शिक्षकांना सहावा वेतन आयोग देताना सरकारने केंद्राप्रमाणे न देता हकीम समितीच्या शिफारशी लागू करून वेतनावर कुऱ्हाड चालवली आहे. यामुळे राज्यातील तब्बल एक लाख शिक्षकांवर अन्याय होत आहे. माध्यमिक विभागात काम करणाऱ्या एक लाख शिक्षकांना बारा वष्रे सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणीत फक्त १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार प्राथमिक शिक्षकांना ग्रेड पेमध्ये १४०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या ग्रेड पेमधील वाढ ८०० रुपये आहे. तर माध्यमिक शिक्षकांना केवळ १०० रुपयांची वाढ आहे. यामुळे माध्यमिक शिक्षकांची पुरतीच निराशा झाली आहे. नियमांनुसार ही वाढ ६०० रुपये होणे अपेक्षित होते. या संदर्भात शिक्षक भारतीचे संयुक्त कार्यवाह महादेव सुळे पाठपुरावा करत आहेत. याबाबतचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार कपिल पाटील व अशोक बेलसरे यांनी दिला.