मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अल्पवयीन मुलांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. याआधी गेल्या तीन वर्षांमध्ये १०० चिमुरड्यांची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. लहान मुलांची तस्करी करुन त्यांना पॅरिसमध्ये पाठवण्यात येत होते, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली. मुलांना चांगले शिक्षण मिळेल आणि कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल, यासाठी संबंधित मुलांचे पालक त्यांना पॅरिसला पाठवत होते, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

मुलांची तस्करी करुन त्यांना पॅरिसमध्ये पाठवणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुनिल नंदवानी आणि नरसय्या मुंजाली अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरील संपर्क क्रमांकाच्या मदतीने या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘नंदवानीने याआधी पाच-सहा अल्पवयीन मुलांची तस्करी करुन त्यांना पॅरिसला पाठवले आहे. तर मुंजालीने काही दिवसांपूर्वीच दोन अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्ट तयार केला होता. मात्र त्याला फ्रान्सचा विसा मिळू शकला नाही. या दोन्ही आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,’ अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली. आरोपींकडून १४ ते १६ वयोगटातील मुलांची तस्करी करुन त्यांना पॅरिसमध्ये पाठवायचे. या मुलांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर त्यांच्याकडून फ्रान्सच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला जायचा.

अल्पवयीन मुलांची खोट्या माहितीच्या आधारे पॅरिसला तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० एप्रिलला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बॉलीवूड कॅमेरामन आरिफ, असिस्टंट कॅमेरामन राजेश पवार आणि हेयर स्टायलिस्ट फातेमा फरिद यांना अटक केली. तस्करी करण्यात येणार असलेल्या चार अल्पवयीन मुलांचा ताबा पोलिसांनी बाल सुधारगृहाला दिला आहे.

‘अल्पवयीन मुलांची पॅरिसला तस्करी करणारी गँग कार्यरत आहे,’ अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. पॅरिसला पाठवली जाणारी सर्व अल्पवयीन मुले पंजाबची असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘संबंधित अल्पवयीन मुलांचा ताबा होशियारपूर आणि कापूरथळामधील बाल सुधारगृहांना देण्यात आला आहे. पंजाबमधील एजंट अल्पवयीन मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या मुलांना परदेशी पाठवण्यासाठी तयार करायचा. बहुतांश मुलांचे पालक मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने मुलांना चांगले शिक्षण मिळेल आणि कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल, या विचाराने त्यांना परदेशात पाठवण्यास तयार व्हायचे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘तस्करी करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना पॅरिसमधील गुरुद्वाऱ्यात सोडले जायचे. त्यांच्या पासपोर्टची एजंटकडून विल्हेवाट लावली जायची. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पॅरिसमधील एजंटसोबत ओळख असावी आणि ते एजंट अल्पवयीन मुलांचा ताबा घेत असावेत,’ अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.