाहीये, अशीच तिची धारणा झाली होती. त्यात कुणी मैत्रीण भेटली की, पुन्हा या विषयाची चर्चा. मग यशवंतीच्या कुंडलीतील ग्रहच कसे फिरले आहेत किंवा मग तिची साडेसाती तरी सुरू झाली असावी, असा कयास व्यक्त व्हायचा. लहानपणी घरात देव्हारा होता खरा पण आईच सारे काही करायची. बाबांनी तर देवाला नमस्कार करायलाही कधी सांगितले नव्हते. त्यामुळे कुंडली काढणे तर तसे दूरच. पण आता काढूनच घ्यावी का कुंडली, असा विचार अलीकडे तिच्या मनात सतत येत होता.

मराठवाडय़ातून मुंबईत आलेली यशवंती आता पन्नाशीच्या जवळ होती आणि आपण ज्या टप्प्यातून जात आहोत, त्याला मिडलाइफ क्रायसेस म्हणतात, हेही तिला चांगले ठाऊक होते. मनगटात ताकद होती आणि त्या ताकदीवर विश्वासही होता. पण परिस्थिती मात्र तेवढी साथ देत नव्हती. अनेक वर्षे उद्योग किंवा मग चांगल्या पद्धतीने प्रयोगशील शेती करण्याचे तिचे स्वप्न होते. पण मुलगी आणि शेती समीकरण फारसे जुळणारे नव्हते, त्या वेळेस. दहावी झाली त्या वेळेस सर्वाना वेड होते इंजिनीअरिंगचे म्हणून तीही इंजिनीअर झाली. पण सुमारे २५ वर्षे तेच ते काम करून ती कंटाळली. त्याच वेळेस बॉसबरोबर कडाक्याचे वाजण्याचे निमित्त झाले आणि राजीनामा देऊन बाहेरही पडली. २१ व्या शतकातील स्त्री असल्याने घरी बसणे तिला मान्य नव्हते, ना तिचा तसा िपड होता. तिच्यातील प्रयोगशीलता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस नवरा आणि मुलीला मुंबईलाच ठेवून ती थेट गावी आली आणि शेतात  विचारमग्न अवस्थेत बसून होती.. त्याच वेळेस तिला लक्षात आले कुणी तरी हाक मारते आहे, पाहिले तर गावच्या शाळेतल्या तिच्या आवडत्या शिक्षिका शांताबाई समोर होत्या.

सहज गप्पांच्या ओघात यशवंती मोकळी झाली तेव्हा तिच्या शिक्षिका असलेल्या शांताबाईंना लक्षात आले की, त्या तिथे वेळेवर पोहोचल्या आहेत. आवडत्या विद्यार्थिनीची ही अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले.  त्या म्हणाल्या, तू तीच यशवंती आहेस का की, जिला नावावरूनच मूलं शाळेत खूप चिडवायची आणि जिद्दीने त्या सर्व मुलांना पुरून उरत ती सांगायची, िहमत असेल तर माझ्यापेक्षा मोठे होऊन दाखवा आणि मग बोला!

शांताबाई म्हणाल्या, हातावरच्या रेषांपेक्षा तुझ्या मनगटातली ताकद महत्त्वाची आहे. तू तीच मुलगी आहेस जिने विज्ञानाची कास धरीत गावात पहिले हायब्रीड पीक आपल्या बापाला घ्यायला लावले आणि त्याचे अनुकरण मग गावाने केले. शेतीतले प्रयोग बाबांनी केलेले असले तरी शाळकरी वयातली तूच त्यांच्या मागे लागली होतीस. शेती आवडते, त्यातले प्रयोग आवडतात तर मातीत का नाही उतरत परत एकदा? गेल्या वेळेस आली होतीस तेव्हा तूच म्हणाली होतीस, कमी पाण्यातले वाण इथे घ्यायला हवे. मोबाइलवरून शेतीतलं पाणी   कसं नियंत्रित करायचं ते तूच तर सांगत होतीस सर्वाना. इंजिनीअर असलीस तरी मातीशी नाळ कायम आहे. मग जे सांगितलंस ते करण्याची संधी असताना कुंडलीचा विचार का करत्येयस? तुझ्या तर नावातच यश आहे. हातांवरच्या रेषा बघत बसण्यापेक्षा मनगटातल्या ताकदीवर विश्वास ठेव!

तुझं भविष्य तुझ्याच हातात आहे!
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com