वचननाम्यांतील कामांचा आढावा

पालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘करून दाखविले’ची टिमकी वाजविता यावी यासाठी आचारसंहितेपूर्वी शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे कामांचा धडाकाही लावला आहे. दुसरीकडे भाजपनेही आपले अस्तित्व पणाला लावण्यासाठी नवनवे प्रयोग हाती घेतले आहे. गुरुवारी महापौर बंगल्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयुक्तांना पाचारण करुन कामांचा आढावा घेण्यात आला. तर भाजपने उल्टा छाता, बँड स्टँड, चौपाटींचे सुशोभीकरणातून मुंबईकरांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी बॉलीवूड कलाकारांनाही पाचारण करण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे.  पालिकेच्या मागील निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र वचननामे जाहीर केले होते. आपण मतदारांना दिलेल्या वचनांची गेल्या पाच वर्षांत पूर्तता झाली का याची चाचपणी शिवसेनेने सुरू केली आहे.

गटनेत्यांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत प्रशासनाकडे त्याची विचारणाही करण्यात आली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नव्हते. या पाश्र्वभूमीवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह अजोय मेहता, महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आदी उपस्थित होते.सध्या पालिकेच्या कोणत्या प्रकल्पांची कामे कोणत्या प्रभागात  सुरू आहेत, कामे कोणत्या टप्प्यात आली आहेत याबाबत इत्थंभूत माहिती शिवसेनेने प्रशासनाकडून घेतली. मागील निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचनांपैकी किती कामे पूर्ण झाली आहेत, कोणती कामे कोणत्या टप्प्यात आहेत याचाही आढावाही  यावेळी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. वचननाम्यातील कामे अंतिम टप्प्यात आली असल्यास आचारसंहिता जारी होण्यापूर्वी उद्घाटनांचा कार्यक्रम उरकून घ्यावा, तसेच काही कामे तातडीने हाती घेऊन त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते.

उल्टा छाता’, वांद्रे बँड स्टँड, जुहू चौपाटीवर सुशोभीकरण

आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजप नेत्यांची विकास कामांची लगबग सुरु असून उद्घाटन, भूमीपूजन आणि दिवाळी पहाटसह अन्य कार्यक्रमांचा धडाका लावण्यात येत आहे. खासदार पूनम महाजन व मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकारातून सांताक्रूझ येथील रोटरी पार्कमध्ये सौरउर्जेतून दिवे व रोषणाई, पर्जन्य जलातून पिण्याचे पाणी पुरविणारा आणि अन्य सुविधा देणारा ‘उल्टा छाता’ बसविण्यात आला आहे. मुंबईतील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

‘उल्टा छाता’ ही आगळीवेगळी संकल्पना महाजन यांनी ‘थिंक फी’ संस्था व महापालिकेच्या मदतीतून उभारली आहे.

छताला उलटय़ा छत्रीच्या आकार असल्याने त्यात पावसाचे पाणी साठविता येते. यात पाच लाख कप इतके पाणी मावणार आहे. ते जमिनीत पाण्याच्या टाकीत साठवून गाळून पिण्यासाठी वापरता येते. उलटय़ा छत्रीच्या छतावर सौर उर्जेच्या यंत्रणा असून त्यातून बॅटरी चार्ज होते व सायंकाळी त्यातून वीजेच्या दिव्यांच्या रोषणाईसाठी मोफत वीज उपलब्ध होते. या उर्जेतून बागेत फिरायला आलेल्या नागरिकांना मोबाईल चार्जिगची व्यवस्थादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘उल्टा छाता’ चा हा प्रयोग यापूर्वी पुणे, ठाणे येथे झाला असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे शाहरूख खान यांच्या हस्ते भूमीपूजन

अ‍ॅड. शेलार यांच्या पुढाकाराने मेरी टाईम बोर्डाच्या निधीतून वांद्रे बँड स्टँडचे सुशोभीकरण झाले असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमीपूजन प्रसिध्द अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी खासदार पूनम महाजन, वांद्रे बँड स्टँड असोसिएशनचे सचिव रॉबिननाथ, उपमहापौर अलका केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार अमित साटम यांच्या पुढाकारातून जुहू चौपाटी येथे पहिल्या टप्प्यातील सुशोभीकरणाच्या कामांचे उद्घाटन व दुसऱ्या टप्प्यातील कामांचे भूमीपूजन खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते नुकतेच झाले. हेरिटेज दिव्यांच्या रोषणाईमुळे चौपाटीवर सायंकाळी झगमगाट असणार आहे.