राज्यातील १८ जिल्ह्य़ांमध्ये शिधापत्रिकेवर दरमहा १० किलो ज्वारी पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थीना दीड रुपये प्रतिकिलो तर बीपीएल शिधापत्रिकाधारकांना ३.८५ रुपये प्रतिकिलो दराने ज्वारी दिली जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
ही ज्वारी मार्च व एप्रिल या दोन महिन्यात दिली जाणार आहे. त्यामध्ये मुंबई, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर जिल्ह्य़ांचा समावेश आहे.
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्यात ३९ हजार मे.टन ज्वारीची खरेदी करण्यात आली होती. महिला व बालकल्याण आणि शालेय शिक्षण विभागाच्या योजनांसाठी वापरूनही बरीच ज्वारी शासकीय गोदामांमध्ये शिल्लक होती. त्यामुळे आता ती शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे.