सुवर्ण खरेदीत १० ते १२ टक्के वाढ अपेक्षित; सराफांच्या संपानंतर चुकलेला मुहूर्त साधण्यास ग्राहक सज्ज
सराफांनी ४२ दिवस पुकारलेल्या संपामुळे गुढीपाडव्याचा चुकलेला मुहूर्त सोमवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहक गाठणार आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सोनेखरेदीत मोठी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अक्षय्य तृतीयेच्या सोनेखरेदीत किमान १० ते १२ टक्के वाढ होईल, असा सराफांचा अंदाज आहे.
सोने खरेदीसाठी वेगवेगळे मोठे ब्रँड आणि अगदी ऑनलाईन बाजारपेठही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असली तरी लोकांचा कल अजूनही पारंपरिक सराफांकडून सोने खरेदी करण्याकडेच आहे. त्यामुळे संप असताना कित्येकांनी नेहमीचे व्यापारी नाहीत म्हणून सोने खरेदी करणे टाळले होते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीसाठी नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होण्याची शक्यता आहे. या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तानंतर दुसरा शुभमुहूर्त लवकर नसल्याने यावेळी दुप्पट गर्दी अपेक्षित असल्याची माहिती ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’चे अमित मोडक यांनी दिली.
अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दागिने बनवून घेण्यावर ग्राहकांचा भर असतो. शिवाय, जून-जुलैमध्ये ज्यांच्याकडे विवाहकार्य आहेत तेही सर्वसाधारणपणे याच मुहूर्तावर दागिने खरेदी करतात. त्यामुळे तयार दागिने किंवा दागिने बनवून घेणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असते हे लक्षात घेता यावर्षी १० ते १२ टक्क्याने सोनेखरेदीत वाढ होईल, असा अंदाज मोडक यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी सोन्याचा भाव खूपच खाली घसरला होता. त्या तुलनेत आता त्यात वाढ झाली असल्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे दुप्पट सोने खरेदी होईल, अशी सराफांची अटकळ आहे. पाडवा आणि अक्षय्य तृतीया अशा दोन्ही मुहूर्ताची मिळून ही खरेदी होणार असल्याने ग्राहकांकडून लक्षणीय प्रतिसादाची अपेक्षा आहे आणि गेले आठवडाभर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दागिने मिळावेत यासाठी आधीच नोंदणी करणाऱ्यांची संख्या पाहता सकारात्मक वातावरण असल्याचे ‘लागू बंधू’चे दिलीप लागू यांनी सांगितले.
दरम्यान मुंबई, पुण्याबरोबरच इतर शहरांतही वेगवेगळ्या कलाकृतीचे सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांनी सराफी बाजारपेठा सजल्या आहेत. काही सराफांकडून दागिन्यांच्या घडणावळीवर सूट देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या बाजाराबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अजित गाडगीळ म्हणाले, ‘अनेक मुहूर्त चुकले व आता सोन्याचे भावही काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल.’

सध्या सोनेखरेदीसाठी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ३० हजाराच्या आतच आहे. भाववाढ नसल्याने नेहमीच्या खरेदीदारांमध्ये उत्साह आहे. त्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांना इच्छा असूनही केवळ संपामुळे सोनेखरेदी करता आली नव्हती. त्यांच्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त फार महत्त्वाचा आहे,’
– आनंद पेडणेकर, जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स