अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा-दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर ‘फ्लिपकार्ट’च्या ऑनलाईन सेलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘फ्लिपकार्ट’च्या या सेलची सुरूवात सोमवारी रात्रीपासून झाली. त्यानंतरच्या दहा तासांत ‘फ्लिपकार्ट’च्या अॅप्लिकेशनवरून तब्बल १० लाख वस्तुंची विक्री झाल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांचा हा सेल पहिल्या दिवशी केवळ फ्लिपकार्ट अॅप्लिकेशनधारकांसाठी मर्यादित असूनही इतक्या मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. सध्या फ्लिपकार्टच्या अॅप्लिकेशनद्वारे प्रत्येक २५ सेकंदांना एका वस्तूची विक्री होत आहे. ‘फ्लिपकार्ट’चा हा ‘बिग बिलियन सेल’ १३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. या सेलमुळे गेल्या दोन दिवसांत १६ लाख लोकांनी मोबाईलवर ‘फ्लिपकार्ट’चे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याची माहिती ‘फ्लिपकार्ट’चे प्रमुख मुकेश बन्सल यांनी दिली. येणाऱ्या दिवसांत या सेलला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘फ्लिपकार्ट’च्या या सेलला बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमधून सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. ‘फ्लिपकार्ट’ने या सेलसाठी ६ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले होते. यामध्ये १३ ऑक्टोबरला- फॅशन, १४ ऑक्टोबरला गृहपयोगी वस्तू, १५ ऑक्टोबरला मोबाईल, १६ ऑक्टोबरला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि १७ तारखेला पुस्तकांवर तब्बल ५० ते ८० टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.