दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; मुंब्रा येथून टोळीचा म्होरक्या अटकेत; सहा राज्यांच्या पोलिसांची कारवाई

देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या आयसिसच्या दहा संशयित दहशतवाद्यांच्या पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली, पंजाब, बिहार व आंध्र प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. यातील पहिली कारवाई गुरुवारी पहाटे मुंब्रा येथे पार पडली.

लखनौत ७ मार्चला झालेल्या चकमकीत आयसिसचा एक दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, दिल्ली व आंध्र प्रदेश या राज्यांतील दहा तरुण देशात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याचे धागेदोरे हाती लागले होते.

महाराष्ट्र व उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकांनी मुंब्रा येथील अब्रार इमारतीत राहणाऱ्या नाझीम शेख ऊर्फ उमर या तरुणाला बेडय़ा ठोकल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार येथून आणखी ९ जणांना पाठोपाठ ताब्यात घेण्यात आले. त्या त्या ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या पोलीस यंत्रणांना फक्त मुंब्रयाच्या कारवाईचा अवकाश होता. ताब्यात घेतलेल्यांपकी तिघांना अटक करण्यात आली, तर उर्वरित सहा जणांकडे कसून चौकशी सुरू आहे. हे सर्व निझामच्या संपर्कात होते. निझाम या टोळीचा म्होरक्या असून तो परदेशातील तिघांच्या संपर्कात होता व त्यांच्याच आदेशांवरून घातपाती कारवायांची तयारी करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्वजण परस्परांच्या संपर्कात होते आणि नजीकच्या भविष्यात देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, असे उत्तर प्रदेश एटीएसचे पोलीस महानिरीक्षक असीम अरुण यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले चारही जण १८ ते २५ या वयोगटातील आहेत. दरम्यान, आणखी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना नोईडा येथे नेण्यात आले असल्याचे उत्तर प्रदेश एटीएसकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेले सर्वजण बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील तरुणांची आयसिसमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्नशील होते, असेही एटीएसने सांगितले.

निझाम व त्याच्या संपर्कात असलेले विविध राज्यांमध्ये आश्रय घेतलेले तरुण घातपाती कारवाया करणार हे स्पष्ट होताच गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवरून उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएस, आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण पथक, पंजाब व बिहार पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई हाती घेतली. कारवाईत सहभागी झालेल्या विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. याच ग्रुपवरून कारवाईतली प्रत्येक हालचाली सर्वांपर्यंत पोहोचत होती. ठरल्याप्रमाणे पहाटे चारच्या सुमारास यूपी, महाराष्ट्र एटीएस पथकांनी अब्रार इमारत घेरली. इमारतीत राहाणाऱ्या निझामला ताब्यात घेताच या ग्रुपवर संदेश पडला. तो पाहताच यूपीतील झिंझीना, बिजानोर, बिहारमधील नकटीया (चंपारण), जालंधरमध्ये तळ ठोकून बसलेल्या पथकांनी उर्वरित ९ जणांना ताब्यात घेतले. चौकशीतून यातील जीशान ऊर्फ गाजी बाबा ऊर्फ मुजम्मिल (पंजाब), फैजान उर्फ मुफ्ती (यूपी) आणि एत्तेशाम ऊर्फ मिंटू उर्फ एसके (बिहार) या तिघांना अटक करण्यात आली, तर ताब्यात घेतलेल्या सहा जणांकडे कसून चौकशी सुरू आहे. यात निझामसोबत अब्रार इमारतीत राहाणाऱ्या दोघांचा समावेश आहे. त्यातील एक निझामसोबत राहतो व अंडी विक्री करतो. दुसऱ्याने मात्र काही दिवसांपूर्वीच बिजनोरहून मुंब्रा गाठल्याची माहिती पुढे येते आहे.

एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार निझामने वर्षभरात मुंब्रा येथील वास्तव्यात काय केले, कोणाला भेटला, परदेशातील तीन व्यक्ती कोण, त्यांनी काय आदेश दिले होते, घातपात कुठे व कसा घडवला जाणार होता याबाबत कसून चौकशी केली जाईल.

कोण हा निझाम?

निझाम मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्हय़ाचा रहिवासी असून वर्षभरापूर्वी मुंब््रयात आला.   विशिष्ट समाजातील तरुणांची माथी भडकावून  , जिहादी विचार भिनवणे, आर्थिक तरतूद करणे, परदेशी म्होरक्यांच्या आदेशाने घातपाती कारवायांचा कट  ही निझामवर मुख्य जबाबदारी होती, अशी माहिती समोर येते आहे.